अक्षररंग

ब्रेडलाईनमागे लपलेली महामंदी

१९२९ मध्ये अमेरिकेमध्ये आर्थिक महामंदी आली त्या काळात तीव्र अन्नटंचाई निर्माण झाली. त्याचा परिणाम अमेरिकेच्या आहारशैलीवर झाला. व्हाईट सॉससारखे स्वस्तातले पदार्थ तयार होऊ लागले. पावासाठी रांगा लागू लागल्या. उपाशी लोकांचे मोर्चे निघू लागले. तुटपुंज्या रेशनमुळे महिलांच्या संतापाचा उद्रेक होऊ लागला. मात्र यातूनच डिप्रेशन मेन्यू म्हणत वेगवेगळे पदार्थ बनू लागले.

नवशक्ती Web Desk

फूडमार्क

श्रुति गणपत्ये

१९२९ मध्ये अमेरिकेमध्ये आर्थिक महामंदी आली त्या काळात तीव्र अन्नटंचाई निर्माण झाली. त्याचा परिणाम अमेरिकेच्या आहारशैलीवर झाला. व्हाईट सॉससारखे स्वस्तातले पदार्थ तयार होऊ लागले. पावासाठी रांगा लागू लागल्या. उपाशी लोकांचे मोर्चे निघू लागले. तुटपुंज्या रेशनमुळे महिलांच्या संतापाचा उद्रेक होऊ लागला. मात्र यातूनच डिप्रेशन मेन्यू म्हणत वेगवेगळे पदार्थ बनू लागले.

अमेरिकेन अन्नाविषयी ऐकताना, वाचताना किंवा खाताना हॅम बर्गर, ॲपल पाय, हॉट डॉग, बार्बेक्यू रिब्ज, फ्राइड चिकन वगैरे लोकप्रिय पदार्थ कायम नजरेसमोर येतात. पण तुम्ही कधी दूध, अंडी किंवा फळं न वापरता केलेले ‘वॉटर पाय’ ऐकलेय का? किंवा ‘केचअप सूप’ (सॉसमध्ये पाणी घालून), ‘पूअर मॅन’स मील’ (तळलेले बटाटे, हॉट डॉग्ज किंवा कांदा घालून केलेले पदार्थ), ‘हूवर स्ट्यू’ (पास्ता, कॅनमधले टोमॅटो, हॉट डॉग्ज आणि मक्याचे दाणे) किंवा ‘व्हाइट सॉस’ (पीठ, बटरपासून बनवलेले कालवण), ‘रेनवॉटर सूप’ (पाण्यासारखं पातळ) आणि ‘रबर स्क्वॅब’ (जुनं मांस), या पदार्थांचा उल्लेख वाचलाय का? १९२९ च्या सुमारास अमेरिकेमध्ये आर्थिक महामंदी - ‘द ग्रेट डिप्रेशन’ सुरू झाले. अर्थात याची झळ सगळ्या जगालाच लागली. पण अमेरिकेसारख्या सधन देशाची अर्थव्यवस्था पुढची आठ-दहा वर्षं कोसळली होती.

ब्रेडलाइन्सचे फसलेले प्रयोग

या काळात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि अनेक लोक बेघर झाले, उपाशी मेले, अर्धपोटी जगले. अशावेळी लोकांना जगवण्यासाठी, चिडलेल्या-उपाशी असलेल्यांना शांत करण्यासाठी अमेरिकन सरकारला वेगवेगळे उपाय करावे लागले. त्यावेळी असे कमी प्रतीचे, चव नसलेले जेवण लोकांना खावे लागायचे. या काळात मग निकृष्ट अन्नाच्या किंवा कमी पदार्थ लागतील अशा पाककृती प्रसिद्ध केल्या जायच्या, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्न वाटण्याचे प्रयत्न झाले, न्यूयॉर्कसारख्या शहरामधल्या ब्रेडलाइन्स - ‘ब्रेड मिळवण्यासाठी लावलेल्या रांगा’ वगैरे अनेक प्रयत्न झाले. त्यातले काही चालले, काही फोल ठरले आणि लोकांची ससेहोलपट झालीच. या सगळ्या काळातील अन्नधान्याची परिस्थिती यावर विविध साहित्य उपलब्ध आहे. त्यातील एक पुस्तक मला महत्त्वाचे वाटते. ते म्हणजे अण्ड्रू कोई आणि जेन झिगलमन यांनी लिहिलेले, ‘अ स्क्वेअर मील - ए कलिनरी हिस्टरी ऑफ द ग्रेट डिप्रेशन.’

