मधुसापळा अर्थात हनीट्रॅप 
अक्षररंग

मधुसापळा अर्थात हनीट्रॅप

पुरुषांच्या सत्तासंघर्षात स्त्री अनेकदा प्यादे बनते; डाव जिंकला तर तिचा वापर झाल्याचे विसरले जाते आणि डाव उघड झाला तर बदनामी मात्र तिच्याच वाट्याला येते. हेरगिरीपासून हनीट्रॅपपर्यंतच्या कहाण्यांमध्ये स्त्रीला खलनायिका ठरवण्याआधी तिच्यामागे असलेल्या सत्ता, पैसा आणि पितृसत्तेच्या यंत्रणेकडे पाहण्याची गरज आहे.

नवशक्ती Web Desk

विशेष

अमोल केरकर

पुरुषांच्या सत्तासंघर्षात स्त्री अनेकदा प्यादे बनते; डाव जिंकला तर तिचा वापर झाल्याचे विसरले जाते आणि डाव उघड झाला तर बदनामी मात्र तिच्याच वाट्याला येते. हेरगिरीपासून हनीट्रॅपपर्यंतच्या कहाण्यांमध्ये स्त्रीला खलनायिका ठरवण्याआधी तिच्यामागे असलेल्या सत्ता, पैसा आणि पितृसत्तेच्या यंत्रणेकडे पाहण्याची गरज आहे.

नोव्हेंबर २०२६ च्या मध्यावर जगभरातील सर्व भाषांमधील माध्यमांमध्ये सर्वात जास्त वापरला गेलेला शब्द असेल हुआंग! अमेरिकेतील एनव्हिडिया या महाकाय कॉर्पोरेट कंपनीचे जेन्सेन हुआंग हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्वेसर्वा होते. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यूयॉर्क टाइम्सने त्यांचे मेगास्पीड या सिंगापुरी कंपनीतील अधिकारी आलीस हुआंग यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याची बातमी दिली. चिप उद्योगातील गुपिते मिळवण्यासाठी चिनी सरकारनेच आलीस यांना पेरले आहे हा या बातमीचा सर्वात सनसनाटी भाग! त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी जेन्सेन हुआंग यांचे त्यांच्या कंपनीतील किंबर्ले पावेल यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याची बातमी न्यूयॉर्क टाइम्सने दिली. त्याच दिवशी एनविडियाच्या बोर्ड मीटिंगमध्ये कंपनीच्या नियमांप्रमाणे जेन्सेन यांचा राजीनामा स्वीकारला गेला. त्यानंतर त्यांचे तिसऱ्या एका बाईंबरोबर संबंध असल्याच्याही बातम्या आल्या.

काही वेळा सत्य परिस्थिती एखाद्या काल्पनिक सुरस कथेपेक्षाही चमत्कारिक असते असे म्हणतात. जेम्स बॉण्ड चित्रपटातील कथेलाही मागे टाकेल असे हेरगिरीपासून हनीट्रॅपपर्यंतचे प्रकार प्रत्यक्षात घडत आहेत. विवाहबाह्य संबंध (तेही एक नाही तर तीन) या विषयाबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतूहल! चघळायला आणि रवंथ करायला याहून आणखी काय हवे? अमेरिकेतील टेक कंपन्यांमधील आघाडीच्या एनव्हीडीया कंपनीच्या सर्वेसर्वा व्यक्तीने बाहेरचा रस्ता धरल्यामुळे कंपनीचे समभाग कोसळले हे सांगायलाच नको. पाच ट्रिलियन डॉलर्स एवढे प्रचंड बाजारमूल्य असलेल्या (तुलनेसाठी :भारताची जीडीपी चार ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे) या कंपनीचा आधारवड नाहीसा झाल्यामुळे चिप उद्योग आणि कृत्रिम प्रज्ञा क्षेत्राच्या पायाखालची जमीनच सरकली.

पण हे फक्त हिमनगाचे टोक आहे. पाण्याखालील न दिसणारा भागच यात जास्त! जवळजवळ वर्षभर ट्रम्प प्रशासनाला जेन्सेन - आलीस प्रकरणाची माहिती असून त्यांनी काही केले नाही. जेन्सेन यांची गच्छंती झाली तीही कंपनीच्या नियमांचे उल्लंघन झालेल्या कथित प्रेम प्रकरणामुळे! दिवसागणिक या प्रकरणाचे नवनवे पैलू उजेडात येत आहेत. हे प्रकरण चिघळण्याआधीच ट्रम्प यांनी या कंपनीतले आपले समभाग विकून प्रचंड नफा कमावला अशी वदंता आहे. त्यामुळे सर्व काही नियोजित पद्धतीने केले जात आहे का अशी शंका घेतली जात आहे.

