

ठाणे महापालिकेने शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकत खारेगाव येथे आपली पहिली CBSE संलग्न मोफत शाळा सुरू केली आहे. 'ठाणे महानगरपालिका क्रिस्टल हाऊस' या नावाने सुरू झालेल्या शाळेत पहिल्याच दिवशी १७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने ठाणे महापालिका आणि क्रिस्टल हाऊस इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या भागीदारीत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
शाळेच्या उद्घाटनानिमित्त महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
आधुनिक सुविधांनी सज्ज शाळा
सफायर रुग्णालयाजवळील या नव्याने विकसित करण्यात आलेल्या शाळेत विज्ञान, संगणक आणि भाषा प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा व कला उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा, लिफ्ट, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अत्याधुनिक अग्निसुरक्षा व्यवस्था उपलब्ध आहे.
शिक्षणासह गणवेश, पुस्तके आणि वाहतुकीचीही सुविधा
ठाणे महापालिका आणि क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्यातील ३० वर्षांच्या करारानुसार शाळेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी क्रिस्टल हाऊस इंडिया सांभाळणार आहे. संस्थेकडून प्रशिक्षित शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून CBSE अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, दररोजचा आहार आणि वाहतुकीची सुविधाही दिली जाणार आहे.
बारावीपर्यंत शिक्षणाची संधी
या उपक्रमाअंतर्गत पूर्व-प्राथमिकपासून बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच भविष्यात उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन, करिअर समुपदेशन आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधाही देण्याची योजना आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला शिक्षण उपआयुक्त डॉ. मिताली संचेती, उपनगर अभियंता विकास ढोले, दीपक झिंजाड, विनोद पवार, शुभांगी केसवानी तसेच क्रिस्टल हाऊस इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाण्यातील वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.