
हिरवाई
प्रल्हाद जाधव
छोटंसं गवताचं पातं, लांबसडक सुचिपर्णी, डेरेदार वड... हा सगळा वनस्पतीसृष्टीचा बहर. या जगात बहार आणणारा. आदिम संस्कृती हा बहर जपायची, तर आधुनिक संस्कृती हा बहर खुडण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचा शोध लावत असते. अशा वेळी या बहराकडे असोशीने पाहणारी, त्याला त्याच्या रूपगंधासह समजून घेणारी ही एक वेगळीच आशिकी. झाडांसोबत इश्क झाल्याशिवाय जागतिक पर्यावरण दिनाला असाही काही अर्थ नाही.
भारतात मी जवळपास सगळ्या भागात फिरलो आहे. पण कुठेही गेलो तरी मला औत्सुक्य असतं ते तेथील झाडांचं! गाडी पुढे चाललेली असते, पण मन मात्र मागे मागे जाणाऱ्या झाडांमध्ये गुंतलेलं असतं. झाड दिसलं की ते कोणतं, त्याचं नाव काय, त्याचं वय किती यासारखे प्रश्न मला सतत पडत राहतात. सह-प्रवाशांना विचारावं तर त्यांना या विषयात काहीही रस नसतो. एखाद्या दुर्मिळ झाडाचं नाव आपणच उत्साहाने त्यांना सांगावं, तर ‘त्यात काय विशेष?’ असा चेहरा करून ते मोकळे होतात.
झाडे जमिनीवर वाढतात, जमिनीखाली पाण्यात वाढतात, पाणी आणि जमीन दोघांनाही धरून ठेवणारी कांदळवने सागरी भागात तगून असतात. झाडं जंगलात असतात, तशी वाळवंटातही असतात. हिमालयात, लडाखमध्ये आणि कच्छच्या रणातही असतात. इतकंच काय, पृथ्वीच्या बाहेरही वाढणं-बहरणं त्यांनी सोडलेलं नाही. अंतराळात फुलण्याचा पहिला मान मिळवला आहे तो झिनियाच्या फुलानेच!
झाडांच्या विविध प्रतिमा-प्रतिकांनी माणसांचं जगणं समृद्ध केलं आहे. साहित्य-कला-संस्कृतीच्या क्षेत्रात सर्वत्र त्यांचं अस्तित्व आढळतं. ‘सर्व इच्छांची पूर्तता’ या अर्थी जे प्रतीक पुढे येतं तेही कल्पवृक्षाचंच! साधुसंतांच्या वचनांतून, धार्मिक पोथ्या-पुरणातूनही झाडांचं महत्त्व सांगितलेलं आहे. मात्र असं असलं तरी आपण कथा, कविता, नाटक-चित्रपट, शिल्प, संगीत याद्वारे झाड या विषयाचा वेध घेण्याचा किती प्रयत्न करतो? झाडांची ललित आणि शास्त्रीय अंगाने माहिती देणारी किती पुस्तकं आपल्याकडे आहेत? आपण संस्कृतीचे गोडवे गातो. ‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु’ अशी प्रार्थना करतो, पण या प्रार्थनेतील ‘सर्वे’ म्हणजे फक्त माणूस नसून पशुपक्षी, प्राणी-पक्षी, वनस्पती, शेवाळ असं सारंच त्यात येतं हे आपण किती लक्षात घेतो?
झाडं ‘कार्बनडाय-ऑक्साइड’ शोषून घेतात आणि प्राणवायू सोडतात, एवढं आपल्याला माहीत. पण हीच झाडं, त्यांचं रंगरूप, पानं-फुलं, फळं, मानवी प्रतिभेच्या मशागतीसाठी आणि आविष्कारासाठी आवश्यक जीवनरसही पुरवत असतात हे किती लक्षात घेतो?
माणूस प्रगतीच्या खूप गप्पा मारतो, पण आजही त्याला ॲमेझॉनच्या जंगलातील सगळीच्या सगळी झाडं, वेली, वनस्पती, पशुपक्षी यांचं वर्गीकरण करून त्यांची नावं निश्चित करणं शक्य झालेलं नाही. ॲमेझॉन कशाला; पश्चिम घाटात फिरायला गेलो तरी तेथील अनेक झाडं, वेली, शेवाळ, वेगवेगळ्या प्रकारचं गवत आपल्याला अनेक कोडी घालत राहतं. तेही कशाला, आजूबाजूच्या गावातील एखाद्या देवराईत गेलो तरी तेथील अनेक झाडं-वेलींची नावं आपल्याला नीट सांगता येत नाहीत. वड-पिंपळ, आवळा-जांभूळ, आंबा-चिंच या पलीकडे आपली उडी जात नाही.
