दिवाळी अंक २०२६ : दिव्या दिव्या दीपत्कार 
अक्षररंग

दिवाळी अंक २०२६ : दिव्या दिव्या दीपत्कार

एका छोट्याशा ज्योतीत किती मोठा अर्थ सामावलेला असतो! अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवणारा दीप हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्याच्या रूपामागे दडलेली श्रद्धा, परंपरा, अध्यात्म आणि विज्ञान यांचा वेध घेतला, तर दीपाचे महात्म्य अधिकच उलगडत जाते.

नवशक्ती Web Desk

मंजिरी हसबनीस

एका छोट्याशा ज्योतीत किती मोठा अर्थ सामावलेला असतो! अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवणारा दीप हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्याच्या रूपामागे दडलेली श्रद्धा, परंपरा, अध्यात्म आणि विज्ञान यांचा वेध घेतला, तर दीपाचे महात्म्य अधिकच उलगडत जाते.

आकाशस्थ तेजाचे पृथ्वीवरील स्फुल्लिंग म्हणजे अग्नी होय. या अग्नीचे छोटे, स्निग्ध आणि पवित्र स्वरूप म्हणजे दिवा किंवा दीप. अनेक मंगल कार्यांत, सण-समारंभांत किंवा परंपरागत रूढींनुसार दीपप्रज्वलन केले जाते. हे प्रज्वलन सांकेतिक असते. त्यामागे अनेक अर्थ दडलेले आहेत. वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम हा दीप करत असतो. दिवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि पर्यायाने नकारात्मकतेवर सकारात्मकतेची मात. दीप हा शुभ, पवित्र आणि मंगल मानला गेला आहे. भक्त आणि देव यांच्यातील तो एक दुवा आहे.

ऋग्वेदकाळात अग्नीला दूत मानले आहे. देवांपर्यंत आहुती आणि प्रार्थना पोहोचवण्याचे काम अग्नी करतो. यामुळेच अग्नीला देवांचे मुख मानले गेले आहे. माणसे प्रथम अग्नीमध्ये आहुती समर्पित करतात आणि त्या देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम अग्नी करतो. अग्नी श्रेष्ठ आहे, पवित्र आहे आणि तो वाहक आहे. म्हणूनच ऋग्वेदाची सुरुवातच ‘अग्निमीळे पुरोहितम्’ या चरणाने होते. हे अग्निसूक्त आहे.

मानवसंस्कृती उदयाला आली, तेव्हापासून आजपर्यंत अग्नीचे अनन्यसाधारण महत्त्व मानवाला ज्ञात आहे. या अग्नीचे जतन आणि संगोपन करणे फार प्राचीन काळापासून मानवाला आवश्यक वाटत होते. म्हणूनच वैदिक काळात यज्ञसंस्था उदयाला आली. त्यावेळी अग्निहोत्री कुटुंबे होती. सतत अग्नी प्रज्वलित ठेवण्याचे काम त्यांच्याकडे असे. या अग्नीचेही अनेक प्रकार होते.

पहिला गार्हपत्य अग्नी. घराघरांत अन्न शिजवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी प्रज्वलित केला जाणारा हा पवित्र अग्नी. दुसरा आहवनीय अग्नी. हा यज्ञात वापरला जाणारा पवित्र अग्नी आहे. तो देवांना आवाहन करतो आणि आहुती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. तिसरा दक्षिणाग्नी. हा अग्नी अंत्येष्टीसाठी म्हणजेच मृतदेहांचे दहन करण्यासाठी वापरला जातो. मात्र, यालाही पवित्रच मानले गेले आहे; कारण तो आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा मार्ग प्रशस्त करतो. अशी ही वैदिक अग्नीची परंपरा.

या परंपरेचा एक सुंदर बिंदू म्हणजे घराघरांत प्रज्वलित होणारे दीप. या दिव्यांचेही अनेक प्रकार आहेत. पहिला मातीचा दिवा म्हणजेच पणती. तिन्हीसांजेला तुळशीपाशी किंवा दिवाळीत रोषणाई करताना हा दिवा लावला जातो. साधेपणा आणि पवित्रता यांचे तो प्रतीक आहे.

दुसरा प्रकार म्हणजे पंचमुखी दिवा किंवा पंचारती. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतीक म्हणून या पाच ज्योती प्रज्वलित केल्या जातात. अध्यात्ममार्गात या पाच ज्योतींना पंचप्राणांचे प्रतीकही मानले आहे.

तिसरा प्रकार म्हणजे दररोजच्या पूजेत वापरला जाणारा तांब्या-पितळेचा दिवा किंवा समई. हा दिवा प्रज्वलित केल्याने सकारात्मकता वाढते, मन प्रसन्न होते आणि भय दूर पळते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच तिन्हीसांजेला म्हणजेच कातरवेळी देवापुढे दिवा प्रज्वलित करण्याची प्रथा आपल्याकडे आहे.

आणखी एक प्रकार म्हणजे अखंड दीप. हा दिवा दीर्घकाळ सतत प्रज्वलित ठेवला जातो. मंदिरांमध्ये किंवा गणपती, नवरात्र यांसारख्या उत्सवांच्या वेळी अखंड दीप लावला जातो. मंदिरांच्या बाहेर गोपुरे उभारली जात असत. त्यांवरील प्रत्येक कोनाड्यात पणती लावली जात असे. ‘गोपुर’ या शब्दाचा अर्थ प्रवेशद्वार असा आहे. ‘गो’ हा शब्द ‘गम्’ या धातूपासून सिद्ध झाला आहे. ‘गम्’ म्हणजे जाणे. म्हणून गोपुर म्हणजे प्रवेशद्वार.

