दखल
वैशाली शिरसाट
विषमतावादी मूल्यव्यवस्था मान्य करायची की समतावादी मूल्यव्यवस्था मान्य करायची, याचा निर्णय घेताना कोणताही विचारी माणूस विषमतेला नकार देतो. पण विषमतेच्या चक्रातून बाहेर पडत समतेचं बोट पकडण्याची हिंमत मात्र दाखवत नाही.
हिंदू धर्मातल्या तथाकथित उच्च समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये जन्म झालेला असताना आंतरजातीय विवाह केल्यानंतर जातवास्तव अधिकच प्रखरपणे माझ्या समोर आलं. जातीय व्यवस्थेच्या परिणामांचा अनुभव हा तोपर्यंत फक्त पुस्तक वाचतानाच लक्षात येत होता. लग्नानंतर येणारे नातेवाईकांचे अनुभव, आसपासच्या समाजातील लोकांचे अनुभव, अगदी घर बदलताना, बाजारामधून सामान खरेदी करताना येणारे नकारात्मक अनुभव या सगळ्याच गोष्टींनी जातव्यवस्थेची भीषणता अगदी प्रत्यक्ष अनुभवाला आली. काही ठराविक समूहांची जातआधारित मानखंडना करून त्यांचं खच्चीकरण करणारी ही व्यवस्था फार क्रूर वाटली. या सगळ्या काळात ‘बौद्ध’ धर्माचा जवळून संबंध आला. दैनंदिन जगण्यात बौद्ध धर्म व्यवस्थेच्या उपचारांचं जरी आकर्षण वाटलेलं नसलं, तरी बाबासाहेबांच्या धम्माच्या मांडणीमधील चिकित्साप्रधान वैज्ञानिकता, बुद्धीप्रामाण्यवाद, लोकशाहीवादी संपूर्ण समानता इत्यादी तत्त्वांबद्दल मनापासून आस्था वाटत होती. माझ्या मनातल्या परंपरागत धर्म या संकल्पनेला तपासून बघण्याची गरज आतून निर्माण झाली.
वाचनाच्या ओघात एके दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं ‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ हातात पडलं आणि माझ्या जगण्याचे संदर्भ बदलले. बाबासाहेबांनी केलेल्या धर्मासंबंधीच्या मूलभूत मांडणीने मन लख्ख उजळून निघालं. त्यात बाबासाहेबांनी धर्माचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक नियमांचा धर्म आणि दुसरा तत्त्वांचा धर्म! बाबासाहेब म्हणतात की, “धर्म तत्त्वांच्या आधारावर उभा असायला हवा, नियमांच्या नाही. धर्माला तत्वांची घनता हवी, नियमांचे मुखवटे नकोत. नियम पाककृतीप्रमाणे केवळ काय करायचं आणि कसं करायचं हे सांगतात. तत्त्वे न्यायतत्त्वाप्रमाणे मुख्य प्रवाह उपलब्ध करून देतात, ज्याच्या संदर्भाने व्यक्तीला तिच्या इच्छांचे व प्रयोजनांचे रोख ठरवायचे असतात.”
मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाने १९४३ साली गरजांच्या उतरंडीचं शास्त्र मांडलं होतं. त्यात सर्वात तळाशी असलेल्या मूलभूत गरजा म्हणजे माणसाच्या अन्नपाण्यासारख्या शारीरिक गरजा होत्या. पण आज असं दिसतं की, धार्मिक मुलतत्त्ववादाच्या प्रभावाखाली लोकं आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आणि वर्चस्वासाठी जीव देतात. त्यामुळे केवळ नास्तिकवादाचा किंवा निधर्मी वाटेचा पुरस्कार करून धर्माची चर्चा दुर्लक्षित ठेवणं परवडणारं नाही. पश्चिमेकडे सुद्धा प्रबोधन युग आणि आधुनिकतेच्या तोंडावर धर्मनिरपेक्ष विचारवंतांना धर्माच्या ठळक अस्तित्वाने चकित केले होते. युर्गेन हेबरमास हे एक जर्मन समाजशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात फक्त धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भातच सार्वजनिक चव्हाट्याची (public sphere)चर्चा केली होती. परंतु नंतरच्या काळात त्यांनी धर्माकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं, हे मान्य केलं. जी मूल्यं एखाद्या व्यक्तीसाठी आदर्श असतात किंवा ज्या मूल्यांच्या वाटेने जाणं त्या व्यक्तीला शक्य असतं यामध्ये आणि समूहासाठी जी मूल्यं आदर्श ठरतात किंवा समूहाला योग्य दिशेने आपली वाटचाल करण्याकरता जी मुल्यं आवश्यक असतात, यामध्ये नेहमीच फरक पडत असतो. एखादी व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर निधर्मीपणाचा पुरस्कार करत असली तरी अशिक्षित, गरीब लोकांना आपल्या जीवनातील सामाजिक आणि नैसर्गिक अनिश्चिततेपासून, असुरक्षिततेपासून, एकाकीपणापासून आणि दुःखापासून स्वतःला आधार देण्यासाठी काही निश्चित तत्त्वज्ञानाची गरज लागते. बाबासाहेब म्हणतात, गरीब आणि दुःखी लोकांसाठी धर्म आशा निर्माण करतो. म्हणून ते धर्माला कवटाळून राहतात.
आज आपण जो धर्म बघतो तो कर्मकांडांच्या किंवा उत्सवाच्या स्वरूपात पाहतो. धार्मिक उन्मादापायी निर्माण झालेल्या अस्मितांच्या खेळांमध्ये, धार्मिक उच्चनीचतेच्या भावनेमध्ये किंवा समाजातील सबल लोकांच्या हातातले एक शोषणाचे हत्यार म्हणून वापरण्याच्या कटामध्ये आज धर्म प्रकट होतो आहे. शोषित-वंचित समूहांसकट सगळ्या जनतेसाठी एक सफल आणि समाधानी जीवन व्यतीत करण्यासाठी धर्म ही एक अपुरी साधनसामग्री ठरते आहे. त्यामुळेच एकीकडे कर्मविपाकाचे, दैववादाचे तत्वज्ञान आणि दुसरीकडे आधुनिक भांडवलशाही, बाजारू चंगळवाद...यांच्या कोंडीत सापडलेली सामान्य जनता एक दुहेरी जीवन जगत आहे. या विसंगतीचं मुलगामी समाधान काय? इथली हताशा निरनिराळ्या व्यसनांच्या, मानसिक समस्यांच्या, हिंसेच्या, आत्महत्यांच्या विविध आवर्तांमध्ये भिरभिरते आहे. परंपरागत धर्माच्या अवलंबनामध्ये कुठेही नैतिक मूल्यांचा आग्रह नाही.
या पेचामधून वाट काढण्यासाठी एक तर आहे त्या परंपरागत धर्माची चिकित्सा करून त्यामध्ये न्याय, लोकशाहीप्रधान समतावादी बदल केले पाहिजेत. नाहीतर त्याला पर्याय तरी शोधला पाहिजे. म.जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, पेरियार यांच्यासारख्या समाज सुधारकांच्या अथक प्रयत्नांना सुद्धा या विषमतावादी मूल्यांनी दाद दिली नाही. धर्माच्या या कठीण खडकावर डोकं आपटून काही फायदा झाला नाही. म्हणूनच त्यांना दुसऱ्या धर्मांचे पर्याय उभे करावे लागले.
१९५६ साली बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. परंपरागत, रूढ बौद्ध धम्मामध्ये सुद्धा बुद्धानंतर बऱ्याच निरर्थक कर्मकांडांची, चुकीच्या परंपरांची घुसखोरी झाली होती. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेला बौद्ध धम्म या परंपरागत बौद्ध धर्मापेक्षा अत्यंत वेगळा होता. बाबासाहेब आपल्या या धम्माला ‘नवयान’ असं म्हणतात. परंपरागत धर्मव्यवस्थेला बाबासाहेबांचा सुद्धा नकार होता. परंपरागत बौद्ध भिख्खूंनी हा खरा बौद्ध धर्म नाही, असा सुद्धा आरोप बाबासाहेबांवर केला. बौद्ध साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक भदंत आनंद कौसल्यायन यांनी मात्र बाबासाहेबांच्या ‘बुद्ध अँड हिज धम्म’ या पुस्तकाचं हिंदीमध्ये भाषांतर करून त्याला त्रिपिटकामधले आधार दिले आणि हाच खरा बौद्ध धर्म असल्याचे प्रतिपादन केलं.
बाबासाहेबांनी एक सक्षम नैतिक ताकद उभी रहावी या अपेक्षेने दलित समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एकत्रित केलं. त्यांनी परंपरागत बौद्ध धर्माचा नवीन अन्वयार्थ लावला. चिकित्सेचं आवाहन केलं. हा नवयान धम्म संपूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा, बुद्धिप्रामाण्यवादी आणि भौतिकवादी असून त्यात आत्मा, पुनर्जन्म किंवा कुठल्याही कर्मकांडात्मक तांत्रिक कृतींचा अंतर्भाव नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धम्म हे जातिव्यवस्थेपासून सगळ्या विषमतांना कडवा विरोध करणारं तत्वज्ञान आहे. इथे कुठेही अध्यात्मातले, ध्यानातील निर्वाण नाही, तर समतेसाठीचा, न्यायासाठीचा संघर्ष आहे. व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी मनाच्या मशागतीवर भर दिलेला आहे. आपण आहोत त्या धर्माची पूर्वापार संस्कारांमधून घडत गेलेली मानसिक गुलामगिरी, तो सोडून देण्यामधली असुरक्षितता, तो झुगारून देण्यासाठी लागणाऱ्या धैर्याचा अभाव आणि बाबासाहेबांसारख्या एका अवर्ण व्यक्तीने मांडलेल्या धम्माच्या समतावादी तत्त्वज्ञानाला असलेला जाणीव-नेणिवेचा प्रतिरोध अशा अनेक बाबी समग्र समाजाने धम्माचं तत्त्वज्ञान स्वीकारण्याआड येऊ शकतात. किंबहुना येतात.
परंपरागत जातव्यवस्थेने भारतीय समाजामध्ये फाटाफूट करून ठेवलेली आहे. त्यामुळे संपूर्ण समाज एकत्र येऊन आपल्या प्रगतीसाठी काही प्रयत्न करेल अशा शक्यता कमी दिसतात. जोपर्यंत आपण कुठल्यातरी खालच्या जातीपेक्षा वरचढ आहोत असा गंड मनाला सुखावतो तोपर्यंत जातीअंताची शक्यताही दूरपर्यंत दिसत नाही. या सगळ्या फाटाफुटीचा फायदा मात्र फॅसिस्ट पक्ष व संघटना पुरेपूर घेत आहेत. कमी जास्त प्रमाणात का होईना परंतु विशेषाधिकार मिळालेल्या ब्राह्मण्यवादी समूहांना शोषित समूहांची एकजूट धोकादायक वाटते. पूर्वाश्रमीचे महार वगळता दलितांमधील इतर जातींनी आपली सामाजिक व सांस्कृतिक ओळख काय ठेवायची हे ठरवायचे आहे. स्वाभिमान आणि सन्मान हिरावून घेणाऱ्या ओळखीमध्ये सामावले जायचे की बौद्ध धम्म स्वीकाराच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायची, हा त्या समाजाचा प्रश्न असेल.
सामाजिक कार्यकर्त्या