मे महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य 
राशीभविष्य

मे महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे मे महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

सिंह

वैयक्तिक मानसन्मानाचा कालावधी

उग्र चेहरा, हनुवटीचा भाग स्थूल, मोठे मुख, पिंगट डोळे, दात मजबूत, छाती रुंद व भरदार, कपाळ विस्तीर्ण, नाक नकटे, छाती पुढे काढून चालणारा, इतरांची परवा न करणारा, गंभीर व कमी बोलणारा, किल्ले, राजधानीची ठिकाणे, पर्वत, प्रदेश येथे निवास करणारा, विद्या साधारण, परंतु प्रख्यात तालीमबाज, वर्ण काळा किंवा सावळा, आवाज मोठा, घरीदारी प्रामुख्याने वागणारा, अधिकाराची आवड असणारा, अंमलदार, साहसी, धैर्यवान, स्त्रीद्रेष्ठा, मासाभिलाषी, त्वरित राग येणारा, भूक, तहान यांनी पिडलेला, चिंतातूर, वृद्धपणी दंतरोगी असणारा, उदार, अभिमानी, मातृभक्त, शेतीची विशेष आवड असणारा, शृंगारात न गुंतणारा, साधुजनांशी नम्र, अशी सिंह राशीची विशेष लक्षणे आहेत.

शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल कालावधी आहे. मात्र बेसावध राहून चालणार नाही किंवा गृहीत धरून चालणार नाही. शिक्षणासाठी योग्य ते प्रयत्न वस्तुस्थितीचा विचार करून करणे फायदेशीर ठरेल. आपण उज्ज्वल यशाची पायरी चढू शकाल. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळू शकते. अभ्यासासाठी अनुकूल वातावरण राहील. मन एकाग्र राहू शकते. या संधीचा फायदा घ्या. परदेशी शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील. एकूणच हा कालावधी शिक्षणासाठी अनुकूल ठरू शकतो. त्या संधीचा फायदा घ्या. खेळाडूंना सुद्धा आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. कला व क्रीडा क्षेत्रात अनुकूल कालावधी आहे.

पारिवारिक : या कालावधीच्या सुरुवातीला विचित्र प्रसंगातून जावे लागण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. वाहने जपून चालवा. उद्योग, व्यवसायात थोडे चढ-उत्तर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.

नियोजनात काही वेळेस अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्व निर्णय शांतपणे व पूर्ण विचारांती घ्या. नोकरीमध्ये मात्र बढतीच्या संधी प्राप्त होतील. अंगिकृत कार्यात यश मिळेल. नव्या ओळखीतून लाभ मिळतील. सरकारी कामासाठी अनुकूलता असल्यामुळे मोठी कामे होतील. आर्थिक गुंतवणूक फलदायी राहील, मात्र तडकाफडकी निर्णय घेणे टाळा. सहकुटुंब प्रवासातून आनंद देणाऱ्या घटना घडतील. चिंता सतावू शकते, मात्र वैयक्तिक मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यामध्ये विशेष रस उत्पन्न होईल.

नोकरी, व्यवसाय, धंदा : हा महिना आपल्याला तसा संमिश्र घटनांचा आहे. काही वेळेस मनाविरुद्ध निर्णय स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या कार्यक्षेत्रातील तसेच आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींशी वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे वादविवाद निर्माण होणाऱ्या लहान-मोठ्या प्रसंगांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. व्यावसायिक परिस्थिती चांगली राहील. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. स्थावर संपत्ती, जमीन इत्यादी संबंधीची कामे गतिमान होऊन पूर्णत्वाच्या वाटेवर असतील. इतरांच्या वादविवादात भाग घेऊ नका. स्वतःच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेणेकुटुंब परिवारात सतत सुवार्ता मिळतील.

