नागपूरमधील ३६ वर्षीय इव्हेंट ऑर्गनायझरची मॅट्रिमोनियल साइटवरून फसवणुक केल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून फसवणूक करणाऱ्याने त्याला जाळ्यात ओढले आणि नंतर मॉर्फ केलेल्या अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीची ओळख एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर झाली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर संवाद सुरू झाला. स्वतःला हैदराबादमधील महिला असल्याचे सांगणाऱ्या आरोपीने २ जानेवारी रोजी संपर्क साधला.
सुरुवातीला साधे मेसेज पाठवण्यापासून सुरू झालेला संवाद ८ मार्च रोजी भीषण वळणावर गेला. अवघ्या २७ सेकंदांच्या व्हिडिओ कॉलदरम्यान आरोपीने तक्रारदाराचा फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत त्याच्याच चेहऱ्याचा वापर करून एक मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला.
ब्लॅकमेलचा डाव
यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तक्रारदाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे तक्रारदाराला मोठा मानसिक धक्का बसला.
तपास सुरू
या प्रकारानंतर पिडीत तरुणाने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. डिजिटल पुरावे, व्हॉट्सअॅप संपर्क आणि बनावट प्रोफाइलची माहिती तपासली जात आहे.