अक्षररंग

अशोक, तुस्सी ग्रेट हो...

अशोक हांडे यांना यावर्षीच्या आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. १३ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. साहित्य आणि नाट्यसृष्टीत हा मानाचा पुरस्कार मानला जातो. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ३८ वर्षांची लांबलचक इनिंग खेळणाऱ्या, मराठी गीतांची पताका परदेशातही फडकावणाऱ्या या कलाकाराला सलाम.

नवशक्ती Web Desk

दखल

संजय कुळकर्णी

अशोक हांडे यांना यावर्षीच्या आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. १३ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. साहित्य आणि नाट्यसृष्टीत हा मानाचा पुरस्कार मानला जातो. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ३८ वर्षांची लांबलचक इनिंग खेळणाऱ्या, मराठी गीतांची पताका परदेशातही फडकावणाऱ्या या कलाकाराला सलाम.

आचार्य अत्रे पुरस्कार आमच्या अशोकला मिळाला याचा मला अभिमान वाटतोय. सन्माननीय अशोकचा मी इथे एकेरी नावाने उल्लेख करतोय, कारण १९८७ पासून व्यावसायिक रंगभूमीवरची त्याची घोडदौड मी पाहत आलोय. ७ ऑगस्ट १९८७ या दिवशी त्याने त्याच्या 'चौरंग' या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. ३८ वर्ष त्याचा अश्वमेध घोडा महाराष्ट्रातील सर्वच नाट्यगृहांमध्ये त्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दौडतोय आणि तो अजूनही अजिंक्य राहिला आहे.

हे सर्व १३ ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे पुरस्कार सोहळ्यात डोळ्यासमोरून सरकू लागलं. त्यानं तो पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याच्या ३८ वर्षाच्या कारकिर्दीचा पडदा उलगडत गेला. या ३८ वर्षांत त्यानं किती मोठी झेप घेतली आहे... हे सारं सुखावून टाकणारं आहे.

लालबागच्या रंगारी बदक चाळीतील एक तरुण... हा एवढा मोठा स्टार होईल हे स्वतः अशोक यालाही वाटलं नसेल. रंगारी चाळीत राहत असताना त्याच्या कानावर शाहीर अमर शेख यांचे पोवाडे पडत होते. नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं आणि भक्तिरसाचे सूरही अनुभवायला मिळत होते. बालकराम वरळीकरांच्या कला पथकाने त्याच्यावर लोककलांचेही संस्कार घडवले.

अवतीभवतीच्या या अशा जागांनी त्याच्यावर नकळत खूप संस्कार केले. अगदी चित्रपटांपासून भजनांच्या जुगलबंदीपर्यंत आणि कोळी नृत्यापासून गायन पार्टीपर्यंतचा अनुभव त्याला आपल्या राहत्या चाळीच्या परिसरात मिळाला. रुपारेल महाविद्यालयात असताना तो 'पिकनिक स्टार' होता. वेगवेगळ्या प्रकारची विडंबन गीतं तो म्हणत असे.

त्या काळात छबिलदास रंगमंचावर प्रायोगिक नाट्य चळवळही जोरात होती. प्रायोगिक नाटकं सादर होत असत. 'घाशीराम कोतवाल' आणि 'तीन पैशाचा तमाशा' ही दोन नाटकं पाहिल्यावर अशोकला या नव्या फॉर्मची ओळख झाली. पिकनिक स्टार असलेला हा तरुण आता कलाकार बनला. त्याने मराठी लोककला प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी 'चौरंग' या संस्थेची स्थापना करून प्रथमच 'मंगल गाणी, दंगल गाणी' या कार्यक्रमाची निर्मिती करून व्यावसायिक रंगभूमीवर पहिल्याच निर्मितीत यशाचा झेंडा रोवला. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलंच नाही. 'माणिक मोती', 'अमृतलता', 'मधुरबाला', 'आवाज की दुनिया', 'गाने सुहाने', 'आझादी ५०', 'स्वर स्नेहल', 'गंगा जमुना', 'अत्रे-अत्रे-सर्वत्रे', 'आवरा हूं' आणि 'मराठी बाणा' यांसारख्या देखण्या गान कलाकृती सादर करून आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध केलं.