तिन्हीसांजेला ‘शुभं करोति कल्याणम्...’ ही प्रार्थना म्हटली जाते. त्यामध्ये दिव्याचे वर्णन फार सुंदर केले आहे. तसेच,

‘दिव्या दिव्या दीपत्कार,

कानी कुंडल मोतीहार,

तिळाचे तेल कापसाची वात,

दिवा जळो सारी रात.’

या प्रार्थनेतही दिव्याचे सुंदर वर्णन आहे. दिव्याने होणारा दीपत्कार म्हणजे दिव्यामुळे पसरणारा प्रकाश. हा प्रकाश शांत, ऊर्जादायी आणि आरोग्यदायी असतो. दीप अमावास्येला सर्व दिवे स्वच्छ घासून लखलखीत केले जातात आणि त्यांचे पूजन केले जाते.

याच कारणासाठी गंगेतही दिवे सोडले जातात. याबाबतीत भगीरथाच्या कथेचा संदर्भ आहे. भगीरथाची कथा सर्वश्रुत आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी गंगा पाताळापर्यंत आणली आणि त्यानंतर आपल्या वंशाचाही उद्धार केला. त्यामुळे पितरांना मुक्ती मिळावी आणि आपल्या वंशाचे कल्याण व्हावे, या भावनेतून गंगेत दिवे सोडले जातात.

भारताप्रमाणेच इतर देशांतही दिव्यांचे सण साजरे केले जातात. थायलंडमध्ये बांबूच्या छोट्या होड्यांमध्ये मेणबत्त्या आणि दिवे लावून ते तलावात सोडले जातात. या सणाला ‘लोई क्राथोंग’ असे म्हणतात. ‘हानुका’ हा इस्रायलमधील दिव्यांचा सण आहे. चीनमध्ये ‘लँटर्न फेस्टिव्हल’च्या वेळी असंख्य आकाशकंदील आकाश व्यापून टाकतात, तर जपानमध्ये ‘विंटर ल्युमिनेशन’च्या वेळी संपूर्ण नगरे वेगवेगळ्या दिव्यांनी प्रकाशित केली जातात.

भारतात मात्र दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. दिवाळीत दीपप्रज्वलन करण्यामागेही अनेक कथा आहेत. बलिप्रतिपदेच्या मागे एक पौराणिक कथा आहे. विष्णूने वामन अवतार धारण करून बळीला पाताळात पाठवले. मात्र, बळीराजाचे दातृत्व वादातीत होते. त्यामुळे त्याला वर्षातून एक दिवस, म्हणजेच बलिप्रतिपदेला पृथ्वीवर येण्याची परवानगी भगवंताने दिली. त्याच्या स्वागतासाठी सर्वत्र दिवे लावून रोषणाई करण्यात यावी, असे सांगितले. तेव्हापासून बलिप्रतिपदेला दिवे लावण्याची प्रथा सुरू झाली. नरक चतुर्दशीला पहाटे दिवे लावण्याची प्रथा आहे. नरकासुराचा अत्याचार वाढला होता. तेव्हा श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी मिळून त्याचा वध केला आणि प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. या आनंदाप्रीत्यर्थ त्या दिवशी दीपप्रज्वलन करण्याची प्रथा सुरू झाली.

चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले. त्यावेळी प्रजेने आनंदोत्सव साजरा केला. संपूर्ण नगरी दिव्यांच्या रोषणाईने आणि प्रकाशाने न्हाऊन निघाली. त्यातूनच दीपावली या उत्सवाचा उगम झाला. ‘दीप’ अधिक ‘आवली’ असा दीपावली या शब्दाचा अर्थ आहे. ‘आवली’ म्हणजे रांग. अर्थात, दिव्यांच्या रांगांचा उत्सव म्हणजे दीपावली.

समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मी अवतरली. तो कार्तिक अमावास्येचा दिवस होता. अमावास्येला सर्वत्र अंधार असतो. लक्ष्मीच्या पृथ्वीवरील आगमनाचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी संपूर्ण सृष्टी दिव्यांनी सजवण्यात आली. हे आहे दिवाळीतील दिव्यांचे महत्त्व.

उपनिषदांमध्ये दिव्याला ज्ञानाचे प्रतीक मानले आहे. दिव्यामध्ये चैतन्य आहे आणि म्हणूनच तो आत्म्याशी त्वरित संधान साधतो, असा विश्वास साधकांना वाटतो. मनाची एकाग्रता साधण्यासाठी आणि दृष्टी अंतर्मुख करण्यासाठी दिव्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे मानले जाते.

असा हा दीप! वाईट विचारांपासून परावृत्त करून मनाला सात्त्विक विचारांकडे प्रवृत्त करणारा, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, अनारोग्याकडून निरामयतेकडे नेणारा आणि म्हणूनच अमृततत्त्व बहाल करणारा, असे त्याचे महत्त्व मानले गेले आहे. या दिवाळीत या सर्व अर्थांचा मागोवा घेत दीप प्रज्वलित करूया आणि मनःशांती प्राप्त करूया.

असतो मा सद्गमय।

तमसो मा ज्योतिर्गमय।

hasabnis1gmail.com

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Mumbai : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांचा सुरेल फराळ; पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सणाचा उत्साह द्विगुणित