रिया आळवेकर- भारतातील पहिल्या तृतीयपंथी सरकारी शिक्षिका, ज्यांनी आपल्या अस्तित्वासाठी आणि आत्मसन्मानासाठी केलेल्या संघर्षातून शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक ठसा उमटवला आहे. त्यांचा हा प्रवास म्हणजे धैर्य, इच्छाशक्ती आणि माणुसकीचा विजय आहे.
सर्गाच्या खेळात कधी कधी अशा काही चुका घडतात, ज्याची किंमत त्या व्यक्तीला आयुष्यभर मोजावी लागते. शरीर एका लिंगाचे आणि मन दुसऱ्या ओळखीचे, अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या जीवांची व्यथा सामान्य जग सहजासहजी समजू शकत नाही. मात्र, याच विसंगतीला छेद देत, स्वतःच्या अस्तित्वाचा लढा जिंकणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्राला आपल्या कर्तृत्वाने गवसणी घालणाऱ्या रिया मयुरी आळवेकर यांची संघर्षगाथा ही केवळ एका व्यक्तीचा बदल नाही, तर तो मानवी इच्छाशक्तीचा आणि धैर्याचा एक उत्तुंग अविष्कार आहे हे दिसून येतं.
आपण ज्या समाजात राहतो, तिथे जन्माला येतानाच मुलाचं किंवा मुलीचं भविष्य, त्याचे कपडे, त्याचे खेळ आणि त्याच्या भावनांचं व्याकरणही ठरलेलं असतं. पण प्रवीणच्या बाबतीत हे व्याकरण सुरुवातीपासूनच विसंगत होतं. कोकणच्या निसर्गरम्य हिरवळीत, आंबा-काजूच्या बागांमध्ये प्रवीणचे बालपण फुलत होतं खरं, पण त्याच्या मनात मात्र एक वेगळंच काहूर माजलं होतं. बाहेरून जरी तो एक मुलगा म्हणून वावरत होता, तरी त्याच्या अंतर्मनातून उमटणारे तरंग मात्र काहीतरी वेगळंच सांगत होते. शाळेत मुलांच्या रांगेत बसताना वाटणारी ती अनामिक भीती आणि मुलींच्या घोळक्यात मिळणारा तो सात्विक विसावा, ही प्रवीणच्या आयुष्यातील पहिली मोठी विसंगती होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना शरीरात होणारे बदल जितके नैसर्गिक असतात, तितकेच ते प्रवीणसाठी भयावह आणि शत्रूवत होते. आरशात पाहताना समोर दिसणारा चेहरा, ती रुंद खांद्यांची ठेवण आणि तो पुरुषी आवाज त्याला स्वतःचा वाटतच नसे. जणू एखाद्या स्त्रीच्या नाजूक आत्म्याने चुकून एका खडबडीत पुरुषी मुखवट्यात आश्रय घेतला असावा, अशी त्याची अवस्था झालेली होती. पण समाजाच्या रूढी-परंपरा तोंडण्याचं धाडस हे सर्वांत नसतं आणि जो हे धाडस करतो तो तावून-सुलाखून बाहेर पडतो.
या परिस्थितीत प्रवीणचं मानसिक द्वंद्व इतकं भीषण होतं की, नववी-दहावीच्या वयात जेव्हा जगण्याची स्वप्नं पाहायची असतात, तेव्हा प्रवीणच्या मनात ‘विषाच्या बाटली’चा विचार आला. जेव्हा स्वतःचं शरीरच आपल्याला एखाद्या तुरुंगासारखं वाटू लागतं, तेव्हा जगण्यापेक्षा मरण सोपं वाटतं. ‘मी नेमका कोण आहे? मी कुठे उभा राहू?’ या प्रश्नाचं उत्तर शोधताना प्रवीणची झालेली घुसमट ही शब्दांच्या पलीकडची होती. समाजाच्या टोचणाऱ्या नजरा, घरच्यांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या मनातील तुफानी वादळ यांत प्रवीण अक्षरशः भरडला जात होता. आत्महत्येचा प्रयत्न हा केवळ निराशेचा भाग नव्हता, तर तो चुकीच्या शरीरात जन्मल्याच्या शिक्षेचा एक आकांत होता. पण त्याच काळोखात एक मिणमिणता प्रकाशकिरण त्याच्या आयुष्यात होता तो म्हणजे ‘शिक्षण’. प्रवीणने ठरवलं होतं की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ज्ञानाच्या बळावर स्वतःला सिद्ध करायचं. ‘होईन तर शिक्षकच’ हा त्याने घेतलेला ध्यास म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देण्याचा पहिला प्रयत्न होता. प्रवीणचं शिक्षण पूर्ण झालं आणि २०१२ मध्ये प्रवीण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाला. हातात खडू आणि समोर फळा आला, पण मनातील ती ‘स्त्री’ अजूनही त्या पुरुषी शर्ट-पँटमध्ये गुदमरत होती. वर्गात शिकवताना, मुलांच्या निरागस डोळ्यांत पाहताना प्रवीणला क्षणभर स्वतःच्या वेदनेचा विसर पडायचा, पण शाळा सुटली की पुन्हा तोच एकाकीपणा छळू लागायचा. त्याचं वागणं, बोलणं आणि चालणं यात निसर्गतःच एक स्त्रीसुलभ नाजूकपणा होता. गावकऱ्यांनी किंवा सहकाऱ्यांनी सुरुवातीला त्याला हिणवलं नाही, कारण त्याचं शिकवणं उत्तम होतं. तो मुलांच्यात इतका रमायचा की, पालकांचाही त्याच्यावर विश्वास होता. पण आतून होणारा तो मानसिक रक्तस्राव कुणालाच दिसत नव्हता. मानसोपचार तज्ज्ञांच्या गोळ्या केवळ शरीराला बधिर करत होत्या, पण मनातील स्त्रीत्वाचा ओलावा त्या सुकवू शकत नव्हत्या.
