चित्रकार: शैलेश पोतदार
अक्षररंग

दादा गेले, पुढे काय?

जातीयवाद, धर्मांधता, अंधश्रद्धा, कर्मकांड याला थारा न देता सत्यशोधक समाजाने मळलेल्या प्रगल्भ विचारांच्या पाऊलवाटांवरून चालणारे, राज्याच्या इतिहास-भूगोलाची सखोल जाण असणारे, सहकार, समाजकारण, राजकारण, अर्थकारणाचे पुरेपूर भान असणारे, कुशल-कर्तव्यकठोर प्रशासक, भारदस्त आवाजाची व स्मरणशक्तीची उपजत देणगी लाभलेले धडाडीचे नेते म्हणजे तुमचे-आमचे अजितदादा पवार...

नवशक्ती Web Desk

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

जातीयवाद, धर्मांधता, अंधश्रद्धा, कर्मकांड याला थारा न देता सत्यशोधक समाजाने मळलेल्या प्रगल्भ विचारांच्या पाऊलवाटांवरून चालणारे, राज्याच्या इतिहास-भूगोलाची सखोल जाण असणारे, सहकार, समाजकारण, राजकारण, अर्थकारणाचे पुरेपूर भान असणारे, कुशल-कर्तव्यकठोर प्रशासक, भारदस्त आवाजाची व स्मरणशक्तीची उपजत देणगी लाभलेले धडाडीचे नेते म्हणजे तुमचे- आमचे अजितदादा पवार. मृत्यूपश्चात त्यांच्या गुणगौरवांचे कौतुक सोहळे धडाक्यात सुरू असले तरी त्यांना जिवंतपणी बदनामीच्या अनंत यातना भोगाव्या लागल्याची सल सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आजही कायम आहे. दादा गेले, पुढे काय? असे प्रश्न पक्ष कार्यकर्त्यांना पडले आहेत.

शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याच्या वटवृक्षाखाली वाढूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत अजितदादांनी करारी बाणा जपला. ते जसे वक्तशीरपणाबाबत काटेकोर, तसे शब्दांचेही अगदी पक्के. रोखठोक विचार आणि स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. हजरजबाबी, काहीसे मिश्कील, बऱ्याचदा अघळपघळ बोलणारे दादामाणूस म्हणजेच अजितदादा. त्यांचा कामाचा झपाटा भल्याभल्यांना अचंबित करणारा. ‘करतो, बघतो,’ या शाब्दिक मायाजालात कुणालाही न अडकविता काम होणार अथवा नाही असे मोकळेपणाने सांगून रोकडा न्याय करणारा खंबीर प्रशासक, मंत्री म्हणूनही ते जनमानसात अधिक लोकप्रिय होते. अजितदादा जेवढे वरून फटकळ, तेवढेच अंतर्मनाने निर्मळ. आपली चूक लक्षात येताच ते मोकळ्या मनाने आत्मक्लेषाचा मार्ग अनुसरत. ते पक्षपातीपणे, द्वेषभावनेने, सूडबुद्धीने कधी वागले नाहीत. कामाचा माणूस, आपला माणूस या भावनेतूनच सामान्य कार्यकर्ते जाहीर सभांमधून त्यांना ‘आय लव्ह यू’ म्हणत ते काही उगाच नाही.

महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी सर्वाधिक ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्या खात्याला किती निधी द्यायचा? कोणते प्रकल्प आधी मार्गी लावायचे? याचा अचूक आराखडा त्यांच्याकडे होता. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ते सर्वांशी सारखेच वागत होते. म्हणूनच ते काही अतिविशेषांच्या नाराजीचे धनी ठरले होते. राजकारणात गोड बोलून वेळ निभावून नेण्यात काहीजण वाकबगार असले तरी स्पष्ट बोलून वास्तवाची जाण करून देणारा दादांसारखा नेता विरळाच. म्हणूनच त्यांची अकाली ‘एक्झिट’ सामान्यांच्या काळजाला घरे पाडणारी, मनाला चटका लावणारी ठरली.

तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख, शरद पवार यांच्याप्रमाणे सहकार चळवळीला दिशादर्शन करण्याची कामगिरी अजितदादांनीही मोठ्या हिकमतीने बजावली. टीका, आरोप, प्रत्यारोपांची तमा न बाळगता त्यांनी अधोगतीला चाललेल्या सहकाराला नवे बळ देण्याचे प्रयत्न केले. जलसंपदा व जलव्यवस्थापनाची खडान‌्खडा माहिती असलेल्या दादांना ‘धरणा’बाबतचे वादग्रस्त वक्तव्य चांगलेच भोवले. त्यावरून त्यांची यथेच्छ टिंगलटवाळी झाली. त्यातच पाटबंधारे खात्यात ७० हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. या आरोपांमधून सुटका होते की नाही अशा द्विधा मन:स्थितीत असतानाच, ज्यांनी आरोप केले त्यांच्याच कळपात घुसून दादांनी पहाटेचा शपथविधी उरकून महाराष्ट्राचे राजकारणच हादरवून सोडले. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर सभांमधून त्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप पुन्हा केले. या आरोपांची शाई वाळण्याआधीच त्यांनी पुन्हा भाजपशी सोयरिक केली. ते पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत झाले. ज्यांनी आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसू लागले. तेच ते अलीकडच्या जाहीर सभांमधूनही सांगू लागले. या साऱ्या घडामोडीत त्यांच्यावरील आरोपांबाबत सत्ताधारी भाजपने सोईस्कर कानाडोळा केला. अदृश्य राजकीय महाशक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त फूटच पाडली नाही, तर त्या पक्षाची शरद पवार व अजित पवार अशी दोन शकले उडवली. ही फूट काका-पुतण्या यांच्यातच नव्हती, तर पक्षनेते व कार्यकर्त्यांमध्येसुद्धा होती. या डावपेचामागे आपल्याला कुणी राजकीय स्पर्धकच असू नये हीच अदृश्य महाशक्तीची रणनीती होती. या घटना म्हणजे जिवंतपणीच्या मरणयातनाच असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र होती. तथापि, आपल्यासह नेत्यांच्या चौकशीचा ससेमिरा चालू झाल्यावर ‘सर सलामत तो पगडी पचास’ याच न्यायाने काकांना सोडून दादा सत्ताधाऱ्यांना शरण गेले. पुढे त्यांचे पक्षीय राजकारण संपवण्याचे टोकाचे प्रयत्न सुरू झाल्यावर मात्र काका पुतणे पुन्हा एकत्र आले. त्यांनी एकत्र निवडणुका लढवूनही पुण्यासारख्या बालेकिल्ल्यातच त्यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. यातून सावरून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये भरीव यश मिळवण्यासाठी दादा पुन्हा पायाला भिंगरी लावून फिरू लागले होते. येत्या १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार, विलीन होणार याची चर्चा सुरू असतानाच दादांच्या अकाली निधनाची मन सुन्न करणारी बातमी समोर आली आणि उभा महाराष्ट्र हळहळला.

अजितदादांमध्ये काम करण्याची धमक होती. त्यातून त्यांनी मोठ्या धाडसाने आपल्या काकांनाच कात्रजचा घाट दाखवून पक्षाची स्वतंत्र चूल मांडली होती. राजकीय जीवनात अनेक चढउतार अनुभवल्यानंतर पुन्हा त्यांचे आपल्या काकांशी सूर जुळू लागले होते; परंतु दादांच्या मृत्यूनंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडीत अनेक घटक सक्रिय झाले आहेत. ज्यांची चौकशी अजून बंद झालेली नाही अशा स्वपक्षातील बड्या नेत्यांनीच पडद्याआड हालचाली सुरू केल्या. सत्ताधाऱ्यांचा दबाव व आपले स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठीची हतबलता लक्षात घेऊन अजित पवार गटाने आता आपल्या पक्षाचा सवतासुभा कायम ठेवण्याची रणनीती यशस्वी करून दाखवली आहे.

अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी शनिवारी निवड झाली. त्यांना सर्वाधिकार देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली. या घडामोडी घडत असताना शरद पवार व त्यांचे समर्थक नेते सुरक्षित अंतर राखूनच होते. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पक्षामधील दुरावा आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे विलीनीकरण करण्याच्या चर्चा शरद पवार गटामार्फत केल्या जात असतानाच अजित पवार गटाने आपले राजकीय वजन सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात टाकले आहे. त्यामुळे दोन गटांच्या विलीनीकरणाला आता आणखी खीळ बसली आहे. त्यामुळे कुटुंब तुटल्याच्या व पक्ष फुटल्याच्या वेदना बाजूला सारून या उतारवयातही शरद पवार पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी प्रदूषित नीरा नदीची पाहणी करून राजकारणात नव्याने उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात बिनसले असून हे गट यापुढे एकत्र येतील की नाही याविषयी शंकाच व्यक्त होत आहेत. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात जे काही सुरू आहे, त्याने सामान्य नागरिक अत्यंत व्यथित आहेत. अजितदादांचे अचानक जाणे क्लेषदायक होते. त्यांच्या जाण्याने शोकसागरात बुडालेले नागरिक स्वत:ला अजूनही सावरू शकलेले नाहीत. अशातच सध्या जे संवेदनाहीन राजकारण सुरू आहे, ते अधिक उद्वेगजनक असल्याची सामान्यांची भावना झाली आहे.

prakashrsawant@gmail.com

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Iran Israel War : जहाजांचा युद्ध विमा महाग; संघर्षामुळे अतिरिक्त प्रीमियम भरावा लागणार; विमा कंपन्यांचा निर्णय