या सर्व दर्जेदार आणि कल्पक कलाकृतींमुळे अशोक हांडे आणि व्यावसायिक रंगभूमी यांचं अतूट असं नातं निर्माण झालं. अनेक विक्रमाच्या नोंदी झाल्या. प्रशांत दामले हा व्यावसायिक रंगभूमीवरचा 'हाऊस फुल'चा सम्राट, तर अशोक हांडे हा वाद्यवृंद क्षेत्रातील 'हाऊस फुल'चा बादशहा. ते दोघे आजही व्यावसायिक रंगभूमीवर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत. वाद्यवृंदांना जेव्हा सुगीचे दिवस नव्हते तेव्हा अशोक हांडे यांच्या 'चौरंग' संस्थेने कलाकारांना मग ते गायक-गायिका असोत, वाद्य वाजवणारे असोत, रंगमंचीय कामगार असोत, की प्रकाश योजनाकार-वेशभूषाकार-रंगभूषाकार असोत, त्यांना मानधनाने समृद्ध केले. त्याच्या 'मराठी बाणा' या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे होतं की अवघ्या दोन तासांमध्ये या प्रयोगाची तिकिटं संपत असत. पहिल्या प्रयोगापासूनच 'मराठी बाणा'च्या प्रयोगाला 'हाऊस फुल्ल'चा बोर्ड लागला आहे. अजूनही तो लागताना दिसतोय. यावरून अशोकची आणि या प्रयोगाची लोकप्रियता दिसून येते. प्रयोगाची प्रॉपर्टी घेऊन जावी लागते, तसाच 'हाऊस फुल्ल'चा बोर्ड सुद्धा बरोबर घेऊन जावा लागतो, असं तो गमतीने म्हणतो. दीनानाथ नाट्यगृहाच्या खाली फिश मार्केट आहे. तिथे मासे विकणाऱ्या एका कोळणीने 'मराठा बाणा' हा कार्यक्रम तब्बल २२७ वेळा तिकिटं काढून पाहिलेला आहे. या कार्यक्रमाचे तिकीट दर जास्त हवेत, असंही काही रसिक प्रेक्षकांनी त्याला सांगितलं. त्यावर तो म्हणतो, "अशा प्रेक्षकांचे ऋण मी आयुष्यात फेडू शकणार नाही. ही सारी मराठी संस्कृतीची किमया आहे. आपणच आपल्या परंपरेचं मोल जाणत नाही. नाहीतर जगातील सर्वात मोठी श्रीमंती, संस्कृतीची आणि मनाचीही आपल्या महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्र सोडून जगात कुठेही इतक्या सगळ्या गोष्टी असतील असं वाटतं नाही." हेच 'मराठी बाणा'च्या यशाचं गुपित असावं. नाही का?

"अशोक, तू आपली मराठी संस्कृती आणि अस्मिता टिकवून ठेवली आहेस," अशी कौतुकाची थाप तर त्याला अनेक मान्यवरांकडून मिळाली आहे. सुनील गावस्कर म्हणाले होते की, क्रिकेटच्या क्षेत्रात आम्ही तीन मराठी खेळाडूंनी दहा हजाराचा टप्पा गाठलेला आहे. अशोक याबाबतीतला आमचा रेकॉर्ड त्याच्या प्रयोगांनी नक्कीच मोडणार."

अशोकला एकदा सिंगापूरच्या क्रूझवर एक संपूर्ण महिना कार्यक्रम करण्यासाठी बोलावणं आलं होतं. पण त्याच्या आंब्याच्या व्यवसायामुळे त्याला सलग एक महिना जाणं शक्य नव्हतं. त्याबद्दलची आठवण सांगताना तो म्हणाला, "सिंगापूरसारख्या देशाला फार तर १०० किलोमीटरचा समुद्र असेल. महाराष्ट्राला तर जवळ जवळ ६०० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटून आपल्या कोकणच्या पर्यटन विकासासाठी क्रूझवरचा कार्यक्रम ठरवला. मुंबईतील जवळ जवळ ६० देशांच्या राजदूतांना त्यांच्या कुटुंबसहित क्रूझवर बोलावलं. या क्रूझचा रात्रीचा मुक्काम रत्नागिरीला होता. इथे कार्यक्रम सादर केला. निवेदन तेवढं इंग्रजीमध्ये केलं. बाकी गाणी मराठी. अशा अनेक आठवणी आहेत."

संस्कार अनेक गोष्टींमधून घडत असतात. कळत-नकळत अनेक बाबी प्रभाव टाकत असतात. अशोक भावुक होऊन म्हणतो, "आईची शिकवण, गावाकडे जत्रेत होणारी नाटकं, वारकरी वडील, आजोबा नाथबाबा, उंब्रजमध्ये घरी असलेली लळीताची परंपरा..या साऱ्या गोष्टींनी माझ्यावर संस्कार केले. या संस्कारांनीच माझ्या जीवनाला आधार दिला, मला घडवलं. मला अनेकजण प्रश्न विचारतात की, तुम्हाला इतक्या कविता पाठ कशा? त्यावेळी हमखास आठवण होते ती चिकित्सक शाळेतील्या परांजपेबाईंची." अर्थात परांजपेबाई अनेकांच्या शिक्षिका होत्या, पण चोख पाठांतर करणारा विद्यार्थी होता अशोक हांडे हाच.

अशोक एकदा का बोलायला लागला की तो थांबतच नाही. याला कारण त्याची ३८ वर्षांची लांबलचक कारकीर्द. अशोक बोलत होता आणि मी ऐकत होतो. आपला जीवनप्रवास उलगडत तो म्हणाला, "शाळा आणि महाविद्यालयाने सुद्धा माझ्यावर संस्कार केले. ज्याप्रमाणे शाळेत असताना इतर उपक्रमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तशीच रुपारेल महाविद्यालयात शिकतानाही मी अनेक गोष्टी केल्या. तिथल्या शिक्षकांनीही मला प्रोत्साहन दिलं. अभ्यास आणि इतर उपक्रम या दोन्ही ठिकाणी मी आघाडीवर होतो. 'मंगल गाणी दंगल गाणी' हे माझं पहिलं अपत्य. या कार्यक्रमाने माझ्या कला जीवनाचा पाया मजबूत झाला. या कार्यक्रमासाठी केलेल्या संशोधन आणि अभ्यासातून मी अधिक प्रगल्भ होत गेलो. गेली ४५ वर्ष हा कार्यक्रम करतोय. मंगल गाणी करत असताना हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम असावा, अशी कल्पना समोर आली. त्यातून 'आवाज की दुनिया' या कार्यक्रमाचं बीज माझ्या मनात पडलं. माणिक वर्मासारख्या सात्विक, सोज्वळ, प्रासादिक गायिकेचा आणि तितक्याच ताकदीच्या गृहिणीचा 'माणिक मोती' हा जीवनपट त्यांच्याच गाण्यातून आणि त्यांनी गायलेल्या शास्त्रीय चीजांमधून इतक्या अभिनव पद्धतीने मांडू शकलो हे मी माझं पूर्वसंचित मानतो. लतादिदींना 'अमृतलता' कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यासाठी फोन केला. 'तुम्ही या कार्यक्रमात नेमकं काय दाखवणार आहात?' हा लतादिदींचा थेट प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे पडदा उघडण्याआधीच नेपथ्य दाखवण्यासारखं होतं. खरं सांगू, फक्त मनोरंजनाचा विचार न करता स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास 'आजादी ५०'मधून मांडला. प्रेक्षकांनीही तो उचलून धरला. नंतर काळानुसार बदल करीत आम्ही 'आजादी ७५' या नावाने हा कार्यक्रम केला. आता यापुढे 'आजादी ७८' या नावाने करू. संपूर्ण आयुष्यभर मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांचं हित पाहणारा मोठा प्रतिभावंत, बहुआयामी आणि निर्भीड माणूस या महाराष्ट्रात होता हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. महाराष्ट्र कळायचा असेल तर आचार्य अत्रे वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत म्हणून 'अत्रे-अत्रे-सर्वत्रे'चा प्रयास केला, एवढंच." योगायोग हा की, अशोक हांडे यांना यावर्षीचा 'आचार्य अत्रे पुरस्कार' लाभला आहे. अशोकने मराठी संस्कृती आणि मराठी भाषा महाराष्ट्रभर नाही, तर जगभर त्यांच्या कार्यक्रमांमधून, विशेषतः 'मराठी बाणा' मधून पोहोचवली याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. पुरस्कार स्वीकारताना त्याने जे मनोगत व्यक्त केलं आहे त्याचाही गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मराठी संस्कृती, या राज्याचा इतिहास, भूगोल, मर्म आणि धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असं म्हणत आचार्य अत्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला हा पुरस्कार मराठी मातीमुळे, इथल्या संस्कारांमुळे आहे, असं सांगायला तो विसरला नाही.

अशोक, म्हणूनच आम्हाला तुझा अभिमान आहे. तुला हॅट्स ऑफ...

तल्लीन अमराठी आणि मराठी बाणा
अशोक हांडे याच्या कार्यक्रमांना अमराठी प्रेक्षक सुद्धा आवर्जून हजेरी लावतात हे विशेष. "आम्ही महाराष्ट्रात राहतो. पण 'मराठी बाणा' या कार्यक्रमामुळे आम्हाला महाराष्ट्राची संस्कृती कळली", असं जेव्हा ते अशोकला भेटून सांगतात तेव्हा अशोकला त्याचा सर्वार्थाने अभिमान वाटतो. अशोक सांगतो, परदेशी पाहुण्यांनी सुद्धा 'मराठी बाणा'च्या प्रयोगांना हजेरी लावलेली आहे. त्यांना गंध, हळद-कुंकू लावून जेव्हा त्यांचे औक्षण करतो तेव्हा ते आनंदित होतात. ते सांगतात, त्यांच्या इथे ब्रॉडवेला होणाऱ्या कार्यक्रमात वादक दिसत नाहीत. त्यामुळे ते वाजवताना कसे दिसतात है आम्हाला कधीच कळत नाही. पण तुमच्या कार्यक्रमात वादक तल्लीन होऊन वाजवताना दिसतात, याचं अप्रूप वाटलं."

ज्येष्ठ नाट्य समीक्षक

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या