दया डोंगरे - अभिनय हाच श्वास  
अक्षररंग

दया डोंगरे - अभिनय हाच श्वास

कलाकार कधीही मृत्यू पावत नाही. तो-ती त्याने साकारलेल्या भूमिकांमधून आपलं अस्तित्व कायम राखतात. दया डोंगरे ही अशीच अभिनेत्री होती. आपल्या भूमिका जगणारी, प्रेक्षकांना श्वास रोखायला लावणारी आणि अगदी सहजतेने रिपिट ऑडियन्स मिळवणारी.

नवशक्ती Web Desk

अभिवादन

संजय कुळकर्णी

कलाकार कधीही मृत्यू पावत नाही. तो-ती त्याने साकारलेल्या भूमिकांमधून आपलं अस्तित्व कायम राखतात. दया डोंगरे ही अशीच अभिनेत्री होती. आपल्या भूमिका जगणारी, प्रेक्षकांना श्वास रोखायला लावणारी आणि अगदी सहजतेने रिपिट ऑडियन्स मिळवणारी.

दया डोंगरे यांचं निधन झाल्याची बातमी समजली आणि 'कळत नकळत', 'आमच्या, या गोजिरवाण्या घरात', 'लेकुरे उदंड झाली' या नाटकातील गाणी डोळ्यापुढे येऊ लागली. त्यांनी श्रीकांत मोघे यांच्या बरोबर सादर केलेली भूमिका सुद्धा डोळ्यासमोर आली. दया डोंगरे आणि श्रीकांत मोघे या दोघांच्या अभिनयाची केमिस्ट्री इतकी जुळून आलेली होती की त्यांच्या 'लेकुरे उदंड झाली' या नाटकाला रिपीट ऑडियन्स मिळत असे. ते नाटक येऊन अनेक वर्षे झाली. 'धी गोवा हिंदू असोसिएशन' या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली होती. त्यानंतर सुयोग संस्थेनेही या नाटकाची निर्मिती केली. त्यावेळी सुयोगचा प्रयोग पाहताना दया डोंगरे यांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. याचा अर्थ हाच की, 'लेकुरे उदंड झाली' या नाटकातील अढळस्थान त्यांनी शेवटपर्यंत टिकवलं. तसं पाहता नाटक-चित्रपट-दूरदर्शन या मनोरंजन क्षेत्रातील त्यांचं बहुआयामी योगदान हे खास आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेनाट्य विश्वात एक युग संपल्याची भावना जेव्हा व्यक्त होते तेव्हा नकळत आपण दया डोंगरे यांना सॅल्यूट करतो.

दया डोंगरे यांचा जन्म अमरावतीला झाला. सुरुवातीला त्यांचा कल संगीताकडे होता. त्यांनी संगीत स्पर्धेत भाग घेऊन आपली चुणूक दाखवली. परंतु त्यानंतर त्यांना अभिनयात काही करावं, असं वाटू लागलं. कला जगतात त्या काळात काही घराणी होती. दया डोंगरे यांना त्यांच्या आई आणि आत्याकडून नाटकाची प्रेरणा मिळाली, असं म्हणतात. अभिनयाचा वारसा त्यांना आईकडून मिळाला. नंतर त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्य शिक्षण घेतलं. 'रंभा' या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. नाटकांबरोबर त्यांचं मन रमलं ते चित्रपट आणि मालिका क्षेत्रात. उंबरठा, नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून, आत्मविश्वास इत्यादी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका करत त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं. काही मोजक्याच हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आणि तिथेही आपला ठसा उमटविला. 'नांदा सौख्य भरे' या नाटकात भूमिका करून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. काही वर्षांपूर्वी एका समारंभात त्या आपल्या कारकीर्दीविषयी म्हणाल्या होत्या की, "त्या काळी रंगभूमीवर काम करायला धैर्य लागायचं. पण 'रंभा' नाटकातील भूमिकेमुळे प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं की मग मी मागे वळून पाहिलंच नाही. हा प्रवास खूप सुंदर होता. साध्या घरातून आलेली मी, पण रंगभूमीने मला मोठं केलं. माझ्या प्रत्येक भूमिकेने मला काहीतरी शिकवलं. कधी सासू झाले, कधी आई, तर कधी खलनायिका. प्रत्येक पात्र माझ्या आयुष्याचा भाग बनलं. रंगमंचाचं मला आकर्षण होतं. पहिल्या नाटकात भूमिका करताना प्रेक्षकांच्या टाळ्यांनी मी भारावून गेले होते."

