संध्येच्या प्रकाशातलं धामापूर 
अक्षररंग

संध्येच्या प्रकाशातलं धामापूर

पाचशे वर्षांचा इतिहास, निसर्गाच्या कुशीत विसावलेला तलाव आणि भगवती देवीचं सान्निध्य-धामापूरच्या संध्याकाळी मनाला विलक्षण शांततेचा अनुभव देतात.

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

पाचशे वर्षांचा इतिहास, निसर्गाच्या कुशीत विसावलेला तलाव आणि भगवती देवीचं सान्निध्य-धामापूरच्या संध्याकाळी मनाला विलक्षण शांततेचा अनुभव देतात.

कोकणात निसर्गरम्य गावी एक तलाव आहे. १००, २०० वर्षांपूर्वीचा नाही, तर ५०० वर्षांइतका जुना. १५३० सालातला. गावातल्या पूर्वजांनी स्वतःच्या हाताने मातीचा बांध घालून निर्मिलेला. दोन डोंगरांनी कुशीत घेतलेला. नदीसारखा भासणारा. हा तलाव आहे धामापूरचा. या बांधावर बांधलेल्या मंदिरात देवी भगवती विराजमान होऊन या बांधाचे, तलावाचे आणि धामापूर काळसे गावांचे रक्षण करत आहे. मालवण तालुक्यात काळसे धामापूर या दोन गावांना जोडणारा हा तलाव निसर्ग, अध्यात्म, वास्तुकला यांचा सुंदर मिलाफ आहे.

खरंतर मंदिर बघायला मला तीन प्रहर आवडतात. एक पहाटेचा. दुसरा संध्याकाळचा आणि तिसरा रात्रीचा. पण धामापूरचे भगवती देवीचे मंदिर आणि तलाव मी फक्त दुपारच्या वेळेस बघितला होता. पाच-सहा वेळा जाणं झालं. नेहमी धावती भेट व्हायची आणि मग शांततेचे मोजकेच क्षण पकडता यायचे. तिथल्या सकाळ, संध्याकाळच्या वेळेच्या मंत्रमुग्ध वातावरणाची मी मनोमन कल्पना करायचे आणि तिथून निघताना नेहमी ठरवायचे, पुढच्या वेळी येईन तेव्हा खास वेळ काढूनच येईन आणि ही खास वेळ जमून आली तब्बल दोन वर्षांनी.

काळसे धामापूर गावात प्रवेश केल्यावरच आपण मालवणजवळच्या अत्यंत निसर्गसमृद्ध जागी आलो आहोत याची जाणीव होते. गावचे सौंदर्य पाहत दुपारी तीनच्या सुमारास धामापूरमध्ये बुक केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल मुद्दाम अशा ठिकाणचं निवडलं होतं जिथून चालत मंदिरात पोहोचता येईल. प्रवासाचा शीण घालवला. फ्रेश होऊन, नीटनेटके आवरून संध्याकाळी ठीक पाच वाजता धामापूरच्या रस्त्यावरून मंदिराकडे चालायला सुरुवात केली.

वाटेवरच्या नारळी सुपारीच्या बागांना पाहून मन म्हणायचं की, वाटेने इतकं हिरवंगार असावं. इथला निसर्ग आणि त्यात दडलेली टुमदार कोकणी घरं डोळ्यांत साठवत मी चालत होते. हे सारं पाहताना डोळे सुखावत होते, पण माझ्या मनात हुरहूर होती ती दिवेलागणीच्या वेळेची. दरदिवशी हा प्रहर मला खूप अंतर्मुख करतो. फारसे कुणाशी बोलू वाटत नाही यावेळी. मन जुन्या समृद्ध आठवणीत, आजीच्या रामरक्षेत गढून जातं. तेलातुपाच्या वासाची, आजीच्या स्निग्धतेची आठवण येत राहते. बरंच काही मौल्यवान निसटून गेल्याची जाणीव मला ही वेळ सतत करवून देते. या प्रहरी मंदिरात असताना मनावर आठवणीचे मळभ नको जमायला, यासाठी मी देवीकडेच मनोमन प्रार्थना करत होते. थोडे अंतर चालल्यावर वीणावादनाचे मंगलमय सूर ऐकू येऊ लागले. गावात कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत लावलं असेल असं वाटलं. या संगीताने मनावरचं मळभ हळूहळू दूर होत होतं. वातावरणातले चैतन्य जाणवू लागलं. मन हलकं झालं. ही सुरावट कोणत्या कार्यक्रमाच्या जागेवरून नाही तर भगवती देवीच्या मंदिरातून ऐकू येत होती, हे पुढे गेल्यावर समजलं. वळणावर मंदिराची कमान दिसली. कमानीतून आत गेल्यावर नारळओटीचे साहित्य घेतले आणि मंदिराकडे जायच्या पायऱ्या चढले.