अमेरिकन महाकाय कॉर्पोरेट कंपन्या, त्यांचे समभागमूल्य, वित्त भांडवलाची ताकद, महासत्तांचे एकमेकांशी संबंध, एकमेकांवर कुरघोड्या, हेरगिरी, मधुसापळे (हनीट्रॅप) या सर्व रस्सीखेचित एकच गोष्ट दुर्लक्षित राहते. सर्वसाधारणपणे मधूसापळे म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया या यंत्रणांच्या हातातील कळसुत्री बाहुल्या असतात. काम फत्ते झाल्यानंतर या स्त्रियांचे काय होते? किंवा हे काम उघडकीस आले तर त्यांचे काय होते? खलनायिका म्हणून त्यांची बदनामी होते त्याला जबाबदार कोण?

मधुसापळे रचणे ही प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे. शत्रुपक्षावर हेरगिरी करून लष्करी किंवा इतर गुपिते मिळवण्यासाठी हुशार, चलाख स्त्रियांची नेमणूक करण्यात येत असे. ज्यांच्याकडे अशी माहिती असेल अशा उच्चपदस्थांशी, लष्करी अधिकाऱ्यांशी वैयक्तिक जवळीक साधून त्यांच्याकडून मिळणारी गुप्त माहिती योग्य ठिकाणी पोहोचवणे हे त्यांचे काम असे. प्राचीन लोकगीते आणि वांग्मय यामध्ये हेरगिरी, शत्रूपक्षाचा विध्वंस किंवा हत्या करण्यासाठी पुरुषाला मोहित करण्याची युक्ती वापरल्याचे आढळते. ख्रिस्तपूर्व अकराशे या शतकात सॅमसंगच्या शारीरिक शक्तीचे गुपित शोधून काढण्यासाठी विरोधी नेत्यांनी डिलायला या सुंदर व चलाख स्त्रीला पैसे देऊन त्याला मोहित करण्याच्या व त्याचे गुपित मिळवण्याच्या कामावर नेमल्याचा उल्लेख बायबल मध्ये आढळतो ज्युडिथच्या पुस्तकात असीरियन जनरल होलोफेर्नस याचा विश्वास संपादन करून त्याला मद्यधुंद करून एक विधवा त्याची हत्या करते असा उल्लेख आहे.

भारतामध्ये सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा सल्लागार आर्य चाणक्य (कौटिल्य) याने अर्थशास्त्र या पुस्तकात आकर्षित करणे किंवा प्रलोभन दाखवणे ही राजकीय खेळी म्हणून वापरण्याचा सल्ला राजांना दिला आहे. राजाचे लष्करी अधिकारी अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडतात का याची परीक्षा घेण्यासाठी राजे मदनमोहिनींची योजना करत असत. प्राचीन भारतीय परंपरांमध्ये शत्रूविरुद्ध किंवा राजदरबारातील प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विषकन्यांचा वापर केला जात असे. लहानपणीपासून काही मुलींना विषाचे अतिशय छोटे डोस देऊन त्यांची शरीरे विषारी केली जात. काही मुली हे सहन न झाल्याने मृत्युमुखी पडत. यातून जगल्यावाचलेल्या मुलींच्या स्पर्श, घाम, शरीराचे स्त्राव यातून विष पाझरत असे. कौटिल्याच्या अर्थशास्त्राप्रमाणे लोकगीतांमध्ये व आयुर्वेदिक वाङ्मयातही विषकन्यांचा उल्लेख आढळतो. प्राचीन ग्रीक वाङ्मयात आरिस्टॉटलने अलेक्झांडर द ग्रेट याला याबाबतीत सावध केलेले आढळते.

