दिवाळी अंक २०२६ : भीमातीरचे स्थापत्यलेणे 
अक्षररंग

दिवाळी अंक २०२६ : भीमातीरचे स्थापत्यलेणे

बहादूरगडाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे पेडगावची ओळख प्रामुख्याने किल्ल्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. मात्र, या परिसरात मध्ययुगीन मंदिर स्थापत्याचा एक समृद्ध ठेवा दडलेला आहे. भीमेच्या काठावर उभी असलेली लक्ष्मीनारायण, मल्लिकार्जुन, बाळेश्वर, रामेश्वर आणि भैरवनाथ ही मंदिरे म्हणजे तत्कालीन शिल्पकला, स्थापत्यकौशल्य आणि धार्मिक परंपरांचा अनमोल वारसा आहे...

नवशक्ती Web Desk

शंतनु परांजपे

बहादूरगडाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे पेडगावची ओळख प्रामुख्याने किल्ल्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. मात्र, या परिसरात मध्ययुगीन मंदिर स्थापत्याचा एक समृद्ध ठेवा दडलेला आहे. भीमेच्या काठावर उभी असलेली लक्ष्मीनारायण, मल्लिकार्जुन, बाळेश्वर, रामेश्वर आणि भैरवनाथ ही मंदिरे म्हणजे तत्कालीन शिल्पकला, स्थापत्यकौशल्य आणि धार्मिक परंपरांचा अनमोल वारसा आहे. या मंदिरांच्या दगडांमध्ये कोरलेला इतिहास उलगडताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे वेगळेच दर्शन घडते.

अहमदनगर जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेले पेडगाव इतिहासात मुख्यतः बहादूरगडामुळे परिचित आहे. औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमांच्या संदर्भात या स्थळाचा उल्लेख वारंवार येतो. त्यामुळे किल्ल्याच्या आवारात आणि परिसरात असलेल्या मध्ययुगीन मंदिरांकडे तुलनेने कमी लक्ष गेले. प्रत्यक्षात पेडगाव हे केवळ एका किल्ल्याचे ठिकाण नसून स्वतंत्र मंदिरपरंपरेचेही महत्त्वाचे केंद्र आहे. येथे लक्ष्मीनारायण, मल्लिकार्जुन, बाळेश्वर, रामेश्वर आणि भैरवनाथ अशी मंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिराची योजना, द्वारशाखा, स्तंभ, वितान आणि देवकोष्ठांची रचना वेगवेगळी आहे.

या मंदिरसमूहातील लक्ष्मीनारायण मंदिर कलात्मकदृष्ट्या सर्वाधिक उठून दिसते. मंदिराच्या बाह्यभागावरील सूक्ष्म नक्षीकाम, बहुप्रक्षेपी जंघा, देवकोष्ठांतील वैष्णव आणि शैव प्रतिमा, सुरसुंदरींची मालिका तसेच अंतराळ आणि मंडपातील शिल्पकार्य यांमुळे हे मंदिर केवळ धार्मिक वास्तू न राहता तत्कालीन महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्याचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरते. इतिहास अभ्यासकांनी त्याची तुलना सोलंकी, कल्याणी चालुक्य आणि परमार स्थापत्यपरंपरेशी साधर्म्य दर्शविणाऱ्या विकसित मंदिरप्रकारांशी केली आहे. स्थापत्य आणि शिल्पवैशिष्ट्यांच्या आधारे लक्ष्मीनारायण मंदिर साधारण तेराव्या शतकाच्या आरंभीचे असावे, असा निष्कर्ष मांडला जातो.

पेडगावच्या मंदिरसमूहाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिररचना एकसारखी नाही. भैरवनाथ मंदिराची जीर्ण अवस्था लक्षात घेतली, तरी त्यातील गर्भगृह, अंतराळ, स्तंभ आणि द्वारशाखांवरून मूळ रचनेची कल्पना येते. काही भाग नंतर प्लास्टर आणि रंगाने झाकले गेले आहेत; तरीही मूळ दगडी रचना आतून दिसून येते. मल्लिकार्जुन मंदिराची रचना तुलनेने साधी आहे. रामेश्वर आणि बाळेश्वर मंदिरांच्या मंडप, गर्भगृह आणि प्रवेशद्वारांच्या रचनेतही वेगळेपणा आढळतो. यावरून ही सर्व मंदिरे एकाच वेळी, एकाच स्थापत्यकाराने किंवा एकाच आश्रयदात्याने उभारली असावीत, असे सरसकट म्हणता येत नाही.

लक्ष्मीनारायण मंदिराची बाह्यभित्ती विशेष अभ्यासास पात्र आहे. मंदिराच्या जंघेवर देवप्रतिमांसाठी स्वतंत्र देवकोष्ठे तयार करण्यात आली आहेत. त्यांतील काही प्रतिमा आज झिजलेल्या असल्या, तरी विष्णूच्या विविध रूपांचे अवशेष ओळखता येतात. नरसिंह, योगनरसिंह, शिवाच्या प्रतिमा तसेच इतर देवतांच्या मूर्ती मंदिराच्या व्यापक धार्मिक आशयाची साक्ष देतात. मंदिराचे नाव लक्ष्मीनारायण आहे म्हणून त्याच्या भिंतींवर केवळ वैष्णव प्रतिमाच असतील, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. मध्ययुगीन मंदिरशिल्पात प्रमुख उपास्यदेवता केंद्रस्थानी असली, तरी शैव, शाक्त, गणपत्य किंवा सौर प्रतिमांचा समावेश असणे अपवादात्मक नव्हते.

