समतेचा क्रांतिसूर्य  
अक्षररंग

समतेचा क्रांतिसूर्य

सध्या जगाच्या पटावर चहुबाजूंनी अशांततेचे मळभ दाटले आहे. सीमांवर युद्धाचा कोलाहल सुरू आहे. देशात जाती-धर्मातील विद्वेष व उन्मादाने गहजब माजवला आहे. बुवा-बाबांची भोंदूगिरी आणि राजाश्रयाआडून महिलांचे शोषण केले जात आहे. मानवी जीवनमूल्येच पायदळी तुडवल्याने आपला समाज एका मानसिक गुलामगिरीकडे व वैचारिक अंधारयुगाकडे चालला आहे.

नवशक्ती Web Desk

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

सध्या जगाच्या पटावर चहुबाजूंनी अशांततेचे मळभ दाटले आहे. सीमांवर युद्धाचा कोलाहल सुरू आहे. देशात जाती-धर्मातील विद्वेष व उन्मादाने गहजब माजवला आहे. बुवा-बाबांची भोंदूगिरी आणि राजाश्रयाआडून महिलांचे शोषण केले जात आहे. मानवी जीवनमूल्येच पायदळी तुडवल्याने आपला समाज एका मानसिक गुलामगिरीकडे व वैचारिक अंधारयुगाकडे चालला आहे. अशा वेळी, पावणेदोनशे वर्षांपूर्वी पुण्यातील भिडे वाड्यात प्रज्वलित झालेली क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची ‘ज्ञानज्योती’ हीच आजच्या जगाला वाचवणारी एकमेव प्रकाशवाट दिसत आहे...

तो भारतीय समाजासाठी अज्ञानाचा आणि कर्मकांडाचा काळाकुट्ट काळ होता. त्या काळात जोतिबांनी ‘सत्यशोधक’ विचारांची धगधगती मशाल हाती घेतली. त्यांचे विचार शोषितांच्या न्यायहक्काचा कृतिशील आवाज होता. सध्या इराणविरुद्ध इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धाला पूर्णविराम मिळालेला नाही. काही देश परस्परांवर अण्वस्त्रे उगारून संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. प्रत्येक देशाने विनाशकारी शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेतून बाहेर पडून व्यापार-उदिमासोबतच ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या, संशोधनाच्या क्षेत्रात आदान-प्रदान करून परस्पर सहकार्याच्या उद्देशाने गुंतवणूक केली, तर पृथ्वीवर रक्ताचे पाट वाहण्याऐवजी शांतता-समृद्धीच्या ज्ञानसंपन्न विकासगंगा वाहतील. जगाला आज विध्वंसकारी हायड्रोजन बॉम्ब नको, तर जोतिबांच्या ‘मानवतावादी’ विचारांची अधिक गरज आहे.

भारताच्या विद्यमान राजकीय स्थितीवर एक नजर टाकली तर महात्मा फुले यांनी मांडलेल्या ‘बळीराजा’च्या संकल्पनेची प्रकर्षाने आठवण झाल्यावाचून राहत नाही. आजकालच्या लोकशाहीच्या उत्सवात मतदारांना जाती आणि धर्माच्या विद्वेषाची गोळी दिली जात आहे. त्यात समाज केवळ विभागला जात नाही, तर तो मानसिकदृष्ट्या दुभंगलाही जात आहे. अशा ध्रुवीकरणाच्या काळात २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन झालेल्या ‘सत्यशोधक समाजा’चा संदेश अत्यंत मोलाचा ठरतो. कोणत्याही मध्यस्थाशिवाय ईश्वराची भक्ती करता येते. हाच बुद्धीप्रामाण्यवादी विचार काळाच्या कसोटीवर आजही टिकून आहे. या विचारानेच शूद्र व अतिशू्द्रांना मानवी हक्कांची जाणीव करून त्यांना मानसिक गुलामगिरीच्या शृंखलातून मुक्त केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘शेतकऱ्याचा आसूड’ ओढताना फुले यांनी जे भाष्य केले, ते आजही शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणारेच नाही, तर आजच्या धोरणकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. शेतीला सिंचन, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देतानाच, त्यांनी शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्ती देण्याची जी भूमिका घेतली, ती आजच्या काळातही आश्वासक वाटते. कोविड काळात ज्या कृषी क्षेत्राने देशाच्या प्रगतीला हातभार लावला होता, तेच क्षेत्र आता हवामान बदलाच्या संकटाचा एकाकी सामना करीत आहे. सध्याची बाजारपेठेतील अनिश्चितता आणि हवामान बदलाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आजच्या शेतकऱ्याकडे पाहून असे वाटते की, जोतिबांनी त्या काळी सरकारी धोरणांवर केलेली टीका आजही कालबाह्य झालेली नाही. मातीत राबणारे हात समृद्ध होत नाहीत, तोपर्यंत आपल्या कृषिप्रधान देशाच्या प्रगतीचे मोजमाप केवळ ‘आभासी’च राहील.

