दुसरी बाजू
प्रकाश सावंत
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या सहा दशकांपासून मराठी अस्मिता जपत हिंदुत्वाचा बुलंद नारा देणारी शिवसेना आज पुरती दुभंगली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा षण्मुखानंदमधील तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गोरगावातील शिवसेनेचा मेळावा व त्यातील आव्हाने-प्रतिआव्हाने पाहता, दोन्ही शिवसेनेतील सत्तासंघर्ष तीव्र होऊन त्यांच्या अस्तित्त्वाची लढाई सुरू झाली आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला गेल्यानंतर नोकरी, व्यापार आणि उद्योगधंद्यात मराठी माणसाची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी एका धगधगत्या आणि आक्रमक आवाजाची गरज होती. ती गरज ओळखून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' ही या संघटनेची मूळ ताकद होती. त्यामुळेच मराठी माणसांना सत्तरीच्या दशकात नोकरीधंद्यात स्वाभिमान आणि रुबाब मिळाला. मात्र, शिवसेनेच्या हीरकमहोत्सवी वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मराठी माणसाला राजा बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या या संघटनेचे आजचे नेते स्वतःच्याच सिंहासनासाठी आणि सत्तेच्या तुकड्यासाठी परस्परांचे जाहीर वाभाडे काढण्यात मग्न आहेत. दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यांमधून त्याचीच झलक पाहायला मिळाली आहे.
सत्तेच्या मोहापायी आणि बदलत्या समीकरणांमुळे शिवसेनेने आपल्या मूळ तत्त्वांना वेळोवेळी मुरड घातली. कधी काँग्रेस व मुस्लीम लीगशी सोयरीक झाली, तर कधी भाजपासोबत ‘गर्व से कहो...’ चा नारा दिला गेला. या राजकीय प्रवासात मुंबईतील मूळ भूमिपुत्र असलेला मराठी माणूस मात्र उपेक्षितच राहिला. नव्वदीच्या दशकात गिरण्यांच्या जमिनींवर टोलेजंग इमारती आणि मॉल्स उभे राहिले, भूमाफियांचे साम्राज्य वाढले आणि वाढत्या खर्चामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर नालासोपारा, कल्याण-डोंबिवली किंवा थेट टिटवाळ्याच्या पलीकडे फेकला गेला. त्याची जागा परप्रांतीयांनी घेतली. आता मुंबईत चणे, पानीपुरीच्या विक्रेत्यांपासून रिक्षा-टॅक्सीपर्यंतच्या व्यवसायिकांपर्यंत बहुसंख्य ठिकाणी आता परप्रांतीयांची मक्तेदारी निर्माण झाली असून आर्थिक नाड्या त्यांच्याच ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळेच मराठी माणसाला स्वतःच्याच राजधानीत उपरे होऊन आपली संस्कृती, भाषा टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
या साऱ्या अधोगतीला आणि मराठी माणसाच्या पराभवाला कारणीभूत आहे ती मराठी नेत्यांमधील फूट. भूतकाळात छगन भुजबळ किंवा नारायण राणे यांनी पक्ष सोडला तेव्हा पक्षाला खिंडार पडले होते, पण अलीकडे आपले आर्थिक साम्राज्य वाचवण्यासाठी किंवा चौकशांचा ससेमिरा टाळण्यासाठी शिवसेना पक्षाचीच शकले उडविण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अदृश्य महाशक्तीच्या सहकार्याने पक्षाचे नाव, चिन्ह आणि बहुतांश लोकप्रतिनिधी आपल्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे दोन्ही शिवसेनेतील सत्तासंघर्ष तीव्र झाला असून त्यात 'ऑपरेशन तुडवा'सारख्या राड्यात डोकी फुटणार आहेत ती केवळ सामान्य मराठी कार्यकर्त्यांचीच. मारणारे आणि मार खाणारे दोघेही मराठीच असतील आणि या हाणामारीकडे पाहून दिल्लीश्वर महाशक्ती मनातल्या मनात हसत राहील, हेच आजचे सूडबुद्धीच्या राजकारणाचे अमानूष वास्तव आहे.
आज देशाची आणि राज्याची परिस्थिती कमालीची चिंताजनक आहे. बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली असून निवडणुकांमध्ये काळ्या पैशाची मुक्त उधळण होत आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि निवडणूक आयोग यांसारख्या स्वायत्त संस्थांचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे प्रयोग उघडपणे सुरू आहेत. 'लाडकी बहीण' आणि तत्सम गोंडस योजनांच्या नावाखाली सरकारी तिजोरीची लूट सुरू असून राज्याला कर्जाच्या खाईत लोटले जात आहे. या मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जातीयवाद, धर्मवाद आणि प्रांतवादाला जाणीवपूर्वक खतपाणी घातले जात आहे. सामान्यांच्या हाताला काम देण्याऐवजी त्यांना जातीय, धार्मिक व प्रांतिक अस्मितेच्या भावनिक राजकारणात गुंतवून ठेवणे हाच हुकूमशाहीचा नवा अजेंडा बनला आहे. राजकारण आता केवळ एक धंदा झाला असून त्यात साधनशुचिता आणि नैतिकतेला काडीचीही किंमत राहिलेली नाही. मतदारांना गृहित धरून त्यांनी निवडून दिलेले आमदार, खासदार फोडणे व त्यांची फसवणूक करणे हाच सध्याचा राजधर्म झाला आहे.
शिवसेनेच्या षण्मुखानंदमधील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भावनिक आणि आक्रमक भूमिका ही विखुरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य फुंकण्यासाठी आणि सहानुभूतीचे मतात रुपांतर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पक्ष संकटात असताना थेट जनतेला साद घालणे ही त्यांची मजबुरी आणि रणनीती दोन्ही आहे. मात्र, त्यांना केवळ बाळासाहेबांच्या नावाच्या पुण्याईवर फार काळ राजकारण करता येणार नाही. सलग दोन मोठ्या बंडांमध्ये जर पक्षाचे तीन चतुर्थांश लोकप्रतिनिधी साथ सोडून जात असतील, तर मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी बंद राहणे आणि पक्ष मोजक्याच सल्लागारांच्या कोंडाळ्यात अडकणे, हेच या पडझडीचे कारण असल्याचे सांगण्यात येत असेल तर ते काही चुकीचे म्हणता येणार नाही. त्यामुळेच आगामी काळात मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावरील पकड अधिक मजबूत करण्यासाठी ठाकरे यांना आपल्या दरबारी राजकारणाला तिलांजली देऊन लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. शाखाशाखांना कार्यक्रम द्यावे लागतील. तसेच, सोबत समविचारी पक्षांनाही घ्यावे लागेल. असाच पक्ष सातत्याने कमकुवत होत राहिला, तर मनाने खचलेले कार्यकर्तेही दूर जायला फारसा वेळ लागणार नाही. माझ्यावर कुणी आरोप करणार असेल तर त्याला शिवसैनिकांनी उत्तर द्यायचे आहे. मला नेतृत्वाची हाव नाही. मी पद सोडायला तयार आहे, असे सांगून अथवा ‘ऑपरेशन कमळा’च्या केवळ वल्गना करून चालणार नाहीत, तर ते न बोलता ‘करून दाखवावे’ लागेल.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अत्यंत व्यावहारिक आणि आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, असा दावा करत त्यांनी स्वतःला 'खरी शिवसेना' म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे यांच्याकडे सध्या सत्ता, पक्ष, चिन्ह आणि अफाट पैसा असला, तरी जनमानसात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना केवळ शासकीय घोषणा आणि मोफतच्या योजनांवर अवलंबून राहून चालणार नाही. कारण, सत्ता व पैशाच्या बळावर केलेली नगरसेवक, आमदार, खासदारांची फोडाफोडी महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला रुचलेली नाही. तेव्हा जनतेला फोडाफोडीच्या राजकारणाचा ‘ट्रेलर’ही नको व पुढचा पिक्चरही नको आहे.
लोकशाहीत राजकीय पक्षांची चोरी, नेत्यांची फुटाफूट किंवा तात्कालिक सत्तेची समीकरणे ही काही काळासाठी फायद्याची ठरू शकतात, परंतु दीर्घकालीन राजकारणात जनतेचा कौल हाच अंतिम असतो. ठाकरे यांच्या पाठीशी असलेली भावनिक सहानुभूती आणि शिंदे यांच्या पाठीशी असलेली सत्ता, पैसा व प्रशासकीय पकड या दोन्ही शक्तींचा थेट सामना जेव्हा आगामी निवडणुकीच्या रिंगणात होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने 'शिवसेनेचा वाघ' कोण आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा खरा नेता कोण, याचा अंतिम फैसला होईल. तोपर्यंत, या दोन्ही शिवसेनेमधील विसंवाद आणि संघर्ष महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला एका अत्यंत वेगळ्या आणि अनपेक्षित वळणावर घेऊन जाणारा ठरेल.
prakashrsawant@gmail.com