जगतवारी
मेधा आलकरी
ॲमस्टरडॅमच्या कालव्यांतून फिरताना, पवनचक्क्यांच्या साक्षीने भूतकाळ अनुभवताना आणि चीज-लाकडी बुटांच्या गंमती ऐकताना हॉलंड केवळ एक देश राहत नाही—तो एका जिवंत चित्रपटासारखा मनात उतरतो. आधुनिकता, परंपरा आणि निसर्ग यांचं विलक्षण मिश्रण अनुभवायला लावणारा हा प्रवास प्रत्येक वळणावर नवी कहाणी सांगत राहतो.
हॉलंडमधील पर्यटकांचं लाडकं शहर म्हणजे ॲमस्टरडॅम. ॲमस्टरडॅम शहराचं नाव घेताच मला आठवायचे ते जुन्या इंग्रजी रहस्यपटातले सीन. शहराच्या मधून वाहणारा कालवा, काठावरून धावणाऱ्या वेगवान गाड्या, सडॅक झडॅक असा ठेका धरत मध्येच कमरेला एक झटका देणाऱ्या ट्राम, कनालच्या काठानेच पण रस्त्यांच्या पलीकडे असणारी मोठ्या खिडक्या आणि मोठ्या दारांची, वेगळ्या धाटणीची दुमजली कौलारू घरं आणि रस्त्यांवरून, पुलांवरून सुसाट वेगाने पळणारा आमचा हिरो ! त्यामुळे ॲमस्टरडॅममध्ये उतरल्यावर पहिला मान होता तो अर्थातच कनाल क्रूझचा.
काचेचं छप्पर असलेल्या या छानशा बोटीतून आमचा प्रवास सुरु होताच गाईडनं आम्हाला काठावरील त्या घरांची माहिती द्यायला सुरुवात केली. प्रत्येक घराच्या कमानीशी एक लांब लोखंडी सळी आणि मोठा आकडा दिसला. त्याबद्दल विचारणा केली असता असं कळलं की हा हुक फर्निचर खिडकीमार्गे घरात चढवण्यासाठी उपयोगी पडतो. पूर्वी कालव्याकाठच्या जागेची किंमत फार मोठी होती. त्यामुळे ही अशी अरुंद पण लांबुडकी आणि दोन तीन मजली घरं बांधण्याची प्रथा पडली. घरातील दरवाजे आणि जिने इतके अरुंद आहेत की त्यातून फर्निचरची ने-आण अशक्यप्रायच असते.तेव्हा या भल्या थोरल्या खिडक्या कामी येतात. आमच्या बलवत्तर नशिबाने एका ठिकाणी चाललेला हा द्राविडीप्राणायाम आम्हाला पाहावयास मिळाला. गाईडने एका घराकडे अंगुलीनिर्देश करून हे शहरातील सर्वात छोटं घर असल्याची माहिती दिली. संपन्न देशात सर्वात छोटं घर ही एक प्रेक्षणीय वस्तू होते. केवढा हा विरोधाभास! माझ्या आतील अस्सल भारतीय मन चुकचुकलं.
हा कनाल क्रूझ आपल्याला पार जुन्या बंदरापर्यंत घेऊन जातो. तिथं ॲमस्टरडॅम नावाच्या हॉलंडच्या पहिल्या व्यापारी जहाजाची प्रतिकृती मोठ्या दिमाखात उभी आहे. त्याच्या समोरच बोटीच्या आकाराची एक इमारत आहे. ह्या सरकारी इमारतीत सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं म्युझियम आहे. परंतु स्थानिक जनता याला टायटॅनिक या नावाने संबोधते. टायटॅनिक बुडत असताना तिचं नाक समुद्रात घुसलं तेव्हा ती जशी दिसली तसा काहीसा आकार या इमारतीचा असला, तरी टायटॅनिक नामकरणाचा आणखी एक अर्थ आहे. हे म्युझियम ‘बुडित’ गेलं होतं, त्याचं दिवाळं वाजलं होतं म्हणून त्याला म्हणतात टायटॅनिक !
हेनिकेन बियरचा जन्मदाता दस्तुरखुद्द हेनिकेन याचं एक रेस्टॉरंट आहे कनालकाठी. त्याचं अर्ध्याहून अधिक स्वयंपाकघर पाण्याखाली आहे. हॉलंड हा ‘लो लँड’ देश आहे. ही संकल्पनाच आपल्याला नवी. समुद्रसपाटीपासून उंची आपल्याला ओळखीची; परंतु खोली असते या बाबतीत मी तरी अनभिज्ञच होते. हॉलंडचा प्रशस्त आणि आधुनिक शिफॉल विमानतळ हा समुद्रसपाटीपासून साधारण ४.५ मीटर खाली आहे. टूर गाईडने लो लँड बरोबरच ‘पोल्डर लँड’ म्हणजे समुद्र किंवा दलदल हटवून, त्याचा तळ कोरडा करून मिळवलेली जमीन आणि त्याच्या चारी बाजूस तयार केलेले बांध याचीही माहिती पुरवली. वाढत्या लोकसंख्येला लागणारी जमीन त्यांनी अशा तऱ्हेने निर्माण केली. इथे कालव्याच्या आतून वाहतुकीसाठी बोगदा खणलाय. हे कालवे पूर्वी दळणवळणाचं साधन म्हणून खोदले गेले होते.
