मंगल देवदत्त परुळेकर
फिल्टर लावून चेहरा सुंदर दिसेल; पण मनातला न्यूनगंड कसा लपवणार? स्वत: ला जसं आहोत तसं स्वीकारण्याचा सुंदर संदेश देणारी नीलची गोष्ट !
नील यंदा आठवीत गेला होता. अभ्यासात तो वर्गात नेहमी पुढे असायचा. गणिताच्या टेस्टमध्ये त्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे आणि सायन्सच्या तासाला सरांनी अवघड प्रश्न विचारला की नीलचाच हात सर्वांत आधी वर असायचा. पण एवढं सगळं असूनही नीलच्या मनात एक बारीक रुखरुख सतत टोचत राहायची - तो स्वतःची तुलना वर्गातल्या इतर मुलांशी करायचा.
कबीर किती भारी क्रिकेट खेळायचा, आर्यनचे केस आणि त्याची हेअरस्टाईल एकदम हिरोसारखी दिसायची आणि ओमच्या जोक्सवर तर अख्खा क्लास पोट धरून हसायचा. नीलला आरशात बघितलं की सारखं वाटायचं, 'आपल्यात यातलं काहीच नाही. आपण किती साधे आणि सुमार दिसतो !'
सकाळी शाळेचा युनिफॉर्म घातल्यावर नील किमान दहा मिनिटं आरशासमोर उभा राहायचा. केस डावीकडून उजवीकडे भांग पाडून बघायचे, मग ते विस्कटून बघायचे, हनुवटी वर करून हसण्याचा सराव करायचा.
"काय रे नील, आरशासमोर काय एवढं तपश्चर्या करतोयस? बस सुटेल बघ तुझी !" आईने किचनमधून आवाज दिला.
"काही नाही गं आई! हे केस नीट बसतच नाहीत आणि गालावर पिपल आलाय बघ," नील वैतागून म्हणाला.
"अरे, वाढत्या वयात एक-दोन पिपल्स येणारच ना! एवढा काय विचार करायचा त्याचा? चल, पटकन बॅग उचल," आई हसत म्हणाली. पण नीलचा हिरमोड झाला.
हल्ली वर्गातल्या मुलांचा व्हॉट्सअॅप ग्रुप चांगलाच अॅक्टिव्ह झाला होता. सगळे स्वतः चे छान छान फोटो डीपीवर ठेवायचे. नीलही मोबाईलवर सेल्फी काढायचा; पण साधा फोटो ग्रुपवर टाकण्याचं धाडस त्याला व्हायचं नाही. तो वेगवेगळे अॅप्स वापरून फोटो 'एडिट' करायचा. गालावरचा डाग पुसून काढ, चेहऱ्याचा रंग गोरा कर, डोळे थोडे मोठे कर... मग कुठेतरी समाधान झाल्यावर तो फोटो पोस्ट करायचा. त्यावर मित्रांनी 'नाईस डीपी', 'हँडसम ब्रो' अशा कमेंट्स दिल्या की क्षणभर बरं वाटायचं; पण थोड्याच वेळात आतून एक बारीक काटा टोचायचा-'हे खोटं आहे, मी असा दिसतच नाही!'
एके दिवशी मधल्या सुट्टीत कबीर सहज म्हणाला, "अरे नील, कालचा तुझा फोटो मस्त होता यार ! पण प्रत्यक्षात तू थोडा वेगळाच दिसतोस."
कबीरने ते अगदी सहज, काहीही वाईट हेतू न ठेवता म्हटलं होतं. पण ते वाक्य ऐकताच नीलचा चेहरा लालबुंद झाला.
"म्हणजे मी खोटा फोटो टाकतो असं म्हणायचंय का तुला?"
"अरे तसं नाही रे, मी फक्त मस्करी-"
"राहू दे, हू दे, मला नको शिकवू काही!" नील ताडकन उठला आणि निघून गेला. त्या दिवशी त्याने कबीरकडे ढुंकूनही पाहिलं नाही.
त्याच आठवड्यात शाळेच्या अॅन्युअल मॅगझिनसाठी फोटोग्राफीची कॉम्पिटिशन जाहीर झाली. प्रत्येकाने स्वतःच्या मोबाईलने एक फोटो काढून पाठवायचा होता. सर्वोत्कृष्ट फोटो मासिकाच्या पहिल्या पानावर छापून येणार होता. नीलने मनात ठरवलं, 'आपण स्वतःचाच असा एकदम भारी अँगलने फोटो काढायचा, की सगळे बघतच बसतील !'
