अक्षररंग

अमूल्य 'अमोल'

प्रतिकूल परिस्थितीतही हार मानायची नाही, स्थिर वृत्तीने प्रत्येक क्षणाचा सामना करायचा, हा धडा अमोल मुझुमदार यांनी स्वतःच्या आयुष्यात गिरवला आणि तोच आपल्या महिला क्रिकेटपटूंनाही गिरवायला लावला. आज ते विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षक झाले आहेत. विजयाचे शिल्पकार बनले आहेत.

ऋषिकेश बामणे

स्ट्रेट ड्राईव्ह

प्रतिकूल परिस्थितीतही हार मानायची नाही, स्थिर वृत्तीने प्रत्येक क्षणाचा सामना करायचा, हा धडा अमोल मुझुमदार यांनी स्वतःच्या आयुष्यात गिरवला आणि तोच आपल्या महिला क्रिकेटपटूंनाही गिरवायला लावला. आज ते विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षक झाले आहेत. विजयाचे शिल्पकार बनले आहेत.

"पुढील सात तास आपण बाहेरील विश्वाशी संपर्क तोडणार आहोत. आपण येथे स्वतःचे छोटे विश्व निर्माण करणार आहोत. आपण सर्व त्याच विश्वात सात तास राहणार असून स्वतःची वेगळी कहाणी लिहूनच आपण त्यातून बाहेर पडणार आहोत. बाहेरील कहाण्या भरपूर झाल्या. तुम्ही प्रत्येकाने स्वतःची कहाणी या सात तासांत लिहायची आहे. चला मग, पुढील सात तासांत इतिहास घडवूया."

भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचे हे शब्द एखाद्या बॉलिवूड चित्रपटाची आठवण करून देतात. २ नोव्हेंबर रोजी, रविवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रात्री १२ वाजेपर्यंत चित्रही तसेच होते. अखेर जणू विधिलिखित असल्याप्रमाणे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या हाती उंच उडालेला झेल विसावला आणि बस्स... भारतीय महिला संघ प्रथमच क्रिकेटचा विश्वविजेता म्हणून ऐन रात्री उदयास आला.

हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ४७ वर्षांचा इतिहास संपुष्टात आणून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. भारत हा महिला विश्वचषक जिंकणारा चौथा देश ठरला. यापूर्वीच्या १२ विश्वचषकांपैकी ऑस्ट्रेलियाने सात वेळा, इंग्लंडने चार वेळा, तर न्यूझीलंडने एकदा जेतेपद मिळवले होते. भारताला २००५ व २०१७च्या विश्वचषकात अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी भारताने इतिहास रचला व तो मैलाचा दगड सर करून स्वप्नपूर्ती केली.

भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूविषयी एव्हाना तुम्ही वृत्तपत्रांपासून समाज माध्यमांवर विविध लेख वाचले असतील. त्यांच्या संघर्षमय प्रवासाने अनेकांना प्रेरणाही मिळाली असेल. मात्र या संघाचे मराठमोळे मुंबईकर प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचाही या विश्वविजेतेपदाच्या वाटचालीत सिंहाचा वाटा आहे. ५० वर्षीय मुझुमदार यांना खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी कधीही लाभली नाही. मात्र प्रशिक्षक म्हणून त्यांनी भारताला जगज्जेतेपदाची दिशा दाखवली. २०२३ पासून अमोल हे महिला संघाचे प्रशिक्षक आहेत. या विश्वचषकात सलग तीन लढती गमावल्यावर अमोल यांनी संघाला जबाबदारीची जाणीव करून देत खडे बोलही सुनावले, तर कधी आपल्या मुलींप्रमाणे या खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

अमोल यांच्याबाबतीत एक किस्सा नक्कीच जाणून घेण्यासारखा आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शालेय वयोगटात हॅरिस शील्ड स्पर्धेत शारदाश्रम शाळेकडून ६६४ धावांची विक्रमी भागिदारी रचली होती.

त्यावेळी पुढील क्रमांकावर अमोल फलंदाजीसाठी येणार होते. मात्र सचिन-विनोदच्या भागिदारीमुळे त्यांना फलंदाजीची संधी लाभलीच नाही. जवळपास दोन दिवस ते पॅड घालून संधीच्या प्रतिक्षेत होते. असेच त्यांच्या कारकीर्दीतही घडले. मुंबई, आसाम, आंध्र प्रदेश यांसारख्या विविध संघांकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या अमोल यांनी ११ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये ३० शतकांचाही समावेश आहे. मात्र त्यांची कारकीर्द स्थानिक क्रिकेटपुरतीच मर्यादित राहिली. भारतीय संघात त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली अशा एकापेक्षा एक दर्जेदार फलंदाजांची गर्दी होती. त्यामुळे या गर्दीत अमोल यांना स्वतःचे स्थान निर्माण करण्याची एकदाही संधी लाभली नाही.

रमाकांत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनात घडलेल्या अमोल यांनी या प्रतिकूल स्थितीतही हार मानली नाही. २०१४मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यावरही ते प्रशिक्षक म्हणून खेळाशी जोडून राहिले. आयपीएलमध्ये काही संघांना मार्गदर्शन केल्यावर त्यांनी मुंबईच्या रणजी संघाचेही प्रशिक्षकपद भूषवले. मुंबईची खडूस वृत्ती त्यांनी महिला खेळाडूंना शिकवली. अखेरीस या वृत्तीचे फलित म्हणून ते आता 'विश्वविजेते प्रशिक्षक' म्हणून ओळखले जात आहेत. विजयानंतर हरमनप्रीतने अमोल यांना वाकून नमस्कार करतानाचे छायाचित्र समाज माध्यमांवर पसरले आहे. यावरूनच अमोल यांचे या विश्वविजयाच्या वाटचालीत अमूल्य योगदान होते, हे स्पष्ट होते.

अमोल यांचे विश्वविजयानंतर दुसऱ्याच दिवशी विलेपार्ले येथील राहत्या घरी आगमन झाले. त्यावेळीही या माणसाने अत्यंत साधेपणानेच सर्वांशी संवाद साधला. समाज माध्यमांवर भारतीय महिला संघाच्या विश्वचषकातील वाटचालीवर आधारित चित्रपट बनवण्यात यावा, अशीही मागणी जोर धरत आहे. अमोल मात्र आपल्या पुढील अभियानासाठी सज्ज झाले आहेत. २०२६मध्ये महिलांचा टी-२० विश्वचषक व त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी यांसारख्या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे अमोल यांच्यावरील जबाबदारी आता आणखी वाढली आहे. विश्वचषक हा शेवट नसून एक नवी सुरुवात आहे, हेच अमोल जणू ठामपणे सांगत आहेत.

एकूणच अमोल यांच्या प्रशिक्षणात भारतीय महिला संघाने केलेल्या पराक्रमाचे आता सातत्याने दाखले दिले जातील व यामुळे अनेकांना प्रोत्साहन मिळेल, यात शंका नाही.

bamnersurya17@gmail.com

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी