अक्षररंग

गोष्टीच्या गमतीचं 'गणित'

मालकीणबाई जरी दुष्ट, खाष्ट आणि मागरिट मांजर मावशीवर सतत हाटहूट करत असल्या तरी त्यांचा मूड जेव्हा चांगला असेल तेव्हा शेजारच्या लहान मुलांना बोलावून त्या गोष्टी सांगत. या गोष्टी ऐकताना मुलं रंगून जात. मागरिटसाठी असणारी खाष्ट बाई, मुलांसाठी मात्र गोड गोष्टीवाली आज्जी होती. मागरिट कान टवकारून आणि रॉबिन्सन उंदीर मामा बिळाला उजवा कान लावून त्यांच्या गोष्टी ऐकायचा.

नवशक्ती Web Desk

बालमैफल

सुरेश वांदिले

मालकीणबाई जरी दुष्ट, खाष्ट आणि मागरिट मांजर मावशीवर सतत हाटहूट करत असल्या तरी त्यांचा मूड जेव्हा चांगला असेल तेव्हा शेजारच्या लहान मुलांना बोलावून त्या गोष्टी सांगत. या गोष्टी ऐकताना मुलं रंगून जात. मागरिटसाठी असणारी खाष्ट बाई, मुलांसाठी मात्र गोड गोष्टीवाली आज्जी होती. मागरिट कान टवकारून आणि रॉबिन्सन उंदीर मामा बिळाला उजवा कान लावून त्यांच्या गोष्टी ऐकायचा. मुलांसोबतच मागरिट आणि रॉबिन्सनला गोष्टी ऐकायला फार आवडत. या मनुष्यप्राण्याच्या मुलांना नि आपल्याला गोष्टी का बरं आवडत असाव्यात ? असा प्रश्न एकदा रॉबिन्सनला पडला. त्याने उत्तरासाठी मावशीकडे बघितलं.

"आपल्याला आजकाल रॉब्यासारखे इंटेलिजन्ट प्रश्न का पडत नाही बाँ?" याचं आधी मावशीला दुःख होऊन ती हिरमुसली.

"मावशे, अगं तुला नाही का आवडत गोष्टी?" मामाने विचारलं.

"तसं नाही रे रॉब्या, मालकीणबाई सतत, तू मूर्ख आहेस, निर्वृद्ध आहेस, ढ आहेस, असं माझ्यावर खेकसते. त्यामुळे खरोखरच माझी बुद्धी गंजली की काय असं वाटायला लागलंय ?"

"माय डियर मावशे, तुझ्याइतकी स्मार्ट कुणी नाहू छे! कशाला करतेस मालकीणबाईचा इतका विचार, दाखवून दे तुझ्या बुद्धीचा किती आहे विशाल संचार !"

"रॉब्या, लोणी लावणं पुरे झालं."

"झालंना, मग मनुष्यप्राण्याच्या पोराटोरांना नि आपल्यालाही गोष्टी ऐकायला का आवडतात ? याला जरा लोणी लाव. स.स सॉरी म्हणजे जरा या रहस्याला शोधना." रॉबिन्सन लाडीगोडी करत म्हणाला. तसंही प्रश्नांच्या उत्तरासाठी पाठलाग करणं मावशीला आवडत असल्यानं तिने डोळे मिटले. आपल्या मेंदूला इकडेतिकडे दौडवले नि डोळे उघडून मामाची मिशी ओढत म्हणाली...

"मिल गया, मिल गया."

"दाऊद, भेटला की काय?"

"गधड्या, दाऊद नाही रे. गोष्ट का आवडते याचं रहस्य."

"अरे वा, मग सांग की मला." मामा कान टवकारून म्हणाला. मावशी सांगू लागली, "रॉब्या, गोष्टीची गंमत मनुष्यप्राण्याच्या नि आपल्यातुपल्या मेंदूत दडलेली असते." "गंमत की गणित?" रॉबिन्सन तोंड आंबट करत म्हणाला. "अरे आंबेटल्या, ही गणिताची गंमत किंवा मग शास्त्राची गंमत आहे. शास्त्र आलं की त्यात गणित येतच हे विसरलास की काय ?"

"म्हणजे नेमकं काय ग मावशे?" "रॉब्या, आपल्या मेंदूत 'डोपामिन' नावाचं रसायन असतं. हे रसायन स्त्रवतं तेव्हा आपणास आनंद मिळतो. जेव्हा आपण गोष्ट ऐकतो तेव्हा त्यातला विनोद, रहस्य, पुढे काय होणार, याची उत्सुकता नि उत्कंठा यामुळे हे रसायन स्त्रवतं."