स्त्री-शिक्षणाच्या बाबतीत जोतिबा आणि सावित्रीबाईंनी पेरलेले क्रांतीच्या बीजाचे वटवृक्षात रूपांतर झाले असले, तरी स्त्री सुरक्षिततेच्या प्रश्नाच्या तीव्रता आजही कायम आहे. ‘विद्येविना मती गेली...’ हे सूत्र केवळ साक्षरतेसाठी नव्हते, तर ते शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे एक प्रभावी अस्त्र होते. आजच्या डिजिटल युगातही जेव्हा महिलांच्या सन्मानावर गदा येते, तेव्हा स्वतःच्या घरातून परिवर्तनाची सुरुवात करणाऱ्या या दाम्पत्याचा आदर्श डोळ्यांसमोर उभा राहतो. शिक्षणाने वेळीच डोळे उघडले नाहीत, तर ती औपचारिक साक्षरता ठरते, परंतु शिक्षणाने जर अन्यायाविरुद्ध संघर्ष केला, व्यवस्थेला प्रश्न विचारले, तर तो फुले विचारांचा पाईक ठरतो.

महात्मा फुले यांनी साहित्याला मनोरंजनाचे नव्हे, तर प्रबोधनाचे साधन मानले. ‘गुलामगिरी’सारख्या ग्रंथातून त्यांनी मानसिक दास्यत्वाच्या बेड्या तोडण्याचे आवाहन केले होते. आज माहितीच्या महापुरात वावरणारा तरुण विशिष्ट विचारसरणीचा गुलाम बनतो, तेव्हा फुले यांचा ‘विवेकवाद’ मार्गदर्शक ठरतो. सोशल मीडियावरील द्वेषमूलक विचार आणि विकृत इतिहासाचा मुकाबला करण्यासाठी तर्कसंगत विचारांची गरज आहे. आजच्या काळात माहितीचा साठा भरपूर आहे, पण सत्याचा शोध घेणारी फुलेंची ‘सत्यशोधक’ दृष्टी मात्र दुर्मिळ होत चालली आहे.

जातीय विद्वेष व धार्मिक उन्मादाचे वास्तव आजही आपल्या देशाच्या प्रगतीच्या आड येत आहे. आरक्षणाचे राजकारण असो किंवा सामाजिक भेदाभेद, फुले यांनी १८६८ मध्ये आपल्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून दिलेला संदेश आजही प्रस्थापित व्यवस्थेच्या अहंकारावर नेमकेपणाने बोट ठेवतो. आज जातीचा वापर सत्तेसाठी होतोय, पण फुले हे जातिनिर्मूलनाद्वारे अखंड समाजाचे स्वप्न पाहत होते. हाच वारसा पुढे राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकरांनी चालवला. आज आपण संविधानाच्या सावलीत जो मोकळा श्वास घेतो आहोत, त्याचा प्राणवायू म्हणजे जोतिबांचे समतेचे विचार आहेत.

