प्रासंगिक
सिरत सातपुते
बहुसंख्यांकवाद आणि धार्मिक ध्रुवीकरण यापासून ‘भारत’ या संकल्पनेचे रक्षण करायचे असेल तर पुन्हा एकदा गांधीजींनी सांगितलेल्या सर्वधर्मसमभावाच्या वाटेवरुन चालणे आवश्यक आहे. दोन ऑक्टेबरला गांधी जयंती साजरी करताना सलोख्याचे प्रदेश अधिक वृद्धिंगत व्हावेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
१४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री जेव्हा पंडित नेहरु नियतीशी केलेल्या कराराबाबत राष्ट्राला संबोधित करत होते, तेव्हा महात्मा गांधीजी बंगालमधील नौखाली येथे फाळणीमुळे उसळलेल्या दंगलीची आग विझवत होते. अहिंसात्मक मार्गाने सत्याग्रह करत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी स्वातंत्र्यप्राप्तीच्या जल्लोषात सामील न होता फाळणीमुळे भडकलेली द्वेषाची आग शमविण्यासाठी नौखालीच्या गल्लीबोळांत फिरत होते, द्वेषाच्या आगीने होरपळलेल्या जीवांवर प्रेमाची फुंकर घालत होते. द्वेषाने भडकलेल्यांना शांत करुन शांतता प्रस्थापित करत होते. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी जीवावर उदार होऊन लोकांचे मन वळवत होते. धार्मिक सलोखा जपत होते. गांधीजींच्या या प्रयत्नांना यश आले आणि फाळणीनंतरच्या दंगली थांबल्या. पण गांधीजींच्या या सलोख्याच्या या प्रयत्नांनी त्यांचाच बळी घेतला. स्वातंत्र्यप्रातीनंतर सहा महिन्यांच्या आतच कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या गोळ्यांना ते बळी पडले. परंतु ‘गांधी कधी मरत नसतात’ या उक्तीप्रमाणे गांधीजींचे विचार अजूनही जगाच्या पटलावर जिवंत आहेत.
महात्मा गांधी हे विचार आणि आचारात सुसंगतता असणारे व्यक्तिमत्व होते. धार्मिक व सांस्कृतिक विभिन्नता असणाऱ्या लोकांना साम्राज्यवादी शक्तींविरुध्द लढण्यासाठी अहिंसा व सत्याग्रहाचे अस्त्र देणारे गांधीजी स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या भारताचे स्वप्न पाहत राज्यघटनेच्या मजबूत चौकटीतून सामाजिक न्यायाची नीव घालतात. राष्ट्र उभारणीच्या कामात सांप्रदायिक सौहार्द आणि एकता या त्यांच्या जीवनाच्या आणि कार्याच्या निर्णायक पैलूंचा आग्रह धरतात. भारत ही संकल्पना जपण्यासाठी ते इतर सर्व गोष्टींमध्ये सांप्रदायिक एकतेला सर्वोच्च प्राधान्य देतात. महात्मा गांधी यांचा सांप्रदायिक सलोख्याचा विचार म्हणजेच ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. स्वातंत्र्योत्तर भारत कसा असावा याची संकल्पना मांडताना गांधीजी म्हणतात, "मला भारत पूर्णपणे हिंदू, पूर्णपणे मुस्लिम आणि पूर्णपणे ख्रिश्चन नको आहे, तर पूर्णपणे सहिष्णू असलेला व सर्व धर्मांचे सहअस्तित्व जपून त्यांना समृध्द करणारा असा भारत हवा आहे." गांधींजींनी सर्वधर्मसमभावाने समृध्द अशा सहिष्णू भारताचे स्वप्न पाहिले, त्यासाठी ते जगले व त्यासाठीच त्यांनी आपले बलिदान दिले.
महात्मा गांधींनी सांप्रदायिक सलोखा हा भारताच्या अखंडतेचा अपरिहार्य पाया मानला. सर्व धर्मांचा समान आदर, हिंदू-मुस्लिमांमधील हृदयाचे ऐक्य आणि धार्मिक विभाजनांच्या पलीकडे असलेली राष्ट्रीय ओळख यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी सर्व धर्मांच्या जन्मजात एकतेवर विश्वास ठेवला आणि सहिष्णुता, सद्भावना आणि शांततापूर्ण सहअस्तित्व वाढवण्यासाठी काम केले. सांप्रदायिक हिंसाचार रोखण्यासाठी आणि सर्व धार्मिक गटांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले. गांधीजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वामुळे काही प्रमाणात सांप्रदायिक हिंसाचार रोखता आला. त्यांच्या हत्येचा समाजमनावर मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे अशा सर्व हिंसाचाराचा अंत झाला. राष्ट्रनिर्माणाच्या कामाला त्यामुळे गती मिळाली.
