जगतवारी
मेधा आलकरी
लहानपणीच्या परीकथांतील उडत्या गालिच्याची जादू विसरून गेलो असू; पण पाण्यावर तरंगणाऱ्या घरांची ही खरी गोष्ट त्या कल्पनेलाही मागे टाकते. पेरूच्या टीटीकाका सरोवरावर उरूस जमातीने उभारलेलं हे तरंगतं विश्व म्हणजे मानवी कल्पकतेचा चमत्कारच.
'अल्लाउद्दीन आणि त्याचा उडता गालिचा’ ही माझ्या लहानपणीच्या गोष्टींमधली लाडकी कथा. समजा अल्लाउद्दीननं तो गालिचा हळूच एखाद्या तलावावर उतरवला आणि त्यावरच घर बांधायचं ठरवलं तर? माझ्या कल्पनेतली ही रम्यकथा मी दक्षिण पेरूमधील पुनो या शहरापासून जवळ असलेल्या टीटीकाका नावाच्या विशाल सरोवरावर जिवंत झालेली पाहिली. या टीटीकाका तलावात वेळूच्या तरंगत्या तराफ्यांवर आपली घरं बांधून उरूस नावाची एक जमात वर्षानुवर्षं त्याच पारंपरिक पद्धतीनं आपलं आयुष्य जगत आहे.
आपल्या जमातीच्या जन्माबद्दल त्यांच्याकडे एक आख्यायिका सांगितली जाते. सूर्याच्याही आधी पृथ्वीवर जन्मलेला पहिला मानव हा म्हणे उरूस जमातीचा होता. त्यांच्या रक्ताचा रंग लाल नसून काळा होता. ते काळं रक्त त्यांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण देत असे. ईश्वरानं त्यांना काही अमानवी शक्ती बहाल केल्या होत्या. कडाडणाऱ्या विजेपासून अभयदान आणि बुडून मृत्यू न पावण्याचं वरदान त्यांना मिळालं होतं. इतर जमातींशी संबंध आल्यामुळे या शक्तींचा म्हणे ऱ्हास झाला. ती आख्यायिका ऐकताना मनातल्या मनात हसू फुटत असलं, तरी मला त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटली. आता हेच बघा ना ! त्यांना शेजाऱ्यांनी हुसकून लावलं. अगदी कौरवी थाटात ‘सुईच्या टोकावर राहील इतकी जमीनही मिळणार नाही’ असं बजावलं. भांडणतंटा न करता त्यांनी पाण्यावरच ‘जमीन’ उभी केली आणि टीटीकाका तलावावर तरंगणारे वेळूचे तराफे तयार करून त्यावर आपलं घरकुल उभारलं.
टीटीकाका तलावात उथळ पाण्यावर ‘टोटोरा’ नावाचं गवत उगवतं. त्या तरंगत्या गवताचा गुणधर्म ओळखून त्यांनी त्याचे तराफे बनवून त्यावर आपली घरं शाकारली आणि अतिशय कल्पकतेनं ही तरंगती बेटं उभारली. शत्रूची चाहूल लागताच नांगरलेले दोर कापून हे तराफेच ते तलावात दूरवर वेगाने वल्हवत नेत. आता मात्र शत्रूची भीती नसल्यामुळे हे तराफे लांब काठ्यांच्या साहाय्याने बंदराजवळच्या उथळ पाण्यात नांगरून ठेवलेले आहेत.
अँडीस पर्वतराजींच्या कुशीत शांत पहुडलेल्या टीटीकाका सरोवराचं चमचमतं पाणी कापत आमची बोट पुनो बंदरातून निघाली आणि अर्ध्या तासाच्या आतच आम्ही या तरंगत्या बेटांजवळ येऊन पोहोचलो. पाण्यावर हेलकावे खात बोट उभी राहिली. त्यातील एका बेटावरील कुटुंबाने आमच्या गटाचं यजमानत्व पत्करलं होतं. दुतर्फा रांगेत उभं राहून, टाळ्या वाजवत आणि स्वागतगीत गात पारंपरिक वेशातील हे कुटुंब आमच्या स्वागतासाठी काठाशी जमा झालं. त्या डचमळणाऱ्या बोटीतून ‘जमिनीवर’ उतरण्यासाठी त्यातील एका माणसाने मला मदतीचा हात दिला. वेळूचे थर असलेल्या त्या बेटावरून चालताना वाटत होतं जणू आपण एका मोठ्या कापसाच्या उशीवरून चालत आहोत. सोनेरी वेळूच्या त्या गालिच्यात पाऊल दोन तीन सेंटीमीटर तरी आत रुतत होतं.