अन्नासाठी दाही दिशा

बेरोजगार स्थलांतरित कामगारांच्या झुंडीच्या झुंडी अमेरिकेच्या ग्रामीण भागामध्ये अन्नासाठी फिरू लागल्या. ते इकडून-तिकडून भीक मागून, कधी चोरून आणलेल्या भाज्या आणि मांस याचे ‘मुलिगन स्ट्यू’ बनवून कसेतरी जगत राहिले. अनेकदा उपाशी मरण्याचीच वेळ त्यांच्यावर आली. पैसा हातात नसल्याने शेतकरी तर वस्तू ‘बार्टर’ करण्याच्या व्यवस्थेकडे पुन्हा वळले. पण शेतात असलेला माल चोरण्यासाठीही टोळ्या तयार झाल्या. एखाद्याच्या घरात साठवलेले मांस, लोणची, खारवलेल्या भाज्या असल्याची कुणकुण लागली तरी त्या लुटल्या जात. काही ठिकाणी तर शेतकरी स्वतःच पीक नष्ट करून टाकत असत, कारण त्यांचे भाव इतके पडले की ते धान्य विकणे अशक्य होते.

महिलांसमोरील आव्हान

आर्थिक तंगीमध्ये कुटुंबातल्या चार-पाच लोकांचे पोट भरणे हे महिलांसाठीही आव्हान ठरू लागले. त्यामुळे त्यांनी मासिकं आणि पेपरमध्ये येणाऱ्या पाककृतींचा आधार घ्यायला सुरुवात केली. अगदी पावाचा राहिलेला चुराही अंड्यात मिसळून, बेक करून पुन्हा पावसदृश पदार्थ बनवला जायचा. वर्तमानपत्रांनीही प्रत्येक दिवशी काय मेन्यू बनवावा याची सदरं सुरू केली. नाश्त्याला क्रीमरसह बेक्ड सफरचंद, दोन पावाच्या कापट्या आणि बटर, कॉफी, क्रीम, साखर. जेवणासाठी क्रीम सूप, शेंगदाणे-चीजयुक्त सॅलेड किंवा टोस्टेड चीज सॅन्डविच बनाना, असे कामचलावू पदार्थ बनवले जाऊ लागले. आपल्याकडेही लोकप्रिय असणारा ‘व्हाइट सॉस’ हा मुळात या महामंदीचा पदार्थ आहे. तो घट्ट किंवा पातळ करून त्यात भाज्या किंवा मांस घालून त्यालाच क्रीम समजून समाधान मानले जायचे.

महामंदीमध्ये एवढी वाईट परिस्थिती होती की, मुलांना अन्न देण्यासाठी न्यूयॉर्कच्या शाळांमध्ये विशेष कार्यक्रम राबवावा लागला. काही मुले त्यातलेही अन्न वाचवून, लपवून घरी न्यायची, कारण तिथे आणखी तोंडं भुकेली होती. अमेरिकेच्या कृषी विभागाने १९३१ मध्ये ‘द फार्म गार्डन’ काढून तिथे भाज्या लावण्याचे फर्मान शेतकऱ्यांसाठी काढले. त्यात मका, बटाटा, कांदे, कोबी, काकडी तत्सम भाज्यांचा समावेश होता. त्यावेळी कृषी सल्ल्यासाठी रेडिओ सर्व्हिस चालवली जायची. त्या माध्यमातून कमी खर्च आणि कमी पदार्थ लागणाऱ्या पाककृती सरकारनेच सांगायला सुरुवात केली. अगदी ख्रिसमसलाही प्लम केकऐवजी बेदाणे, खजूर वगैरे वापरून ‘चॉकलेट जिलेटीन (जेलीसारखा) केक’, उरलेल्या अन्नापासून वेगवेगळे ‘पाय’ असे पदार्थ सांगितले जायचे. ‘कॅसरोल’ हा एक पदार्थ मोठ्या प्रमाणात केला जायचा. कारण यामध्ये स्टफिंग म्हणून लोकांना न आवडणाऱ्या पण स्वस्त गोष्टी ढकलून दिल्या जायच्या.

ॲपलविना ॲपल पाय

स्ट्यू म्हणून बटाटे, गाजर, कांदे, रताळे, शेंगदाणे अशी एखादी मिळेल ती स्वस्त भाजी वापरली जायची. महामंदीच्या सुरुवातीच्या काळात हबर्ट हूवर हे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना परिस्थिती हाताळता आली नाही. काही ‘कम्युनिटी किचन’मध्ये त्यावेळी मोफत, पण अत्यंत पाणचट सूप दिले जायचे. त्याचे नाव ‘हूव्हर स्ट्यू’ पडले. बटरऐवजी शेंगदाणा बटर, ताजे अन्नं नसल्याने कॅनमधील अन्न वापरले जाई. सफरचंदासारखी फळं न परवडणारी असल्याने किंवा उपलब्धच नसल्याने बिस्किटं, साखर आणि इतर काही पदार्थ वापरून त्यालाच ‘ॲपल पाय’ म्हणण्यात आले.

तुटपुंजे रेशन आणि महिलांचा उद्रेक

लोकांची वाढती अस्वस्थता लक्षात घेऊन सरकारने चित्रविचित्र प्रयोग केले. केवळ २.५० डॉलरमध्ये आठवड्याला पुरेल असे रेशन काही कुटुंबांना दिले गेले. ते रेशन एवढे तुटपुंजे होते की लहान मुलांनाही ते अन्न पुरेना. पण परिस्थिती रेटून नेण्यासाठी असलेच उपाय करणे त्यांना भाग होते. काही गृहिणींची नेमणूक करून त्यांना गावोगाव पाठवून कमी खर्चात अन्न कसे बनवायचे याची माहिती महिलांना दिली जाऊ लागली, महिलांचे क्लासेस घेण्यात येऊ लागले. पण तरी महिलांचा उद्रेक झालाच. अठरा सेंट्समध्ये तीनवेळचे जेवण कसे बनवणार, म्हणून ६०० महिलांनी शिकागोमध्ये धरणे धरले. न्यूयॉर्कमध्ये काही महिला नाइलाजाने या पाककृतींच्या वर्गांना गेल्या. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वेगळा विभाग स्थापन करण्यात आला. “होम इकॉनॉमिक्स ब्युरो”ने खारवलेले पोर्क विविध पद्धतीने कसे वापरता येईल, यासंबंधी माहिती उपलब्ध करून दिली. त्यात सँडविच, ग्रेव्ही, भाज्या अशा कशाबरोबरही डुकराचे मांस वापरण्यास सांगितले. कम्युनिटी गार्डन्सनाही त्यावेळी चालना मिळाली. महिलांना होम किचन्सच्या माध्यमातून कुटुंबाला लागणाऱ्या भाज्या लावण्याचा सल्ला देण्यात आला.

उपाशी लोकांचे मोर्चे

वॉशिंग्टनमध्येही उपाशी लोकांचे मोर्चे निघाले. त्यात पहिल्या महायुद्धात सामील झालेल्यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांनी अगदी झोपड्या उभारून ठिय्या आंदोलन केले. युद्ध संपले आणि ते सैनिक घरी आले. पण महामंदी सुरू झाल्याने त्यांना काम मिळेना आणि अन्नही. त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था करणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी होऊन बसली. मग बीफ आणि बटाटे समप्रमाणात घेऊन स्ट्यू आणि पाव त्यांना वाटण्यात यायचा. पण जास्त काळ हे शक्य नव्हते. अन्नाचा तुटवडा इथेही निर्माण झाला. इतका की, लहान मुलं कुपोषित होऊ लागली. शेवटी आर्मीला बोलावून त्यांना हुसकावून देण्यात आले.

डिप्रेशन मेन्यू

महामंदीची झळ ‘व्हाइट हाऊस’पर्यंत पोहोचली. त्यावेळी फ्रँकलिन रुझवेल्ट राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यांच्या पत्नी एलिनोर यांनीही देशातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन व्हाइट हाऊसमध्ये ‘बजेट जेवण’ द्यायला सुरुवात केली. त्यात ‘मिल्कोरर्नो (मका आणि स्कीम मिल्क) पोलेंटा’ आणि ‘टोमॅटो सॉस’ असे माणशी केवळ ६.५ सेंट खर्चाचे पदार्थ दिले जाऊ लागले. मग त्यात गहू घालून ‘मिल्कव्हिटो’ बनवण्यात आला आणि त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. हा पदार्थ कसा पौष्टिक आहे, हेसुद्धा अमेरिकेने सांगायला सुरुवात केली. रुझवेल्ट हे स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने त्यांनी बेरोजगार युवकांना शहरातून गावाकडे जायला सांगितले. कारण तिथे शेतीच्या माध्यमातून अन्न मिळवणे शक्य होते. त्यांनी स्वतःच्या जेवणावरचाही खर्च आणि छानछौकी कमी केली. टोमॅटो सॉसमध्ये केलेले गरम डेव्हिल एग, कुस्करलेले बटाटे आणि प्रून पुडिंग असा साधा मेन्यू ते जेवल्याच्या नोंदी आहेत. त्यांना अमेरिकेतल्या जनतेला दाखवून द्यायचे होते की, राष्ट्राध्यक्षही साधे जेवण जेवतात. ‘डिप्रेशन मेन्यू’ म्हणून हे पदार्थ प्रसिद्ध होऊ लागले. प्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्याही वाट्याला व्हाइट हाऊसमध्ये ‘रेनवॉटर सूप’ आणि ‘रबर स्क्वॅब’ हे पदार्थ आले. पण ना हूवरना, ना रुझवेल्टना, कोणालाच हा प्रश्न हाताळता आला नाही. महामंदी संपेपर्यंत दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली.

या काळात लोकांना सोसाव्या लागणाऱ्या यातना ‘होबो’ म्हटल्या जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांनी म्हटलेल्या गाण्यातून समजून घेता येतील -

“ओ, माझं पोट दुखतंय रे,

लहानशा मांसाच्या तुकड्यांसाठी,

पंक गाण्याचा आवाज आणि गरम पेयासाठी, या एकसुरी दृश्याला कंटाळलोय,

मला एखाद्या खानावळीत ने,

जिथे किमान हवेपेक्षा जास्त काहीतरी खायला मिळेल..” n

मुक्त पत्रकार

shruti.sg@gmail.com

Iran Israel War : इराणच्या सर्वोच्च नेता निवडी‌वेळी इस्रायलचा हल्ला; लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ले

भारताकडे २५ दिवसांचा तेल साठा; केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती

Iran Israel War : आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन

आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प

मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष; राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात