अजब निसर्ग
मकरंद जोशी
मुंग्यांचं स्वतःचं गाव असतं का? मधमाशांच्या पोळ्यात राणी कोण ठरवतं? चतुर हवेत एकाच जागी कसा तरंगतो? आणि अंधारात काजवा दिवा कसा पेटवतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत कीटकांच्या भन्नाट दुनियेत!
कीटकांच्या जगातील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातील समाजरचना. अनेक प्रकारचे कीटक अगदी शिस्तबद्ध, सुविहित समाजरचना पाळताना पाहायला मिळतात. मुंग्या, मधमाश्या, वाळवी आणि काही प्रकारच्या वास्प एकत्रितपणे, समूहाने राहताना पाहायला मिळतात. यातला सर्वांत उत्कृष्ट नमुना म्हणजे मधमाश्यांचे पोळे. मधमाश्यांच्या एका पोळ्यात एकावेळी अडीच हजार ते पाच हजार माश्या राहत असतात. ही सर्व एकाच राणीमाशीची संतती असते. या पोळ्यात एक राणीमाशी, २०० ते ३०० नर आणि बाकीच्या सगळ्या कामकरी असतात. राणीमाशीचा आकार इतर माश्यांपेक्षा मोठा असतो. निरंतर अंडी घालणे हेच तिचे काम असते. ती दिवसाला जवळपास दोनशे अंडी घालते. पोळ्यातल्या कामकरी माश्या आकाराने सर्वांत लहान असतात. मध गोळा करणे, पिल्लांची देखभाल करणे, पोळ्याची दुरुस्ती करणे अशी सगळी कामे या कामकरी माश्याच करत असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या पिल्लाला राणी बनवायचे की कामकरी, हे त्या ठरवतात आणि त्याप्रमाणे अन्न भरवतात.
या पृथ्वीवर सुमारे पस्तीस कोटी वर्षांपूर्वी जेव्हा कीटक अवतरले, तेव्हा बहुसंख्य कीटक हे भू-जलचर होते. हळूहळू त्यांच्यात परिवर्तन घडून भूचर कीटक निर्माण झाले. मात्र, आजही अनेक कीटकांच्या आयुष्याची सुरुवात पाण्यातच होताना दिसते. तसेच केवळ गोड्या किंवा खाऱ्या पाण्यातच राहणारे हजारो प्रकारचे कीटक आढळतात. याचे उदाहरण म्हणजे रानातल्या एखाद्या डबक्यात किंवा कुंडातल्या पाण्यावर तरंगणारे व्हिर्लिगिग बीटल्स. चिकूच्या बीसारखे दिसणारे हे कीटक जलचर असतात. त्यांना एकाच वेळी पाण्याखाली आणि पाण्यावर बघता येईल, अशी त्यांच्या डोळ्यांची रचना असते.
अंशतः जलचर कीटकांमधला आपल्या अगदी परिचयाचा कीटक म्हणजे ड्रॅगनफ्लाय अर्थात चतुर. कीटकांच्या जगातील ओडोनाटा या वर्गात चतुरांचा समावेश केला जातो. संशोधकांच्या अंदाजानुसार, कीटकांच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे सुमारे तीस कोटी वर्षांपूर्वी चतुर निर्माण झाले. तेव्हाचे चतुर एखाद्या उडत्या तबकडीच्या आकारासारखे दिसायचे आणि त्यांच्या पंखांचा विस्तार एक मीटर इतका मोठा असायचा. आपल्या देशात चतुरांच्या सुमारे पाचशे जाती आढळतात. चतुराचे वर्णन ‘परफेक्ट फ्लाइंग मशीन’ असेच करावे लागते. एकाच जागी तरंगत राहणे, मागच्या दिशेने उडणे, आडवे उडणे ही सगळी चतुराची वैशिष्ट्ये पाहूनच माणसांना हेलिकॉप्टरची कल्पना सुचल्याचे मानले जाते. चतुराच्या शरीराचा ६५ टक्के भाग हा निव्वळ उडण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्नायूंनीच बनलेला असतो. पाहा ना, त्याचे पंखही पारदर्शक असतात. ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने आपल्या भक्ष्याचा पाठलाग करून, प्रसंगी हवेतच त्याचा फडशा पाडण्यासाठी चतुर प्रसिद्ध आहे. या कीटकाचे मिलनही हवेतच, उडता उडता होते. चतुराची मादी आपली अंडी पाणवनस्पतींच्या पानांवर घालते. त्या अंड्यांतून बाहेर आलेले बालकीटक आपली बाल्यावस्था संपेपर्यंत म्हणजे सुमारे दोन ते पाच वर्षे पाणकीटक म्हणूनच वाढतात. या काळात ते दहा-पंधरा वेळा कात टाकतात. चतुराच्या शरीररचनेतील सर्वांत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याचे डोळे. चतुराच्या डोक्यावर एक जोडी संयुक्त डोळे असतात. या संयुक्त डोळ्यांमध्ये तीस हजार भिंगे असतात. याशिवाय त्याला तीन साधे डोळेही असतात. मानवाला उपद्रवी असलेले डास आणि माश्यासुद्धा अंशतः जलचर कीटक आहेत. त्यांची अळी, कोष पाण्यातच वाढतात. प्रौढ झाल्यानंतर ते हवेत भरारी घेतात.