डुलत डुलत, तोल सांभाळत आम्ही बेटाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत येऊन पोहोचलो. तिथे तीन बाजूंना वाळलेल्या वेळूची घट्ट आवळून बांधलेली लांब वळकटी बसण्यासाठी ठेवली होती. आम्ही लगोलग त्यावर बसकण मारली. त्या बेटाची प्रमुख एक मध्यमवयीन स्त्री होती. तिनं आणि तिच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आमचं स्वागत केलं. थोडं स्पॅनिश(स्पेनची कॉलनी असल्यामुळे पेरू देशाची अधिकृत भाषा), आणि थोडं ‘आयमरा’ या स्थानिक भाषेत बोलत तिने आमच्याशी संवाद साधला. उरूस जमातीचा इतिहास ती अतिशय खुमासदार पद्धतीनं सांगत होती. तिचा हसरा चेहरा, तिचे हावभाव तिच्या विनोदी स्वभावाची साक्ष देत होते. आम्हाला दोन्ही भाषांचा गंध नव्हता; पण सरावलेला गाईड त्याचं त्वरित भाषांतर तितक्याच विनोदी शैलीत करत असल्यामुळे आमच्या हास्याची दाद तिच्यापर्यंत लगेच पोहोचत होती. या तरंगत्या वेळूच्या बेटांची निर्मिती शास्त्रोक्त पद्धतीने कशी होते, ही बेटं किती दिवस टिकतात, भर कशी घालावी लागते हे तिनं अथपासून इतिपर्यंत आम्हाला समजावून सांगितलं. त्याचवेळी तिचा नवरा आम्हाला त्याचं प्रात्यक्षिक दाखवत होता.
साधारण फेब्रुवारी महिन्याच्या आसपास टोटोरा वेळूच्या मुळांची, एकमेकांत गुंतलेली मोठाली ढेकळं पाण्यावर तरंगतात. त्यांना ते ‘खिली’ म्हणतात. ही मुळं सच्छिद्र असल्यामुळे त्यांच्यात तरंगण्याची शक्ती असते. ही ढेकळं करवतीने कापून त्याचे आयताकृती ठोकळे बनवतात. त्यांना दोरखंडानं करकचून बांधल्यानंतर निमुळत्या टोकाची निलगिरीची काठी त्यात खोवतात. साधारण पुरुषभर उंचीचा हा तराफा घरकुलाच्या पायाची जबाबदारी उचलतो. त्याच्या शिरावर आता वेळूचे उभे आडवे थर टाकतात. हा एकत्रित थर साधारण तीन फुटांपर्यंत पोहोचला की मग त्यावर छोटेखानी घरकुलं बांधली जातात
टोटोरा वेळू म्हणजे उरूस जमातीचं सबकुछ ! तराफा वेळूचा, घरंही त्याचीच, टोप्या, बास्केट, खेळणी इतकंच नव्हे तर मासेमारीसाठी तलावात वल्हवत न्यायच्या नावाही वेळूच्याच! अन्न शिजवण्यासाठी वेळूचं सरपण पाहून मी जरा चक्रावलेच. तराफ्यावरील वाळका वेळू पेट कसा नाही घेत? त्याचं कारण असं की त्यांची चूल असते टोटोरा मुळांच्या दाट ढेकळावर. ताज्या हिरव्या टोटोराच्या मुळाकडचा भाग ही उरूस मंडळी केळ्यासारखा सोलून खातात. पाण्यातून उपटला, सोलला आणि आतला पांढरा गर मटकावला. चव पाहावी म्हणून मी एक तुकडा तोडून तोंडात घातला. केळ्यासारख्या मधुर चवीऐवजी कच्च्या बटाट्यासारखी तुरट चव लागल्याने भ्रमनिरास झाला. यात आयोडीनची मात्रा भरपूर असते. टोटोरा वेळूत इतरही औषधी गुण आहेत. त्याची पिवळी फुलं पाण्यात उकळून केलेला काढा पचनशक्ती वाढवतो. शरीराच्या दुखऱ्या भागाला टोटोराची मलमपट्टी म्हणजे रामबाण उपाय !
या बेटांच्या कडेनं, वेळू आवळून, घट्ट बांधून बनवलेल्या अतिशय आकर्षक दिसणाऱ्या नौका तरंगत होत्या. काहींना पुढच्या बाजूस प्राण्यांची मुखं होती. वाळलेल्या वेळूची ही ‘बाल्सा’ नामक नौका बनवण्यात आठ- दहा माणसांचा पूर्ण दिवस खर्ची पडतो. मात्र त्या नौका अल्पायुषी ! फारतर महिनाभर टिकतात. सतत पाण्यावर तरंगत राहिल्यामुळे तळाकडचा वेळू कुजतो. पंधरा वीस मिनिटांच्या या नौकाविहारात उरूस नावाड्याने आम्हाला तलावावर तरंगणारा ताजा हिरवा टोटोरा कसा कापायचा त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. लांबलचक काठीला टोकाशी कोयता बांधून एका झटक्यात तो गवताचा भारा आपल्याकडे ओढणं हे खरं कसबच! दिसतं त्यापेक्षा कठीण. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला. गवताच्या एका बारीकश्या काडीलाही माझ्यामागे येण्यात काही स्वारस्य नव्हतं. टोटोराचा तो कापलेला भारा मग नावेमागे ओढत आणावा लागतो. जणू मोराचा मिटलेला डौलदार पिसारा! ही नाव म्हणजे त्यांची जीवनवाहिनी. तिच्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. टोटोरा आणण्यासाठी, मासेमारीसाठी, पक्षांच्या शिकारीसाठी, आणि पुनो बंदरापर्यंत जाण्यासाठी ही प्रियदर्शनी बरोबर हवीच. ‘घर पान्यामंदी बंदराला करतोय ये जा ….’