शुभ दिनांक : ३, ६, ७, ११, १८, १९, २४, २९
अशुभ दिनांक : २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०

कन्या

पती अथवा पत्नीचा भाग्योदय होईल

संतुलित राहणे, आळसात चालणे, मान वाकडी करून चालणारा, चालताना हात फार हलवणारा, चेहरा रुंद, उंची मध्यम, चाल हत्तीसारखी, स्त्रियांची लक्षणे विशेष, सुकुमार, कलानिपुण, रतिप्रिय, परगृह, परधन यांचा उपभोग घेणारा, भाषणप्रिय, बहुधा निर्व्यसनी, पवित्र वर्तनाची आवड असणारा, लोकोपयोगी कामे करणारा, सामाजिक कार्यक्रम घेणारा तसेच धार्मिक कार्याची आवड असणारा, ललित कला संपन्न काव्याचा भोक्ता, जुन्या पद्धतीचे वर्तन विशेष प्रिय असणारा, दयाळू, देशाटन करणारा, नेहमी आनंदी व हसत बोलणारा, चांगल्या पदार्थांच्या सेवनाची आवड असणारा, पोशाखाची विशेष टापटीप न ठेवणारा बेशिस्त विद्वान लोकांशी परिचय ठेवणारा, कमी काळजी करणारा, साधारणतः विद्वान, शास्त्र व्यासंगी, वात-कफाचे प्राबल्य शरीरात विशेष असणारा अशी कन्या राशीची काही ठळक वैशिष्ट्ये.

शिक्षण : शिक्षणामध्ये सदरच्या कालावधीमध्ये सहजासहजी यश मिळणे अवघड आहे. म्हणजेच अपेक्षित यश साध्य करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्नांची व त्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. इतरत्र कुठेही वेळ वाया न घालवता आपण तो वेळ अभ्यासासाठी दिल्यास यश मिळवू शकता हे लक्षात ठेवावे. त्याचप्रमाणे कुसंगतीपासून दूर राहावे हे आपल्या हिताचे ठरेल. इतरत्र लक्ष कमी करावे व अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला त्याचा उपयोग होऊन यश प्राप्त होईल.

पारिवारिक : कुटुंबातील सदस्यांपैकी कोणाच्या आजार अथवा शस्त्रक्रियेच्या प्रसंगामुळे धावपळ होऊ शकते. त्याचप्रमाणे खर्चात वाढ होऊ शकते. काही काळ चिंतायुक्त वातावरण कुटुंबात राहण्याची शक्यता आहे, मात्र व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये काही वेळेस मनाविरुद्ध घटना घडतील, मात्र संततीबाबतीत चांगल्या घटना घडतील. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे वाहने काळजीपूर्वक चालवावीत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्राखाली व्यावसायिक गाठीभेटी होऊन नवीन करार होण्याची शक्यता आहे. काही फायद्याचे सौदे हाती येतील. कुटुंबातील तरुणांना तसेच तरुणींना अनुकूल ग्रहमान असल्यामुळे त्यांचे प्रश्न सुटतील. कुटुंबातील पती अथवा पत्नीचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे.

नोकरी, व्यवसाय, धंदा : कुटुंबातील परिस्थिती काही वेळा बदललेली आढळून येईल. कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून आहे त्या समस्येवर मार्ग काढू शकाल. वादविवाद होऊ देऊ नका. वादविवादांचे कलहसदृश स्वरूपात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे आप्तेष्ट, नातेवाईक यांच्याशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. वेळप्रसंगी माघार घ्यायला हरकत नाही. त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना सर्व प्रकारची सावधानता बाळगणे गरजेचे आहे. परिस्थिती पडताळून पाहण्याची गरज आहे.

शुभ दिनांक : ३, ६, ७, ९, १३, १८, १९, २१, २४, २५, २८
अशुभ दिनांक : २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०

आजचे राशिभविष्य, ३ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Sunday special : कोळंबीप्रेमींसाठी खास ट्रीट! तंदूरशिवाय घरीच बनवा झणझणीत 'तंदूरी प्रॉन्स'

Kitchen Tips : 'अशी' तयारी असेल तर स्वयंपाक होईल झटपट; महिलांसाठी स्मार्ट किचन टिप्स

माठातलं पाणी किती दिवसांनी बदलावं? उन्हाळ्यात 'ही' चूक टाळली नाही तर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळी चहा-कॉफीशिवायही मिळू शकते भरपूर एनर्जी; न्यूट्रिशनिस्टने सांगितले ६ हेल्दी पर्याय