कीटकांच्या जगातील सर्वांत मोठा गट आहे बीटल्स अर्थात ढालकिड्यांचा. कीटकांच्या विश्वाचा चाळीस टक्के भाग या ढालकिड्यांनी व्यापलेला आहे. जगात आतापर्यंत ढालकिड्यांचे सुमारे तीन लाख पन्नास हजार प्रकार नोंदवण्यात आलेले आहेत. ढालकिड्यांचे वरचे पंख एखाद्या कवचासारखे कडक असतात, तर आतले पंख तलम असतात. या ढालकिड्यांच्या गटातला धोकादायक प्रकार म्हणजे ब्लिस्टर बीटल. हा ढालकिडा त्याच्या पायाच्या सांध्यातून कँथरिडिन या रसायनाचा फवारा मारतो. या तीव्र रसायनामुळे माणसाच्या त्वचेवरही फोड येतात. मग इतर प्राण्यांची काय गत होत असेल? स्टॅग बीटल या ढालकिड्याला एखाद्या सांबाराप्रमाणे दोन लांबलचक शिंगे असतात, तर ऱ्हायनोसरस बीटल या कीटकाचा आकार एखाद्या लहानशा गेंड्यासारखा असतो. मात्र, यातील नराला असणारी शिंगे तशी नावालाच म्हणजे केवळ भीती दाखवण्यापुरती असतात. लाँग हॉर्न बीटल या ढालकिड्याच्या मिशा किंवा अँटेना नावाप्रमाणेच लांबलचक असतात. ढालकिडे जसे शाकाहारी आहेत, तसेच त्यांच्यात टायगर बीटलसारखे शिकारी, मांसाहारी कीटकही आहेत. बीटल्समधला अद्भुत प्रकार म्हणजे आपला काजवा. आपल्या शेपटीत दिवा घेऊन उडणारा काजवा एक प्रकारचा ढालकिडाच आहे. ल्युसिफेरीन या द्रव्यामुळे हा प्रकाश निर्माण होतो. मात्र, त्यात कोणतीही ऊर्जा उत्सर्जित होत नाही किंवा उष्णताही निर्माण होत नाही. म्हणून याला थंड उजेडाचा दिवा असेही म्हणता येईल. बीटल्सच्या गटातील टॉरटॉइज शेल बीटल म्हणजे जणू ढालकिड्यांमधला कूर्मावतारच. या बीटलचे कासवासारखे दिसणारे अर्धवर्तुळाकार कवच पारदर्शक असते. प्रत्यक्षात ते कवच म्हणजे या कीटकाचे पंख असतात. बीटल्सच्या गटातील शाही मंडळी म्हणजे ज्वेल बीटल्स. या ढालकिड्यांचे झळाळते, झगमगते रंग त्यांना एखाद्या मौल्यवान खड्याचे रूप प्राप्त करून देतात. अनेकदा या ज्वेल बीटल्सच्या मोहक रूपामुळे त्यांचा वापर दागिन्यांमध्ये करण्याचा मोह माणसाला आवरत नाही. बीटल्सच्या गटातील एक सभासद तुमच्या-आमच्या घरात अनेकदा आढळतो, तो म्हणजे गहू, तांदूळ अशा धान्यांमधला पोरकिडा.
कीटकांची दुनिया दिसायला जरी चिमुकली असली, तरी तिचा विस्तार अफाट आहे. हिरव्यागार नाकतोड्यापासून ते रंगीबेरंगी फुलपाखरांपर्यंत या दुनियेतील विविधता थक्क करणारी आहे. मानवाला मेण, मध, लाख अशा उपयुक्त वस्तू देण्यापासून ते परागीभवन करून वनस्पतींचा प्रसार करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या कामगिऱ्या हे कीटक बजावतात. त्यामुळे त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्यच आहे.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com