प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा आनंद साजरा करण्याचा दिवस, ज्यावर घराघरात श्रीखंड-पुरीचा पारंपरिक नैवेद्य केला जातो. या गोड पदार्थामुळे नवीन वर्षाची सुरुवात थंडावा, पौष्टिकता आणि गोड आनंदाने होते.
गुढीपाडवा अगदी चार दिवसांवर आलाय. आपला प्रत्येक हिंदू सण आणि त्या सणाला घरोघरी बनणारा गोड पदार्थ यांचं एक घट्ट नातं आहे. त्या सणाला तो पदार्थ खाल्ला नाही तर उगीचच चुकल्या चुकल्यासारखं वाटत राहतं. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक, ऋषीपंचमीला कंदमुळांची भाजी. होळी पौर्णिमेला पुरणपोळी, तर मकर संक्रांतीला खुसखुशीत गुळपोळी, तिळाचे लाडू, दिवाळीला लाडू, करंजी, अनारसे इ. नारळी पाैर्णिमेला नारळीभात, नारळवडी, नागपंचमीला गव्हाची खीर, सत्यनारायणाला गोडाचा शिरा तसंच गुढीपाडव्याला मलईदार श्रीखंड.
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला सण असून, या दिवशी श्रीखंड-पुरीचा नैवेद्य आवर्जून केला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीराला थंडावा देणं, पचन सुधारणं आणि नवीन वर्षाची गोड सुरुवात करणं या उद्देशाने दह्यापासून बनवलेलं श्रीखंड खाल्लं जातं. हा बेत उष्णता कमी करण्यासाठी आणि पौष्टिकतेसाठी उत्तम मानला जातो.
हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन घर, वस्तू किंवा सोन्याची खरेदी केली जाते, पण शास्त्रानुसार गुढी उभारल्यानंतर तिला गोडाधोडाचा नैवेद्य देखील दाखवला जातो.
गुढीपाडवा सणाचा सांस्कृतिक इतिहास पहायचा झाला तर, ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिलं, असं सांगितलं आहे. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षं वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूचा पहिला दिवस आपण हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशीम वस्त्र, तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, साखरेची माळ यासारख्या नैसर्गिक आणि आरोग्याला पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पूजा केली जाते. कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते किंवा काही ठिकाणी पानंही खातात. अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते तीच आहारात गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवींचा समावेश करूनच आणि त्यात महत्त्वाचं असतं ते श्रीखंड!
जसं मकर संक्रांतीला तिळाचं महत्त्व असतं, होळीला पुरणपोळीचं तसंच गुढीपाडव्याला हमखास घरोघरी खाल्लं जातं ते श्रीखंड-पुरी... असं म्हटलं जातं की, नवीन वर्षाची सुरुवात ही गोड क्षणांनी करावी त्यासाठी आपल्या ताटात आवर्जून असतात ते गोडाचे पदार्थ.
गुढीपाडवा वसंत ऋतूत येतो, जेव्हा ऊन वाढू लागतं. थंड आणि पौष्टिक श्रीखंड शरीराला थंडावा आणि ऊर्जा देतं, त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जेवणात गोड पदार्थाला (श्रीखंड) प्राधान्य दिलं जातं.
थोडक्यात, गुढीपाडवा आणि श्रीखंड-पुरी हे नातं चविष्ट- अन्नासोबतच उत्तम आरोग्याचंही प्रतीक आहे. श्रीखंड हा दही, साखर, केशर आणि वेलचीपासून बनवलेला एक पारंपरिक भारतीय गोड पदार्थ आहे, जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये लोकप्रिय आहे. याचा इतिहास ४००-५०० इस.पूर्व इतका जुना मानला जातो. महाभारताच्या काळापासून, जेव्हा भीमाने ‘बल्लव’ रूपात हा पदार्थ तयार केल्याची आख्यायिका आहे, हे ‘शिखारिणी’ म्हणून प्राचीन ग्रंथांत ओळखलं जात असे.
श्रीखंड हे भारतातील सर्वात जुन्या मिष्टान्नांपैकी एक आहे. याचा उल्लेख प्राचीन संस्कृत साहित्य आणि ‘लोकपकार’ या कन्नड ग्रंथात आढळतो! श्रीखंड हे नाव ‘शिखारिणी’ (गाळलेलं दही) या संस्कृत शब्दापासून विकसित झालं आहे. काही मतानुसार, ‘श्री’ (देवता) आणि ‘खंड’ (पदार्थाचा भाग) यापासून ‘श्रीखंड’ तयार झालं!
प्राचीन काळापासून हे गुढीपाडवा, दसरा यांसारख्या सणांवर आवर्जून बनवलं जातं.
आयुर्वेदानुसार, श्रीखंडमध्ये थंडावा देणारे गुणधर्म आहेत आणि ते रेचक म्हणून देखील काम करतं. आतून होणारी जळजळ कमी करतं आणि सामान्य सर्दीशी लढतं. आधुनिक विज्ञानानुसार, त्यात कॅल्शियम, प्रथिनं आणि फॉस्फरस असतात, तसंच ते हाडं आणि दातांसाठी चांगलं असतं.
आता श्रीखंड खायचं कसं? तर हा काही पानाला चुना लावतात तसा जिभेला लावण्याचा पदार्थ अजिबात नाही. चमच्याने तर हे अजिबातच खाऊ नये. घरगुती... म्हणजे, घरगुती पदार्थाचं माहेरघर अशा पाटीखाली विकतचे पदार्थ मिळतात ते नव्हे, तर चक्क आपल्या घरात चक्का बनवून त्याचं बनवलेलं मलईदार श्रीखंड, वाटीभर.....किंवा... वाडगाभरही चालेल, घेऊन उजव्या हाताची तर्जनी त्यात गोल फिरवून पिवळ्याधम्मक श्रीखंडाचा पहिला घास जिभेवर ठेवायचा, अष्ट्सात्विक भाव जागे करायचे आणि मनापासून आनंद घेत सगळी वाटी चाटून पुसून लख्ख करायची.
जीभ, पोट आणि मन तृप्त होऊन जातं, पानावरून उठेपर्यंत डोळे पेंगुळले होतात. श्रीखंडाची चव जिभेवर वागवत चुळा भरायच्या आणि नवीन वर्षाचा पहिला सण गुढीपाडवा खऱ्या अर्थाने साजरा करत तास दोन तास मस्त आडवं व्हायचं.
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com