अक्षररंग

उत्सव नव्हे, संघर्षाची आठवण

८ मार्चला साजरा होणारा जागतिक महिला दिन अनेकदा शुभेच्छा, भेटवस्तू आणि ऑफर्सपुरता मर्यादित राहतो. परंतु या दिवसामागे महिलांनी समान हक्क, सन्मान आणि न्याय मिळवण्यासाठी केलेल्या दीर्घ संघर्षाचा इतिहास दडलेला आहे. या इतिहासाची जाणीव करून देत, महिला दिनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.

नवशक्ती Web Desk

विशेष

प्रविण शारदा प्रकाश झावरे

८ मार्चला साजरा होणारा जागतिक महिला दिन अनेकदा शुभेच्छा, भेटवस्तू आणि ऑफर्सपुरता मर्यादित राहतो. परंतु या दिवसामागे महिलांनी समान हक्क, सन्मान आणि न्याय मिळवण्यासाठी केलेल्या दीर्घ संघर्षाचा इतिहास दडलेला आहे. या इतिहासाची जाणीव करून देत, महिला दिनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. या दिवशी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो, दुकाने विविध ऑफर्स जाहीर करतात, महिलांसाठी गिफ्ट्स दिली जातात, काही ठिकाणी महिलांना स्वयंपाकातून सुट्टी दिली जाते.

सौंदर्यप्रसाधने, कपडे, दागिने यावर खास सवलती जाहीर होतात. एकंदर पाहिलं तर हा दिवस महिलांचे लाड करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण एक प्रश्न मात्र इथे उभा राहतो की महिला दिनाचा खरा अर्थ इतकाच आहे का?

हा दिवस फक्त महिलांना गिफ्ट देऊन किंवा त्यांचे कौतुक करून साजरा करण्याचा दिवस नाही. या दिवसामागे एक मोठा इतिहास आहे. हा दिवस म्हणजे महिलांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या संघर्षाची आठवण करून देणारा दिवस आहे.

महिला दिनाची सुरुवात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली. त्या काळात महिलांना आज आपण सहज मिळणारे अनेक मूलभूत अधिकारही नव्हते. महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, कामाच्या ठिकाणी समान वेतन मिळत नव्हते, कामाचे तास जास्त आणि परिस्थिती असुरक्षित होती. अनेक ठिकाणी महिलांना शिक्षणापासूनही वंचित ठेवले जात होते. १९०८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हजारो महिला कामगार रस्त्यावर उतरल्या. त्यांनी कामाचे तास १२ वरून ८ पर्यंत कमी करणे, योग्य वेतन मिळणे, सुरक्षित कामाची परिस्थिती आणि मतदानाचा अधिकार यासाठी मोठे आंदोलन केले. या आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.

त्यानंतर १९११ साली न्यूयॉर्कमध्ये एका कपड्यांच्या कारखान्यात भीषण आग लागून अनेक महिला कामगारांचा मृत्यू झाला. या घटनांनी जगभरातील लोकांना महिलांच्या कामाच्या परिस्थितीबद्दल विचार करायला भाग पाडले आणि महिला हक्कांच्या चळवळीला अधिक बळ मिळाले.

यानंतर १९१० साली डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिलांच्या परिषदेत जर्मनीच्या समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. जगभरातील महिलांच्या हक्कांसाठी दरवर्षी एक दिवस साजरा केला जावा, असा त्यांचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला अनेक देशांनी समर्थन दिले आणि पुढे ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जाऊ लागला.

१९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला अधिकृत मान्यता दिली. हा दिवस म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी सुरू झालेल्या चळवळीचे प्रतीक आहे. इतिहासात महिलांनी अनेक अधिकार संघर्ष करून मिळवले. आज आपण जे अधिकार स्वाभाविक मानतो ते मिळवण्यासाठी अनेक महिलांनी मोठा लढा दिला आहे. त्यात मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्त्वाचा होता. न्यूझीलंडमध्ये १८९३ ला पहिल्यांदा हा अधिकार मिळाला, खरंतर न्यूझीलंड हा जगातील पहिला देश ठरला ज्याने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. तसेच भारतात १९५० नंतर संविधानाने सर्व वयस्कांना हे हक्क दिले. शिक्षणाचा अधिकार, नोकरी करण्याचा आणि समान वेतनाचा अधिकार, मालमत्ता आणि संपत्तीवरील हक्क, सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार हे सर्व महिलांनी रक्तपोटीने मिळवले. हे अधिकार फक्त एका दिवसाच्या नाही तर दीर्घ लढ्याने साकारले गेले.

भारतातील स्त्री चळवळीचा इतिहासही तितकाच प्रेरणादायी आहे. एक काळ असा होता की मुलींना शिक्षण देणे समाजाला मान्य नव्हते. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी समाजातील विरोध सहन करत विधवांसाठी आश्रम चालवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया घातला. पंडिता रमाबाई यांनी ‘मुक्ती धर्म’ ही संस्था स्थापन करून विधवांच्या शिक्षणासाठी लढा दिला. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन सोसायटी स्थापन करून महिला सन्मानासाठी सामाजिक सुधारणा घडवल्या. या महिलांनी सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता अशा अन्यायकारक प्रथा मोडून समाजाला नवे दृष्टिकोन दिला.

आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. महिलांनी विज्ञान, शिक्षण, राजकारण, क्रीडा, उद्योग, कला अशा अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. कल्पना चावला अंतराळात गेल्या, इंदिरा गांधी यांनी देश चालवला, पी. व्ही. सिंधू पदक जिंकल्या आणि अनेक महिला नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत. त्या देशाचे, समाजाचे आणि कुटुंबाचे नेतृत्व समर्थपणे करत आहेत. परंतु या प्रगतीसोबत काही प्रश्न अजूनही कायम आहेत. समाजात अजूनही काही ठिकाणी लिंगभेद दिसून येतो.

काही क्षेत्रात महिलांना समान वेतन मिळत नाही भारतात महिलांना पुरुषांच्या ८२% वेतन मिळते. स्त्रियांवरील हिंसा, सामाजिक बंधने आणि असुरक्षितता यांसारख्या समस्या अजूनही पूर्णपणे संपलेल्या नाहीत. दर तासाला एक बलात्कार, तसेच कौटुंबिक हिंसा होतेच आहे.

म्हणूनच महिला दिन हा फक्त शुभेच्छांचा किंवा लाडांचा दिवस नसून जागरूकतेचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला इतिहासाची आठवण करून देतो आणि समाजातील उरलेल्या समस्यांवर विचार करण्यास भाग पाडतो. महिला दिन म्हणजे महिलांचे लाड करण्याचा एक दिवस नाही. तो म्हणजे महिलांच्या संघर्षाची आठवण ठेवण्याचा दिवस आहे. तो समानतेच्या मूल्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे.

समाजाच्या प्रगतीसाठी स्त्री आणि पुरुष दोघेही समान महत्त्वाचे आहेत. एकाच्या प्रगतीशिवाय दुसऱ्याची प्रगती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांचा सन्मान करणे, त्यांना समान संधी देणे आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देणे ही केवळ महिलांची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. स्त्री-पुरुष दोघांनीही हा इतिहास समजून घेतला पाहिजे. ८ मार्च हा दिवस आपल्याला हेच सांगतो “महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसावा. तो वर्षातील प्रत्येक दिवशी आपल्या विचारांमध्ये आणि कृतीत दिसायला हवा.” कारण महिला दिन हा कुठलाही उत्सव नाही… तो समानता, सन्मान आणि न्यायाच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.

कवी, लेखक

Pravinzaware777@gmail.com

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात