ठाणे जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र स्वरूप धारण करत आहे. शहापूर, मुरबाड तालुक्यातील अनेक गावपाड्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून सध्या १६१ गावपाड्यांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार
ठाणे जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र स्वरूप धारण करत आहे. शहापूर मुरबाड तालुक्यातील अनेक गावपाड्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून सध्या १६१ गावपाड्यांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

एकीकडे धरण परिसरात असलेली गावे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणारे ग्रामस्थ अशी विरोधाभासी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणारे तापमान आणि घटणारी पाणीसाठ्यांची पातळी यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून जलजीवन मिशन, नळपाणी पुरवठा योजना, पूरक नळपाणी योजना, विंधण विहिरी आणि कुपनलिका अशा विविध योजना राबवल्या जात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात दरवर्षी पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीसाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार
Thane : उन्हाच्या चटक्याने जिल्हा होरपळला; पाणीटंचाईने ग्रामीण भागात भीषण परिस्थिती

यंदा शहापूर तालुक्यातील १४८ गावपाड्यांना ३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर मुरबाड तालुक्यातील १३ गावपाड्यांसाठी ४ टँकर कार्यरत आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात शहापूरमधील १६४ गावपाड्यांना ४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा गावांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी पाणीटंचाईचे संकट अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामीण भागात पाणी पुरवणे बनले आव्हान

उन्हाळा आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने येत्या काही आठवड्यांत टँकरची संख्या आणि पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करणे आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in