

ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात घडलेली धक्कादायक घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभी करतेय. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने कारमध्ये बोलावून, महिलेच्या नकळत वाढदिवसाच्या केकमध्ये गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा भयानक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी एक आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली असून दुसरा फरार आहे.
कामाच्या जाहिरातीचं आमिष आणि विश्वासघात
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेनं सोशल मीडियावर कामाची जाहिरात पाहून आरोपींशी संपर्क साधला होता. चांगलं काम मिळवून देण्याचं आश्वासन देत आरोपींनी तिचा विश्वास संपादन केला. या दरम्यानच पीडित महिला आणि आरोपी यांच्यात जवळीक निर्माण झाली.
पीडित महिला मुंबईतील कुर्ला परिसरात राहते. २५ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आरोपींनी तिला कारमध्ये बसून केक कापण्याचा प्रस्ताव दिला. वाढदिवसाच्या नावाखाली आणलेल्या केकमध्ये आरोपींनी अगोदरच गुंगी आणणारे औषध मिसळले होते. केक खाल्ल्यानंतर काही मिनिटांतच महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपींनी कार थेट ठाणे फॅमिली कोर्टाच्या पार्किंगमध्ये नेली आणि तिथेच महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
अत्याचारानंतर पीडित महिला शुद्धीवर आली तेव्हा स्वतःला नको त्या अवस्थेत पाहून ती हादरली. दोन्ही आरोपींनी तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं सांगत ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.
ब्लॅकमेलिंगनंतर धाडसाने दाखल केली तक्रार
कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने पीडितेने सुरुवातीला कुणालाही सांगितले नाही. पण आरोपींनी नंतरही तिला रस्त्यात भेटून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. शेवटी त्रस्त होऊन पीडितेने ओळखीचे वकिल आणि मैत्रिणीच्या मदतीने ५ डिसेंबर रोजी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी हिरालाल केदार यास अटक केली असून दुसरा आरोपी रवी पवार हा फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सक्रिय आहे.