मग पुढे २०१५ मध्ये प्रवीणने एक ऐतिहासिक आणि अत्यंत धाडसी पाऊल उचललं. त्याने ‘हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे समाजाच्या सर्व पारंपरिक भिंती एका दमात पाडण्यासारखा होता. मानसोपचार तज्ज्ञांची प्रमाणपत्रं मिळवणं, औषधांचे होणारे शारीरिक दुष्परिणाम सोसणं, हाडं ठिसूळ होण्याचा धोका पत्करण्याचं धाडस- हे सगळं एका बाजूला आणि स्वतःचं खरं अस्तित्व मिळवण्याची ओढ दुसऱ्या बाजूला असं सगळं सुरू होतं. २०१७ मध्ये त्याने कोल्हापूरच्या मयुरी आळवेकर यांना आपलं ‘गुरू’ मानलं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने ‘रिया’ नावाच्या फिनिक्स पक्ष्याची भरारी सुरू झाली.
रिया साडी नेसून पहिल्यांदा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या समोर उभ्या ठाकल्या. रियाच्या आयुष्यातील तो सर्वात मोठा, थरारक वळणबिंदू होता. रिया म्हणाली, “मी कालपर्यंत प्रवीण होते, आता मला रिया म्हणून जगायचं आहे,” हे वाक्य उच्चारताना तिच्या आवाजात कंप होता, पण काळजात वज्रासारखा निर्धार होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तिची बारकाईने पारख केली. समोर उभी असलेली व्यक्ती केवळ वेशात बदललेली नव्हती, तर ती आपल्या अस्तित्वाच्या अधिकारासाठी एका मोठ्या व्यवस्थेशी भिडत होती. एका स्त्री अधिकाऱ्याने दुसऱ्या स्त्रीच्या अंतरीची व्यथा ओळखून दिलेली ती संवेदनशीलता रियासाठी संजीवनी ठरली. “काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे,” हे शब्द म्हणजे रियाच्या पुनर्जन्माची जणू अधिकृत पावतीच होती. प्रशासनातील प्रजीत नायर आणि महेश धोत्रे यांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दाखवलेली प्रगल्भता ही आजच्या काळात वंदनीय आहे. त्यांनी रिया यांना केवळ नोकरीत संरक्षण दिले नाही, तर त्यांना सन्मानाने ‘मॅडम’ म्हणून वावरण्यासाठी स्वतःच्या कार्यालयात जागा दिली. इथूनच एका नव्या पर्वाला
सुरुवात झाली.
या सर्व बदलाबाबत रिया सांगतात की, “त्यांच्यासारख्या व्यक्तींचा जन्म तीनदा होतो. पहिला आईच्या उदरातून, दुसरा आपली खरी ओळख जगासमोर मांडताना होणाऱ्या सामाजिक संघर्षातून आणि तिसरा म्हणजे जेव्हा शस्त्रक्रियेच्या टेबलावर आपल्या शरीरातील नसा कापल्या जातात तेव्हा. हा तिसरा जन्म सर्वात भयानक आणि वेदनादायी असतो. ज्या देहात आपण आयुष्यभर वावरलो, त्या देहाचा एक भाग चिरून काढणे आणि नवीन ओळख देणारी संरचना जोडणे ही केवळ वैद्यकीय शस्त्रक्रिया नसते. ती मनाची, बुद्धीची आणि भावनांची अग्निपरीक्षा असते. आता जेव्हा मी विचार करते तेव्हा मला अंगावर काटा आणणारी गोष्ट आठवते ती म्हणजे- शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की, “डोळ्यांतून पाणी काढायचं नाही, अन्यथा हार्मोन्सवर विपरीत परिणाम होईल.” ज्या आयुष्यात पावलापावलावर अपमान आणि विवंचना आली, त्या व्यक्तीने रडायचंही नाही? हे कसं शक्य होणार होतं हे मलाही कळत नव्हतं? एकीकडे आनंद ते दुसरीकडे सहनशीलतेचं दुःख.. पण मी श्वासावर नियंत्रण मिळवून तेही साध्य केलं. स्वतःला सावरलं, कारण यातून माझ्या मागे येणाऱ्या हजारो गुदमरलेल्या जीवांसाठी ती एक उमेद असणार होती.” पण या असंख्य वेदानांनतर रिया यांना ओळख मिळाली. हीच ओळख आदर्शवत ठरली.
