राशीभविष्य

ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑगस्ट महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

सिंह

मानसन्मानाचे योग

सिंह या राशीचे चिन्ह वनाचा राजा सिंह आहे. सिंह म्हणजे औदार्य, अधिकार, लालसा त्याचप्रमाणे सत्तेचा लोभ, कर्तृत्व, स्वावलंबित्व व राजेपणा हे सिंहाचे जन्मजात असलेले गुण सिंह राशीच्या जातकामध्ये दिसतात. सिंह रास बलवान असणाऱ्या जातकांमध्ये असते. इतरांनी आपल्या ताब्यात असावे, आपले नेतृत्व स्वीकारावे, अशी प्रवृत्ती निसर्गातच या राशींच्या जातकांमध्ये असते, तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्वही असते. सिंह रास ही वंद्या रास आहे. त्याचप्रमाणे ही अग्नितत्त्वाची रास आहे. सिंह रास ही दशम भावात बलवान होते. सिंह रास ही दिवसा बलवान असते.

शिक्षण : सध्याच्या कालावधीमध्ये काही शुभ ग्रहांची हवी तशी साथ आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे अपेक्षित यश थोडे लांब जाईल, तरीसुद्धा तुमचे योग्य प्रयत्न चांगले यश मिळवून देतील. प्रयत्नात सातत्य हवे, तुमचे आत्मिक बल व बौद्धिक कौशल्य चांगले राहिल्याने त्याचा फायदा आपल्याला होईल. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच बाबींमध्ये आपल्याला यश मिळू शकते. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले यश लाभेल. परदेशातील शिक्षणासाठी चांगले ग्रहण आहे. आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातून तसेच गुरुजनांकडून आपल्याला सहकार्य तसेच मार्गदर्शन मिळू शकते.

पारिवारिक : कुटुंबात चांगले व आनंदी वातावरण असावे यासाठी आपण सदोदित प्रयत्नशील राहाल. आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. त्यासाठी तुमचे संवादकौशल्य उपयोगी पडणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये असलेले मतभेद भेटवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहात. त्यामुळे कुटुंबातील शांतता टिकून राहील. आर्थिक बाब ही मजबूत राहिल्या कारणाने खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. स्वतःसाठी अथवा घरातील सदस्यांसाठी मुक्तहस्ते खर्च करू शकाल. आपल्याला स्वतःला त्यामुळे एक प्रकारचे समाधान मिळेल. आनंदासाठी खर्च होईल. कौटुंबिक बहुतेक जबाबदाऱ्या आपण आपल्या कौशल्याने पूर्ण करू शकाल.

नोकरी, व्यवसाय, धंदा : या कालावधीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या सभासमारंभाची आमंत्रण मिळू शकतात. या समारंभापैकी काही ठिकाणी आपण मानाचे स्थान भूषवू शकाल. आपल्याला सामाजिक तसेच धार्मिक कार्यात विशेष रस निर्माण होईल. त्यासाठी आपण स्वखर्चही करा. सहकुटुंब एखादा धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल. समाजातून आपल्याला निरनिराळे मानसन्मान मिळतील. समाजातील प्रभावशाली व्यक्तींच्या सहवासात याल. त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर मदत मिळेल. आपण आपल्या कार्यक्षेत्रात नोकरीत-व्यवसाय-धंद्यात प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकणार आहात. आपण आपल्या आत्मविश्वासाने व ऊर्जेने आपल्याला कार्यात झोकून देऊन आपली कार्य पूर्ण करणार आहात. व्यवसाय, धंद्यामध्ये आपल्याला भागीदाराचे पूर्णपणे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक : 6, 7, 9, 10, 11, 14, 17, 19, 24,25,26,27

अशुभ दिनांक: 2, 5, 13, 16, 18, 21, 23, 30, 31

कन्या

अपेक्षित घटना घटित होतील

कन्या राशीचे चिन्ह मुलगी आहे. ही मुलगी बारा वर्षांची आहे व ती नावेत बसलेली आहे. तिच्या एका हातात कणीस व दुसऱ्या हातात अग्नी किंवा दिवा आहे. या कन्येच्या अंगात व्यवस्थितपणा व नीटनेटकेपणा तसेच व्यवहार कुशलता हिशोबीपणा, मोहक सौंदर्य, रेखीव व प्रमाणशीर अवयव रचना, चौकसपणा, शालिनता, धान्य संग्रहाची आवड, दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्याची उत्सुकता, दुसऱ्याचे पोषण करण्याची कळकळ असे प्रमुख गुण कन्या राशीच्या जातकांमध्ये असतात. ही वंध्य राशी आहे व अर्थ तत्त्वाची ही रास असून ही रास लग्नभावात बलवान असते. या राशीचा समय बल दिवस आहे.

शिक्षण : शिक्षणासाठी ग्रहमानाची चांगली साथ आपल्याला लाभणार असल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्व विभागांमध्ये आपल्याला यश लाभेल. त्या दृष्टिकोनातून योग्य प्रयत्न व परिश्रम घेतल्यास आपल्याला यश मिळू शकते. काही वेळेस आपल्याला इतरांकडून मार्गदर्शन घेण्याची गरज भासू शकते. असे मार्गदर्शन आपल्याला फायद्याचे राहील. तरीसुद्धा आपणास अभ्यासासाठी आपले मन केंद्रित करायला किंवा आळस न करता आपले प्रयत्न नितांत चालू ठेवावेत. सर्वच क्षेत्रातील अभ्यासासाठी प्रामाणिकपणा आवश्यक आहे. कला व क्रीडा क्षेत्रात यश समाधानकारक मिळू शकते परदेशासंबंधी शिक्षणात आपल्या बुद्धिमत्तेची चमक दिसून येईल. त्यामुळे यश मिळेल. उच्च शिक्षण घेऊ शकाल.

पारिवारिक : आपल्या कार्यक्षेत्रात तसेच आपल्या कुटुंबात आपल्याला सध्याच्या काळामध्ये जास्त लक्ष द्यावयास हवे. स्वतंत्र जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्या आपण योग्य तहेने पूर्ण करू शकाल. आपल्या कार्यक्षेत्रातील वाढत्या कार्यामुळे आपल्याला वेळेचे नियोजन करावे लागेल ते आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडेल. इतरांची मदत घ्यायला हरकत नाही. ती मदत मिळू शकते. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आपल्याला वाढत्या प्रमाणात सहकार्य मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्यामुळे सर्वच जबाबदाऱ्या आपण पेलू शकाल. मुला-मुलींसाठी विशेष खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य होऊ शकते अथवा त्याचे नियोजन होऊ शकते. सहकुटुंब प्रवासाचे योग आहेत. शांत व उत्साही वातावरणाचा लाभ मिळेल.

नोकरी, व्यवसाय, धंदा : पूर्वी केलेल्या नियोजनातून प्रत्यक्ष फायदा मिळण्यास सुरुवात होईल. परंतु काही वेळा अनपेक्षित घटना घडल्यामुळे नियोजनात बदल घडवावा लागेल. धावपळ होण्याची शक्यता आहे. काही निर्णय बदलावे लागतील. व्यवसाय, धंद्यामध्ये स्पर्धक बलवान होतील, त्याचप्रमाणे शत्रूहित डोके वर काढू शकतात, त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवणे गरजेचे राहील, तसेच कुटुंबात गैरसमज टाळा, पूर्वी केलेली गुंतवणूक फलदायी ठरवून त्यातून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.

शुभ दिनांक : 6,7,9,17,19,25,26,28

अशुभ दिनांक : 2, 5, 13, 16, 18, 21, 23, 30, 31

पावसाने चकवले; एल निनोचे अंदाज फसले, मुंबईत दोन महिन्यांत ८३ टक्के पाऊस

रस्त्यावर उतरल्याने उबाठाला मिळाले बळ...

आजचे राशिभविष्य, ३ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

घशात खवखव आणि गिळताना त्रास होतोय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

स्किनकेअर प्रॉडक्ट्स लावताना 'या' चुका करू नका; तज्ज्ञांनी सांगितले योग्य कॉम्बिनेशन