मकरंद जोशी
कधी वाळलेल्या काडीसारखे दिसणारे, कधी झाडाच्या पानाचा भास निर्माण करणारे, तर कधी परिसराच्या रंगात स्वतःला मिसळून घेणारे! कीटकांच्या या अजब करामती पाहिल्या की निसर्गाच्या किमयेपुढे थक्क व्हायला होते. चला, जाणून घेऊया या छोट्या जीवांचे मोठे विश्व!
सह्याद्रीच्या रानवाटांवरून फिरताना आपल्याला निसर्गाची विविध रूपे नेहमीच पाहायला मिळतात. दर सात वर्षांनी फुलणारी कारवी, पिवळ्या फुलांचे झुबंर मिरवणारा बहावा, सोनेरी पाठीचा सुतार पक्षी, निळ्या रंगाचा खंड्या पक्षी, आपल्या हिरव्या रंगाने झाडांमध्ये मिसळून गेलेला हरणटोळ साप, माणसांची चाहूल लागताच धूम ठोकणारी भेकरं, अशा सहज नजरेस पडणाऱ्या वन्यजीवांकडे आपले लक्ष जाणे अगदी स्वाभाविक असते. पण सृष्टीतील या मोठ्या घटकांप्रमाणेच चटकन नजरेस न पडणाऱ्या छोट्या छोट्या जीवांनीही निसर्गचक्राचा मोठा हिस्सा व्यापलेला आहे. अशा छोट्या जीवांमधील कीटक अर्थात षट्पादांची ओळख करून घेऊया.
खरं तर कीटक आपल्याला अनोळखी नाहीत. आपल्या घरातील डास, मुंग्या, माशा, झुरळं हे सगळे याच वर्गाचे सभासद आहेत. शिवाय मध गोळा करणाऱ्या मधमाशा, कागद खाणारी वाळवी, रंगीबेरंगी फुलपाखरे, रात्री किरकिर करणारे रातकिडे, गवतावर उड्या मारणारे टोळ हे सगळे कीटकच आहेत. पृथ्वीवरील एकूण सजीव प्राण्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ७५ टक्के प्रजाती कीटकांच्या आहेत. यावरून कीटकांचा गट किती मोठा आहे, याची कल्पना येईल. मात्र, कीटकांचा आकार लहान असल्याने त्यांचा अभ्यासही तुलनेने कमी झाला आहे. जगातील एकूण कीटकांपैकी सुमारे ७५ टक्के कीटक आजही आपल्याला नीटसे ठाऊक नाहीत. म्हणूनच दरवर्षी जगभरात कीटकांच्या नव्या नव्या प्रजाती सापडतात.
उत्क्रांतीच्या ओघात सुमारे पस्तीस कोटी वर्षांपूर्वी कीटक या पृथ्वीवर अवतरले. मेसोझॉइक काळात जेव्हा सपुष्प वनस्पती उदयाला आल्या, तेव्हा त्यांच्याबरोबर कीटकांचाही विकास झाला. प्राणिशास्त्राच्या वर्गीकरणानुसार कीटक हे कणा नसलेले म्हणजेच अपृष्ठवंशी (इनव्हर्टिब्रेट्स) प्राणी आहेत. या अपृष्ठवंशी प्राण्यांच्या गटात फक्त कीटकच हवेत भरारी घेऊ शकतात. पृथ्वीवर अवतरल्यानंतरच्या पुढील सहा-सात कोटी वर्षांत कीटकांनी वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये अनुकूल बदल घडवून आणले आणि अक्षरशः जल, जमीन आणि आकाश व्यापून टाकले.
कीटक हे अस्थिरहित संधिपाद प्राणी आहेत. सर्वसाधारणपणे कीटकांना सहा पाय आणि पंखांच्या दोन जोड्या असतात. कीटकांच्या शरीराची विभागणी मस्तक, धड आणि पोट अशा तीन भागांत झालेली असते. अनेकदा कोळी आणि खेकडा यांना कीटक समजण्याची गल्लत केली जाते. पण कोळी हा अष्टपाद, तर खेकडा हा क्रस्टेशियन म्हणजेच कवचधारी संधिपाद गटाचा सभासद आहे.
कीटकांचे डोके किंवा मस्तक हे सात खंड एकत्र जुळून बनलेले असते. या डोक्यावर दोन संयुक्त डोळे, एक किंवा अधिक साधे डोळे, दोन अँटेना अर्थात मिशा आणि अन्नग्रहण करण्याचे अवयव असतात. कीटकांमध्ये पाय, पंख आणि अन्नग्रहण करण्याच्या अवयवांमध्ये मोठी विविधता आढळते. ढेकूण आणि डास यांना अतिशय अणकुचीदार सोंड असते. तिचा वापर करून ते आपल्या भक्ष्याच्या शरीरातील द्रव (रक्त) शोषून घेतात. फुलपाखरे आणि पतंग यांना फुलांतील मध शोषून घेण्यासाठी उपयुक्त अशी सोंड असते. इतर वेळी ही सोंड स्प्रिंगप्रमाणे गुंडाळून ठेवलेली असते.