२२ ऑगस्ट २०२२ हा दिवस सिंधुदुर्गच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. साडी नेसून, कपाळावर आत्मविश्वासाची टिकली लावून आणि डोळ्यांत माणुसकीचं स्वप्न घेऊन जेव्हा रिया ओरोस बुद्रुकच्या शाळेत पाऊल ठेवत होत्या, तेव्हा काळजाची धडधड वाढलेली होती. लोक काय म्हणतील? मुलं स्वीकारतील का? पण माणुसकी अजून जिवंत आहे, याचा प्रत्यय त्यांना आला. शाळेतील शिक्षक-शिक्षिकांनी त्यांना केवळ ‘सहकारी’ म्हणून नाही, तर आपली हक्काची ‘बहीण’ म्हणून सामावून घेतलं. लहान मुलं, ज्यांच्या मनात कोणाबद्दलही पूर्वग्रह नसतात, त्यांनी त्यांना ‘रिया मॅडम’ म्हणून इतका लळा लावला की, जुन्या प्रवीणचं तिथेच खऱ्या अर्थाने विसर्जन झालं. ज्या समाजात तृतीयपंथी व्यक्तींना केवळ उपहासाचा विषय मानलं जातं, तिथे रिया मॅडम आज असंख्य मुलांना शिक्षिका म्हणून घडवत आहेत.
रिया आळवेकर यांची ‘आयडॉल टीचर’ म्हणून झालेली निवड ही त्यांच्या केवळ संघर्षाची पावती नाही, तर त्यांच्या चोख कर्तृत्वाचा तो एक आविष्कार आहे. तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांनी शाळेचं काम ऑनलाइन करण्यात मोठं योगदान दिलं. सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली जिल्हास्तरावरील ट्रॉफी हे त्यांच्यामधील सुप्त कलागुणांचे फळ आहे. रिया म्हणतात, “आम्हाला कलेचं वरदान निसर्गतःच मिळतं.” त्यांच्या नृत्यात, त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या शिकवण्यात एक प्रकारची अतिंद्रिय संवेदनशीलता जाणवते. वर्गाचा गेट ओलांडल्यावर त्या केवळ एक ‘शिक्षिका’ असतात. जगभरातील दुःख, घराची काळजी आणि समाजाचे टोमणे त्या शाळेच्या वेशीवरच सोडून येतात. “माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे” हे साने गुरुजींचे तत्त्व त्या केवळ फळ्यावर लिहीत नाहीत, तर त्या प्रत्येक कृतीतून ते मुलांच्या मनावर कोरत आहेत.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रिया आळवेकर यांची कथा स्त्रीशक्तीचे वेगळे रूप दाखवते. जन्माने नव्हे तर संघर्ष, सामाजिक चटके आणि शिक्षणाच्या बळावर त्यांनी आपले स्त्रीत्व घडवले. सावित्रीबाई फुलेंनी उघडलेल्या शिक्षणाच्या वाटेवर चालत ‘प्रवीण’ ते ‘रिया’ असा त्यांचा प्रवास घडला आणि आज त्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पणदूर नं. १ येथे आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
रिया आळवेकर यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नसून तो मानवी अस्तित्वाचा आणि आत्मसन्मानाचा विजय आहे. समाजाने ज्यांना ‘वेगळे’ मानून परिघाबाहेर ठेवले, त्याच चौकटी मोडून रिया यांनी शिक्षकी पेशातून स्वतःचे वेगळे आकाश निर्माण केले. “पुढचा जन्मही असाच मिळावा,” असे म्हणण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास शेकडो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालेल्या एका समुदायाचा हुंकार आहे. आज सिंधुदुर्गच्या मातीत साडीचा पदर सावरून आत्मविश्वासाने वावरणाऱ्या ‘रिया मॅडम’ केवळ एका समाजाचे नेतृत्व करत नाहीत, तर त्या माणुसकीची एक नवीन आणि व्यापक व्याख्या जगाला शिकवत आहेत. त्यांच्या या संघर्षाचं आणि ध्येयवेड्या अस्तित्वाचं हे ‘अग्निपुष्प’ येणाऱ्या पिढ्यांसाठी अखंड तेवत राहणारी प्रेरणादायी मशाल ठरेल.
शब्दांकन- क्रांती गोडबोले पाटील