आत्मभान गवसलेलं आकाश! 
अक्षररंग

आत्मभान गवसलेलं आकाश!

मला सापडलाय आता पासवर्ड माझ्या जगण्याच्या ॲपचा’- उभ्या आयुष्याच्या गुंफेचं अंतर्व्दार उघडण्याची आणि स्वतःच्या अस्तित्वाचा वेध घेण्याची गुरुकिल्ली सापडल्याचा आत्मविश्वास व्यक्त करणारी डाॅ. कीर्ती जाधव यांची कविता स्त्री’जाणिवांचा अंतःस्वर प्रकट करते.

नवशक्ती Web Desk

परीक्षण

डॉ. वंदना जोशी

मला सापडलाय आता पासवर्ड माझ्या जगण्याच्या ॲपचा’- उभ्या आयुष्याच्या गुंफेचं अंतर्व्दार उघडण्याची आणि स्वतःच्या अस्तित्वाचा वेध घेण्याची गुरुकिल्ली सापडल्याचा आत्मविश्वास व्यक्त करणारी डाॅ. कीर्ती जाधव यांची कविता स्त्री’जाणिवांचा अंतःस्वर प्रकट करते. कवयित्री म्हणते आहे,

‘मी पुसून टाकते आहे चित्र,

तुम्ही रंगवलेल्या माझ्या जीवनाचे

मला माझ्या रेषा, रंग वापरायचे आहेत

मी देतेय आकार मला हवा तसा,

माझ्या आयुष्याला

तुम्ही कितीही आणलात अडथळा तरी’

कवितेच्या शब्दवाटेवर उजळलेली दिशा दिसते आहे. आयुष्याच्या प्रतलावर सत्वाचे आणि स्वत्वाचे मनस्वी रंग भरून तिला जीवनचित्र रंगवायचे आहे.

‘बाई तुझ्या अवकाशात’ या कवितासंग्रहातून कीर्ती जाधव यांनी स्त्री-मनातील जाणिवा-नेणिवांचा आणि वेदना- संवेदनांचा वेध घेतला आहे. निळ्या आभाळात तिच्या बुद्धी आणि कर्तृत्वाच्या क्षितिजावर बागडणारी स्वप्नांची, ध्येयांची व ध्यासाची रंगीबेरंगी फुलपाखरे आणि जीवनानुभवांमधून वाट्याला येणारी रक्तवर्णी जांभळ्या वेदना व्यक्त करणारी रंगीत फुले यातून बाईच्या वास्तव जगण्याचे सूचन करणारे या संग्रहाचे मंदार नेने यांनी तयार केलेले मुखपृष्ठ लक्षवेधी आहे. ज्येष्ठ स्त्रीवादी कवयित्री अंजली कुलकर्णी यांची वेधक प्रस्तावना असलेला ‘स्त्री-अवकाश’ सगळ्या आया- बहिणींना, सखी शेजारणींना खुणावत राहतो.

‘कालचक्र बदलतेय, ती हळूहळू कात टाकतेय

आणि सळसळतेय हिरव्या पात्यासारखी

संधी मिळेल त्या क्षेत्रात.’

आजच्या आधुनिक स्त्रीची होणारी प्रगती पाहताना कवयित्रीला दिलासा मिळतोय. म्हणूनच पारंपरिक समाजव्यवस्थेनं स्त्रीजीवनाचा आखून व ठरवून दिलेला पुराणकालीन संकुचित परीघ आता अधिकाधिक विस्तृत करण्याचं पुढच्या पिढीतल्या कन्या आणि युवतींना ती आवाहन करते आहे. कारण प्रचलित व प्रस्थापित पर्यावरणात असलेलं दुय्यम स्थान, कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्रपंचाची बंधने या साऱ्यांमुळे जखडणाऱ्या स्त्रीमनाची कहाणी तिला सतत अस्वस्थ करते आहे. या अस्वस्थतेतून होणारी उरातील घालमेल व मनाची घुसमट विविध कवितांमधून ती व्यक्त करते आहे.

‘सगळं लिहिता येतच असं नाही’--- हे आर्त प्रकट करताना कवयित्री म्हणते,

‘हक्कापेक्षा कर्तव्याच्या तारेवर

दिवसरात्र झुलणारा जीव

त्यामुळे जन्माला येणारी आयुष्यभराची त्रेधातिरपीट

कुणाला सांगूनही खरी वाटत नाही.’