यानंतर या भुरळ घालून कपटाने हेतू साध्य करण्याच्या पद्धती शेकडो वर्षे युद्धकाळात वापरल्या गेल्या. पहिल्या महायुद्धात माताहारी ही सर्वात गाजलेली मधुसापळा म्हणून वापरलेली गुप्तहेर होती. या डच नर्तकीला जर्मनीची हेर म्हणून फ्रान्समध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पहिले व दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्धाच्या काळात शत्रूला मोहिनी घालून नामोहरम करण्यासाठी स्त्रियांचा सर्रास वापर करण्यात आला. या प्रत्यक्ष परिस्थितीतूनच जेम्स बॉण्डपटांचा जन्म झाला. या सिनेमांनी अर्धनग्न स्त्रियांचे यथेच्छ प्रदर्शन करून प्रचंड पैसा कमावला. स्त्री ही पुरुषाला भुरळ घालून त्याचा सत्यनाश करते हे जुनेच मिथक वापरले गेले. एका बाजूला घर सांभाळणारी मुकाटपणे काम करणारी "चांगली" स्त्री व दुसऱ्या बाजूला ही मोकाट सुटलेली "वाईट" स्त्री अशा स्त्री प्रतिमांना खत पाणी घालण्यात आले.

विसाव्या शतकाच्या शेवटी कॉर्पोरट/ वित्त भांडवलाने आर्थिक क्षेत्रावर मक्तेदारी मिळवली आणि युद्धभूमी शेअर बाजारातही प्रकटली. दररोज कंपन्यांमधील युद्ध तिथे खेळले जाऊ लागले.धंद्यातील गुपिते चोरण्यासाठी अजूनही जुन्याच पद्धती वापरल्या जाऊ लागल्या. हेरगिरीसाठी लक्ष्य ठरवताना त्या व्यक्तीची संवेदनशीलता व कमकुवतपणा शोधला जाऊ लागला. संपत्ती, विचारसरणी, धाकदपटशा किंवा अहंभाव यातील कशाला लक्ष्य करून त्या व्यक्तीकडून गुपिते मिळवता येतील याचा विचार केला जाऊ लागला. प्रभावी पुरुषांशी सलगी करून त्यांच्याकडून तंत्रज्ञानातील गुपिते मिळवण्यासाठी पुन्हा स्त्रियांनाच वापरले जाऊ लागले. भांडवलशाहीच्या या सर्वाधिक आधुनिक अवताराने पितृसत्तेशी हातमिळवणी करून स्त्रियांना आपल्या साध्याचे साधन म्हणून वापरले. कधी त्यांचा शस्त्रास्त्रासारखा वापर केला.

प्राचीन काळापासून जसजशी उत्पादन पद्धती बदलत गेली तसतसा पितृसत्तेने आपला स्त्री शोषणाचा मूळ गाभा तोच ठेवून वरचे स्वरूप बदलले. समाज व्यवस्थेच्या सातत्यासाठी स्त्रीला घरात डांबून कुटुंबाच्या प्रेमाखातर आयुष्यभर तिच्याकडून विनामूल्य काबाडकष्ट करून घेतले. त्यासाठी प्रेम, वात्सल्य या भावनांचा उपयोग करून घेतला. गरज पडेल त्याप्रमाणे तिला सामाजिक उत्पादनव्यवस्थेतही सामावले. पण तृतीयपंथी, वेश्या यांना समाजासाठी वेगळ्या जबाबदाऱ्या देऊन त्यांचेही शोषण केले. हेरगिरीसारख्या अत्यंत जोखमीच्या कामातही काही स्त्रियांची निवड करून गुप्त कामांसाठी त्यांचा वापर केला. यामध्ये फसलेल्या स्त्रियांना कधी तुरुंगवास, कधी अज्ञातवास तर कधी मृत्यूदंडाच्या शिक्षाही झाल्या. आज अत्यंत प्रगत अशा कॉर्पोरेट/ वित्त भांडवलाच्या युगातही स्त्री-पुरुषांमधील आदिम नैसर्गिक आकर्षणाचा गैरफायदा घेऊन कुटील डाव खेळले जात आहेत. याच्याही बळी पुन्हा स्त्रियाच!

Mumbai : शासकीय कर्मचाऱ्यांना घरदिलासा; वांद्रे, पवई, घाटकोपरला ५०० नवी सेवा निवासस्थाने

भारताच्या GDP वाढीची प्रशंसा; डोनाल्ड ट्रम्प यांची फेडरल रिझर्व्हवर टीका

Mumbai : १० महिन्यांत ७ खून, उपनगरीय लोकलमध्ये हत्यासत्र; पश्चिम रेल्वेवर ५, तर मध्य रेल्वेवर २ घटना

नीट पेपरफुटीप्रकरणी बुधवारपासून सुनावणी

Mumbai : पवई तलावावर देशातील सर्वांत भव्य म्युझिकल फाऊंटन; ३० कोटींच्या प्रकल्पाचे आज उद्घाटन, शिवरायांची शौर्यगाथा साकारणार