दिवाळी अंक २०२६ : दीठींच्या दिशा खोल तेजाळताना 
अक्षररंग

दिवाळी अंक २०२६ : दीठींच्या दिशा खोल तेजाळताना

दिवाळीच्या लखलखत्या रोषणाईत कुणाच्या डोळ्यांत आशेच्या पणत्या तेवत असतात, तर कुणाच्या मनात बालपणीच्या किल्ल्यांच्या आठवणी रेंगाळत असतात. कुणासाठी दिवाळी हा दोन घासांच्या कमाईचा संघर्ष असतो, तर कुणासाठी शब्दांच्या दिव्यांनी अंतरंग उजळवणारा साहित्यसोहळा! या साऱ्या भावविश्वातून माणुसकी, बालपण, मैत्री आणि संवेदनशीलतेचा हरवता प्रकाश पुन्हा शोधण्याचा हा हळवा प्रयत्न.

नवशक्ती Web Desk

गीतेश गजानन शिंदे

दिवाळीच्या लखलखत्या रोषणाईत कुणाच्या डोळ्यांत आशेच्या पणत्या तेवत असतात, तर कुणाच्या मनात बालपणीच्या किल्ल्यांच्या आठवणी रेंगाळत असतात. कुणासाठी दिवाळी हा दोन घासांच्या कमाईचा संघर्ष असतो, तर कुणासाठी शब्दांच्या दिव्यांनी अंतरंग उजळवणारा साहित्यसोहळा! या साऱ्या भावविश्वातून माणुसकी, बालपण, मैत्री आणि संवेदनशीलतेचा हरवता प्रकाश पुन्हा शोधण्याचा हा हळवा प्रयत्न.

‘उत्साहाने घरचा आकाशकंदील करण्याच्या वयात
त्यांना परोपरीने सजवून विकणारी ही मुले
या दिवाळीची खरेदी करीत हिंडणाऱ्या
श्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत...
त्यांचे खानदान मुळातच वेगळे...’

स्टेशन परिसरात, बाजारपेठेत किंवा रस्त्यारस्त्यांवर असे कंदील, पणत्या, रांगोळी, उटणं विकणारी मुलं पाहिली की, दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या कवितेतील वरील ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. कुठून येतात ही मुलं? काय असते त्यांच्या घरची परिस्थिती? असले प्रश्न खरेदीच्या उत्साहात आपल्या मनाला क्वचितच शिवत असतील. आपण स्वस्तात मस्त म्हणून त्या विकतही घेतो. एरव्ही मॉलच्या थंडगार वातावरणात बिलिंग काऊंटरपाशी बारकोडवरची किंमत पटापट स्कॅन करवून कार्डावर भरघोस शॉपिंग करणारे किंवा क्यूआर कोड स्कॅन करत झटक्यात पैसे ट्रान्स्फर करणारे मात्र रस्त्यावरच्या या मुलांकडे दहाला एक मिळणारी वस्तू दहाला दोन कशा पदरात पडतील यासाठी आपले कसब पणाला लावतात आणि तशी ती वस्तू स्वस्तात मिळाली की आतल्या आत या विजयाने सुखावतातदेखील, तर काही जण खोट्या दयाभावनेनं इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी अशा लहानग्यांसोबतचे रील्स, व्हिडीओज शेअर करून बक्कळ लाइक्स आणि व्ह्यूज कमावतात. त्या तुलनेनं ही मुलं मात्र दुर्लक्षितच राहतात.

काय असेल या सर्व मुलांची पार्श्वभूमी ज्यांच्या दिवाळीची सुरुवात साधारणतः तीन महिने आधीच होत असते? काडीकाडी जमा करून, कोणाकडून तरी उसनवारी करून किंवा अर्धपोटी राहत पैशांची बचत करून या सर्व वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल ते आधी जमवतात. किती लोकांना जाणीव असेल की ही मुलं उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून अशी थेट रस्त्यावर येऊन बसली आहेत, ज्यांना प्रत्येक नव्या सूर्योदयाबरोबरच जगण्यासाठी खूप मोठा हप्ता द्यावा लागतो. खरं तर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये भारत महासत्ता होण्याचं स्वप्न आपण पाहिलं होतं, पण पहिल्या सहा वर्षांचा ताळेबंद करायचा झाल्यास सुरुवातीच्या दीड वर्षात कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या संकटामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, छोट्या छोट्या कंपन्या कायमच्या टाळेबंद झाल्या. कित्येक कुटुंबं देशोधडीला लागली. शंभर कोटी लसीकरणाचा किती जरी डांगोरा पिटला तरी मधल्या काळात ऑक्सिजन, औषधोपचारांच्या सोयीअभावी कित्येक कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला... ही मुलं त्यापैकीच एखाद्या घरातील तर नसतील ना? किंवा गेल्या तिनेक वर्षांत आधी रशिया-युक्रेन आणि आता इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षानं अनेक उद्योगांचे धाबे दणाणलेत. त्यात भर म्हणून यंदा सुपर एल-निनोमुळे दुष्काळ चटके आताच जाणवू लागलेत. मराठवाडा, विदर्भात तर भीषण परिस्थिती आहे आणि ती दिवसेंदिवस अतिगंभीर होणार आहे. त्यातूनच स्थलांतरित कुटुंब रोज शहरात येऊन दाखल होताहेत. त्यापैकीच तर ही मुलं नाहीत ना? थोडक्यात काय, आपलं आयुष्य उजळवणारे हे सर्व हात कायमची रात्र असलेल्या प्रदेशातून आलेले आहेत. ते कधीच आपल्या प्रकाशावर अधिकार सांगत नाहीत, किंबहुना त्यांनी तो जन्मतःच मान्य केला आहे. पण कधीतरी या वस्तू घेताना त्यांच्या डोळ्यांत जरूर डोकवा, त्यांच्याही डोळ्यांत तुम्हाला आशेच्या पणत्या तेवताना दिसतील. ज्यात त्यांनी आपल्या घामाचं तेल ओतलेलं असतं. जमल्यास घासाघीस न करता त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला स्वाभिमानानं मिळवून द्या. त्यांच्याही दारात एक दिवा उजळू दे, कंदील लागू देत.

एकीकडे ही अशी हातावर पोट घेऊन जगणारी मुलं, तर दुसरीकडे नशेच्या विळख्यात अडकलेली मुलं. नशा म्हटलं की नजरेसमोर पटकन दारू वा अमली पदार्थांचं व्यसन इतकेच येते. श्रीमंतांच्या पोरांची क्रूझ पार्टी आठवते. पण त्याहीपलीकडे नवी पिढी ग्रासलीये ती ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनानं याकडेही लक्ष द्यायला हवे. पबजी व इतर कॉम्बॅक्ट शूटिंग गेम्सच्या नादात एक पिढी हिंसक आणि एकलकोंडी बनलीये. या व्हर्च्युअल जगात वावरण्याची त्यांना इतकी सवय जडते की अवतीभवतीचं जगसुद्धा आभासी वाटू लागतं. मला तर शंका येते की या सर्व मुलांनी कधी दिवाळीमध्ये आपल्या सोसायटीत किल्ला तयार केला असेल. कदाचित किल्ला वगैरे हौसेनं बनवणारी व त्यात आनंद मानणारी आमची शेवटची पिढी असेल. आजही आठवतंय की सहामाही परीक्षा झाली रे झाली की आठवडाभर आधी दिवाळीची सुटी लागायची. मग बिल्डिंगमधली सर्व मुलांची गँग संध्याकाळी जमून आपल्या किल्ल्याचा एक आराखडा बनवायची. आर्किटेक्चरची कोणतीही पदवी नसलेले आम्ही सर्वजण त्यावेळी बांधकाम तज्ज्ञ होतो. सर्वांचा हेतू एकच की आपला किल्ला एरियात सर्वांत बेस्ट असायला हवा. मग माती कुठून व कोणी आणायची, दगड कोणी जमा करायचे, गेरू कोणी आणायचा, गोणपाट टाकून त्याला कसं शाकारायचं, कसा आकार द्यायचा, किल्ल्याची तटबंदी कशी करायची या सर्वांवर खल चालायचा. किल्ल्यावर एका बाजूला दरी आणि रान दाखवण्यासाठी मातीत मोहरी टाकायची म्हणजे चार-आठ दिवसांत ती बाजू कशी हिरवीगार व्हायची. नदी किंवा धबधबा दाखवण्यासाठी एखादी सलाईन कामी यायची. ती अशारीतीने लावायची की समोरून पाहणाऱ्याला दिसणारही नाही. वर्षानुवर्षं हस्तांतरित झालेले मातीचे मावळे कधीच म्हातारे व्हायचे नाहीत. दरवर्षी कॅमलिनच्या रंगांमुळे त्यांना नवी झळाळी मिळायची आणि एकदा का दिवाळी पहायला छत्रपती शिवाजी महाराजांची गडावर स्थापना झाली की किल्ला खऱ्या अर्थानं राजेशाही व्हायचा आणि भरून पावल्यासारखं व्हायचं. त्यावेळी ते सर्व क्षण टिपायला आतासारखे ना मोबाईल फोन होते, ना डीएसएलआर कॅमेरे. एखाद्याकडे कोडॅकचा बॉक्स कॅमेरा असायचा आणि तोही रोल अगदी पुरवून पुरवून वापरायचा. आता मात्र आपण रील स्क्रोल करूनच जगतो.

या किल्ले बांधणीवेळी वादही व्हायचे, पण दुसऱ्या दिवसापर्यंत ते मिटायचेदेखील. सोसायटीतील ज्येष्ठ मंडळीही मार्गदर्शन करायची. या सर्वांमुळे कोणताही कोर्स न करता समूहभावना वाढीस लागायची आणि डिप्रेशन येण्याचा तर दूरदूरपर्यंत संबंधच नसायचा. आपल्या बोलण्यापेक्षा दुसऱ्यांचं ऐकणं किती जास्त महत्त्वाचं असतं हे मी त्या काळात शिकलो. आजच्या मॅनेजमेंट युगात संघटनकौशल्य वगैरे पैसे देऊन शिकताही येत असेल, पण खरं संघटनकौशल्य या मातीतल्या संस्कारांनी शिकवलं. दगड, माती, टाकाऊ वस्तू आणि मित्रांच्या सुपीक डोक्यातल्या कल्पनांनी समृद्ध असे ते दिवस होते. कोणाच्याच खिशात अगदी वडापावसाठीही पैसे नसायचे, तरीदेखील या छोट्याछोट्या गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदामुळे आम्ही तेव्हा सर्वांत श्रीमंत लोक होतो. घरातील रद्दी वर्तमानपत्रांची रद्दी विकून केलेली वडापाव, पेप्सीकोलाची पार्टी म्हणजे सुख आणि चैन असायची. ऑनलाइन शिक्षणामुळे आणि गेमिंगमुळे गेल्या काही वर्षांत घरकोंबडी झालेल्या मुलांना मैत्रीमधली ही चैन उपभोगू देण्याची आज खरी गरज आहे. अर्थात शहरीकरणाच्या रेट्यात, उंचच उंच टॉवर्समध्ये आजकाल माती फक्त कुंडीतल्या झाडांपुरतीच किंवा पोडियम गार्डनवरच दिसते आणि बाकी सगळीकडे पेव्हर ब्लॉकचे आच्छादन पसरलेले.

दिवाळीत आणखी एक समृद्ध करणारी गोष्ट म्हणजे दिवाळी अंक. कॉलेजमध्ये असताना पेपर स्टॉलवर लागलेल्या अंकांच्या रंगीबेरंगी, आकर्षक मुखपृष्ठांवरील चित्रांनी मी भारावून जायचो. पुढे कधी याच अंकात माझ्या कविता, लेख येतील आणि मीही एका अंकाचा संपादक होईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मौज, दीपावली, हंस, धनंजय, कथाश्री, ऋतुरंग, महाराष्ट्र टाइम्स यांसारखे कित्येक दर्जेदार अंक पुढले चार-दोन महिने आपली बौद्धिक भूक भागवतात. मनोरंजन वृत्तपत्राचे संपादक काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांनी ‘मनोरंजन’ हा पहिला दिवाळी अंक १९०९ साली प्रसिद्ध केला. म्हणजेच तब्बल ११७ वर्षांचा दिवाळी अंकांचा वारसा मराठी भाषेला लाभलाय. महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र मिळून साधारणपणे ३५०-४०० अंक यादरम्यान प्रसिद्ध होतात.

विविध विषयांना वाहिलेले, साहित्य अभिरुची वाढवणारे, काही विनोदी, काही रंजक अशा या अंकांनी आजवर अनेक साहित्यिक घडवलेत. दिवाळी अंक म्हणजे लेखक, कवींसाठी आपला पहिला खर्डा आजमावून पाहण्याची संधीच. यंदाही साहित्यिकांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे. उद्योगधंद्यांच्या, बँकांच्या जाहिराती कमी प्रमाणात मिळत असल्या तरी आपल्या वाचकवर्गावर विसंबून पुन्हा एकदा संपादक, प्रकाशकांनी कंबर कसली आहे. दरम्यानच्या काळात कागद व मुद्रणावर १८% जीएसटी कर भरावा लागत असल्याने अंकांची निर्मिती देखील महागली आहे आणि त्याचाच परिणाम किंमतींवरही झाला आहे. पण तरीदेखील चोखंदळ वाचक पुन्हा एकदा या साहित्य फराळाचा आस्वाद घेतील आणि सृजनसंवादाचा हा आशयगर्भ कंदील पुन्हा अंतरंग तेजोमय करेल अशी आशा वाटते. अगदी कविवर्य शंकर रामाणींच्याच कवितेतून सांगायचे झाल्यास दीठींच्या दिशा खोलवर तेजाळून आपल्या आत सद्सद्विवेकाचा, करुणेचा दीप प्रज्वलित होत समाजाच्या इतर घटकांसाठीही जाग येईल आणि मोठ्या समाधानानं म्हणता येईल,

‘दिवे लागले रे दिवे लागले
तमाच्या तळाशी दिवे लागले
दीठींच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले.’

लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत.

geeteshshinde@gmail.com

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Mumbai : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांचा सुरेल फराळ; पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सणाचा उत्साह द्विगुणित