वेळूचे थर जसे बेटावर, तसे कपड्यांचे थर या लोकांच्या अंगावर ! थंडी वाऱ्याबरोबर इथे उन्हापासूनही संरक्षण आवश्यक आहे. उंचीवरील ऊन प्रखर असतं. अंग भाजून काढतं. बायका केसांच्या दोन वेण्या घालतात आणि त्याला रंगीबेरंगी गोंडे लावतात. डोक्यावर वेळूचीच हॅट असते. चटकदार रंगाचे लांब आणि घेरदार स्कर्ट आणि त्यावर फिक्कट रंगाचे ब्लाउज असते. थंडीने उलून लाल झालेल्या गोबऱ्या गालांची आणि शेंबड्या नाकाची त्यांची मुलं कपड्यांच्या वेष्टनात गुंडाळलेली असतात. कान झाकणाऱ्या त्यांच्या लोकरी टोप्या ही पेरूची खासियत. बेटावर दुडूदुडू धावणाऱ्या या मुलांच्या शिक्षणाचं काय? हा प्रश्न माझ्या मनात डोकावून गेला. गाईडने सांगितलं की या बेचाळीस उरूस बेटांपैकी काही ऐसपैस बेटं ही प्राथमिक शाळेसाठी राखीव आहेत. मुलांना नावेतून शाळेत पोहोचवलं जातं. नाव म्हणजे त्यांची ‘स्कूलबोट’ म्हणा ना ! माध्यमिक शाळांपासून पुढील शिक्षण घेण्यासाठी मात्र त्यांना पुनो शहरात जावं लागतं.
या उरूस जमातीचे दोन हजार वंशज हयात आहेत. परंतु सगळेच काही अशा पारंपरिक पद्धतीने राहत नाहीत. शिक्षणामुळे त्यांची क्षितिजं विस्तारली आहेत. स्वप्नं मोठी झाली आहेत. संस्कृती , जीवनराहणी बदलली आहे. अनेक तरुण-तरुणी राजधानी लिमामध्ये नोकरीधंद्यात आहेत. जे बेटावर उरले आहेत त्यांची आवक पर्यटनामुळे वाढली आहे हे खरं असलं, तरी पर्यटकांसमोर हे सादरीकरण करण्यात त्यांचा बराच वेळ जातो आणि शक्तीही खर्च होते. दिवसाकाठी दोन तीन गटांना आपली संस्कृती, जीवनपद्धती दाखवणं या कामाचा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडतो. त्यांच्या रोजच्या दिनचर्येत यामुळे अडथळे येतात; परंतु हीच मिळकत त्यांना त्यांची संस्कृती टिकवून ठेवण्यास मदतही करते असं त्यांचं म्हणणं पडलं. त्यांना त्यांच्या या आगळ्या वेगळ्या संस्कृतीचा, या तरंगत्या बेटांवरील निवासाचा विलक्षण अभिमान आहे.
पूर्वीसारखं फक्त मासेमारी करून आपलं पोट भरायचं किंवा मोठ्या बाजारी ते विकायला न्यायचं, एवढ्याने शिक्षणासारखे वाढते खर्च भागत नाहीत याची त्यांना कल्पना आहे. पोषक आहार, मुबलक फळफळावळ यासाठी पर्यटनामधून मिळणारी ही वाढीव मिळकत त्यांना महत्त्वाची वाटते. त्यांच्या भरतकामाचे आणि हस्तकलेचे नमुने असलेला एक बाजार त्या बेटावरील कोपऱ्यात भरतो. त्यातील एखाद दोन वस्तू विकत घेऊन आपण त्यांच्या मिळकतीस हातभार लावू शकतो.
बेटावरील ती प्रमुख स्त्री मला अगदी अगत्याने तिचं घर दाखवायला घेऊन गेली. एकच खोली असलेल्या त्या घराची जमीन लाकडी फळ्या ठोकून मजबूत केली होती. त्यावर एक टोलेजंग पलंग होता. पलंगावर भरतकाम केलेला पलंगपोस आणि जाडजूड अशा गोधड्या होत्या. आणि आश्चर्य म्हणजे चक्क टीव्ही आणि टेपरेकॉर्डरही होता. वीज कशी आणि कुठून येते इथे ? अशा माझ्या प्रश्नार्थक हातवाऱ्यांना तिने एका बोटाने उत्तर दिलं. मी त्या दिशेने पाहिलं तर तिथे दिमाखात उभा असलेला सोलर पॅनल दिसला. आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा किती सुंदर मेळ !
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com