मेधा आलकरी
लंडनच्या राणीला पाहण्याची उत्सुकता होतीच; पण त्यापेक्षाही जास्त ओढ होती ती चौकड्यांचा स्कर्ट घालून बॅगपायपर वाजवणाऱ्या स्कॉटिश सैनिकांना पाहण्याची! स्कॉटलंडच्या भूमीत पाऊल ठेवण्यापूर्वी मनात रंगवलेलं हे चित्र प्रत्यक्षात किती देखणं असेल, याची कल्पनाही नव्हती. ऑगस्टमध्ये एडिंबरात पोहोचलो आणि शहरच जणू उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघालेलं दिसलं. पुढे जे अनुभवायला मिळालं, ते केवळ एक कवायत नव्हती, तर इतिहास, शौर्य, संगीत आणि कलाविष्कार यांचा अविस्मरणीय सोहळा होता.
‘राणी’चं लंडन पाहायची जितकी जबरदस्त इच्छा होती, तितकीच किंबहुना त्याहूनही अधिक इच्छा बॅगपायपर हे रणवाद्य वाजवणाऱ्या आणि चौकड्यांचा स्कर्ट घालणाऱ्या स्कॉटिश सैनिकांना पाहण्याची होती. सृष्टीसौंदर्यानं नटलेलं स्कॉटलंड पाहायला आम्ही ऑगस्ट महिना निवडला. एडिंबरा ही स्कॉटलंडची राजधानी. इंग्रजी स्पेलिंगमध्ये एडिनपुढे लागणाऱ्या बर्ग या शेपटाचा तऱ्हेवाईक उच्चार न करता स्कॉटिश लोक त्याचा बरा किंवा बरो असा उच्चार करतात. एडिंबरा! ऑगस्ट या उन्हाळी महिन्यात एडिंबरामध्ये विविध फेस्टिव्हल्स असतात. फ्रिंज फेस्टिव्हल, फिल्मोत्सव, नाट्योत्सव, मिलिटरी टॅटू. सारं वातावरण कसं भारलेलं. उत्सव समित्यांनी योजलेले कार्यक्रम बहुतकरून रात्री असतात, मग दिवसा पर्यटकांचं मनोरंजन करण्यासाठी देशविदेशातील कलाकार येतात. त्यांचं व्यासपीठ म्हणजे ही विशाल मेदिनी, पडदा असतो निळ्याभोर आकाशाचा आणि पार्श्वसंगीत म्हणजे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्या. जादूगार, डोंबारी, संगीतकार, चित्रकार अशा कलाकारांच्या या सादरीकरणाला फ्रिंज शो म्हणतात. मुख्य कार्यक्रमाच्या जोडीचे! रात्रीचा वेळ मुख्य कार्यक्रमांसाठी राखून ठेवायचा, दिवसभर या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायचा आणि उन्हं डोक्यावर आली की बागांमध्ये मस्त लोळायचं असे हे ऑगस्ट महिन्याचे उत्सवमय आणि चैतन्यमय दिवस.
एडिंबराच्या या ‘ऑगस्ट मस्ती’बद्दल पुसटशीही कल्पना नसलेले आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा अगदीच नवखे पर्यटक होतो. स्कॉटलंड किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रंगणाऱ्या ‘मिलिटरी टॅटू’ या कवायतीच्या कार्यक्रमाची तिकिटं फेब्रुवारीतच संपतात ही माहिती तर नवीनच होती. ब्लॅकमध्ये हवी असल्यास टुरिस्ट बसच्या ड्रायव्हरजवळ चौकशी करा, असा एक अनाहूत सल्ला मिळाला होता. दो का पाच, दो का पाच करणारे इथेही? नको रे बाबा! या परिस्थितीत हिरमुसले होऊन आम्ही आमच्या हॉटेल मालकीणबाईंकडे चौकशी केली तेव्हा तिने खूपच मौलिक माहिती दिली. ती म्हणाली, “असलं काहीही न करता सरळ टॅटूच्या ऑफिसमध्ये जा. बऱ्याच वेळा कोणीतरी तिकिटं कॅन्सल करायला येतात. ट्राय युवर लक.”
आम्ही हा सरळसोप्पा मार्ग स्वीकारून लगबगीनं टॅटूच्या ऑफिसात शिरलो आणि थोडं दबकतच तिथल्या गणवेषधारकाला विचारलं, “आजची किंवा उद्याची दोन तिकिटं मिळू शकतील का?” त्याने चक्क होकारार्थी मान हलवली. म्हणाला, “या, दोन मिनिटांपूर्वीच एक जण दोन तिकिटं कॅन्सल करून गेला.” तिसऱ्या मिनिटाला मशीनमधून आमची नावं असलेली तिकिटं बाहेर आली. आमचा विश्वासच बसेना. जागाही अगदी मोक्याची होती. कुणा भल्या माणसाकडून सहा महिने आधीच देवाने आमच्या तिकिटांचं आरक्षण करून ठेवलं होतं.
