डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मिथुन
मौल्यवान वस्तू सांभाळा
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. मिथुन रास असलेल्या जातकांची बुद्धी सर्वगामी असते. यांची वृत्ती आनंदी परंतु अस्थिर असते. स्वतःचा कमीपणा अथवा दोष झाकण्याचे चातुर्य यांच्यामध्ये चांगले असते. बुध हा पाऱ्याप्रमाणे असतो. पारा हा द्रव पदार्थ आहे, पाण्यासारखा गुण याच्यामध्ये आहे, पण तो दिसतो चांदीसारखा. त्याचबरोबर तो विषारीही आहे आणि चपळ आहे. बुद्धिमत्ता हा विशेषत्वाने जाणवणारा गुण या राशीच्या जातकांमध्ये दिसून येतो. मिथुन राशीच्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान व संवादचतुर असतात. बदलत्या परिस्थितीनुसार वागण्यासाठी त्या प्रसिद्ध असतात; ती कला त्यांच्यामध्ये असते. त्यांच्यात तारतम्यभाव आढळून येतो. एखादी गोष्ट जशीच्या तशी आठवणे हे यांचे वैशिष्ट्य मानले जाते. अर्थात पत्रिकेमध्ये चंद्र व बुध दोन्हीही सुस्थितीत व शुभ हवेत, अन्यथा याच्या विरुद्ध गुण मिथुन राशीच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात; जसे की कमी बुद्धी, विसरभोळेपणा वगैरे.
शिक्षण: शिक्षणासाठी हा कालावधी मिथुन राशीच्या जातकांसाठी चांगला आहे. विशेषतः कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ जास्त अनुकूल ठरू शकतो. आज ग्रहमानाची चांगली साथ मिळणार असल्यामुळे मिळालेल्या संधीचा उत्तम फायदा आपल्याला मिळू शकतो. स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित यश प्राप्त होईल. परदेशातील शिक्षणात चांगले यश मिळेल. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास प्रयत्नांना सफलता मिळेल; परंतु आपल्याला प्रामाणिकपणे परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागेल.
पारिवारिक: कुटुंब-परिवारातील सदस्यांच्या आरोग्याकडे तसेच स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणे महत्त्वाचे ठरू शकते. वेळेवरच उपचार घ्या, म्हणजे पुढील धावपळ टळू शकेल. पथ्यपाणी व्यवस्थित पाळा. स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड होईल असे काहीही करू नका. आहार, विहार आणि उपचार यांवर नीट लक्ष ठेवा. वेळा पाळा, शिस्त पाळा तसेच शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, किमती वस्तू व वाहने यांना काळजीपूर्वक हाताळा. चोरी होणे किंवा गहाळ होणे इत्यादी नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सावध राहा. कुटुंब-परिवारातील तरुण-तरुणींना मोठ्या संधी मिळू शकतात.
नोकरी, व्यवसाय व धंदा : चालू नोकरीमध्ये अनुकूलता दिसून येईल. अपेक्षित घटना घडतील. आजपर्यंत केलेल्या कामाचे व घेतलेल्या परिश्रमाचे उत्कृष्ट फळ मिळेल. पदोन्नती अथवा वेतनवाढ होईल, मात्र बदलीची शक्यता आहे. स्थानबदल होऊ शकतो किंवा कामाच्या स्वरूपात बदल घडण्याची शक्यता आहे. ज्या जातकांना नोकरी नाही, अशा जातकांना नोकरी मिळू शकते; त्यांचा नोकरीचा शोध संपुष्टात येईल. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पस मधून नोकरीविषयक मुलाखती देता येतील व त्यात यश प्राप्त होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. कुटुंब-परिवारातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील, मात्र त्यांनी कुसंगत टाळणे महत्त्वाचे राहील.
त्याचप्रमाणे वाहन चालवताना दक्ष राहणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळा व दुखापतींपासून दूर राहा.
सदरचा कालावधी चांगला राहणार आहे. आपण आपली अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करू शकाल. विशेषतः जमीन-जुमला, स्थावर संपत्ती व वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी क्षेत्रांतील अर्धवट राहिलेली कामे अथवा व्यवहार पूर्ण करू शकाल. त्यातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. यामुळे आपल्यातील आत्मविश्वास वाढणार आहे.
शुभ दिनांक : २,५,१२,१३,१९,२०,२४,२५,२८
अशुभ दिनांक : १,३,९,१०,११,१५,३०
कर्क
मंगल कार्य घडेल
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचा स्वभाव चंचल आहे. जलद प्रवास करणे, मनोराज्य करणे व त्यातच रमणे, उतावळेपणा करणे असे गुण या राशीत आढळतात. चेतना, स्फूर्ती, घर व कुटुंब याविषयी आत्मीयता, प्रेमळपणा, व्यवहारी कल्पना, खबरदारी घेणे, सावधगिरी, काटकसर, दुसऱ्याचे विचार ऐकून घेण्याची वृत्ती आणि चंचलतेमुळे धरसोड वृत्ती इत्यादी वैशिष्ट्ये या राशीत आढळतात.
दुसऱ्या व्यक्तीवर छाप पाडण्याची अथवा अनुकरण करण्याची प्रवृत्ती यांच्यात असते. चंद्राचे क्रिया, भावना व विचार या तिन्ही पातळ्यांवर वर्चस्व असते. यांची बुद्धी सर्वगामी असते. जातकांमध्ये व्यवहारी उद्योगात, घरगुती कामात अथवा समाजात खबरदारीने वागणारा, नम्रता असणारा, प्रसंगी तुटकपणा ठेवणारा अथवा दाखवणारा, आरामशीर जीवन जगण्याची प्रवृत्ती असल्यामुळे मित्रपरिवार व लोकप्रियता असणारा असा स्वभाव दिसून येतो. चंद्र पत्रिकेत अनुकूल असताना सर्व सुखे प्राप्त होतात; परंतु अनुकूलता नसल्यास सर्व सुख-सुविधा असूनही कोणतेही सुख मिळत नाही.
शिक्षण : या कालावधीतील ग्रहमान शिक्षणासाठी अनुकूल आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या कोणत्याही शाखेत तुम्ही शिक्षण घेऊ शकता. अनुकूल परिस्थिती लाभल्यामुळे शिक्षणामध्ये यश प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेतसुद्धा अपेक्षित यश मिळू शकते. कला व क्रीडा क्षेत्रातही आपणास चांगले यश मिळणार आहे. आपण स्वतः प्रयत्न केल्यास ते यशस्वी होतील, मात्र त्यासाठी आधी चांगले परिश्रम घेणे गरजेचे आहे. इतरत्र वेळ वाया न घालवता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केल्यास त्याचा फायदा अवश्य होईल आणि चांगले यश मिळू शकेल. परदेशात शिक्षण घेण्याच्या प्रयत्नांनाही यश मिळेल.
पारिवारिक: या कालावधीच्या पूर्वार्धात जनसंपर्कातून महत्त्वाच्या कामांची पूर्तता करू शकाल. आतापर्यंत जी कामे अर्धवट राहिली होती, ती या कालावधीत आपण पूर्ण करू शकाल. काही नवीन ओळखी होतील. कुटुंब-परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. आतापर्यंत विवाह ठरण्यातील ज्या अडचणी येत होत्या, त्या दूर होतील. बलवत्तर असे विवाहयोग आहेत. कुटुंब-परिवारामध्ये एखादे मंगल कार्य ठरेल किंवा पार पडेल; त्याचप्रमाणे धार्मिक कार्यसुद्धा होऊ शकते आणि त्यासाठी खर्च होईल. कुटुंब-परिवारातील महिला वर्गाची कामाच्या संदर्भात धावपळ होऊ शकते. उत्तरार्धात कोर्टाच्या कामांना मोठी गती मिळू शकते व आपल्या बाजूने निकाल लागू शकतात. एकूणच कुटुंब-परिवारातील वातावरण चांगले व अनुकूल राहील.
नोकरी, व्यवसाय व धंदा: आपण आपल्या कामात मग्न असल्याकारणाने स्वतःच्या कष्टाने व प्रयत्नाने यश खेचून आणाल. आपल्या कामात सातत्य राहणार आहे. कुटुंब-परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या आपण पूर्ण करू शकाल; मात्र कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्यास त्यांच्याशी जुळवून घेणे व त्या सोडवणे ही आपली प्राथमिकता राहील.
आपण उत्साही व मानसिकदृष्ट्या कणखर राहिलात, तर सर्व आघाड्यांवर यश मिळू शकते. आपण आपल्या सकारात्मक विचारांनी सर्व दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहात. स्वतः उत्पन्न वाढवणार आहात व उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधून काढाल. तुमच्या सहकाऱ्यांशी व वरिष्ठांशी सुसंवाद साधा. स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी घ्या; कामाच्या ठिकाणी छोट्या-मोठ्या कुरबुरी चालू राहण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक : २,४,१२,१३,२८
अशुभ दिनांक : १,३,९,१०,११,१५,३०