‘मोहरलेला आम्रवृक्ष’ हा महाराष्ट्राचा ‘राज्यवृक्ष’ आहे हे अनेकांना माहीत नसतं. शिरीष आणि ‘रेन ट्री’ ही झाडं मुंबईत जागोजागी दिसतात. दोन्ही दिसायला सारखी. पण या दोन झाडांमधील फरक अनेकांना सांगता येत नाही.
मीसुद्धा ही दोन्ही झाडं एकच आहेच, असंच काल-परवापर्यंत मानायचो. शिरीष भारतीय, तर रेन ट्री अमेरिकन. शिरीषाची पानं लहान, तर ‘रेन ट्री’ची मोठी. हा फरक नंतर कळला.
उत्तरेतील ‘चिनार’ आणि ‘मेपल’ या दोन झाडांच्या बाबतही अनेकांचा गोंधळ होतो. ही झाडे दिसायला सारखी असली तरी त्यांच्यात फरक असतो. मेपलची पाने लहान तर चिनारची मोठी. चिनार हिमालयाला जवळचा तर मेपल युरोप-अमेरिकेतला! काश्मीरमध्ये फिरताना पावलोपावली चिनार दिसतो. उन्हाळ्यात त्याची पाने हिरवी, तर हिवाळ्यात लाल होतात. चिनार लाल झाल्यावर काश्मीर बदलून जातं. माणसाची प्रतिभा बहरावी तशी लाल चिनाराच्या रूपाने जणू काश्मिरी भूमीची प्रतिभा बहरते!
हिमाचल प्रदेशात ‘पॉप्लर’ आणि ‘विलो’ ही झाडं जागोजागी दिसतात. एक उंच, दुसरं बुटकं! पॉप्लरच्या झाडापासून क्रिकेटच्या बॅटी आणि फर्निचर तयार होतं, एवढंच आपल्याला माहीत. पण त्याच्या विविध ऋतूतील रूप-रंगाविषयी कोणी काही बोलत नाही. विलोच्या झुबकेदार झाडाखाली प्रियकराच्या प्रतीक्षेत झुरत बसलेल्या नायिकेच्या गोष्टी जागतिक साहित्यात खूप वाचल्या जातात, पण ते झाड नेमकं कसं असतं हे समजून घेण्याच्या फंदात कोणीही पडत नाही.
उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल, मेघालय, आसाम या भागात सूचिपर्णी अर्थात पाईन आणि देवदारची घनदाट जंगलं आहेत. धरमशाला येथून खज्जीयारकडे जाताना डोळ्यात मावणार नाहीत इतके पाईन आणि देवदार वृक्ष नजरेस पडतात. या दोन झाडांत फरक काय असं विचारलं, तर अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव असतात. या वृक्षांनी आपल्या रहिवासासाठी त्या भागातील पर्वतरांगा जणू वाटून घेतल्या आहेत, असं वाटतं. त्यांची किती रूपं नजरेत भरून घ्यावीत? काही नुकतीच जन्माला आलेल्या अर्भकासारखी, काही लहान, काही मोठी, काही प्रौढ, काही मित्र-मैत्रिणींसारखी, काही आजोबा-नातवांसारखी, काही प्रियकर-प्रेयसीसारखी तर, काही आई-मुलीसारखी! उंचावरून खाली पाईनचे ‘बालवृक्ष’ पाहताना त्यांच्या जावळावरून हात फिरवावा असं मनात येतं.
प्रवासात गर्द झाडांच्या आच्छादनाखालून गाडी जात असताना स्वच्छ डांबरी रस्त्यावर पडलेल्या आणि मागे मागे जाणाऱ्या झाडांच्या सावल्या म्हणजे जणू साक्षात्काराची चित्रलिपी! ती अक्षरे गिरवायची नसतात तर मनाच्या पाटीवर कोरून ठेवायची असतात. एखाद्या प्रवासात सकाळी सकाळी पर्वतरांगांमधील जाड धुक्याचा पडदा आलेली आणि घनदाट वृक्षवेलींच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी तयार केलेली अद्भुत शाल निसर्गाने आपल्या अंगावर घातली की जगण्याचं सार्थक झालं हे समजून घ्यायचं.
झाडांना चालता येत नाही, असं म्हणतात. पण बीज-प्रसाराच्या रूपाने ती जगभर फिरत असतात. कच्छच्या रणात धोलाविरा हे अश्मिभूत गाव पहायला गेलो होतो. गावात शिरताना तोंडाशीच पिवळ्या फुलांनी बहरलेले बाभळीचे झाड पाहून सोलापुरात फिरतोय की काय, असं वाटलं होतं... परदेशातील अनेक झाडं भारतात रस्त्यारस्त्यांवर आणि जंगलात दिसत राहतात. पश्चिम घाटात फिरताना जंगलात अधूनमधून लालभडक फुलांचं एक झाड दिसायचं. माहिती घेतली तर ते ‘आफ्रिकन ट्युलिप’ निघाले. गुलमोहर, बहावा ही सुद्धा आपल्याकडे परदेशातून आलेली झाडं. नीर-फणसाच्या (ब्रेड फ्रूट ट्री) गुबगुबीत फळाची भाजी होते, हे आपल्याला माहीत असतं, पण ते झाड कॅप्टन कुक यांनी भारतात आणलं, हे अनेकांना माहीत नसतं. हिमालयात फिरताना लाल-गुलाबी रंगाची फुलं असणारी अनेक झाडं दिसतात, ती सारी ऱ्होडेडेंड्रॉन या प्रकारात मोडणारी.
दोन-दोनशे फूट उंचीची आकाशात जाऊ पाहणारी झाडं पाहिली की मुळांकडून इतक्या उंचीवर पाणी आणि अन्य जीवनरस कसा पोचत असेल याचंच आश्चर्य वाटतं. पण एका ठिकाणी समूहाने उभी असलेली झाडं दूरवर एकाकी पडलेल्या आपल्या नात्यातील दुसऱ्या एखाद्या झाडाशी जमिनीखालून संपर्क साधत, त्याला जीवनरस पुरवत त्याचे ‘औषधपाणी’ करतात हेही सिद्ध झालं आहे.
पाच-पाच हजार वर्षं वयाची झाडं आजही जिवंत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुवक्कराई इथे अश्मिभूत वृक्षांचं उद्यान (फॉसिल वूड पार्क) पाहायला गेलो होतो. कित्येक कोटी वर्षांपूर्वी अश्मिभूत झालेल्या झाडांचे अवशेष तिथे जतन करून ठेवले आहेत. झाडांचा जन्म कित्येक कोटी वर्षांपूर्वीचा, तर माणूस हा अलीकडे उत्क्रांत झालेला प्राणी! पण तरी तो झाडावर घाव घालायला जराही कचरत नाही; हे कसं?
झाड तोडण्यापूर्वी त्याची पूजा करण्याचा संकेत अनेक ठिकाणी आहे. एके ठिकाणी गावकरी त्या झाडाच्या बाजूला पाण्याने भरलेलं भांडं ठेवतात. तोडल्या जाणाऱ्या झाडाच्या किंकाळ्या त्या भांड्यातील पाणी शोषून घेतं असं मानलं जातं. एका आदिवासी जमातीतील प्रथेनुसार जे झाड तोडायचं आहे तिथे जमून आदिवासी त्या झाडाला शिव्या देतात. मग अपमानित होऊन ते स्वतःहून प्राण सोडतं; असं मानलं जातं. छोटेमोठे देवदार मिठीत घेऊन त्यांना जीवदान देणाऱ्या चिपको आंदोलनातील निरक्षर, अडाणी स्त्रियांची उदाहरणं तर ताजी आहेत... या अशा कथांचे, घटनांचे अर्थ आपण कधी लक्षात घेणार?
झाडांना माणसांशी बोलता येत नाही, असं म्हणतात. पण खरं तर झाडं माणसांशी बोलायला सदैव उत्सुक असतात. कविवर्य गुलजार आपल्या ‘दरख्त’ (झाड) या कवितेत म्हणतात,
“सोचते हैं जब तो फूल आते हैं
वो धूप में डुबोके उंगलियां
खयाल लिखते हैं लचकती शाखों पर
तोह रंग-रंग लफ़्ज चुनते हैं
खुशबुओं से बोलते हैं ओर बुलाते हैं...”
कविता इथेच थांबत नाही.
त्यांनी केलेला कवितेचा शेवट पहा -
“हमारा शौक़ देखिये
कि गर्दनें ही काट लेते हैं
जहां कहीं महकता है कोई...”
कोणी फुलायला लागला की त्याला तोडायचं एवढंच आपल्याला माहीत! झाडंच नाही, तर जीवनाच्या इतरही क्षेत्रात कुठे काही ‘फुलोरा’ येताना दिसला की तो छाटून टाकण्यासाठी आपल्याकडे अनेक तलवारी लगेच बाहेर येताना दिसतात!
निवृत्त सनदी अधिकारी व ललित लेखक
pralhadjadhav.one@gmail.com