प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
आजच्या फूड कल्चरमध्ये मेन्यू, रेटिंग आणि रिव्ह्यू महत्त्वाचे असतात; पण आमच्या काळात एखाद्या पदार्थाची चव आणि त्यामागची आठवणच त्याला खास बनवायची. काही चवी आजही जिभेवर रेंगाळतात, तर काही उपाहारगृहं मनात कायमची घर करून बसली आहेत.
आज उपाहारगृहात जाणं फारसं विशेष वाटत नाही; पण माझ्या लहानपणी, म्हणजे १९६५-६६ मध्ये, उपाहारगृहात जाणं तसं विशेषच होतं. सर्वसामान्य घरातील कुणी जेवायला, म्हणजे आजच्या भाषेत लंच अथवा डिनरला जात नसे. महिन्या-दोन महिन्यांतून एकदा जाणं व्हायचं, तेही अल्पोपाहारासाठी. मला मात्र आमचे तात्या अधूनमधून उपाहारगृहात घेऊन जायचे.
दादरमध्ये माझ्या आवडीची दोन उपाहारगृहं होती. त्यातलं एक उडिपी होतं. दादर कोहिनूर चित्रपटगृहाकडून थोडं पुढे येऊन रस्ता ओलांडला की डाव्या हाताला होतं ते. नाव मात्र आज अजिबात आठवत नाही. दुसरं दादरमधलं पणशीकर उपाहारगृह.
पहिल्या उडिपी उपाहारगृहात माझी आवडती डिश असायची साधा डोसा. कुरकुरीत, क्रिस्पी डोसा आणि चविष्ट सांबार. सोबत नारळाची, कडीपत्ता-मोहरीचा तडका दिलेली चटणी. डिश समोर येताच माझे डोळे चमकायचे. मग मात्र मी आणि तो... तो म्हणजे डोसा, इतकंच उरायचं!
पणशीकरांकडे गेल्यावर बटाटावडा, दुधी हलवा आणि पियूष. अस्सल मराठी चवीचा बटाटावडा लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांनी डवरलेला आणि बेसनाच्या पातळ आवरणात खरपूस तळलेला असायचा. आत शिरताच त्याच्या खमंग स्वादाने भूक खवळायची. सोबत लसणाची चटणी. समोर येताच चमचे वगैरे बाजूला ठेवायचे आणि वड्याला हातात घेऊन मस्त चव घेत रिचवायचा. वडापाव नावाची युती तोपर्यंत अस्तित्वात आलेली नव्हती.
वडा रिचवला की दुधी हलवा. ही पणशीकरांची खासियत होती. फक्त साखर, खवा, चारोळी आणि वेलचीपूड यांसह बनणारा हा पदार्थ समोर आला आणि त्याचा पहिला घास मुखात गेला की जो आनंद मिळायचा, तो शब्दांत काय सांगावा? लवकर संपेल म्हणून लहान घास घेत मी त्याला गट्टम करायचो. आजकाल काजू, बदाम, पिस्ते यांच्या थराखाली झाकोळून गेलेल्या दुधी हलव्याबद्दल न बोललेलंच बरं. दुधी हलव्यानंतर पोटात जागा असेल तर पियूष!
त्या उडिपी उपाहारगृहाच्या कोपऱ्यावर कांदा-बटाटा भजी मिळण्याचं दुकान होतं. संध्याकाळी त्या दुकानाकडे दुर्लक्ष करून पुढे जाणं खरंच अशक्य व्हायचं. तात्या कधीतरी ऑफिसमधून येताना मिक्स भज्यांचा पुडा आणायचे. खमंग वासाने रसना उद्दीपित व्हायची. कांदाभजी तर अप्रतिम असायची. आज मुलं मित्रांसोबत जाऊन त्यांना हवं ते खातात. तशी मोकळीक आमच्या लहानपणी नव्हती आणि खिसेही मोकळेच असायचे.
पुढे आम्ही ठाण्याला राहायला गेलो. शालेय शिक्षण संपून कॉलेजमध्ये दाखल झालो. खिशात २०-२५ रुपये म्हणजे चंगळ वाटायची. स्टेशनजवळ छाया स्वीट्स नावाचं मिठाईचं दुकान होतं. त्याच्या अर्ध्या भागात उपाहारगृह होतं. तिथे मिसळ फारच चविष्ट मिळायची. झणझणीत नसली तरी चमचमीत मात्र असायची.
नोकरीला लागल्यानंतर मित्रमंडळी संध्याकाळी तलावपाळीच्या जवळ असलेल्या ताठे उपाहारगृहात भेटायचो. कटिंग चहा किंवा अधूनमधून कांदाभजी. तीही सदस्य जितके असतील त्याच्या निम्म्या प्लेट्स ऑर्डर केल्या जायच्या. शाळेपासूनचा एक मित्र होता. त्याच्याकडे तेव्हाही खिशात पैसे असायचे आणि बहुधा आमच्या दोघांचं बिल तोच भरायचा. आमचं ठरलेलं उपाहारगृह होतं, वसंत. तिथे टोमॅटोवडा मिळायचा. आम्हा दोघांचीही ती आवडती डिश होती.
रात्री चित्रपटाचा शो पाहून घरी न जाता हायवेला लागून असलेल्या भुर्जीपावच्या गाडीवर धडकायचो. त्या तरुण मुलाने बनवलेली भुर्जी अप्रतिम असायची. छोट्या अल्युमिनियमच्या थाळीत भुर्जी आणि सोबत तव्यावर गरम केलेले दोन पाव. पहिला घास तोंडात जाताच जीभ खवळायची. अहाहा! स्वच्छता, मिनरल वॉटर हे सगळे सोपस्कार गुंडाळून ठेवायचे.
ठाण्याच्या तलावपाळीभोवती रात्री पावभाजीच्या गाड्या लागायच्या. तेव्हा हा पदार्थ हॉटेलमध्ये उपलब्ध झालेला नव्हता. भाजी चहाच्या बशीमध्ये, सोबत मस्क्यात भाजलेले दोन पाव आणि टोमॅटो-कांदा कचुंबर. तेव्हा पाव मस्क्यामध्ये लिबलिबीत होईपर्यंत भाजले जात नव्हते. आज मस्का आणि चीजच्या अतिवापरामुळे पदार्थांची मूळ चवच मारली जाते.
ठाण्यात तांबे आहार भवनमध्ये साबुदाणा वडा, थालीपीठ, बटाटा पुरी, उपवासाची मिसळ असे पदार्थ मिळायचे. ऑफिसमधून परतताना आम्ही दोघं ठाणेकर मित्र एकेक डिश रिचवून मगच घरची वाट धरायचो. ठाण्यातली मामलेदार मिसळ तर सुप्रसिद्धच. ती फार तिखट असते हे कळल्यामुळे मी तिच्याकडे वळण्याचं धाडस केलं नव्हतं. एकदा मित्राने ओढून नेलं. त्याने अनुभवी गिऱ्हाईकाप्रमाणे ऑर्डर दिली, “दोन मीडियम मिसळ, बिगरबटाटा.” मिसळीत अर्धा उकडलेला बटाटा असतो. त्याने जागा अडवण्यामुळे मिसळ कमी होते, म्हणून बिगरबटाटा सांगायचं. समोर आलेली मिसळ मात्र चटकदार होती.
आईला हॉटेलमध्ये जेवण्याची विशेष आवड नव्हती. हॉटेलमध्ये जाण्याचा बेत ठरला की ती उत्सुक नसायची. याउलट तात्या अगदी आवडीने तयार असायचे. त्यांना नवनवीन डिश टेस्ट करायला आवडायचं. १९८९ मध्ये मी दहिसरला राहायला आलो. एव्हाना हॉटेल व्यवसाय उडिपी आणि पंजाबी व्यावसायिकांनी, तर भेळपुरी-शेवपुरीचा व्यवसाय उत्तर प्रदेशीयांनी व्यापून टाकला होता. मराठी पदार्थांची उपाहारगृहं बिचारी मान टाकत अधेमधे दिसत होती. दहिसरला मुलांच्या शाळेच्या उपाहारगृहात बटाटावडा अप्रतिम मिळायचा आणि आजही मिळतो. त्याचा गंध आला की पुढे पाऊल उचलत नसे.
पुढे कोकणचे मासे आणि माशांचे पदार्थ मिळणारी उपाहारगृहं उदयाला आली. दादरला सचिन, सिंधुदुर्ग, पार्ल्यात गजाली, बांद्र्याला सायबा, हायवे गोमांतक, गोरेगावचं सत्कार, बोरिवलीचं पंगत, कोकणप्रांत अशा ठिकाणी खवय्यांना मासे आणि तत्सम पदार्थांची चव मिळू लागली.
घरापासून ऑटोने पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंगत नावाचं सामिष पदार्थ मिळणारं उपाहारगृह आहे. ठराविक वारी तिथे प्रचंड गर्दी असते. आम्हीही अधूनमधून जातो. मी काय, फक्त नावाला अशा उपाहारगृहात जातो. कारण मी सामिष आहारप्रिय नाही आणि आता तर अजिबातच खात नाही. टेबल मिळाल्यावर इतर पदार्थांसोबत आम्ही एक व्हेज थाळी ऑर्डर करतो. वेटरला कळतं की या उपाहारगृहात येऊन शाकाहारी थाळी खाणारा थोर पुरुष कोण आहे ते! तोही माझ्याकडे कशाशा नजरेने पाहत जातो. बायको आणि लेक बांगडा फ्राय, सुरमईची आमटी, तिसऱ्या अशा सामुद्री अन्नाचा फडशा पाडत असतात. मी मात्र काळ्या वाटण्याची आमटी, भाजी, डाळ, भातुकलीच्या आकाराची श्रीखंडाची वाटी, पोळ्या किंवा वडे आणि क्वचित अळूवडी असा मेन्यू खालमानेने जेवत असतो. पण ठीक आहे, हिला एक दिवस स्वयंपाकापासून आराम मिळतो, इतकंच!
बोरिवली पश्चिमेला गिरगाव कट्टा नावाचं मराठी पदार्थ मिळणारं उपाहारगृह आहे. तिथे नाचणीची किंवा तांदळाची भाकरी, खमंग लसणाचा स्वाद येणारं पिठलं, झुणका, मिरचीचा ठेचा, दही असा मस्त मेन्यू मिळतो. शिवाय बटाटावडा, साबुदाणा वडा, मिसळ, कोथिंबीर वडी, खरवस, दुधी हलवा, पियूष असे चविष्ट पदार्थही असतात. तिकडे गेल्यावर पंगतमध्ये होणारा माझा अपमान मी यथेच्छ फेडून घेतो आणि वर पियूषच्या भैरवीसह जेवण संपवतो.
आपापल्या चवीने लक्षात राहिलेली ही उपाहारगृहं आणि टपऱ्या. कसं विसरायचं त्यांना आणि तिथल्या पदार्थांना? तुम्हीच सांगा!
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com