परंतु, नव्वदीच्या दशकात, अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा सांप्रदायिक राजकारण पुन्हा एकदा उघड झाले. त्यानंतर देश सांप्रदायिक उन्मादात ढकलला गेला. आणि आता तर थेट सांप्रदायिक राजकारण करणारा एक उजवा पक्ष केंद्रात आणि देशातील बहुतेक राज्यांमध्ये पूर्ण बहुमतासह सत्तेत आहे. मुस्लिमांनी गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून जमावाकडून मारहाण, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात त्यांना दुर्लक्षित करणे आणि त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागवणे या घटना सामान्य झाल्या आहेत. लोकशाहीच्या कल्पनेच्या विरुद्ध असलेली बहुसंख्यांकवादी विचारसरणी वर्चस्व गाजवत आहे. देशाच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नव्हते, असे लोकांच्या मनाचे सांप्रदायिकीकरण झाले आहे. राज्य यंत्रणेवर नियंत्रण ठेवणाऱ्या आणि श्रद्धेच्या नावाखाली बहुसंख्यांकवादी अजेंडा आणि ध्रुवीकरण प्रक्रिया आक्रमकपणे पुढे नेणाऱ्या शक्तींकडून आता गांधीजींच्या ‘आयडिया ऑफ इंडिया’वर सुनियोजित पद्धतीने हल्ला केला जात आहे.
अशा अस्वस्थ काळात, देशाच्या एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपल्याला राज्यघटनेच्या चौकटीचे समर्थ कोंदण देण्याची गांधीजींची भारताबद्दलची अनन्यसाधारण दूरदृष्टी जाणवते आहे. २७ जानेवारी १९४० रोजी ‘हरिजन’मध्ये गांधीजी म्हणतात, “सांप्रदायिक ऐक्याशिवाय केवळ अहिंसेद्वारे स्वराज्य प्राप्त होऊ शकत नाही, असा माझा दृढ विश्वास आहे. परंतु समुदायांमधील न्यायाशिवाय हे ऐक्य साध्य होऊ शकत नाही.” गांधीजींनी ज्या न्यायाची घोषणा केली होती, ती दाबून टाकण्याचे काम सध्या विद्वेषाचे विष पेरणारे सत्ताधारी नेते त्यांच्या वक्तव्यातून आणि कृतीतून करताना दिसत आहेत.
गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या कारकिर्दीपासूनच अवलंबलेल्या 'सत्याग्रह' या महत्त्वाच्या अस्त्रामुळे स्वातंत्र्यलढ्यात सांप्रदायिक सलोखा टिकून राहिला. त्यांची अहिंसक संघर्षाची पद्धत खरे पाहता आधीपासूनच आपल्या वैविध्यपूर्ण धर्मपरंपरेत रुजलेली होती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ‘सत्याग्रहा’त सामील होण्याचे आवाहन करताना गांधीजींनी त्यांच्या वेगवेगळ्या जाहीर भाषणांमध्ये विविध धर्मातील अनुकरणीय सत्याग्रहींचा उल्लेख केला. त्या संदर्भात त्यांनी सत्याग्रही होण्यासाठी उदाहरणे म्हणून हिंदू पुराणातील भक्त प्रल्हाद, ग्रीक इतिहासातील सॉक्रेटिस, ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधित्व करणारे येशू ख्रिस्त, इस्लाममधील इमाम हुसेन आणि हिंदू धर्मातील मीराबाई यांचा उल्लेख केला. विविध धार्मिक परंपरांमधून आधार घेत असा एकत्रित दृष्टिकोन ते तयार करतात आणि सत्याग्रहाचे महत्त्वाचे धडे स्पष्ट करतात. हे असे आंतरधर्मीय सौहार्द सांप्रदायिक ऐक्य साध्य करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात केंद्रस्थानी राहिले.
१९४० च्या सुरुवातीला गांधीजींनी तयार केलेल्या त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमात, त्यांनी आर्थिक समानता, स्वच्छता, महिलांचे उत्थान या अशा मुद्द्यांपेक्षा सांप्रदायिक एकतेला प्राधान्य दिले. सांप्रदायिक एकतेच्या मुद्द्यावर ते म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये केवळ स्वतःच्या श्रध्देचेच नाही तर सर्व धर्मांच्या घटकांचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. त्यांना हिंदू आणि मुस्लिमांमध्ये केवळ राजकीय ऐक्यच नाही, तर मनामनातील ऐक्य देखील हवे होते. जेव्हा गांधीजी तुरुंगात ‘इंडियन नॅशनल आर्मी’ (INA) सैनिकांना भेटायला गेले होते तेव्हा त्या सैनिकांनी गांधीजींना सांगितले की, ते भारतीय म्हणून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले, पण त्यांना तुरुंगात हिंदू पाणी-मुस्लिम पाणी आणि हिंदू चहा-मुस्लिम चहा दिला जात आहे. ही समस्या ते कशी हाताळत आहेत, या गांधीजींच्या प्रश्नावर त्या सैनिकांनी आपण हिंदू पाणी-मुस्लिम पाणी आणि हिंदू चहा-मुस्लिम चहा एकत्र करुन, मिसळून पितो, असे उत्तर दिले. या उत्तराने गांधीजीं अतिशय प्रभावित झाले. त्या संदर्भात गांधीजींनी म्हणतात, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमधील अशाप्रकारचे मनामनातील ऐक्य हे हिंदू पाणी-मुस्लिम पाणी आणि हिंदू चहा-मुस्लिम चहा देण्याच्या ब्रिटिश भारतात प्रचलित असलेल्या विभाजनकारी प्रथेचा अंत करेल.