नाकतोडा, टोळ आणि रातकिडा हे मागच्या पायांचा वापर करून उंच उंच उड्या मारतात. त्यामुळे त्यांचे मागचे पाय लांब आणि मजबूत असतात. मधमाशीच्या मागच्या पायांवर केस असतात. जेव्हा मधमाशी फुलांमधील मध गोळा करत असते, तेव्हा या पायांवरील केसांमध्ये परागकण अडकतात आणि त्याद्वारे परागीभवनास मदत होते.
कीटकांच्या अनोख्या शरीररचनेमुळे ते सर्वव्यापी ठरले आहेत. वाळवंट, घनदाट अरण्य, शेते, खुर्ट्या झुडपांचे प्रदेश, दलदलीचे भाग, बर्फाच्छादित परिसर, नद्या, तलाव, गावे-शहरे आणि माणसांची घरे अशा सर्व ठिकाणी कीटकांचा संचार असतो. कीटकांचे अन्नही विविध प्रकारचे असते. काही कीटक पाने, फुले आणि फळे कुरतडून खातात, काही कुजलेल्या वनस्पती आणि मृत प्राण्यांवर जगतात, तर काही लाकूड आणि कागद खातात. त्यामुळे पृथ्वीवर अशी एकही जागा नाही, जिथे कीटक आढळत नाहीत आणि असा एकही नैसर्गिक पदार्थ नाही, जो त्यांनी खाण्यासाठी नाकारला आहे.
कीटकांमध्ये दोन प्रकारचे जीवनक्रम पाहायला मिळतात. टोळ, ढालकीटक अशा काही कीटकांमध्ये इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस म्हणजेच अपूर्ण अवस्थांतर पाहायला मिळते. या कीटकांमध्ये अंडी, बालकीटक आणि प्रौढ कीटक अशा तीनच अवस्था आढळतात. यातील बालकीटक हे प्रौढ कीटकांच्या हुबेहूब प्रतिकृती असतात. फरक असतो तो केवळ आकाराचा आणि रंगाचा.
फुलपाखरे आणि पतंग यांच्यात मात्र कम्प्लीट मेटामॉर्फोसिस म्हणजेच पूर्ण अवस्थांतर पाहायला मिळते. त्यांचा जीवनक्रम अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू किंवा पतंग असा असतो. यातील प्रत्येक अवस्था दुसऱ्यापेक्षा वेगळी दिसणारी असते.
विशेष म्हणजे, जन्माला येतानाच भोवतालच्या परिसराप्रमाणे रंगरूप धारण करण्याची किमया कीटकांना अवगत असते. टोळ आणि नाकतोडे यांनी आपली अंडी हिरव्या गवतावर घातली, तर त्यांतून बाहेर येणारे कीटक हिरव्या रंगाचे असतात. मात्र, हे गवत वाळलेले असेल, तर हेच कीटक पिवळ्या रंगाचे असतात.
रंगसंगतीतून साधली जाणारी सभोवतालच्या परिसराशी असलेली समानता हे कीटकांचे सर्वांत मोठे बचावाचे साधन आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काडीकीटक (स्टिक इन्सेक्ट). एखादी वाळलेली काडी असावी, तसा हा कीटक दिसतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे, तो जर वाळलेल्या गवतात जन्मला असेल, तर तपकिरी रंगाचा असतो आणि हिरव्या गवतात जन्मला असेल, तर हिरव्या रंगाचा असतो. याच्या जिवावर बेतले, तर तो मेल्याचे नाटक करतो आणि आपला जीव वाचवतो.
या प्रकारचे आणखी एक उदाहरण म्हणजे पर्णकीटक (लीफ इन्सेक्ट). हा कीटक हुबेहूब झाडाच्या पानासारखा दिसतो. तो चालायला लागला की झाडाचे पानच चालत आहे, असे वाटते. शुष्कपर्ण (ओकलीफ बटरफ्लाय) हे फुलपाखरूही आपल्या पंखांच्या बाहेरील बाजूला वाळलेल्या पानासारखी रंगसंगती मिरवत असते. त्यामुळे ते बसलेले असताना एखादे वाळलेले पानच लटकत आहे, असे वाटते.
कीटकांच्या या अजब जगाविषयी आणखी काही मनोरंजक गोष्टी रविवारच्या 'ऐसी अक्षरे रसिके' पुरवणीत.
makarandjoshi@gmail.com