मनाच्या तळघरातले अव्यक्त असणारे ताणे-बाणे कीर्ती जाधव यांनी नेमकेपणाने शब्दांकित केले आहेत. त्या लिहितात,

‘सोपं नसतं नदी होणं

वेदनेचे दगडधोंडे झिजवत

समुद्राला सत्व अर्पून

स्वतःच अस्तित्व विलीन करणं--

सोपं नसतं नदी होणं

तसंच सोपंही नसतं

एक स्त्री होणं,’

मुक्त शैलीतून आणि मुक्तछंदातून स्त्रीदुःखाचे संवेदन व्यक्त करणारी कीर्ती जाधव यांची कविता वाचकांच्या मनाचा ठाव घेते. घरातल्या कुणालाही काही झालं की वेदना कमी करण्यासाठी वापरली जाणारी रक्तचंदनाची बाहुली, खुरट्या परीघात घुसमट सांभाळत बहरणारी कुंडीतील झाडं, तळातील खळबळ जिवंत ठेवत, वरवर शांत भासवत वाहत राहणारी नदी अशा निरनिराळ्या निसर्गप्रतिमा, आयुष्य भाजत ठेवणारी ‘किचन’ नावाची भट्टी, जगाला जे दाखवायचे ते बाहेरच्या बाजूने शिवून आणि जगापासून जे लपवायचे ते भराव म्हणून आतल्या बाजूला घालून आणि आजी तयार करत असलेली ‘गोधडी’ इत्यादी दैनंदिन जीवनाशी सख्य सांगणाऱ्या ‘गृहप्रतिमा’ आणि ‘लॅपटॉप’, ‘पासवर्ड’, ‘डाऊनलोड’, ‘जी.पी.एस.’ या आजच्या जगण्याच्या परवलीच्या झालेल्या ‘तंत्रज्ञान प्रतिमा’ या वैविध्याने कवितेला बहुआयाम दिले आहेत. या संग्रहातील ‘आयाम’ या कवितेत ती त्याला म्हणते आहे,

‘कधीतरी ठेव तुझा पुरुषी अहंकार बाजूला

कबूल कर माझी बलस्थाने

आणि तुझ्या मर्यादा..

जमलं तर पाहा मला

स्त्री असण्याच्याही पलीकडे’

स्त्रीकडे ‘माणूस’ म्हणून बघण्याचे आवाहन करणारी ‘ती’ त्याला आत्मपरीक्षण करावयास सांगते आहे. त्याच्याशी स्पर्धा किंवा संघर्ष नाही तर साहचर्याचं मर्म समजावत संवाद साधू पाहते आहे. ती साद घालतेय, ‘माझ्या नजरेतून जगून बघ. तुझ्या माझ्या जगण्याला वेगळा आयाम देऊन बघ.’ स्त्रीच्या नजरेतून जगाकडे आणि जीवनाकडे बघण्याचा अंतःकरणपूर्वक आग्रह धरणारी कीर्ती जाधव यांची स्त्रीवादी कविता आहे. स्त्रीकडे ‘माणूस’ म्हणून पाहण्याचे ‘मूल्यभान’ जागवणारी स्त्री-वादी विचारसरणी या संवेदनशील शब्दाकळेतून व्यक्त झाली आहे.

‘स्त्री जन्मावर तेच तेच बोलण्यापेक्षा स्वतःची एक मुद्रा उमटवीन म्हणतेय’---अंत:हृदयातून उमलून, उसळून आणि उफाळून आलेले आत्मभान वाचकांना अंतर्मुख करते.

‘बाई तुझ्या अवकाशात

आता तुझं जग दिसावं,

विसाव्याला क्षणभर

तूच तुझी निजखुण व्हावं.’

स्त्रीत्वाचं सामर्थ्य ओळखत, प्रगल्भतेनं अस्मिता जागवत, स्वप्नांना सत्यात उतरवण्याची, कर्तृत्वाचं आकाश पेलण्याची ऊर्जा आणि चैतन्य ‘बाई तुझ्या अवकाशात’ या आपल्या तिसऱ्या काव्यसंग्रहातील ६५ कवितांमधून रसिकांच्या मनात निर्माण करण्यात कवयित्री कीर्ती जाधव यशस्वी झाल्या आहेत हा प्रत्यय येतो. जाणकारांनी हा समृद्ध अनुभव जरूर घ्यावा.

  • काव्यसंग्रह : ‘बाई तुझ्या अवकाशात’

  • कवयित्री : डॉ. कीर्ती जाधव

  • प्रकाशक : सृजनसंवाद, ठाणे,

  • पृष्ठ संख्या : ९६

  • मूल्य : २५०

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

Navi Mumbai : क्षुल्लक कारणातून रिक्षाचालकाची हत्या; मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत, दोन अल्पवयीनांचाही सहभाग

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर; मागणी व पुरवठा यात मोठी तफावत

एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची सौदीला जाणारी उड्डाणे रद्द