चंदू चिंचवडकरच्या चविता!
श्रीकांत बोजेवार
चंदू चिंचवडकर घरात थोडा दुःखी मनाने बसला होता. त्याचा पहिलाच कवितासंग्रह प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर होता. कालपर्यंत सगळे काही मनासारखे झाले होते आणि आज अचानक हे संकट आले. सकाळपासून छान पाऊस सुरू होता. हातात गरमागरम कॉफीचा मग होता आणि तरीही त्याला काही लिहावेसे वाटत नव्हते. असे कधी होत नसे. कवितेचे वातावरण असले की त्याला लगेच कविता स्फुरत. कालच तो अशाच रोमँटिक वातावरणात बसलेला होता आणि त्याने ढगाला उद्देशून एक कविता लिहिली होती.
हे ढगा
घालुनी पावसाचा झगा
का मिरवतोस उगा
असतो मी जर कालिदास
पाठविले असते खास
तुला तिच्याकडे
घेऊनी माझे प्रेम वेडे
आणि लिहिले असते नव्याने
माझे मेघदूत
किंवा सरळ साधे
'ढगदूत'
शिंका याव्या तशा त्याला सटासट कविता सुचत. खरेतर त्याचे त्यालाच आश्चर्य वाटे की आपण हे कसे काय करू शकतो. शारदेची आपल्यावर खास कृपा आहे असे त्याला नेहमीच वाटे. त्याने लेखणी हाती धरली आणि कविता नाही स्फुरली, असे कधी होत नसे. आपला हा गुण लोकांना कळत नाही किंवा त्याचे महत्त्व कळण्याएवढी त्यांची कुवत नाही, याची त्याला नेहमीच खंत वाटे. आता परवाच बघा ना, ती त्याला बस स्टॉपवर उभी दिसली आणि त्याच्या मनात आपोआप कविता आकाराला आली.
तू उभी अशी
कुतुबमिनार जशी
तुझ्या खांद्याला
पर्स पट्टेदार
गळा हार
मी पार खल्लास... खल्लास... खल्लास...
ती कविता तिला दाखविण्याची त्याची काही हिंमत झाली नाही. कारण त्याच्या प्रतिभेला समजून घेण्यात ती कमी पडली असती तर उगाचच त्याचा मूड ऑफ झाला असता. त्यापेक्षा ती कविता त्याने घडी करून खिशात ठेवून दिली. गेली काही वर्षे तो आपल्या प्रतिभेची साधना करत होता आणि त्यातूनच कवितांचे बाड जन्माला आले होते. त्याने कविता लिहायला सुरुवात केली तेव्हापासून हिशेब केला तर त्याने दिवसाला एक कविता केली होती. पहिली कविता केल्याचा दिवस त्याला अजूनही लख्ख आठवतो. त्याच्या आजीने त्याचा टिफिन तयार केला आणि स्कूलबॅगमध्ये टाकला. त्याची आजी त्याला म्हणाली, बटाट्याची भाजी दिली आहे टिफिनमध्ये. ते ऐकून तो म्हणाला,
आजी गं आजी
मला खूप आवडते
बटाट्याची भाजी
आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण कवी झालो आहोत. तर त्यानंतर तो संधी मिळेल तेव्हा तेव्हा कविता लिहीत आला. एकदा तर त्याने गृहपाठ केला नव्हता तेव्हा, सरांना सांगितले,
सर काल होते घरी खूप वर्क
म्हणून मी केले नाही होमवर्क
त्याला सरांनी शून्य दिला आणि म्हणाले, "तुमची काय प्रतिभा!"
त्याला मग छंदच जडला. गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान सगळ्याच विषयांची उत्तरे तो कवितेत देऊ लागला. एकदा सरांनी त्याला विचारले, सांग बरे आर्किमिडीजचे तत्त्वज्ञान काय आहे, तर चंदू चिंचवडकर म्हणाला,
दगडाचे केले विसर्जन
त्याने लोटले पाणी
मोजले पाण्याचे आकारमान
तेवढे दगडाचे वस्तुमान
"असेल ती मराठीच्या क्लासला दाखवत चला. माझ्या वर्गात मी सांगितलेल्या व्याख्या पाठ करून यायचं." तेव्हाच त्याला कळलं होतं की आपली प्रतिभा या बिलो अॅव्हरेज जगाला झेपणारी नाही. तेव्हापासूनच तो या जगाकडे तुच्छ नजरेने पाहायला शिकला.
वयात आल्यावर, प्रेमात पडल्यावर आणि प्रेमात सपशेल पडल्यावरही त्याच्या कवितांचा ओघ काही थांबला नाही. त्यामुळेच ऐन तारुण्यात त्याच्याकडे कवितांचे बाड जन्माला आले. या बाडाचे बारसे काय करावे याचा त्याने बराच काळ विचार केला आणि मग त्याला एक सॉलिड टायटल सुचले - चंदू चिंचवडकरच्या चविता! अर्थात चंदूने केलेल्या कविता म्हणजेच चविता!
त्याने मग तोच शब्द आपला केला. कुठल्याही कविसंमेलनात तो उभा राहिला की, "मी आता एक चविता सादर करणार आहे", अशी सुरुवात करीत असे. 'चंगोच्या चारोळ्या' जशा प्रसिद्ध झाल्या त्याचप्रमाणे चंदूच्या चविता होऊ लागल्या. पुस्तक रूपात प्रसिद्ध होण्यापूर्वीच चंदू चिंचवडकरच्या चवितांची चर्चा होऊ लागली. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी भाषेचे पांग फेडण्यासाठी आपल्या कवितांचा संग्रह प्रसिद्ध होणे गरजेचे आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने काही प्रकाशकांच्या भेटी घेतल्या आणि आपल्या चविता ऐकवल्या. परंतु "कवितासंग्रहाला उठाव नाही" असं फालतू उत्तर त्याला मिळालं. कवितासंग्रह म्हणजे जणू विकायला ठेवलेली गुळाची भेलीच आहे. म्हणे, उठाव नाही!
मग त्याने स्वतःच कवितासंग्रह प्रकाशित करण्याचे ठरवले आणि कर्जासाठी तो बँकेत गेला. बँकेत त्याला लक्ष्मी आणि सरस्वतीच्या शत्रुत्वाचा चांगलाच अनुभव आला. "आम्ही तुम्हाला ज्या कामासाठी कर्ज द्यावे असे तुम्हाला वाटते, त्या कर्जाची परतफेड तुम्ही कशी करणार आहात?" असा प्रश्न त्याला बँकेत विचारण्यात आला. त्यावर त्याने मोठ्या अभिमानाने "कवितासंग्रह विकून!" असे उत्तर दिले. त्यावर त्या अधिकाऱ्याने चक्क बेल वाजवून बँकेच्या शिपायाला बोलावले आणि हुकूम सोडला, "आपल्या स्टाफला बोलाव सगळ्यांना."
चंदूला वाटले आता बहुधा बँकेतच आपल्या चवितांचा कार्यक्रम होणार. परंतु त्या क्रूरकर्मा अधिकाऱ्याने चंदूकडे बोट दाखवत सर्वांना प्रश्न केला, "हेच ते चवितावाले चंदू चिंचवडकर. यांना यांचा चवितासंग्रह प्रकाशित करायचा आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. उद्या आपण दिलेल्या कर्जातून जर यांचा चवितासंग्रह प्रकाशित झाला तर तुमच्यापैकी कोण कोण तो विकत घेईल?"
बँकेतल्या एकाही कर्मचाऱ्याला चंदूच्या चवितासंग्रहात रस नव्हता. ते पाहून अधिकारी हसत हसत म्हणाला, "चॉरी चिंचवडकर, चुम्हाला चर्ज चाही चिळणार..."
चंदू चिडून उठला. तो परत कधीच कुठल्या बँकेत गेला नाही. आपल्या भावी बायकोसाठी दागिने करण्यासाठी म्हणून त्याने बाजूला काढून ठेवलेले पैसे कवितासंग्रहावर खर्च केले आणि कवितासंग्रहाच्या मनोगताला शीर्षक दिले, 'बायकोऐवजी!'
कवितासंग्रहाला एखाद्या मान्यवराची प्रस्तावना असल्याशिवाय त्या कवितासंग्रहाची परीक्षणे छापून येत नाहीत असे त्याला अनेकांनी सांगितले होते. बरेचसे मान्यवर प्रस्तावना लिहिण्याचा व्यवसाय करतात, त्यांचे पोट प्रस्तावनांवरच चालते. त्यामुळे ते पैसे मिळाल्याशिवाय लिहीत नाहीत. काही फारच तयार प्रस्तावना लेखक असतात ते तर स्वच्छ सांगून टाकतात, "तुम्हाला काय लिहायचे असेल ते लिहा हो, मी सही करतो खाली."
तर अशा सर्व 'पैसा घेऊ' प्रस्तावनाकारांना डावलून चंदूने प्रा. अभिलाष फडके यांना गाठले. त्यांच्या घरचा चहा पिऊन त्यांना आपल्या कविता ऐकवल्या. चंदूच्या 'चविता' या शब्दावर ते फारच खूश झाले आणि त्यांनी प्रस्तावना लिहून देतो असे आश्वासन दिले. कालच संध्याकाळी तो त्यांच्या घरून आनंदाने परतला होता. फडके यांचा साहित्य क्षेत्रातला दबदबा बघता, त्यांच्या प्रस्तावनेला महत्त्व होते. अखेर आपल्या कवितासंग्रहाबाबत बरे काहीतरी घडत आहे, असे त्याला वाटले. सकाळपासूनचा छान पाऊस, त्याच्या हातात कॉफीचा कप आणि मग त्याला वाटले की, फोन करून फडके सरांचे आभार मानायला हवेत. म्हणजे त्यांना प्रस्तावनेची एकदा आठवणही करून देता येईल. त्याने फोन केला. कोणीतरी उचलला.
"फडके सर आहेत का?"
पलीकडून उत्तर आले, "ते काल रात्री उशिरा हार्ट अॅटॅकने गेले."
त्याला धक्काच बसला. काल संध्याकाळी आपण त्यांना कविता ऐकवल्या आणि रात्री ते गेले. आपल्या कवितांमुळेच ते गेले असे लोक म्हणतील आता. गप्प बसावे, की सांगावे लोकांना. मग त्याला अचानक काहीतरी छान सुचले. त्याने एका वृत्तवाहिनीला फोन केला आणि कालची घटना सांगितली. प्रा. फडकेंबद्दल तीच तीच माहिती सांगून कंटाळलेल्या निवेदिकेला चंदूच्या माहितीने चेव आला आणि तिने प्रा. फडके आणि चंदूच्या कालच्या भेटीची माहिती रंगवून रंगवून सांगितली आणि अखेरची मल्लिनाथी केली, "फडके सर गेले. आपला शब्द पाळण्याबद्दल त्यांची ख्याती होती, मात्र एका कवीला दिलेला अखेरचा शब्द ते पाळू शकले नाहीत... दिव्या ढमढेरे, विलेपार्ले, ताज्या बातम्या!"
ताज्या बातम्या नामक वाहिनीवरून ही माहिती प्रसारित होताच इतर वाहिन्यांवरूनही चंदूला फोन येऊ लागले आणि प्रा. फडके चंदूला प्रस्तावना लिहून देणार होते, हे चॅनलोचॅनली पसरले. फडके यांची प्रस्तावना न मिळताही, 'चंदूच्या चविता' हा आगामी कवितासंग्रह चांगलाच गाजू लागला. तो बाजारात येण्याआधीच त्याची विचारणा होऊ लागली आणि आश्चर्य म्हणजे प्रकाशक स्वतःहून फोन करून तो छापण्यास आपण तयार आहोत असे सांगू लागले. ज्या बँकेत त्याने कर्जासाठी प्रयत्न केले होते तिथल्या मॅनेजरनेही फोन करून त्याला कर्ज ऑफर केले... प्रा. फडकेंच्या निधनाने सगळे चित्रच बदलून गेले होते.
पावसाळी वातावरणात पुढचे सगळे प्लॅनिंग करण्यात चंदूचे दोन दिवस गेले. तिसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या दारात कुरियरवाला उभा होता. त्याने सही करून कुरियर घेतले, पाकीट उघडले आणि त्याचे हात थरथरू लागले... प्रा. फडके यांनी त्याच्या कवितासंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना त्याच्या हातात होती... ही त्यांनी कधी लिहिली? संध्याकाळी आठच्या सुमारास आपण त्यांच्या घरून बाहेर पडलो आणि रात्री १२ वाजता झटका आला. त्याच रात्री ते गेलेही. मग हे त्यांनी लिहिले तरी कधी? अतृप्त आत्मे आपल्या इच्छा मृत्यूनंतर पूर्ण करतात असे त्याने ऐकले होते. प्रा. फडकेंच्या आत्म्याने, म्हणजे खरेतर भूताने ही प्रस्तावना लिहिली असेल का? परंतु अवघ्या दोन दिवसांत त्यांचे भूत झालेही आणि त्यांनी आपली इच्छा पूर्ण केलीही? खरेतर एखाद्या मृताला भूत होण्यासाठी किती काळ लागतो हे कुणालाच माहीत नव्हते आणि भूत झाल्यावर त्याला प्रस्तावना लिहायला असा कितीसा वेळ लागणार?... त्याचे हात आता थरथरण्याऐवजी थाडथाड उडूच लागले होते. त्याने घाबरून हातातील कागद खाली टाकले. भूतांनी लिहिलेले कागद आपल्या हातात आहेत, या कल्पनेनेही तो घामाने थबथबला.