हा तासाभराचा क्रूझ करून झाला की जुन्या शहराची अर्धी अधिक वारी करून आलो असं वाटतं. दिवस कलल्यावर केलेल्या या क्रूझची वेगळीच तऱ्हा! मेणबत्त्यांचा मंद प्रकाश, सोबत वाईन, वेगवेगळ्या चवींचं चीज, धुंद संगीत, बाहेर झगमगणारं शहर. तो कैफ काही औरच! सूर, सुरा आणि सुंदरी यांच्या सान्निध्यसुखाची नशा आवडणाऱ्यांसाठी हा निशा नौकाविहार!
हॉलंडची ठळक खूण म्हणून मनात ठसलेलं आणखी एक चित्र म्हणजे त्यांच्या पारंपरिक पवनचक्क्या. हॉलंडमध्ये झोडपणारा पाऊस आणि झंझावता वारा या समस्यांना तोंड देण्यासाठी तेथील लोकांनी खूप युक्त्या शोधून काढल्या. निरक्षर शेतकऱ्यांनीही आपल्या खोपटांच्या चारी बाजूंनी झाडं लावली. ही झाडं घराला एखाद्या पिरॅमिडसारखं झाकून टाकतात आणि घर वादळवाऱ्यापासून सुरक्षित राहतं.
‘झान्सेसकांस’ असा तर्खडकरी उच्चार असलेल्या (डच उच्चारासाठी जीभ फार वळवावी लागेल, तेव्हा ती तसदी घेऊन नका,- इति आमचा गाईड) पवनचक्क्यांच्या गावात आम्ही प्रवेश करताच तन मन अगदी ताजतवानं झालं. छान झुळझुळतं वारं आणि लांबवर पसरलेली हिरवी कुरणं! शाळकरी होऊन, जत्रेत मिळणारी भिंगरी घेऊन पळत जावंसं वाटलं. एकेकाळी या पारंपरिक पवनचक्क्यांची संख्या दहा हजारांवर होती. आतामात्र ती रोडावून बाराशे वर आली असली तरी त्या आजही कार्यरत आहेत. पोल्डर लँड मधील पाणी उपसण्याचं काम तर त्या करतातच; शिवाय धान्य दळणे, लाकूड कापणे आणि तेल व कागदनिर्मितीच्या कामातही त्यांचा हातभार लागतो. येथील स्थानिक बेकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागणारं पीठ या पवनचक्यांद्वारे दळलं जातं. लाकूड कापणाऱ्या पवनचक्क्यांच्या उपयोग अठराव्या शतकात जहाजे बनवण्यासाठी होत असे. हॉलंडमध्ये दिसणारे हजारो आधुनिक टर्बाईन मात्र वीज निर्मितीच्या कामात उपयोगी पडतात. पारंपरिक पवनचक्क्या वीज बनवत नाहीत. मे महिन्यात येणारा ‘नॅशनल मिल डे’ साजरा करताना देशातील सर्व पवनचक्क्यांचे पंखे फिरवले जातात आणि त्यादिवशी पर्यटकांना त्या आतून बघता येतात. झान्सेनकांस ही पवनचक्की मात्र पर्यटकांसाठी नेहमीच खुली असते. चालत त्याच्या तळाशी आलो तेव्हा त्याचा प्रचंड आवाका लक्षात आला. तळमजल्यावरून पहिला मजला चढून गेलो आणि दूरवर पसरलेली हिरवाई पाहिली. ही पवनचक्की आजही तेल बियाणं दळण्यासाठी वापरात येते.
