

ठाणे महानगरपालिकेने (TMC) गुरुवारी (दि.१२) शहरातील काही भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. सिद्धेश्वर जलटाकी परिसरात सुरू असलेल्या नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामामुळे हा पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी उत्खननाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान सिद्धेश्वर जलटाकीला जोडलेल्या ६०० मिमी व्यासाच्या आउटलेट पाइपलाइनवर परिणाम होत आहे.
पाणीपुरवठा बंद राहण्याची वेळ
नवीन पाइपलाइन बसवण्यासाठी सध्या असलेली पाइपलाइन हलवावी लागणार आहे. त्यामुळे (गुरुवार, दि.१२ मार्च) सकाळी ९ वाजल्यापासून ते (शुक्रवार, दि.१३ मार्च) सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद ?
उथळसर प्रभागातील, सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी परिसर, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंह नगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड आणि गोकुळनगर या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
याशिवाय नौपाडा प्रभागातील काही भागांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई आणि धोबी आळी या भागांचा समावेश आहे.
TMCचे नागरिकांना आवाहन
महापालिकेने नागरिकांना आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचे आणि बंद काळात पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
पाइपलाइनचे काम सुरळीत पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.