गांधीजींनी केवळ ब्रिटिश सरकारलाच भारतातील समुदायांमध्ये फूट पाडून त्यांचे राज्य टिकवून ठेवल्याबद्दल दोषी ठरवले नाही, तर श्रद्धेच्या नावाखाली लोकांमध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल मौलवी आणि हिंदू पुरोहितांनाही दोषी ठरवले. त्यांनी असेही भाकीत केले की, सांप्रदायिकतेची तीव्रता वाढल्याने इतिहासाचे विकृतीकरण होईल. श्रद्धेच्या नावाखाली संघर्ष वाढल्याने ताजमहाल आणि मोगल काळातील इतर पैलू इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकले जातील, अशी त्यांनी व्यक्त केलेली भीती त्यांच्या लिखाणात आढळून येते. त्यांच्यामते जर हिंदू, मुस्लिम आणि इतर सर्व धर्माचे लोक पूर्ण सुरक्षित वातावरणात आणि सन्मानाने जगू शकले तरच आपले शिक्षण पूर्णपणे आनंदी होईल. अलिकडे मोदी राजवटीने आपल्या इतिहासाच्या पुस्तकांतून मोगल काळातील अनेक पैलू काढून टाकले आहेत. हा सांप्रदायिक विद्वेषाचा परिणाम म्हणायला हवा.
हल्ली भाजपच्या काही नेत्यांसह हिंदुत्ववादी शक्तींकडून श्रद्धेच्या नावावर विशिष्ट समाजावर व्यापक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच झुंडबळीसारखी प्रकरणे वाढू लागली आहेत. म्हणूनच आज महात्मा गांधींनी मांडलेल्या सांप्रदायिक सौहार्दाच्या दृष्टिकोनाशी जोडून राहणे, आवश्यक आहे. असे केल्याने आपण ‘भारत’ या संकल्पनेचे रक्षण करू शकतो आणि आपले संविधान आणि लोकशाही वाचवू शकतो. समाजात तणाव आणि वैमनस्य निर्माण व्हावे या हेतूने धार्मिक आणि जातीय विद्वेष झपाट्याने पसरवण्याचे काम जोरात चालू असतानाच्या या काळात “अमन के हम रखवाले, सब एक है” म्हणत, या देशातील संविधानिक हक्कांचे व मूल्यांचे रक्षण करावे यासाठी आग्रह धरणेही आवश्यक आहे.
असाच एक प्रयत्न जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, ‘सद्भाव मंचा’च्या माध्यमातून करत आहे. समाजात सौहार्द, शांतता, बहुविधता, एकात्मता व धर्मनिरपेक्षता टिकून राहावी यासाठी तसेच विविध धर्मीयांमध्ये परस्पर संवाद आणि मैत्री वाढावी, सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेची ताकद उभी व्हावी यासाठी विविध उपक्रमांद्वारे लोकांना जोडण्याचे प्रयत्न सद्भाव मंचाद्वारे केले जातात. दंगली, झुंडबळी, धार्मिक व जातीय दडपशाहीच्या घटनांमध्ये वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘सत्यशोधन समिती’ स्थापन करणे, घटनेचा निःपक्षपाती अहवाल तयार करणे, सामाजिक सलोखा व निर्भयतेने जगण्याच्या अधिकाराची मागणी करणे व अंमलबजावणीचा आग्रह धरणे ह्या दृष्टीनेही ‘सद्भाव मंच’ काम करत आहे.
आजच्या विद्वेषाच्या दिवसांत गांधी विचारांचे सोने लुटून सामाजिक समता आणि सलोख्याचा विचार समाजात रुजवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, जात-धर्म-लिंग-भाषा-प्रदेश अशा भेदांचे सीमोल्लंघन करावे व सामाजिक समतेचा आणि सलोख्याचा संकल्प करावा, असे आवाहन सद्भाव मंचाने गांधी जयंती निमित्त केले आहे. यासाठी तळागाळातील लोकांत जाऊन स्थानिक पातळीवर संवाद, विविध धर्मीय सामुदायिक समारंभ, सहभोजन, आंतरधर्मीय प्रार्थना सभा, सौहार्दपूर्णतेसाठी उपवास असे कार्यक्रम आयोजित करावेत, असे कृतीकार्यक्रम सुचविण्यात आले आहेत. अशा कार्यक्रमांमधूनच आपली सामाजिक सलोख्याची उसवत चाललेली वीण परत एकदा पक्की होईल, असा सकारात्मक विश्वास बाळगायला हरकत नाही.
सद्भाव मंच व जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या महाराष्ट्र समन्वयक