त्यानंतर आम्ही जवळच्याच बूट बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली. लाकडी बूट (क्लोम्प) हेही हॉलंडचं एक वैशिष्ट्य ! इथे आपल्या लग्नाळू मुलाला त्याचे वडील बूट कोरायला शिकवतात. पूर्वीच्या काळी तरुण एखाद्या तरुणीला लग्नाची मागणी घालण्यासाठी बारीक कोरीवकाम केलेला नक्षीदार लाकडी बूट रात्री तिच्या उंबरठ्यावर ठेवत असे. दुसऱ्या दिवशी तिच्या पायात तो दिसला तर होकार समजायचा. लग्नात तर तो बूट घालून त्याची नववधू मांडवभर मिरवते. त्या कारखान्यात ओलं लाकूड ते तयार बूट या प्रक्रियेचं प्रात्यक्षिक आम्हाला बघायला मिळालं. दुकानाबाहेरील छोटेखानी म्युझियममध्ये तो लग्नातला बूटही पाहिला आम्ही. अगदी बारीक आणि नाजूक असं जाळीदार कोरीवकाम! या बुटाकरता वापरलं जाणारं ‘पॉप्लर’ किंवा ‘विलो’ झाडाचं लाकूड किती ओलं असतं हे दाखवण्यासाठी त्या कारागिराने आमच्या देखत एका टोकाकडून जोरात फुंकर मारली. दुसऱ्या टोकाकडून चक्क पाण्याचे बुडबुडे आले. पण मुळात या लाकडी बुटांची कल्पना रुजली कारण हॉलंड हा दलदलीचा प्रदेश आहे. चामड्याचे बूट ओले होऊन लवकर खराब होतात.( मुंबईकरांना हा अनुभव काही नवा नाही.) त्या ऐवजी या हलक्या आणि मजबूत लाकडी बुटात पाय कोरडे आणि उबदार राहतात. शेतात किंवा कारखान्यात काम करताना ते अधिक सुरक्षित मानले जातात. आजच्या आधुनिक शहरी जीवनात मात्र त्याचा उपयोग पर्यटकांसाठी सोव्हिनियर इतकाच राहिला आहे. दुकानाच्या बाहेर प्रांगणात, पिवळे धम्मक महाकाय बूट ठेवले होते. अगदी आपल्या म्हातारीच्या बुटाएवढा मोठा नाही पण एक माणूस बसू शकेल इतका मोठा खचितच होता तो बूट.
हॉलंड आणि चीज यांचं नातं शेकडो वर्षांपासूनचं आहे. तो त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पोल्डर लँडची सुपीकता आणि गाई-म्हशींचं योग्य संगोपन यामुळे तेथील चीज उच्च दर्जाचं असतं. ॲमस्टरडॅमला परतताना आम्ही एका चीज फार्मला भेट दिली. तिथला ‘गवळीबुवा’ म्हणजे एक वल्लीच ! ढगळी, काळी थोडी मळलेली पँट, (बहुदा कमरेशी नाडीने बांधलेली असावी) पांढरा शर्ट, जॅकेट आणि टोपी. बोलणं मात्र विनोदी आणि हजरजबाबी! दूध उकळवून, फाडून त्याचे निर्यातीसाठी तयार चीज कसे बनते याचं प्रात्यक्षिक पर्यटकांना दाखवण्याची रुक्ष प्रक्रिया त्याने आपल्या विनोदाच्या फोडणीने छान रुचकर बनवली. “दूध फाडल्यानंतर जे हिरवट पाणी वेगळं होतं (व्हे) त्याचा चीज बनवण्यासाठी काही उपयोग नसला तरी आम्ही ते फेकून देत नाही बरं का…” अशी सुरुवात करून तो थांबला. आमच्या प्रश्नार्थक चेहऱ्यांवरून एक गंभीर नजर फिरवत पुढे म्हणाला, “ पर्यटकांना पाजतो..” हास्याची लाट ओसरल्यावर म्हणतो कसा, “गंमत राहूदे बाजूला, हे व्हे खूप पौष्टिक आणि औषधी आहे. त्याने वार्धक्य लांबणीवर पडतं. आता हेच बघा, माझं वय आहे पंच्याऐंशी, वाटतो का मी त्या वयाचा?” आता मात्र त्याच्या टपलीत मारावीशी वाटली. पठ्ठा जेमतेम पस्तिशीचा असेल. शेवटी त्याने गौडा, एडाम या चीजमधले फरक समजावून सांगितले. गोडसर आणि सायीसारखं मऊ गौडा आणि क्रिकेटच्या बॉलसारखं कडक पण दीर्घकाळ टिकणारं एडाम यांची चव घेतली. खिशाचा भार हलका करत दोन तीन प्रकार विकत घेतल्यामुळे त्या विनोदवीराचा हेतू सफल झाला. हॉलंडमधील पारंपरिक चीज मार्केटमध्ये विक्रेते चीजची भलीमोठी चक्रच घेऊन येतात. त्यांचे कपडे शुभ्र पांढरे असतात आणि लाकडी हातगाड्यांवरून त्या चीजचक्रांची ने आण होते. पूर्वी जर्मन आणि फ्रेंच हे त्यांचे शेजारी डच लोकांना ‘चीजहेड’ म्हणून हिणवायचे. युद्धकाळात शेतकरी बाहेर पडताना या चीज बनवण्याच्या गोल आणि मजबूत लाकडी साच्यांचा उपयोग हेल्मेटसारखा करीत. डच लोकांनी मात्र त्याला राष्ट्रीय अस्मितेचा भाग बनवला. स्वतःला चीजहेड म्हणवून घेण्यात ते धन्यता मानतात. फुटबॉल सामन्यांदरम्यान डच समर्थक आपल्या डोक्यावर चीजच्या आकाराच्या फोमच्या पिवळ्या टोप्या घालतात ते चीजहेड म्हणूनच.
लेखिका आणि ट्रॅव्हलर