टॅटूची वेळ होती रात्री नऊची. त्याआधी दिवसा उजेडी किल्ला बघायला बाहेर पडलो. नेमका कुठला रस्ता घ्यावा या विचारात असताना निळ्या रंगाच्या गणवेशातली एक बाई आमच्याकडे आली. STAR म्हणजे ‘स्ट्रीट टीम अँड रिस्पॉन्स’ ही संस्था प्रवाशांच्या मदतीसाठी आपले अनेक वार्डन रस्त्यात उभे करते. तिने सुचवलेल्या रस्त्यावरून चालत आम्ही किल्ल्यात दाखल झालो. स्कॉटलंडचा संपूर्ण इतिहास या किल्ल्याभोवती फिरतो. इंग्लंड स्कॉटलंडच्या विलीनीकरणासाठी जबाबदार सहावा जेम्स इथेच जन्मला. इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ विनाअपत्य होती. तिनं इथल्या राणी मेरीच्या पुत्रास दत्तक घेतलं आणि दोन कट्टर विरोधी राष्ट्रांचं एकीकरण झालं. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी किल्ल्यात भरपूर स्थळं असली, तरी पर्यटकांची गर्दी असते ती ‘ऑनर्स ऑफ द किंगडम’ या प्रदर्शनात. मुकुटमण्यांच्या आकर्षणाबरोबरच तिथे ठेवलेला ‘स्टोन ऑफ डेस्टिनी’ पाहण्याची आमची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती. या अत्यंत पवित्र, गूढ आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या दगडाबद्दलच्या ऐतिहासिक तथ्यांसोबत काही प्राचीन आख्यायिकासुद्धा ऐकायला मिळाल्या.
असं मानलं जातं की, बायबलमधील याकोब याने पॅलेस्टाईनमध्ये झोपताना हा दगड आपल्या उशाखाली घेतला होता आणि तो इजिप्त, स्पेन, आयर्लंडमार्गे स्कॉटलंडला पोहोचला. येथील प्राचीन परंपरांमध्ये हा ‘बोलणारा दगड’ म्हणून ओळखला जातो. आख्यायिकेनुसार, जेव्हा स्कॉटलंडचा खरा वारसदार राजा या दगडावर उभा राहून शपथ घ्यायचा, तेव्हा हा दगड म्हणे आनंदानं गुंजायचा. शतकानुशतके स्कॉटलंडच्या राजांचा राज्याभिषेक याच दगडावर बसून केला जात असे. १२९६ मध्ये इंग्लंडचा राजा पहिला एडवर्ड याने स्कॉटलंडला पराभूत केल्यानंतर विजयाची निशाणी म्हणून हा दगड लंडनला नेला आणि त्यासाठी एक राज्याभिषेक खुर्ची बनवून घेतली. जवळजवळ सातशे वर्षं प्रत्येक राजाचा राज्याभिषेक या ‘कोरोनेशन चेअर’वर बसूनच झाला. स्कॉटलंडसाठी हा त्यांच्या अस्मितेचा प्रश्न होता. १९५० साली ख्रिसमसच्या रात्री चार तरुण देशभक्तांनी लंडनच्या अतिसुरक्षित वेस्टमिनिस्टर ॲबीमधून हा दगड अतिशय शिताफीनं पळवून आणला. मात्र ब्रिटिश सरकारने तो पुन्हा लंडनला परत नेला. वर्षानुवर्षांच्या राजकीय आणि सांस्कृतिक मागण्यांनंतर अखेर १९९६मध्ये ब्रिटिश राज्याभिषेकाच्या वेळी तो लंडनला आणला जाईल या बोलीवर ब्रिटन सरकारने अधिकृतपणे हा दगड स्कॉटलंडला परत केला. सध्या तो दगड स्कॉटलंडमधील पर्थ म्युझियम येथे ठेवण्यात आला आहे. या टूरमधल्या वार्डनकडून आम्हाला स्कॉटलंड आणि इंग्लंड नात्यातील आणखी एक मजेशीर गोष्ट कळली. बँक ऑफ स्कॉटलंडचा जन्मदाता इंग्रज होता आणि बँक ऑफ इंग्लंडचा स्कॉटिश. स्कॉटलंडमधल्या चलनाला पौंड स्टर्लिंगच म्हणत असले आणि त्यांचं मूल्य सारखंच असलं तरी त्यांचं रंगरूप वेगळं असल्यामुळे आपला गोंधळ उडू शकतो.
किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, समोरील विस्तीर्ण प्रांगणात होणारा तालबद्ध कवायतीचा मिलिटरी टॅटू बघायला आम्ही आठ वाजताच तिथे पोहोचलो. अवाढव्य मोठा एडिंबरा कॅसल समोर दिसत होता. आता एकच रस्ता मोकळा ठेवण्यात आला होता. त्यावरून जाणाऱ्या शिस्तबद्ध लोंढ्यात आम्ही सामील झालो. गोऱ्या वयस्कर बायका, लालचुटूक लिपस्टिक लावून, एका हातात पर्स लटकवून, दुसरा हात नवऱ्याच्या थरथरणाऱ्या हातात अडकवून हसऱ्या चेहऱ्यानं पुढे सरकत होत्या. बरोबर नऊच्या ठोक्याला कवायत सुरू झाली. कमालीची तालबद्ध! ड्रम आणि पाइप या वाद्यांचा संमिश्र ताल! त्या शिस्तीत एक सौंदर्य होतं. या कवायतीत प्रथम आले राजाचे उमदे घोडेस्वार. ओमान आणि नेपाळच्या गुरखा पलटणीही कवायतीत भाग घेण्यासाठी आमंत्रित केल्या गेल्या होत्या. स्वित्झर्लंड, अमेरिका, साऊथ आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशही त्यात सहभागी झाले होते. त्यांचे ते रंगीबेरंगी गणवेश, विविध व्यूहरचना हे सगळं पापणी न लवता नुसतं पाहत राहावं इतकं देखणं. काही कवायतींमध्ये सांस्कृतिक कलाकारही सहभागी झाले होते. साऊथ आफ्रिकेतील आदिवासींनी त्यांच्या पारंपरिक वेशात महाकाय ड्रम वाजवत एक कवायत सादर केली. ओमानच्या वाळवंटात पाणी भरण्यासाठी दूरवर चालत जाणाऱ्या स्त्रियांनी त्यांचे तुंबे कमरेवर घेऊन केलेलं बहारदार नृत्य तर दृष्ट लागावं इतकं सुंदर आणि कमनीय होतं. कॅनडाहून आलेल्या मुलींनी स्कॉटलंडच्या प्रसिद्ध टार्टन (चौकड्यांचं) कापडाचे स्कर्ट घालून केलेलं बॅले नृत्य अतिशय मोहक होतं. कोरियाने पंख्यांच्या सहाय्यानं केलेल्या नृत्यात विविध रंग आणि लवचिक हालचालींमुळे जणू फुलपाखरं उडताहेत असा भास झाला. मात्र प्रेक्षकांची उत्स्फूर्त वाहवा मिळवली ती स्विस ड्रमर्सनी. ताल तर सुरेख होताच; पण ते मधूनच ड्रमस्टिक हवेत उंच उडवत किंवा एकमेकांकडे फेकून त्यांची अदलाबदल करत. त्यांची मानेची कवायत तर फारच मजेदार होती. त्यानंतर अमेरिकन आर्मीच्या एका रायफल तुकडीनं आपली करामत दाखवली. समोरासमोर किंवा एका विशिष्ट व्यूहरचनेत उभं राहून त्यांनी संगीन लावलेल्या रायफली एकमेकांकडे फेकून त्यांची अदलाबदल केली. या अतिधाडसीच्या प्रात्यक्षिकासाठी मनाची अविचल एकाग्रता आवश्यक असते. त्यासाठी प्रेक्षकांना या प्रात्यक्षिकादरम्यान फ्लॅशशिवाय फोटो काढण्याची विनंती केली गेली. नीरव शांतता, एकच प्रकाशझोत आणि फक्त रायफल फेकल्याचा आवाज. प्रात्यक्षिक संपताच इतका वेळ श्वास रोखून बसलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शेवटी आली फ्लाइंग गनरची मोटारसायकल टीम. या वीर आणि वीरांगणींनी धडकी भरेल अशा चित्तथरारक कवायती दाखवल्या. बेफाम वेग आणि उंच उड्या.. नंतर राजाच्या चार भल्यामोठ्या तोफा आणल्या गेल्या आणि इंग्लंड-स्कॉटलंड विलीनीकरणाचा प्रतीकात्मक प्रवेश झाला. कवायत करत आधी स्कॉटलंडचा आणि त्यामागून इंग्लंडचा झेंडा आला आणि दोन्ही राज्यांचा एक असा तो चिरपरिचित ब्रिटिश झेंडा मिरवत नेण्यात आला.
शेवटी, सहभागी झालेले सारे सदस्य एकत्र प्रांगणावर जमा झाले. तोफा डागल्या गेल्या. प्रत्येक तुकडीनं मग पाहुण्यांना मानवंदना दिली. या कवायतीदरम्यान एडिंबरा किल्ला निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशझोतात न्हाऊन निघत होता. अचानक एका क्षणी सारी वाद्यं थांबली. त्या नीरव शांततेत बॅगपाईपचे सूर ऐकू येऊ लागले. किल्ल्याच्या एका टेहळणी बुरुजावर एक लखलखीत प्रकाशशलाका गेली. तिथे एक हायलँडर रणयोद्धा एकटाच उभा होता. त्याच्या हातात ते रणवाद्य होतं. रात्रीची वेळ, बोचरी थंडी, नीरव शांतता आणि त्या रणवीरने छेडलेले बॅगपाईपचे ते आर्त सूर मी कधीच विसरू शकणार नाही. थेट हृदयाला भिडणारे आणि अंतःकरण हेलावून टाकणारे! दीड तास एका अजब दुनियेत हरवलो होतो आम्ही. मनोमनी त्या मिलिटरी टॅटूला एक कडक सॅल्यूट ठोकून भारावल्या अवस्थेत आम्ही हॉटेलवर परतलो.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalakari@gmail.com