या मंदिरावरील सुरसुंदरी विशेष लक्ष वेधून घेतात. दर्पणिका, नृत्यात मग्न असलेल्या नायिका, वाद्यधारी स्त्रिया, अप्सरा आणि विविध भावमुद्रांतील स्त्रीप्रतिमा या केवळ रिकाम्या जागा भरण्यासाठी केलेल्या सजावटीच्या वस्तू नाहीत. त्यांच्या देहबांध्यातील त्रिभंग, कटीची लय, हातांच्या मुद्रांतील हालचाल आणि वस्त्राभूषणांतील सूक्ष्मता स्पष्टपणे जाणवते. शिल्पकाराला मानवी देहाचे प्रमाण आणि दगडातून हालचाल साकारण्याचे उत्तम कौशल्य अवगत होते. शिल्पशास्त्रासारख्या ग्रंथांमध्ये अशा अनेक स्त्रीप्रतिमांची स्वतंत्र ओळख करून देत त्यांचे स्थानही नोंदविलेले आढळते.

मंदिरांच्या द्वारशाखांकडे पाहिले, तर शिल्पकाराचे आणखी एक कौशल्य लक्षात येते. प्रवेशद्वारांवर पुष्पवल्ली, पत्रवल्ली, व्याल, गण, लहान देवप्रतिमा आणि काही ठिकाणी नदीदेवतांची योजना दिसते. मंदिरात प्रवेश करणे ही केवळ एका वास्तूत जाण्याची क्रिया नव्हती. लौकिक अवकाशातून पवित्र अवकाशात जाणाऱ्या संक्रमणाला स्थापत्यानेही अर्थ दिला होता. म्हणूनच द्वारशाखा, ललाटबिंब आणि उंबरठा यांना मंदिरवास्तूमध्ये स्वतंत्र महत्त्व प्राप्त झाले.

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील मंडोवराची रचना पाहिली, तर भिंती सरळ आणि सपाट ठेवलेल्या नाहीत. भद्र, उपभद्र आणि अन्य प्रक्षेपांमुळे बाह्यभित्तीची रचना सतत पुढे-मागे सरकताना दिसते. त्यामुळे प्रकाश आणि सावलीचा सुंदर खेळ निर्माण होतो. याच प्रक्षेपांमध्ये देवकोष्ठे ठेवण्यात आल्याने प्रत्येक मूर्तीला स्वतंत्र स्थापत्यचौकट मिळते. ही पद्धत मध्ययुगीन पश्चिम भारतातील आणि दख्खनमधील मंदिरपरंपरेत वारंवार दिसून येते.

या मंदिरातील स्तंभ आणि वितानांचाही स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. काही स्तंभ साध्या चौकोनी किंवा बहुभुज आकारातून विकसित झालेले दिसतात, तर काहींवर घट-पल्लव, वेलबुट्टी आणि लहान शिल्पांची योजना आहे. छताच्या मध्यभागातील वितानाकडे पाहताना मंदिराच्या बाह्यभागातील ऊर्ध्वगामी रचना आणि आतील केंद्राभिमुख रचना यांतील फरक लगेच जाणवतो. बाहेरचे मंदिर वरच्या दिशेने विस्तारत जाते, तर आतील मंडपाचे छत भक्ताची दृष्टी केंद्राकडे खेचते. स्थापत्यातील हा विरोधाभास मंदिराच्या एकूण रचनेला वेगळे सौंदर्य प्रदान करतो.

पेडगावची मंदिरे पाहताना केवळ लक्ष्मीनारायण मंदिरातील मूर्तीची छायाचित्रे घेऊन परतणे पुरेसे नाही. या संकुलातील पाचही मंदिरांची योजना स्वतंत्रपणे पाहिली, गर्भगृह आणि मंडपातील बदल टिपले, द्वारशाखांची तुलना केली आणि देवकोष्ठांचा क्रम समजून घेतला, तरच या स्थळाचे खरे महत्त्व उलगडते. बहादूरगडाच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या सावलीत ही मंदिरे बराच काळ दुर्लक्षित राहिली. मात्र स्थापत्याच्या दृष्टीने विचार केला, तर पेडगाव हे मध्ययुगीन महाराष्ट्रातील मंदिरनिर्मितीच्या एका समृद्ध टप्प्याचे प्रतिनिधित्व करणारे महत्त्वाचे स्थळ आहे.

पुण्यापासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर असलेले पेडगाव इतिहास, स्थापत्य आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. बहादूरगडाचा किल्ला आणि त्याच्या परिसरातील ही पाचही मंदिरे पाहण्यासाठी मुद्दाम वेळ काढायला हवा. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या या स्थळाला वाट वाकडी करून आवर्जून भेट द्यायला हवी.

sdparanjpe@gmail.com

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Mumbai : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांचा सुरेल फराळ; पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सणाचा उत्साह द्विगुणित