सध्याच्या भांडवलशाही युगात आर्थिक शोषण नवनव्या स्वरूपात समोर येत आहे. कामगारांचे प्रश्न आणि बेरोजगारी यावर उपाय शोधताना फुले यांनी मांडलेला ‘कष्टाचा गौरव’ प्रेरणादायी ठरतो. त्यांनी दैवावर विसंबून राहणाऱ्या आळशीपणाचा धिक्कार केला. कष्टकरी समाजाने संघटित होऊन आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे, हा विचार जागतिक कामगार चळवळीला ऊर्जा देत असला तरी आता कामगार चळवळीलाच उतरती कळा लागली आहे व ती श्रमसंस्कृतीसाठी शोकांतिका ठरण्याचा धोका वाढला आहे.

उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, स्त्री-पुरुष भेदभावाचे विखारी वारे जोरात वाहत असताना, पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचे साहस फुले दाम्पत्याने दाखवून शैक्षणिक क्रांतीचीच मुहूर्तमेढ रोवली. अंगावर शेण आणि दगड झेलून त्यांनी आपले ज्ञानदानाचे कार्य जोमाने सुरू ठेवले. त्यांनी देवाला ‘निर्मिक’ म्हटले आणि धर्म हा मानवनिर्मित असल्याचे मोठ्या धाडसाने सांगितले. ‘सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती’ हे ब्रीदवाक्य धार्मिक मक्तेदारीच्या चिंधड्या उडवणारे होते. त्यांनी देव आणि माणसामधला ‘दलाल’ संपवून माणसाचा धर्म हा ‘माणुसकी’ असल्याचे जगाला निक्षून सांगितले. १८८८ मध्ये जनतेने त्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली, ती त्यांच्या अतुलनीय कार्याची पोचपावती होती. वडिलांच्या निधनानंतर कर्मकांडांऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा नवा पायंडा पाडला. यशवंत या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी समाजसुधारणेचा वस्तुपाठ घालून दिला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून काढणाऱ्या महात्मा फुले यांना समस्त मराठी माणूस कधीही विसरू शकणार नाही.

शेवटी, महात्मा फुले हे केवळ एका कालखंडाचे किंवा विशिष्ट समूहाचे नेते नव्हते, तर ते अखिल मानवजातीचे सार्वकालिक महान सुधारणावादी होते. जेव्हा लोकशाहीवर संकट येईल, शोषितांचा आवाज दाबला जाईल, तेव्हा ‘सत्यशोधक’ विचार क्रांतीची मशाल बनून पेटून उठेल. भारताला जर खऱ्या अर्थाने ‘विश्वगुरू’ व्हायचे असेल, तर ते फुले यांच्या समताधिष्ठित आणि विज्ञाननिष्ठ सत्यशोधक समाजाच्या निर्मितीनेच शक्य होईल. कारण, फुलेंचा विचार हा केवळ काळाचा संदर्भ नसून, तो प्रत्येक अन्यायाविरुद्धचा शाश्वत हुंकार आहे. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ ही केवळ घोषणा नाही, तर तो या देशाच्या मातीचा डीएनए आहे, जो पिढ्यानपिढ्या न्यायाचा जागर करत राहील. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

prakashrsawant@gmail.com

अखेर थेट भेट; अमेरिका-इराणची बैठक सुरू, पहिली फेरी झाली

दुसरीकडे मोक्याच्या पदांवर जाऊन बसणे बंद; महसूल अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केवळ तीन वर्षांसाठी

Pune : भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरण्याऐवजी थेट कार पार्किंगमध्ये; थोडक्यात टळला मोठा अनर्थ, उडाला गोंधळ

प्रत्येक शाळेत आता स्थापन होणार परिवहन समिती; शालेय बसवर निर्बंध, सुरक्षित प्रवासासाठी नवे नियम

जेष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती खालावली; 'ब्रीच कँडी'त उपचार सुरू