अभिवादन
संजय कुळकर्णी
४६ वर्षांच्या दीर्घ सिने कारकीर्दीत फक्त १४ सिनेमे करूनही अभिनेत्री संध्या यांनी आपलं नाव चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कोरून ठेवलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, नजरांचे कटाक्ष, मानेची विशिष्ट हालचाल आणि त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण नृत्य या गोष्टी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या. अनेक दिग्गज अभिनेत्रींच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चं वेगळेपण जपलं. ४ ऑक्टोबरला संध्या यांचं निधन झालं. त्यांच्या बहारदार कारकीर्दीच्या आता आठवणी उरल्या आहेत.
संध्या गेल्या’ ही बातमी कानावर पडली आणि नाही म्हटलं तरी त्यांनी साकारलेल्या हिंदी-मराठी चित्रपटातील भूमिका डोळ्यासमोर येऊ लागल्या. त्यांच्या अभिनयाची एक वेगळी खासियत होती. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका गाजल्या या विशेषकरून त्यांच्या नृत्यामुळेच हे कोणीही नाकारू शकत नाही. प्रत्येक चित्रपटातील त्यांचे हावभाव जरी तेच तेच वाटले तरीही त्यांच्या भूमिका हिट झाल्या. मी तर म्हणेन की त्याकाळी त्यांच्या व्यक्तिरेखांचे त्यांनी केलेले कोरीव काम प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहे. त्यांचे एकाचवेळी तरुण-तरुणीच्या रूपात सादर झालेले नृत्य त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम नृत्य आहे. मध्यंतरीच्या काळात त्या कुठल्याही समारंभात दिसल्या नाहीत. पण त्यांची उणीव भासत होती. त्यांनी सादर केलेली नृत्य आजही अनेक समारंभांमध्ये, मग तो वाहिनीचा सोहळा असो की चित्रपट सोहळा असो, सादर होत होती. शाळेतल्या गॅदरिंगमध्ये तर ती नेहमीच होत असतात.
काही वर्षांपूर्वी संध्या या एका सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या होत्या. त्यावेळी त्यांचे नृत्य सादर झाले होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अनेक प्रेक्षकांनी टिपलेले होते. ज्या कलाकाराने ते नृत्य सादर केले होते तिची संध्या यांनी पाठ थोपटलेली होती.
संध्या यांचं नाव विजया देशमुख. त्या जेव्हा आपली मोठी बहीण वत्सला देशमुख यांच्याबरोबर चित्रपट क्षेत्रात आल्या तेव्हा त्यांना वाटलेसुद्धा नसेल की हिंदी-मराठी दोन्ही सृष्टीत आपले नाव गाजणार आहे. कारण हिरॉईन होण्यासारखा त्यांचा चेहरा नव्हता. अभिनयाचा वारसा नव्हता. एका बॅक स्टेज करणाऱ्या रंगमंच कामगाराची ती मुलगी. रंगमंचावर त्या सुरुवातीला छोट्या छोट्या भूमिका करायच्या. पण म्हणतात ना नियतीने प्रत्येकाचे नशीब लिहून ठेवलेले असते. तसेच संध्या यांच्याबाबत झालेलं असावं.
अमर भूपाळीमधून पदार्पण
४६ वर्षांच्या कारकीर्दीत फक्त १४ सिनेमा करून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपलं नाव कोरलं. त्याकाळी व्ही. शांताराम ‘अमर भूपाळी’ या सिनेमाची जुळवाजुळव करीत होते. त्यांना त्या चित्रपटासाठी चांगल्या चेहऱ्याची अभिनय कुशल तरुणी हवी होती. ती जाहिरात वत्सला देशमुख यांच्या वाचनात आली. त्यांनी ऑडिशनसाठी संध्याला म्हणजेच विजयाला पाठवलं. व्ही. शांताराम यांनी तिची स्क्रीन टेस्ट घेतली. थोड्याफार प्रमाणात ते नाराज झाले. पण त्यांना तिचे हावभाव, आवाज आवडला. मात्र चेहरा हिरॉईनच्या भूमिकांना साजेसा नसल्यामुळे त्यांनी आधी होकार दिला नाही. त्यांनी त्यानंतर काही प्रमुख अभिनेत्रींच्या सुद्धा टेस्ट घेतल्या. पण व्ही. शांताराम आणि संध्या यांचं जन्मजन्माचं नातं होणार होतं. नियतीचा तो एक प्रकारचा संकेत असावा. त्यांनी ‘अमर भूपाळी’ या चित्रपटासाठी विजया देशमुख हे नाव पक्कं केलं. विजया हे नाव त्यांना आवडलं नाही. त्यांनी तिच्या नावाचं बारसं केलं ते संध्या म्हणून. १९५१ साली ‘अमर भूपाळी’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट तुफान गाजला. संध्याला हिरॉईन म्हणून एक ओळख मिळाली. चेहरा मिळाला. दुसरीकडे व्ही. शांताराम यांना एक फ्रेश चेहरा मिळाला होता.
आंधळ्या प्रेमाची सुरुवात
१९५२ साली संध्याचा ‘परछाई’ हा चित्रपट आला. या चित्रपटादरम्यान व्ही. शांताराम आणि संध्या यांच्या प्रेमाची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू झाली. संध्याचे व्ही. शांताराम यांच्यावर प्रेम जडले. १९५६ साली ती दोघं विवाहबंधनात अडकली. व्ही. शांताराम यांचा हा तिसरा विवाह होता. प्रेम आंधळं असतं, याचंच हे उदाहरण होतं.
चित्रपटासाठी नृत्याची तालीम
व्ही. शांताराम यांना ‘झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट बनवायचा होता. त्यासाठी त्यांना त्या वेळची लोकप्रिय अभिनेत्री वैजंतीमाला हवी होती. पण लो बजेट चित्रपट असल्यामुळे तिनं तो नाकारला. शेवटी संध्यालाच घेण्याचं त्यांनी ठरवलं. त्या चित्रपटात नृत्य हा महत्त्वाचा घटक होता. संध्याला नृत्य येत नव्हतं. या चित्रपटासाठी महान नृत्य दिग्दर्शक गोपीकृष्ण यांना त्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून निवडलं. संध्या यांनी नृत्याची अठरा-अठरा तास तालीम करून व्ही. शांताराम यांना दाखवून दिलं की चित्रपटासाठी आणि त्यातील व्यक्तिरेखेसाठी आपण हवी तितकी मेहनत घेऊ शकतो. व्ही. शांताराम सुद्धा ते पाहून चकित झाले. संध्या नृत्यनिपुण झाली. गोपीकृष्ण यांना तिनं आपलं गुरू मानलं. गुरू-शिष्या हे नातं त्या दोघांनी जपलं. ‘झनक झनक पायल बाजे’ सुपर हिट झाला.
ये तो नवरंग है
दरम्यानच्या काळात व्ही. शांताराम यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करण्याचं ठरलं. ऑपरेशननंतर त्यांना दृष्टी येईल की नाही, याबद्दल डॉक्टर साशंक होते. त्यांची शुश्रूषा करण्यासाठी नर्स ठेवावी, असं सगळ्या जवळच्यांना वाटत होतं. पण संध्याने विरोध दर्शविला. तिनं व्ही. शांताराम यांची खोली रंगबेरंगी फुलांनी सजविली. जमिनीवर विविध रंगांच्या रांगोळ्या काढल्या गेल्या. ऑपरेशननंतर ज्यावेळी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढली गेली आणि त्यांनी फुलांनी सजवलेली खोली आणि विविध रंगांनी भरलेल्या रांगोळ्या पाहिल्या तेव्हा ‘ये तो नवरंग है’ हे शब्द त्यांच्या तोंडून उमटले. आपल्या आगामी चित्रपटाचं नाव त्यांनी ‘नवरंग’ ठेवलं. त्यात संध्याला शकुंतला ही व्यक्तिरेखा साकारायची होती. त्यात तिची सिंहाबरोबर दृश्य होती. तिने सिंहाशी दोस्ती करून ते चित्रीकरण केलं. तिच्या त्या धाडसाला सर्वांनीच दादही दिली.
पिंजराचं अभूतपूर्व यश
एव्हाना मराठी चित्रपटात तर ती आली होतीच. ‘पिंजरा’ हा तिच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड. डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याबरोबर भूमिका करताना ‘हम भी कुछ कम नहीं’ हे तिने दाखवून दिलं. त्या दोघांच्या अभिनयाची केमिस्ट्री इतकी जुळली की ‘पिंजरा’ हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला.
संध्याला हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या इतर निर्मात्यांकडून चित्रपटाच्या ऑफर आल्या. पण तिनं त्या नाकारल्या. व्ही. शांताराम यांच्याबरोबरच भूमिका आणि चित्रपट करणार हे तिनं सर्वांना ठासून सांगितलं. अशा या अभिनेत्रीने त्यांना शेवटपर्यंत साथ दिली.
या चतुरस्र अभिनेत्रीला सलाम.
तिला निरोप देताना आज हे शब्द आठवत आहेत, “ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम, हसते हुए निकले दम...”
ज्येष्ठ सिने-नाट्य समीक्षक