अजब निसर्ग
मकरंद जोशी
लहानपणीच्या मजेदार खेळांमधला एक 'तळ्यात का मळ्यात'. कुठे उभं राहायचं आहे, 'तळ्यात का मळ्यात' हे न कळल्यामुळे अनेकजण कसे पटापट बाद होतात हे तुम्ही पाहिलं असेलच. पण निसर्गात मात्र तळ्यात आणि मळ्यात दोन्हीकडे मजेत राहायची कसरत उत्तमपणे जमलेले काही भिडू पाहायला मिळतात. आपल्या पृथ्वीवरच्या जीव सृष्टीचा उगमच पाण्यात झाला आहे. त्यामुळे वनस्पती काय किंवा प्राणी काय आधी पाण्यात म्हणजेच तळ्यात राहात होते. तिथून ते हळू हळू अधिक अनुकूल परिस्थितीच्या शोधात जमिनीवर म्हणजे मळ्यात आले. मग पाण्यात राहाणारे ते जलचर आणि जमिनीवर राहातात ते भूचर अशी स्पष्ट विभागणी झाली. पण ही विभागणी होताना काही प्राण्यांच्या शरीरात असे बदल घडून आले की ते दोन्ही ठिकाणी म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर सारख्याच सहजतेनं राहू लागले आणि एका वेगळ्या गटाचा उदय झाला. हा गट 'उभयचर 'म्हणजे 'अॅम्फिबियन' या नावाने ओळखला जातो.
अॅम्फिबियन या प्राचीन ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थच मुळी 'दोन्ही प्रकारचे आयुष्य' असा होतो. सुरवातीच्या काळातले जे उभयचर होते ते पाण्यातले असे मासे होते ज्यांना पायांसारखे फिन्स म्हणजे कल्ले फुटले होते आणि याच कल्ल्यांच्या मदतीने ते पाण्याबाहेर जमिनीवर खुरडत खुरडत चालत असत. आजही बहुसंख्य अॅम्फिबियन्सच्या आयुष्याची सुरुवात पाण्यात होते. पाण्यातच पिल्लांमध्ये अवस्थांतर घडून येतं आणि ते पाण्याबरोबर जमिनीवर राहायला सक्षम होतात. उभयचर प्राण्यांचे जगभरात सुमारे ८००० प्रकार आढळतात आणि त्यातले ऐंशी टक्क्यांहून जास्त प्रकार हे बेडकांचे आहेत. मात्र उभयचरांमधले एखाद दोन अपवाद वगळले तर समुद्रात किंवा खारट पाण्यात कोणतेच उभयचर तग धरू शकत नाहीत. उभयचर हे थंड रक्ताचे असल्याने त्यांना आपल्या शरीराचे तपमान स्थिरस्थावर ठेवण्यासाठी बाह्य घटकांवर अवलंबून राहावे लागते.
उभयचरांच्या तीन मुख्य ऑर्डर्स (गण) आहेत. १) अनुरा यात बेडकांचा समावेश होतो, २) कौडाटा- यात सलामॅन्डर येतात आणि ३) जिम्नोफिओना- यात सिसीलियन्स येतात. 'अनुरा' या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो 'पुच्छ विहिन' अर्थात शेपूट नसलेले प्राणी. बेडकांचा जीवनक्रम पाण्यात सुरू होतो. बेडकाची मादी पाण्याजवळच्या वनस्पतींच्या पानावर किंवा पाण्यातच अंडी घालतात. या अंड्यांमधून बाहेर आलेल्या पिलांना टॅड्पोल्स म्हणतात. या पिल्लांना शेपटी असते आणि ते माशांप्रमाणे पाण्यात पोहताना दिसतात. ही अवस्था संपताना बेडकामध्ये आमूलाग्र बदल होतात, त्याच्या शरिरातील कल्ले जाऊन फुफ्फुसे तयार होतात, डोळ्यांपासून ते चेतासंस्थेपर्यंत असे बदल होतात की, ज्यामुळे प्रौढावस्थेतील बेडूक आपले उर्वरित आयुष्य जमिनीवरही आरामात घालवू शकतो.
