

भिवंडी शहरातील कामतघर परिसरात एका २३ वर्षीय तृतीयपंथीयाने (किन्नर) प्रियकराच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी संबंधित रिक्षाचालक प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, किन्नर आणि २८ वर्षीय आरोपी रिक्षाचालक भिवंडी शहरातील रहिवासी आहेत. दोघांमध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपी त्याला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता.
त्यामुळे सततच्या छळाला कंटाळून, किन्नरने १ ऑगस्ट रोजी घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. किन्नरच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात संबंधित रिक्षाचालकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी (दि. ५) पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली.
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, किन्नर आपल्या आई आणि भावासोबत कामतघर भागात राहत असून जोगवा मागून तो आपला उदरनिर्वाह करायचा. प्रियकर त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचे समजते. आत्महत्येच्या आदल्या दिवशी किन्नरने कुटुंबीयांना प्रियकराच्या या त्रासाबद्दल आणि आत्महत्येला तोच जबाबदार असेल, असे सांगितल्याचे समोर आले आहे.