"बस.. इतकं पिटुकलं रहस्य." "रॉब्या, अरे हे एक कारण झालं, आपल्याला गोष्टी आवडण्याचं." "म्हणजे, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सातवं, अकरावंसुद्धा कारण आहे की काय ?" मामाने उत्सुकतेनं विचारलं. "हो ना, अरे रॉब्या, आपण जेव्हा गोष्टी ऐकतो तेव्हा मेंदूला तसा प्रत्यक्ष अनुभव मिळून तो प्रतिसाद देतो."

"म्हणजे?"

"म्हणजे असं की गोष्टीत आलं की, जंगलात मध्यरात्री भूतं आणि चेटकिणी बाहेर पडतात, तर आपल्या मेंदूत असणारा 'मोटॉर कॉर्टक्स' आणि 'अमिग्डाला' हा भीतीशी निगडित भाग सक्रिय होतो. गोष्टी ऐकणाऱ्यास खरोखरच तशी भीती वाटू लागते." "अरे माझ्या देवा, इथेही भानगड आहे म्हणायची."

"मामेटल्या, यात कसली आलीय भानगड. हे शास्त्रीय सत्य. मेंदूत जसे भीतीशी निगडित भाग असतात, तसेच दुःख, आनंद, उदासपणा, संघर्ष, भावनिक बुद्धिमत्ता अशाही भावनांशी निगडित भाग असतात. मेंदूतलं 'मिरर न्यूरॉन्स' हा भाग हे सगळं घडवतो. गोष्टीतल्या प्रसंगानुसार त्या भावना जागृत होतात. म्हणजे आपल्याला तो अनुभव येतो. गोष्टी ऐकताना स्मृतीशी संबंधित असलेला 'हिप्पोकॅम्पस' भाग सक्रिय होतो. त्यामुळे गोष्टी लक्षात राहून शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते.

गोष्टीतील आवाज, लय, बोलण्याची शैली यामुळे ऐकण्याशी संबंधित 'ऑडिटरी कॉर्टेक्स' भाग जागृत होतो."

"आता तिसरं कारण कोणतं बरं गोष्ट आवडण्याचं?"

"मामू, हा मनुष्यप्राणी फार हुशार नि बुद्धिमान असल्याने, प्राचीन काळापासून त्याला आलेले अनुभव तो पुढच्या पिढीकडे देऊ लागला. त्यासाठी त्याने एक युक्ती केली."

"म्हणजे, चार सांगेन युक्तीच्या गोष्टी... असं का ?"

"असंच म्हण. त्याला माहीत होतं की कोरडं ज्ञान नि कोरडे अनुभव काही लक्षात राहायचे नाहीत, म्हणून त्याने या ज्ञान आणि अनुभवाला गोष्टीचं रूप दिलं. त्यातून मग शिकार कथा, मैत्रीच्या कथा, नियमांच्या कथा, संस्कार कथा, देवदेवतांच्या कथांचा जन्म झाला," "वा वा, मानवाच्या हुशारीला तोडच नाही बघ. गोष्टीत रंगवून ठेवायचं नि हळूच उपदेशपण द्यायचा. उत्सुकता वाढवायची नि हळूच ज्ञानामृत पाजायचं." "आता कसं बोललास शहाण्यासारखं. अरे, या मनुष्यप्राण्याच्या पूर्वजांना हजारो वर्षांपूर्वीच गोष्टीमधून शिकणं नि ज्ञान देणं लक्षात आलं होतं. गोष्टीतून बऱ्याच प्रश्नांची उत्तरंही मिळतात.

कल्पनाशक्तीला गोष्टी चालना देतात. शिवाय गोष्टी ऐकताना मेंदूत 'अल्फा व्हेव्हज' नामक किरण निर्माण होतात."

"त्याने काय होतं?"

"अरे, या किरणांमुळे मनाला शांती मिळते, आनंद मिळतो, तणाव कमी होतो. म्हणून लहान मुलं गोष्ट ऐकता ऐकता शांत झोपी जातात. गोष्ट सांगणारा आणि गोष्ट ऐकणारा या दोघांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण होतो."

"क्या बात है, गोष्ट का आवडते हे कळलं मला मावशे. पण मग हाच फॉर्म्युला आपण मालकीणबाईसाठी वापरला तर?"

"म्हणजे काय करायचं?"

"अगं, तूच आता सांगितलंस ना की गोष्टी सांगणारा नि गोष्ट ऐकणारा या दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं म्हणून. तर मग त्यांना आपल्या दोघांविषयी प्रेम वाटावं,

सहानुभूती वाटावी यासाठी त्यांना आपण गोष्ट ऐकवू लागलो तर..."

"कोणती रे गोष्ट ?"

"अगं मावशे विसरलीस एव्हढ्या लवकर... मर्डर इन लायब्ररी.." एक डोळा मिचकावत रॉबिन्सन म्हणाला, मागरिट खुदकन हसली.

ज्येष्ठ बालसाहित्यिक

BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका

एअर इंडिया विमान अपघात, तुमच्या मुलाचा दोष नाही; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट