डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मेष
सरकारी कामे होतील
मेष राशीचे चिन्ह म्हणजे मेंढा होय. सरळ धडक मारण्याची प्रवृत्ती. त्याचप्रमाणे निकराची लढत देणे हे मेंढ्याच्या अंगातील नैसर्गिक गुण आहे. हे गुण मेष राशीच्या व्यक्तींमध्ये आढळतात. ही राशी अल्प प्रसव राशी आहे. त्याचप्रमाणे मेष रास ही अग्नितत्त्वाची रास असून मूळ त्रिकोण राशी मंगळाची आहे. दशम भावात ही रास बलवान असते. त्याचप्रमाणे मेष रास रात्री बली रास आहे.
शिक्षण : शिक्षणासाठी सदरचा कालावधी अत्यंत उपयुक्त आहे तसेच अनुकूलसुद्धा आहे. शिक्षण क्षेत्रातल्या कोणत्याही शिक्षणासाठी या कालावधीचा उपयोग होईल. विशेषतः टेक्निकल क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. इतर क्षेत्रात मात्र आपणास जास्त परिश्रम घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे योग्य दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कला व क्रीडा क्षेत्रातील चांगले यश लागू शकते. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकतात. परदेशासंबंधीच्या शिक्षणासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश प्राप्त होईल.
पारिवारिक : या कालावधीच्या पूर्वर्धामध्ये जनसंपर्कातून महत्त्वाच्या कामांची परिपूर्तता करू शकाल. आतापर्यंत जी अर्धवट कामे राहिली होती ती या कालावधीमध्ये आपण पूर्ण करू शकाल. काही नवीन ओळखी होतील. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. आतापर्यंत विवाह ठरण्यामधील ज्या अडचणी येत होत्या त्या दूर होतील. वर्धक बलवत्तर असे विवाह योग आहेत. कुटुंबात एखादे मंगलकार्य ठरेल किंवा होईल. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यसुद्धा होऊ शकते. त्यासाठी खर्च करू शकाल. कुटुंबातील महिला वर्गामध्ये कामाच्या संदर्भात धावपळ होऊ शकते. उत्तरार्धात कोर्टविषयक कामातून मोठी गती मिळू शकते. आपल्या बाजूने कोर्टाचे निकाल लागू शकतात. एकूणच कुटुंबातील वातावरण चांगले व अनुकूल राहील.
नोकरी, व्यवसाय, धंदा : आपल्या कार्यक्षेत्रातील रखडलेली सरकारी कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. ही कामे पूर्ण करण्यासाठी वेळ व पैसा दोन्हीही खर्च होऊ शकतो. परंतु महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. कोर्टकचेरीतली कामे आपल्या बाजूने पूर्ण झाल्यामुळे आनंदात राहाल. स्थायी संपत्ती, जमीनजुमला याविषयी रखडलेले व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. नोकरीच्या ठिकाणी काही वेळेस वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या मताला ताब्यात ठेवणे हिताचे ठरेल तसेच वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या. वादविवाद नको. व्यवसाय-धंद्यातील उधारी वसूल होईल. त्यामुळे आपण आपली उधारी चुकती करू शकाल. कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल अथवा उपयोगी पडेल. कलाकार, खेळाडूंचे मोठे भाग्योदय होतील. नवनवीन संधी उपलब्ध होतील. आपले कर्तृत्व त्यांना सिद्ध करता येईल.
शुभ दिनांक : 6, 7, 9, 10, 11, 14, 17, 19, 20, 22, 28
अशुभ दिनांक : 2, 5, 13, 16, 18, 21, 23, 30, 31
वृषभ
समस्या सुटतील
वृषभ राशीचे चिन्ह बैल आहे. खूप परिश्रम करण्याची वृत्ती असते. सोशिकपणा स्वभावातच असतो. परंतु सतत काम करण्याची धमक असते. ते दीर्घोद्योगी असतात. हे नैसर्गिक गुण वृषभ राशीच्या जातकांमध्ये आढळतात. वृषभ रास ही मध्यम प्रसव राशी आहे. तशीच ही रास पृथ्वी तत्त्वाची आहे. शुक्राची अर्थत्वाची राशी आहे. वृषभ रास दशम भावात बलवान होणारी राशी आहे. वृषभ रास ही रात्री बली रास आहे.
शिक्षण : सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी आपणास अनुकूलता जाणवणार आहे. उत्तम यश पदरी पाडता येईल. पण त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे व परिश्रम घेणे गरजेचे आहे. आळस झटका. इतरांचे मार्गदर्शन लाभेल. त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास चांगले यश मिळेल. स्पर्धात्मक यश मिळवू शकाल. स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल, कला व क्रीडा क्षेत्रातही आपणास चांगले यश मिळेल. चांगल्या संधी मिळतील. परदेशासंबंधी शिक्षणासाठी केलेल्या किंवा घेतल्या गेलेल्या कष्टाला फळ मिळेल. अपेक्षित यश प्राप्त होईल, पण कोणतेही निर्णय घाईगर्दीमध्ये घेऊ नये. शांतपणे परीक्षा देणे महत्त्वाचे ठरेल. इतर कोणतेही विचार मनामध्ये नकोत. इतर विचार केले गेल्याने मनाचा गोंधळ होऊ शकतो. शांतपणे व एकाग्रतेने अभ्यास करणे गरजेचे आहे.
पारिवारिक : सदरच्या काळामध्ये आपण हातात घेतलेली कामे सतत यशस्वी झाल्यामुळे प्रचंड ऊर्जा राहील. उत्साहाने नवीन कार्य हाती घ्याल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. परिवारातील तरुण-तरुणींच्या नोकरीविषयक दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील तसेच घरातील प्रिय व्यक्तींच्या चिंता दूर होतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. एखाद्या धार्मिक कार्याचे नियोजन होऊ शकते. नातेवाईकांचे साह्य मिळेल. महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये यश साध्य कराल. विक्रमी यश मिळेल. परंतु जीवनामध्ये असंगांशी संग टाळा. नाहीतर रंगाचा बेरंग होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विशेषतः स्त्रीवर्गाशी सौजन्याने वागा, विनयशीलता ठेवा.
नोकरी, व्यवसाय, धंदा : आत्तापर्यंत आपण ज्या समस्या अथवा प्रश्न सुटण्याची वाट बघत होता ते प्रश्न सुटून मार्गस्थ होतील. विशेषतः दीर्घकाळ रखडलेली मालमत्ता तसेच जमीनजुमलाविषयक कामे अर्धवट स्वरूपात राहिलेली होती ती मार्गस्थ होतील. त्यातून चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो, तसेच वडिलोपार्जित संपत्तीबद्दल असलेले वादविवाद संपुष्टात येतील. मागील काही काळात आलेले ताणतणाव पूर्णपणे निवळल्याकारणाने आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास व निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे. आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा व आत्मविश्वास असेल. आपला दृष्टिकोनही सकारात्मक असेल. नशिबाची आपणास उत्तम साथ मिळणार आहे. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.
व्यावसायिक अथवा व्यक्तिगत कारणांमुळे जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवास फलदायी ठरतील. व्यवसाय-धंद्यामध्ये कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे आपणास अधिक उत्पन्न मिळणार आहे. व्यावसायिक उलाढाल वाढवून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. कार्यक्षेत्रात प्रगती होताना दिसेल. आपण आपली गुंतवणूक हुशारीने करू शकाल. तुमच्या व्यावसायिक व कौटुंबिक आयुष्यात आनंद व प्रगती होईल.
शुभ दिनांक : 9,10,11,17,19,24,25,26
अशुभ दिनांक : 2, 5, 13, 16, 18, 21, 23, 30, 31