'खट्याळ सासू' मधील सासूची त्यांची भूमिका गाजली. त्यावेळी त्यांना त्या भूमिकेविषयी अनेकांनी प्रश्न विचारले होते. त्यांनी त्या सगळ्या प्रश्नांना अगदी सडेतोड उत्तरं दिली होती. त्या म्हणत, "प्रेक्षक म्हणायचे की रागीट भूमिका कशा करता ? पण खरं सांगू, मी प्रत्येक वेळा ती भूमिका जगायचे. भूमिका जगणं हेच माझं कलेवरचं प्रेम होतं. नाटक रंगमंचावर सादर करणं म्हणजे जिवंत जादू असते. प्रेक्षकांसमोर जेव्हा तुम्ही संवाद बोलता आणि मग त्यांच्या टाळ्यांचा जो आवाज येतो, ते सारं शब्दांच्या पलीकडचं असतं. अभिनय हा माझा श्वास होता. चित्रपट-मालिका यांनी नाव दिलं, पण नाटकाने आत्मा दिला. सुलभा देशपांडे, निळू फुले, शुभा खोटे अशा कित्येक कलाकारांसोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं. निळू फुले नेहमी म्हणायचे, 'दया तू सीनमध्ये आलीस की सगळ्यांचा श्वास थांबतो.' मी म्हणायचे, 'नाही, मी फक्त पात्र जगत असते.' मी कधीही कुणाशीही स्पर्धा केली नाही. त्याकाळी कलाकार हे कुटुंबासारखे होते. मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम या तीन गोष्टी मनात रुजवल्या की कलाक्षेत्र तुम्हाला नक्कीच पुढं नेईल. टाळ्या मिळतात तेव्हा नम्र राहा. कारण टाळ्या त्या पात्राच्या असतात, तुमच्या नाही. 'नांदा सौख्य भरे' या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग संपल्यावर एक वृद्ध बाई रंगमंचावर आली. तिनं माझ्या हाताला धरून म्हटलं, 'माझ्या सासूबाईचं प्रेम तू दाखवलंस ग'. त्याक्षणी मला जाणवलं की, अभिनय हा फक्त मनोरंजनापुरता नाही, तर तो कोणाच्या जीवनाला स्पर्श देखील करू शकतो. तुम्ही दिलेलं प्रेमच माझं आयुष्य आहे. कला संपत नाही, फक्त स्वरूप बदलते. मी जरी गेले तरी माझ्या भूमिकांतून कायम जगेन. जिथं कुठं दया डोंगरे नावाचं पात्र तुम्ही पाहाल तिथं माझा एक श्वास असेल."

आज या घडीला चतुरस्त्र अभिनेत्री दया डोंगरे अस्तित्वात नाहीत. पण त्यांच्या भूमिका आणि आठवणी स्मरणात आहेत. त्या म्हणायच्या, "शेवट हा शब्द मला आवडत नाही. कलाकार कधीही संपत नाही. आपण शरीरातून जातो पण आवाज, संवाद आणि आठवणींच्या रूपात राहतो. जर माझं पात्र एखादी तरुणी रंगमंचावर उभं करत असेल तर मी अजूनही जिवंत असेन."

तर अशी ही दया डोंगरे. आजही रंगभूमीच्या एखाद्या कोपऱ्यात श्वास घेत उभी असेल.

ज्येष्ठ नाट्यसमीक्षक

BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

बार्शीत धक्कादायक घटना; आईने घेतला गळफास, १४ महिन्याच्या चिमुकल्यालाही दिलं विष, बाळाची प्रकृती गंभीर

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका