रेघोट्यांपेक्षा कर्तृत्व मोठे 
अक्षररंग

रेघोट्यांपेक्षा कर्तृत्व मोठे

कष्टाच्या खुणांनी फाटलेल्या तळहातात धनरेषा शोधणाऱ्या ज्योतिषावर बहिणाबाईंनी आपल्या साध्या पण परखड शब्दांत प्रश्नचिन्ह उभे केले. अंधश्रद्धा, दैववाद आणि कर्मकांडाला विरोध करणाऱ्या त्यांच्या या चार ओळी आजच्या विज्ञानयुगातही विवेकाची नवी दृष्टी देतात.

नवशक्ती Web Desk

समाजचिंतन

जगदीश काबरे

कष्टाच्या खुणांनी फाटलेल्या तळहातात धनरेषा शोधणाऱ्या ज्योतिषावर बहिणाबाईंनी आपल्या साध्या पण परखड शब्दांत प्रश्नचिन्ह उभे केले. अंधश्रद्धा, दैववाद आणि कर्मकांडाला विरोध करणाऱ्या त्यांच्या या चार ओळी आजच्या विज्ञानयुगातही विवेकाची नवी दृष्टी देतात.

खानदेशी लोककवयित्री बहिणाबाई चौधरी या औपचारिक शिक्षणापासून दूर होत्या, तरी त्यांच्यात जीवनाकडे पाहण्याची विलक्षण चिकित्सक दृष्टी होती. शेतात राबणाऱ्या सामान्य स्त्रीच्या अनुभवातून त्यांनी समाजातील अनेक रूढ समजुतींवर नेमके बोट ठेवले. त्यांच्या कवितेतून अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड आणि बनावट आध्यात्मिकतेवर अनेक ठिकाणी उपरोधिक आणि उपहासात्मक पण परखड शब्दांत टीका केलेली आढळते. ज्योतिषशास्त्रावर त्यांनी केलेला हा प्रहार त्यातीलच एक अत्यंत प्रभावी नमुना आहे.

‘धनरेषांच्या चऱ्यांनी तळहात रे फाटला,

देवा तुझ्या बी घरचा

झरा धनाचा आटला,

म्हणे नशिबाचे नऊ ग्रह,

तळहाताच्या रेघोट्या,

बापा नको मारू थापा,

अशा उगा खऱ्या खोट्या.

या ओळी ज्योतिषशास्त्राच्या दाव्यांचा अत्यंत मार्मिक शब्दात उपहास करतात. बहिणाबाई सांगतात की, आयुष्यभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या तळहातावर श्रमामुळे खोल चरे पडतात, हात फाटतात; पण त्या चऱ्यांमुळे त्याच्या आयुष्यात धनाचा वर्षाव होत नाही. जर तळहातावरील धनरेषाच संपत्ती देत असतील, तर श्रमामुळे सर्वाधिक रेषा पडलेल्या शेतकऱ्यालाच सर्वाधिक श्रीमंत व्हायला हवे. प्रत्यक्षात मात्र तोच अनेकदा दारिद्र्यात जगतो. याच वास्तवातून त्या हस्तरेषाशास्त्राच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे करतात. या चार ओळींमध्ये बहिणाबाईंनी ज्योतिषशास्त्राचा पाया असलेल्या हस्तरेषा आणि ग्रहदशा या दोन्ही संकल्पनांवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या कवितेची ताकद ही विद्वत्तापूर्ण शब्दप्रपंचापेक्षा दैनंदिन जीवनातील प्रत्यक्ष अनुभवात आहे. त्या शेतकरी माणसाच्या हाताकडे पाहतात. वर्षानुवर्षे नांगर, विळा, कुऱ्हाड, फावडे हाताळल्यामुळे त्याचे तळहात फाटलेले असतात. कष्टाच्या खुणांनी त्याच्या हातावर असंख्य रेषा निर्माण झालेल्या असतात. हस्तरेषाशास्त्रानुसार धनरेषा जितकी स्पष्ट तितकी संपत्ती अधिक, असा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात सर्वाधिक कष्ट करणारा शेतकरीच अनेकदा सर्वाधिक गरीब असतो. बहिणाबाई याच विसंगतीकडे लक्ष वेधतात.

‘धनरेषांच्या चऱ्यांनी तळहात रे फाटला’ या ओळीत ‘धनरेषा’ हा शब्द अत्यंत उपरोधिक अर्थाने वापरला आहे. श्रमामुळे पडलेल्या चऱ्यांना त्या धनरेषा म्हणतात. जर तळहातावरील रेषाच धन देत असतील, तर श्रमामुळे सर्वाधिक रेषा निर्माण झालेल्या हातात अमाप संपत्ती असायला हवी. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. या एका निरीक्षणानेच हस्तरेषाशास्त्राचा डोलाराच कोसळतो. दुसऱ्या ओळीत त्या म्हणतात, ‘देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला.’ ही ओळ उपरोधाचा उत्कृष्ट नमुना आहे. मेहनती माणसाच्या वाट्याला गरिबीच येत असेल, तर देवाकडेही बहुधा धनाचा झरा आटला असावा, असे त्या मिश्कीलपणे म्हणतात. हा देवाची टिंगल करण्याचा प्रयत्न नसून अन्यायाचे समर्थन करणाऱ्या दैववादावर केलेला उपरोध आहे. माणसाच्या दुःखाला ग्रह, नशीब किंवा देवाची इच्छा जबाबदार धरली की समाजातील अन्याय, विषमता आणि शोषण यांवर पडदा पडतो. बहिणाबाई हा पडदा फाडून वास्तव दाखवतात.

‘म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या’ या ओळीत त्या ज्योतिषाच्या दोन प्रमुख आधारस्तंभांचा उल्लेख करतात. जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती आणि तळहातावरील रेषा यांच्या आधारे माणसाचे संपूर्ण भविष्य सांगता येते, असा ज्योतिषाचा दावा असतो. कोणाला नोकरी मिळेल, कोणाचा विवाह कधी होईल, कोणाला अपत्यप्राप्ती होईल, कोण श्रीमंत होईल, कोण आजारी पडेल, कोणाचा अपघात होईल, हे सर्व ग्रह ठरवतात, असे सांगितले जाते. परंतु या दाव्यांचा वैज्ञानिक कस लावला असता ते टिकत नाहीत. विज्ञानात कोणताही दावा स्वीकारण्यासाठी निरीक्षण, प्रयोग, पुनरावृत्ती आणि स्वतंत्र पडताळणी आवश्यक असते. ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत मात्र असे विश्वसनीय पुरावे उपलब्ध नाहीत. जगातील विविध देशांत अनेक नियंत्रित चाचण्या घेण्यात आल्या. जन्मपत्रिका पाहून व्यक्तीचा स्वभाव, व्यवसाय, वैवाहिक जीवन किंवा भविष्यातील घटना अचूक ओळखण्याचे आव्हान ज्योतिषांना देण्यात आले. परंतु त्यांची अचूकता योगायोगापेक्षा जास्त असल्याचे सिद्ध झाले नाही. त्यामुळे आधुनिक खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र किंवा इतर कोणतेही विज्ञान ज्योतिषाला वैज्ञानिक शास्त्र मानत नाही.

खरे तर ग्रहांचा पृथ्वीवरील माणसावर होणारा परिणाम हा गुरुत्वाकर्षण किंवा इतर ज्ञात नैसर्गिक शक्तींनी मोजता येण्यासारखा असला पाहिजे. खरे पाहता जन्माच्या वेळी प्रसूतिगृहात उभ्या असलेल्या डॉक्टरचे किंवा आईच्या शरीराचे गुरुत्वाकर्षण नवजात बाळावर मंगळ किंवा शनीपेक्षा अधिक असते. तरीही डॉक्टरच्या उपस्थितीवरून भविष्य सांगितले जात नाही, पण लाखो किलोमीटर दूर असलेल्या ग्रहांवरून भविष्य सांगितले जाते. हीच विसंगती विज्ञान अधोरेखित करते. ज्योतिषी अनेकदा अशी विधाने करतात की ती जवळजवळ प्रत्येकालाच खरी वाटू शकतात. ‘तुम्ही मनाने चांगले आहात पण लोक तुमच्याविषयी गैरसमज करून घेतात’, ‘अलीकडे काही अडचणी आल्या आहेत पण पुढे सुधारणा होईल’, ‘तुमच्यात क्षमता आहे पण योग्य संधी मिळालेली नाही’ अशा प्रकारची सर्वसाधारण विधाने ऐकणारा प्रत्येक जण ती स्वतःशी जोडतो. मानसशास्त्रात याला ‘बार्नम परिणाम’ असे म्हणतात. त्यामुळे ज्योतिष अचूक असल्याचा भास निर्माण होतो. याशिवाय माणूस जे भाकीत खरे ठरते ते लक्षात ठेवतो आणि जे चुकते ते विसरून जातो. याला ‘पुष्टीकरण पूर्वग्रह’ फॅलसी म्हणतात. उदाहरणार्थ, दहा भविष्यवाण्यांपैकी दोन जुळल्या तर लोक त्या दोनच लक्षात ठेवतात; उरलेल्या आठ चुकलेल्या भविष्यवाण्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ज्योतिषावरील विश्वास टिकून राहतो.

ज्योतिषशास्त्रामुळे समाजात अनेक अपायकारक परिणामही घडतात. विवाह जुळवताना पत्रिका न जुळल्यामुळे चांगली नाती मोडली जातात. ग्रहदोषांच्या भीतीने लोक मानसिक तणावात राहतात. मौल्यवान रत्ने, पूजा, शांती, यज्ञ, जप, होम यांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. काही लोक व्यवसाय, शिक्षण, शस्त्रक्रिया किंवा इतर महत्त्वाचे निर्णय शुभमुहूर्ताच्या प्रतीक्षेत लांबणीवर टाकतात. अशा प्रकारे ज्योतिषामुळे विवेकाऐवजी भीतीवर आधारित निर्णय घेतले जातात. म्हणून या कवितेतील बहिणाबाईंची शेवटची ओळ महत्त्वाची ठरते. ‘बापा नको मारू थापा, अशा उगा खऱ्या खोट्या’ हे कवन फक्त एका ज्योतिषाला उद्देशून नाही, तर ते समाजातील प्रत्येक त्या व्यक्तीला उद्देशून आहे जी पुराव्याशिवाय दावे करून लोकांची दिशाभूल करते. त्यांच्या मते सत्य हे अनुभव, श्रम आणि वास्तव यांत शोधले पाहिजे; काल्पनिक ग्रहदोषांत किंवा तळहातावरील रेघोट्यांत नव्हे.

आज कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश संशोधन, जनुकीय विज्ञान आणि वैद्यकशास्त्राच्या युगातही ज्योतिषाचा प्रभाव कायम आहे. याचे कारण त्याची सत्यता नसून माणसाची भविष्य जाणून घेण्याची नैसर्गिक इच्छा, अनिश्चिततेची आणि अज्ञाताची भीती आहे. या भीतीचा फायदा घेऊन अनेक जण भविष्यकथनाचा व्यवसाय करतात. अशा वेळी बहिणाबाईंची कविता आपल्याला वास्तवाकडे परत आणते. ती सांगते की, नशीब तळहातावरील रेषांत नसते; ते आपल्या ज्ञानात, परिश्रमात, धैर्यात, समाज व्यवस्थेत आणि उपलब्ध संधींचा उपयोग करण्याच्या क्षमतेत असते. म्हणूनच बहिणाबाई चौधरींच्या या चार ओळी केवळ काव्य नसून विवेकवादाचा जाहीरनामा आहेत. त्या अंधविश्वासाला प्रश्न विचारण्याचे धैर्य देतात, पुराव्यावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा खरा शिल्पकार ग्रह नसून त्याचे कर्तृत्व आहे, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात.

लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.

jetjagdish@gmail.com

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'