आठवण
अजितेम जोशी
३० जून २०२६... बाई गेल्याची बातमी धडकली. बाई म्हणजे मराठी प्रायोगिक रंगभूमीला नवी दिशा देणाऱ्या, 'रंगायन' या १९६० मध्ये स्थापन झालेल्या आणि रंगभूमीचं अवघं अवकाश व्यापून टाकणाऱ्या नाट्य संस्थेच्या सर्वेसर्वा, प्रगल्भ अभिनेत्री आणि अर्थातच उत्तुंग दिग्दर्शिका विजया मेहता...
बाईंचा दबदबा, दरारा दुरूनच ऐकलेला, बघितलेला. फक्त दुरूनच. कारणच तसं. १९७५ पासून एकांकिका, स्पर्धेचं नाटक, आकाशवाणी, मुंबई दूरदर्शन आणि नाटकाला वाहिलेलं सुधीर दामले यांचं नाट्यदर्पण हे मासिक या ठिकाणी माझं स्ट्रगल सुरू झालं होतं. अभिनय, दिग्दर्शन, लेखन, पत्रकारिता जे जे जमेल ते ते करत होतो. शिकत होतो. राज्य नाट्य, आळतेकर-कोल्हटकर या स्पर्धात नाटक करणे, बघणे, शिवाजी मंदिर-रवींद्र नाट्य मंदिर येथे नाटकं बघणं. थोडक्यात लुडबुड करत होतो.
आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत लेखक-दिग्दर्शक म्हणून धडक मारता मारता, राज्य नाट्यस्पर्धेसाठी एक मोठी संधी मला मिळाली. ती म्हणजे आमच्या रंगमंच या हौशी नाट्य संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेसाठी, सुप्रसिद्ध कादंबरीकार गो. नी. दांडेकर यांच्या आनंदवन भुवन या गाजलेल्या कादंबरीवर आधारित, राजीव जोशी (माझे मोठे बंधू आणि लेखनप्रवासातले पहिले गुरू) लिखित, 'विधिलिखित' हे नाटक करायचं ठरवलं. आनंदवन भुवन ही कादंबरी बाबा साधनाताई आमटे यांच्या जीवनावर, त्यांच्या कुष्ठरोग्यांकरिता केलेल्या कामावर आधारित होती. विधिलिखित हे नाटक करताना रंगमंचावर कुष्ठरोगी दाखवणं महत्त्वाचं असल्यामुळे रंगभूषेसाठी त्या वेळच्या धी गोवा हिंदू असोसिएशन या नाट्य संस्थेचे रंगभूषाकार अशोक पांगम यांची आठवण होणं स्वाभाविक होतं. विधिलिखितसाठी पांगम यांनी जीव ओतून रंगभूषा केली. हुबेहूब कुष्ठरोगी वाटावेत अशी कमाल केली. पांगम एकदा असेच अचानक भेटले, 'अजितेम काय करतोयस? विजयाबाई एक मराठी चित्रपट करताहेत. मुंबई दूरदर्शनसाठी. स्मृतिचित्रे. विनायक चासकर त्याचं प्रॉडक्शन करताहेत. त्यांना निर्मिती सहाय्यक हवाय. तू करशील का काम. मी रंगभूषा करतोय. वरळीलाच शूटिंग असेल. अनुभव मिळेल. पैसेही. मुख्य म्हणजे बाईंच्या सोबत काम करण्याची संधी मिळतेय.'
बाई... विजया मेहता... हे नाव तेव्हापर्यंत दुरूनच ऐकलं होतं, बघितलं होतं. आता त्यांच्या सोबत काम करायला, शिकायला मिळणार. ही म्हणजे लाखमोलाची दुर्मिळ संधीच होती. अर्थात ती नाकारण्याचं कारणच नव्हतं काही. विनायक चासकर, मीना गोखले (पानसरे), अशोक पांगम, श्रीकला हटंगडी, रवींद्र साठे, माधव पटवर्धन (गॉसिप ग्रुप), मंगेश कुलकर्णी, सुहास जोशी, सतीश नाईक-साटम अशा सर्वांशी अगोदरपासून कॉन्टॅक्ट असल्यामुळे मी ही संधी साधली आणि विजयाबाई नावाच्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या टीममध्ये सहभागी झालो. मंगेश कुलकर्णी हा पटकथा लेखन-दिग्दर्शन सहाय्यक होता.
माधव पटवर्धनच्या हाताखाली मी काम करायला सुरुवात केली. तरीही बाईंबरोबर बोलणं नाहीच, दुरूनच दर्शन व्हायचं त्यांचं. वरळीला मुंबई दूरदर्शनच्या तेव्हाच्या जुन्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर, डाव्या हाताला पहिल्या रूममध्ये बाई आणि त्यांची टीम विनायक चासकर, कॅमेरामन आर. सी. महापाक्षी, माधव पटवर्धन, मंगेश कुलकर्णी, निशिकांत घारे, मीना श्रीकला अशी मंडळी असायची. बाई, चासकर, मंगेश, माधव पटवर्धन यांच्यात रोजच्या शूटिंगबद्दल चर्चा, प्लॅनिंग व्हायचं.
बाईची प्रत्येक गोष्ट लिहिलेली, पेपर वर्क डिटेल केलेलं असायचं. शूटिंगपूर्वी आणि अर्थातच शूटिंग संपल्यावर बाई आणि अर्थातच सर्व टीम दुसऱ्या दिवशीच्या प्लॅनिंगसाठी बसून सर्व ठरवायचे. त्यानुसार काटेकोरपणे त्यांची अंमलबजावणी तीही वेळ, शिस्त पाळून केली जायची.
तेव्हाच्या स्टुडिओ बी मध्ये स्मृतिचित्रेचा सेट लागलेला होता. ए स्टुडिओच्या मानाने बी स्टुडिओ तेवढा मोठा नव्हता पण याच स्टुडिओत एक राष्ट्रीय पुरस्कार विजेती मोठी कलाकृती जन्माला आली एवढं खरं. मुंबई दूरदर्शनच्या इतिहासात पहिल्यांदाचं पूर्ण लांबीचा चित्रपट (टेलीफिल्म) तोही मराठीत निर्माण होत होता आणि विजया मेहता यांचाही चित्रपट दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. म्हणूनच उत्साहाच्या, आनंदाच्या वातावरणात शूटिंग व सर्व काम चालायचं. विनायक चासकर तर अक्षरशः रात्रंदिवस काम करत होते. इतिहास घडवणारी चित्रकृती निर्माण करण्यासाठी झटत होते.
स्मृतिचित्रे... लक्ष्मीबाई नारायण वामन टिळक यांचे, १९३४ ते १९३७ मध्ये चार भागात प्रसिद्ध झालेलं आत्मचरित्र. कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील स्त्रीचा संघर्ष. आपले पती कवी ना. वा. टिळक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे लक्ष्मीबाईंच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, वैवाहिक जीवनातला संघर्ष यात होता. विजयाबाईंनी यावरून चित्रपट करताना, मूळ आत्मकथेतील पती-पत्नीच्या नात्यातील वीस वर्षांच्या भागाची निवड करून, संकलन करून, एक कथा तयार करून मंगेश कुलकर्णीच्या मदतीने पटकथा रचली. मूळ कथेतील संवाद आणि काव्य यांचा उपयोग केला.
वृद्ध लक्ष्मीबाई (साक्षात विजया मेहता) स्मृतिचित्रेची
कथा सांगताहेत आणि फ्लॅशबॅकच्या तंत्राने हा चित्रपट पुढे सरकतो. अशी याची योजना. रोज शूटिंगला बाई वेळेवर आणि बाईंमुळे सगळी टीम वेळेवर किंवा वेळेपूर्वीच हजर. पण शूटिंग जबरदस्त. मला तर हे सर्वच अद्भूत, नवीन, अनाकलनीय पण हवंहवंस वाटणारं होतं.
बाईंसोबत होतो पण संवाद नव्हता, बोलणं तर फारच मोजकं, ना के बराबर (भीती जास्त. त्यामुळे गप्प)
'ए इथे ये. नाव काय तुझं..'- बाई
'अजितेम जोशी'
'मला पाणी हवं प्यायला.' (अथवा माझं पान हवंय)
'आणतो'
परत दुसऱ्या वेळेस -
'ए नाव काय तुझं'
'अजितेम'
'या भागात शूटिंग करायचं आहे. कचरा बघ. साफ हवाय फ्लोअर'
त्यानंतर एकदा -
'ए तुझं...'
'अजितेम'
'जा आणि केस, दाढी साफ करून ये. तुला पुढल्या सिनमध्ये बसायचं आहे.'
बाईंचा आदेश आल्यावर धावत गेलो आणि दाढी, केस कापून आलो. (सिनेमात काही सेकंद दिसलो)
त्यानंतर पुन्हा एकदा - 'जेमतेम (मला बाईंनी नंतर नाव दिलं) उद्या तू चेंबूरला जा आणि तिथून काही पुरुष-महिला ज्या चर्चशी संबंधित गावाकडल्या वाटतील त्यांना निवडून बसमधून घेऊन ये. सकाळी नऊच्या आत इथे हजर हवेत सगळे.'
माधव पटवर्धननं सगळं समजावलं, जायला बससाठी पैसे दिले आणि मी बाईंचं काम वेळेवर व्हायला हवं म्हणून पळत सुटलो. सुटायचो. विजया मेहता यांच्या पहिल्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये आपल्याला सहभागी होता आलं, बाई आपल्याला काम सांगतात, चुकलं तर प्रेमानं दटावतात हे सारं सारं शब्दांच्या पलीकडलं. भारावून टाकणारं. वेगळ्या धुंदीत नेणारं.
आत्ताही लख्ख आठवतं, रवींद्र नाट्य मंदिरातल्या एका रूममध्ये तीन-चार लोखंडी बॅगा भरून वेगवेगळ्या साड्या आलेल्या. बाई स्वतः प्रत्येक साडी उघडून बघत, निवडत होत्या. त्या रूममध्ये बाईंबरोबर माधव पटवर्धन, ड्रेसवाले काका, त्यांचा सहाय्यक आणि मी. यात किती तरी वेळ गेला पण बाईंनी शांतपणे त्यांना आवडतील त्या साड्या त्या साड्यांच्या ढिगातून निवडल्या. नंतर कितीतरी वेळ आम्ही उरलेल्या साड्यांच्या घड्या घातल्या.
स्मृतिचित्रेमध्ये मराठी नाट्यचित्रपटसृष्टीतले अनेक नवे-जुने कलाकार काम करत होते. यतीन कार्येकर (बालकलाकार म्हणून), शिरीष जोशी (तरुण टिळक) रवींद्र मंकणी (मोठे टिळक), सुहास जोशी (लक्ष्मीबाई), सुधीर जोशी, सुलभा कोरान्ने, डॉ. विश्वास मेहेंदळे, मंगेश कुलकर्णी, रेखा कामत, अंजली चासकर, डॉ. ज्योत्स्ना कार्येकर, गणेश मतकरी, सुशील गोलतकर, उज्ज्वला जोग, सुमन शिरवाडकर, शशिकांत मेहेंदळे सोबत अनेक कलाकार आणि स्वतः साक्षात विजयाबाई (वृद्ध लक्ष्मी बाई) जवळ जवळ साडेचार महिने स्मृतिचित्रेचं शूटिंग सुरू होतं. मुंबई दूरदर्शन वरळीचा स्टुडिओ बी ही सर्वांची कर्मभूमी. रोज सकाळी घरून रीतसर जेवून मी शूटिंगला आठ-साडेआठला जायचो. रात्री घरी परतायची वेळ ठरलेली नसायची. बाईंनी या काळात काय दिलं? काय शिकवलं ? एखाद्या विद्यार्थ्यांसारखं बाईंनी समोर बसून शिकवलं नाही, पण प्लॅनिंग, पेपर वर्क, शिस्त, वेळ पाळणे, जीव झोकून, लाज-शरम विसरून काम करणे, अभ्यास करणे, टीमवर्क, सर्वांना घेऊन पुढे जाणे, सर्वांसोबत कसं वागणं-बोलणं अशा अनेक गोष्टी बाईंनी नकळत शिकवल्या. विजया मेहता म्हणजेच जिनियस बाईंच्या पहिल्या चित्रपटाच्या कामात आपण सहभागी होतो, आपला खारीचा वाटा होता, ही आठवण मनात राहील. विजयाबाईंच्या सहवासाचे अत्तरासारखे हे क्षण अशोक पांगम आणि मुंबई दूरदर्शन यांच्यामुळे लाभले एवढं नक्की.
लेखक हे सुप्रसिद्ध समीक्षक व नाट्यकर्मी आहेत