इथे आल्यावर मंदिरातून दिसणाऱ्या निळ्याशार तलावाचं दृश्य पाहून मी नेहमी हरखून जाते. मंदिर बांधावर असल्यामुळे तलावाला समांतर आडवं आहे. सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ आणि गाभारा असं मंदिराचं स्वरूप आहे. शके १८२७ ला सभामंडपातील एका तुळईवर सभामंडप बांधला असं लिहिलं आहे. कोकणातील घरांसारखेच कौलारू, लाकडी तुळ्यांवर तोललेलं आणि अत्यंत देखणं मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात उंचीपुरी चतुर्भूज भगवती देवी विराजमान आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव काय वर्णावे!! तिने शस्त्र धारलेली आहेत आणि तिच्या मुखावर प्रसन्नतेचं हलकं स्मित आहे. आपलं लेकरू संकटात असेल तेव्हा आई ढाल बनून उभी राहते आणि लेकरावर आत्मविश्वास ठेवून जगायला बळ देते, तसाच भाव भगवती देवीच्या चेहऱ्यावर आहे, असं मला नेहमी जाणवतं. एकाचवेळी ती वात्सल्यरूप आहे आणि दुष्ट वृत्तीचा नाश करणारी असुरमर्दिनी आहे. तिच्या सान्निध्यात असलं की बळ मिळतं आणि सुरक्षीतही वाटतं. मंदिरात जाऊन साडीने तिची ओटी भरली आणि मनोभावे नमन केलं.

सभामंडपात येऊन तिथेच खांबाला टेकून बसले. समोर तलाव दिसत होता. त्याची अथांगता पाहतच बसावी अशी आहे. एका बाजूला काळसे गावचा डोंगर आहे आणि दुसऱ्या बाजूला धामापूर गावचा डोंगर. या दोन हिरव्यागार डोंगरांमध्ये असलेला हा निळाशार तलाव मुकुटमणीच आहे. थोड्या वेळात आकाश गुलाबीसर झालं. स्पीकरमधून ऐकू येणारे वीणावादनाचे सूरही या प्रहराला साजेसे होते. खरंच वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं. पक्ष्यांची परतायची वेळ झाली होती. मंदिराच्या मागून पक्ष्यांचे थवेच्या थवे तलावाच्या दिशेने उडत येत होते. समुद्रावरून हे पक्षी येत होते, पण पाहताना असं वाटायचं की मंदिराच्या शिखरातून हे शुभ्रधवल पक्षी बाहेर पडत आहेत. दहा-बारा बगळे असलेला थवा बाण सुटल्यासारखा उडायचा आणि तलावावरून दूरवर डोंगराकडे जायचा. तो थवा अदृश्य होईपर्यंत त्यांना मी पाहत बसायचे. असे अनेक थवे तिथे बसून पाहिले. काही थवे तलावाच्या काठावर उतरायचे. हिरव्यागार काठच्या पार्श्वभूमीवर बगळ्यांचं पांढरं अंग मोहक दिसायचं. मी चित्रकार असते तर याचं निसर्गचित्र काढलंच असतं. पाणकावळे तर तलावाला स्पर्श करीत उडायचे आणि अचानक पाण्यात डुबकी मारून पोहायचे. खंड्याचेही तलावात सूर मारणं आणि पुन्हा झाडाच्या फांदीवर येऊन पाण्याकडे टक लावून बसणं सुरू होतं. संध्याकाळच्या प्रहराची जी कल्पना होती त्यापेक्षाही कैक पटीने संध्याकाळचा हा सुंदर प्रहर अनुभवायला मिळाला होता. त्या प्रहरी कित्येक तरुण मुलं-मुली, वृद्ध आजी-आजोबा तिथे होते, पण सगळ्यांच्या मनावर शांततेचं राज्य होतं. तलावाच्या पाण्यावर कशा मंद लाटा उमटतात, तशाच आनंदच्या लाटा आमच्या सर्वांच्या अंतरंगात उमटत होत्या. संध्याकाळच्या शांततेचे हे क्षण फक्त मलाच नाही तर तिथे असलेल्या प्रत्येकाला पकडता आले होते. अंधार होऊ लागला तसं समाधानी वृत्तीने माणसं परतु लागली. मी आणि माझा नवरा मात्र अंधार पडल्यानंतरही थांबलो. आता स्पीकरवर शुभंकरोती लावली गेली होती. मंदिरात बसून आम्ही ती ऐकली. उदबत्ती, कापराचा गंध मंदिरात दरवळत राहिला. देवीची आरती करूनच तिथून निघालो. त्यावेळी तिथले गुरुजी म्हणाले, उद्या सकाळीसुद्धा या. दुसऱ्या दिवशी सकाळी तलावाच्या बाजूने फिरले आणि मंदिरात गेल्यावर तर एक सुंदर भेट मला मिळाली. त्याविषयी मी पुढच्या भागात सविस्तर सांगते. कधी कधी स्थळ साधंसं भासतं, पण तिथे येणारे अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात राहणारे असतात. धामापूर हे असेच मौल्यवान क्षण देणारं स्थळ आहे.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

Thane : पाणी बिल थकबाकीसाठी पालिकेची मोहीम तीव्र; १५ दिवसांत ९.८८ कोटींची वसुली

अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण; दिल्लीतील मेट्रो स्थानकाचे नामांतर, आता 'श्री राम मंदिर मयूर विहार' अशी नवी ओळख

Mumbai : बुरखा घालून लेडीज डब्यात शिरला पुरुष; जाब विचारताच धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन, RPF कडून गुन्हा दाखल

समृद्धी महामार्गावरील नागपूर ते दक्षिण मुंबई प्रवास होणार सुलभ; ठाण्यातून थेट कोस्टल रोडला जोडणार नवीन मार्ग

Mumbai : बेलासिस पुलाचे सुरक्षा प्रमाणपत्र जारी; पश्चिम रेल्वेची माहिती