जरा मन थाऱ्यावर आल्यावर त्याने प्रा. फडके यांच्या घरी फोन लावला. त्यांचा मुलगा फोनवर होता. त्याच्याशी दोन मिनिटं सांत्वनाचे बोलून झाल्यावर चंदू म्हणाला, "जरा काही विचारायचे होते, तुमची हरकत नसेल तर..."
"विचारा की!"
"ज्या रात्री सर गेले त्या रात्री मी आठ वाजता तुमच्या घरून बाहेर पडलो. त्यानंतर त्यांनी काय काय केले याची माहिती हवी होती मला. अर्थात तुमची हरकत नसेल तर..."
"अहो त्यात काय, हे बघा, ते रोज रात्री साधारण ८ ते ९ च्या सुमारास मराठी मालिका बघायचे. खरेतर त्यांची मालिका बघण्याची वेळ झाली होती म्हणूनच त्यांनी तुमचा निरोप घेतला होता, तर त्या रात्रीही त्यांनी मालिका पाहिल्या. मग आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. जेवताना त्यांनी तुमच्या काही चवितांच्या ओळी म्हणून दाखवल्या आणि कौतुकही केले होते. जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी थोडावेळ वाचन केले आणि मग ते झोपले..."
"माफ करा. वाचन केले आणि झोपले... याच्या मध्ये त्यांनी थोडावेळ काही लिखाण वगैरे केले का?"
"छे हो! ते आपले लिखाण नेहमी पहाटे करत."
"आणि माझ्या भेटीनंतर त्यांना पहाट अशी मिळालीच नाही..."
"हो, खरं आहे. पण हे असं का विचारताय तुम्ही?"
चंदू जरा चाचरला. मग सावरला. "मला सांगायला जरा विचित्र वाटतं आणि तुम्हाला ते ऐकायलाही विचित्र वाटेल. आज माझ्याकडे प्रा. फडक्यांनी माझ्या कवितासंग्रहाची लिहिलेली प्रस्तावना कुरियरने आली..."
"अहो, कसं शक्य आहे ते?"
"मलाही तोच प्रश्न पडला आहे."
पलीकडून काहीतरी आवाज आला. प्रा. फडके यांचा मुलगा विचारात पडला की खाली पडला ते काही चंदूला कळेना. तो नुसता हॅलो हॅलो करीत राहिला. ही बातमी एखाद्या व्हॉट्सअॅप फॉरवर्डसारखी सगळीकडे भराभरा पसरली. पुन्हा चंदूला वाहिन्यांचे, पत्रकारांचे फोन सुरू झाले.
वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या.
भूताने लिहिली कवितासंग्रहाची प्रस्तावना!
आत्म्याचे अस्तित्व झाले सिद्ध!
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चंदू चिंचवडकर यांच्या घरासमोर निदर्शने!
मग चंदूने एका प्रकाशकाकडून गबर मानधन घेऊन तातडीने त्याला आपला संग्रह विकून टाकला. त्यानेही तो तातडीने छापला आणि तो हातोहात खपू लागला. त्याची जाहिरात प्रकाशकाने केली ती अशी - "चंदूच्या चवितांना भूताची प्रस्तावना? आजच वाचा!" विविध वाहिन्यांवर चर्चा रंगू लागल्या. भूत ही संकल्पना एकवेळ मान्य केली तरी एखादे भूत कुरियरच्या कार्यालयात जाऊन ते पाकीट कुरियर करते वगैरे कसे काय शक्य आहे? त्याच्याकडे पैसे कुठून येणार? त्याला माणसाचे रूप धारण करता येते का?
असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. काही वाहिन्यांनी चंदूकडील पाकिटाच्या आधारे त्या कुरियरवाल्याला शोधून काढले. तो म्हणाला, "वो आदमी जो कुरियर करने के लिए आया था, वो अपना चेहरा छुपा रहा था. थोड़ा अजीब लग रहा था. पहले तो वो बोला कि मेरे पास पैसा नहीं है, फिर पाँच सौ का नोट निकाला और बाद में बाकी का पैसा लिए बगैर ही गायब हो गया..."
भूताखेतांवर विश्वास ठेवणारे आणि भूतांच्या विरोधातले यांच्यात मग झोंबाझोंबी सुरू झाली. रोज नवी चर्चा, नवा वाद... आणि त्यातच चंदूच्या चवितासंग्रहाची तुफान विक्री होऊ लागली!
आपल्या वडिलांनी मृत्यूनंतर लिहिलेले कागद प्रा. फडके यांच्या मुलाने चंदूकडून मागून घेतले आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून ते देवघरात ठेवले. दरम्यान, चंदूच्या चवितासंग्रहाचे त्याच्या प्रस्तावनेसह दहा-पंधरा भाषांमध्ये अनुवादही झाले. मात्र त्याला चनुवाद म्हणावे असा हट्ट चंदूने धरला, तो मान्यही झाला.
चित्रपटांसाठी, अल्बम्ससाठी, मालिकांच्या शीर्षकगीतांसाठी त्याच्याकडे कवितांची मागणी होऊ लागली. चंदूच्या चवितांची गाडी जोरात धावू लागली... आणि तो गाडीने फिरू लागला.
त्याच नव्या कोऱ्या गाडीत बसून जात असताना त्याचे लक्ष नेहमीच्या बस स्टॉपकडे गेले. ती तिथे होतीच उभी, जिला तिथे बघून त्याने एकदा चविता केली होती...
तुझ्या खांद्याला
पर्स पट्टेदार
गळा हार
जणू श्रावण मास
आणि मी पार
खल्लास... खल्लास... खल्लास...
तो तिला पाहून परत एकदा खल्लास झाला. मात्र यावेळी त्याने गाडी थांबवून तिच्याकडे सस्मित पाहण्याचे धाडस केले. तिनेही फार भाव खाल्ला नाही. "कुठे सोडू तुम्हाला?" असा प्रश्न त्याने विचारला, तेव्हा ती म्हणाली, "कुणाला जर आज वेळ असेल तर माझी ऑफिसला दांडी मारण्याची तयारी आहे..."
आणि मग लवकरच लग्नाची तयारीही झाली.
पहिल्या रात्री तिला मिठीत घेत तो म्हणाला, "लोकांना देव पावतो, मला भूत पावले, म्हणून तू मिळालीस..."
तिने त्याच्या चुंबनाची सव्याज परतफेड केली आणि डोळे मिटून त्याला प्रोत्साहन देत म्हणाली, "मी त्या भूताला ओळखते..."
"ओळखतेस?" चंदूने भयचकित होऊन विचारले.
"हो. प्रा. फडकेंनी ती प्रस्तावना माझ्या संग्रहासाठी लिहिली होती. तुम्ही त्यांच्या घरी गेला होतात आणि त्याच रात्री त्यांचं निधन झाल्याचं वाचलं तेव्हा मी तीच प्रस्तावना तुम्हाला पाठवून दिली. नाहीतरी सगळ्या संग्रहांच्या प्रस्तावना एकसारख्याच असतात. कवीचं नाव बदलून तेच सगळं लिहिलेलं असतं."
तिच्या प्रत्येक वाक्यासरशी दोघांची मिठी अधिकाधिक घट्ट होत होती.
"आणि तो कुरियरवाला सांगत होता... ते?"
"प्रसिद्धी मिळतेय म्हटल्यावर तो वाट्टेल ते सांगत सुटला. माणसं आता तेवढी तयार झाली आहेत..."
"थांब, मी किती तयार आहे, ते दाखवतोच तुला आता..." असं म्हणत त्यानं तिला आणखी घट्ट जवळ ओढून घेतलं... आणि तीही तयारीची आहे हे त्याला लवकरच कळलं. चंदू चविता रचत राहिला आणि ती त्याला नवनवीन यमकं सुचवित राहिली..!
Shrikant.bojewar@gmail.com