आपल्याला बेडकांचे अस्तित्व त्यांच्या मंडूक वाणीमुळे चटकन जाणवते. घशात घेतलेली हवा बाहेर सोडताना स्वरयंत्राच्या मदतीने बेडूक हा आवाज करतात आणि तो मोठा करण्यासाठी त्यांच्या गळ्याजवळ किंवा तोंडापाशी कातडी पिशव्या असतात. बेडकांच्या ओरडण्यातील विविधता थक्क करणारी आहे. तुम्हाला जर रात्रीच्या वेळी झाडांझुडपातून टाइप रायटर वापरल्यासारखा 'टक टक टकाक टक 'असा आवाज आला तर समजून जा की, आसपास बॉम्बे बुश फ्रॉग आहे. आकाराने अगदी लहान असलेला हा बेडूक त्याच्या गळ्याजवळची पिशवी फुगवून हुबेहूब टाइप रायटरचा आवाज काढतो. भारतात आढळणाऱ्या बेडकांचे ढोबळपणे जमिनीवर राहाणारे, पाण्यात आणि पाणथळ जमिनीवर राहाणारे, झाडांवर राहणारे अशा गटांमध्ये विभाजन करता येते. भारतात जे उभयचर आहेत त्यात ९०% जाती या बेडकांच्या आहेत. भारतात आढळणाऱ्या बेडकांच्या अनेक प्रजातींमधील सर्वात मोठा बेडूक म्हणजे 'इंडियन बुल फ्रॉग'. हा ओरडायला लागला की, याच्या गळ्याजवळच्या निळ्या रंगाच्या हवेच्या पिशव्या फुगतात. पावसाळ्यात सह्याद्रीच्या रानवाटांवर दिसू शकणारा बाय कलर्ड फ्रॉग हा नावाप्रमाणेच दोन रंगी असतो. डोक्यापासून ते पार्श्वभागापर्यंत येणारा गडद पिवळा पट्टा आणि शरीराच्या दोन्ही बाजूंचा काळा रंग यामुळे हा दुरंगी बेडूक नजरेत भरतो. आपल्या रंगीत अवतारामुळे लक्ष वेधून घेणारा आणखी एक बेडूक म्हणजे फंगॉइड फ्रॉग. पाठीवरचा मातकट पिवळा रंग, कडेचा काळा रंग आणि पायावरचे काळे पिवळे पट्टे यामुळे अगदी नटून सजून तयार असल्यासारखा हा बेडूक दिसतो.
जिम्नोफिओना गणातले सिसीलियन्स हे सापासारखे किंवा आकाराने मोठ्या गांडूळसारखे दिसतात. तसेच लांबुळके, हात-पाय नसलेले शरीर असते. मात्र गांडूळ आणि सिसीलियनमधला मुख्य फरक म्हणजे सिसीलियनना डोळे, दात आणि शरीराचा सांगाडा असतो, जो गांडूळांना नसतो. तर सापांपेक्षा हे वेगळे ओळखता येतात कारण सापांसारखी यांची कातडी खवल्यांची नसते. यांचे शरीर वळ्या वळ्यांनी बनलेले असते. हे ओल्या मातीत, पाचोळ्याखाली, जमिनीखाली राहातात. यातले काही प्रकार पाण्यातही राहातात. जमिनीखाली राहात असल्याने सिसीलियनचे डोळे फारसे विकसीत झालेले नसतात. सिसीलिअन्सच्या डोक्यावर दोन्ही बाजूंना- डोळे आणि नाकपुडीच्यामध्ये 'टेन्टॅकल्स' असतात. या इंद्रियाच्या मदतीने सिसीलियन्स वास घेतात. नाकाबरोबरच गंध हुंगण्यासाठी हे जास्तीचे इंद्रिय त्यांना आहे. बहुसंख्य सिसीलियन आपली अंडी जमिनीखाली घालतात, त्यातून बाहेर आलेली पिल्ले जवळच्या पाण्यात जाऊन राहातात. काही मात्र थेट पिल्लांनाच जन्म देतात. एका प्रजातीमध्ये पिल्लांना जन्म दिल्यानंतर आईच्या अंगावर कातडीचा एक थर वाढतो. पिल्ले दर दोन-तीन दिवसांनी हा वाढीव थर खाऊन त्यांच्या वाढीसाठी पोषक घटक मिळवतात. या 'पोषक आहारा'मुळे पिल्ले फक्त एका आठवड्यात त्यांच्या मूळ आकाराच्या दसपट वाढतात. आपल्या भारतात सिसीलयन्स आढळतात ते मुख्यत्वे 'पश्चिम घाट' म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगेत. भारतात आढळणाऱ्या सिसीलियन्सच्या ३९ प्रजातींपैकी २६ या एन्डेमिक म्हणजे प्रदेशनिष्ठ आहेत, ज्या फक्त भारतातच पाहायला मिळतात. बॉम्बे सिसीलियन, नारायण सिसीलियन, कोडागू स्ट्रीप्ड सिसीलियन, गोवा सिसीलियन, वायनाडमध्ये आढळणारी पेरिह पीक सिसीलियन, महाराष्ट्र सिसीलियन अशा अनेक प्रदेशनिष्ठ जाती भारतात पाहायला मिळतात. दरवर्षी सिसीलियन्सच्या नवनवीन प्रजाती सापडत आहेत, त्याचबरोबर त्यांचा अधिवास-त्यांना राहायला अनुकूल अशी ठिकाणे कमी होत आहेत. त्यामुळे उभयचर वर्गातील हा अनोखा जीव संकटात सापडलेला आहे.
तर उभयचर हे या निसर्गातील अजब जीवांचे एकदम अचूक उदाहरण मानता येतील. तळ्यात का मळ्यात या प्रश्नावर त्यांचं उत्तर दोन्हीकडे मजेत हेच असतं.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com