पण स्पर्धेच्या दिवशी आर्टच्या सुप्रिया मॅडमनी सगळ्यांना मैदानात गोळा केलं आणि म्हणाल्या, "मुलांनो, आज स्वतःचे सेल्फी अजिबात काढायचे नाहीत! आजूबाजूला बघा. रोज दिसणाऱ्या माणसांकडे आणि साध्या प्रसंगांकडे एका नव्या नजरेने बघा. त्यातलं सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न करा."
नीलचा मूड पार गेला. तरीही तो नाइलाजाने मोबाईल हातात घेऊन मैदानावर फिरू लागला.
कडक ऊन पडलं होतं. एका कोपऱ्यात कबीर पाचवी-सहावीच्या एका छोट्या मुलाला बॅटिंग शिकवत होता. खेळता खेळता त्या लहान मुलाने जोरात शॉट मारला आणि बॉल आणायला जाताना तो घसरून पडला. त्याच्या गुडघ्याला खरचटलं आणि तो रडू लागला.
कबीर लगेच धावत गेला. त्याने त्या मुलाला हाताला धरून उठवलं. स्वतःच्या रुमालाने त्याच्या गुडघ्यावरची माती झटकली आणि म्हणाला, "अरे, काही नाही झालं दोस्ता! मी शिकत होतो तेव्हा तर दहा वेळा पडलो होतो. चल, आता मी तुला हळूच बॉल टाकतो, मस्त सिक्स मार!"
त्या लहान मुलाच्या डोळ्यांतलं पाणी विरघळलं आणि ओठांवर एक गोड हसू आलं.
नील बाजूला उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या बोटांनी नकळत कॅमेरा ऑन केला आणि त्याने 'क्लिक' केलं !
कबीरच्या चेहऱ्यावरचं ते काळजीचं आणि आपुलकीचं हसू, छोट्या मुलाच्या डोळ्यांतली चमक आणि मागून पानांमधून पडलेलं कोवळे ऊन-सगळं एका फ्रेममध्ये अचूक कैद झालं होतं.
नीलने स्क्रीनवर तो फोटो पाहिला आणि तो क्षणभर थबकला. फोटोत कबीरचे केस उन्हाने विस्कटलेले होते, कपाळावर घामाचे थेंब चमकत होते, युनिफॉर्मवर थोडी धूळ लागली होती... पण तरीही तो फोटो अप्रतिम दिसत होता! कारण त्यात कोणताही पोझ दिलेला आव नव्हता, कसलाही 'फिल्टर' नव्हता; त्यात एक जिवंत, खराखुरा क्षण होता.
"काय रे, काय करतोयस?" मागून कबीरचा आवाज आला. नीलने थोडं संकोचून फोन त्याच्यापुढे धरला.
कबीरने डोळे मोठे केले, "अरे वा नील! हा फोटो तू काढलास? काय भारी आलाय यार! हा नक्की मॅगझिनमध्ये सिलेक्ट होणार!"
नील शांत उभा राहिला. त्याच्या मनातलं मळभ एका क्षणात दूर झालं. त्याला पहिल्यांदाच उमगलं एखाद्या फ्रेममध्ये सुंदर दिसण्यासाठी चेहरा आरशात कसा दिसतो यापेक्षा, माणूस त्या क्षणी कसा जगतो हे जास्त महत्त्वाचं असतं !
त्या संध्याकाळी नीलने अभ्यासाच्या टेबलावरून मोबाईल उचलला. आरशासमोर उभा राहिला. त्याने स्वतःचा एक साधा सेल्फी काढला. गालावरचा पिंपल दिसत होता, केस थोडे अस्ताव्यस्त होते. यावेळी त्याने एकही फिल्टर लावला नाही. त्याने तो फोटो शाळेच्या ग्रुपवर पाठवला आणि खाली फक्त लिहिलं 'मी, असाच !'
रात्री झोपताना त्याने आरशात स्वतःच्या डोळ्यांत पाहिले आणि स्वतःशीच हसून पुटपुटला, "कदाचित मी एखाद्या हिरोसारखा दिसत नसेन, पण मी जसा आहे तसा अगदी परफेक्ट आहे!"
त्या रात्री आरशातल्या मुलाच्या चेहऱ्यावर जे हसू होतं, ते कुठल्याही अॅपपेक्षा किंवा फिल्टरपेक्षा खूप जास्त सुंदर होतं.
mdparulekar@gmail.com