अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त
अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

अन्नभेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) वसई-विरारमध्ये धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या १८ दिवसांत विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत १८ दुकाने सील करण्यात आली असून सुमारे १४ लाख रुपयांचा भेसळयुक्त आणि संशयित माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अन्नभेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, वसई-विरार महानगरपालिका हद्दीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त

एफडीएच्या पथकांनी तीन वेगवेगळ्या आस्थापनांवर छापे टाकून ४ हजार ७९८ किलो खाद्यतेल जप्त केले. या तेलाची किंमत ९ लाख १४ हजार ६९८ रुपये इतकी आहे. हे तेल जुन्या आणि पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये साठवून ठेवण्यात आले होते. संबंधित तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त
FDA चे २०३ आस्थापनांवर छापे, १०२ जणांना अटक; तुकाराम मुंढे यांची अवैध गुटखा व भेसळीविरोधात कारवाई

आईस्क्रीम उत्पादकांवरही FDA ची नजर

उन्हाळ्यात वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर एफडीएने आईस्क्रीम उत्पादक आणि विक्रेत्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडील कारवाईत ९८६ लिटर आईस्क्रीम जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १ लाख ९७ हजार २०० रुपये आहे. दर्जात्मक निकषांचे उल्लंघन झाल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

गुटखा विक्रेत्यांवरही कारवाई

भेसळयुक्त अन्नपदार्थांसोबतच प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीविरोधातही कारवाई सुरू आहे. या मोहिमेत १८ दुकाने सील करण्यात आली असून २ लाख १० हजार ५७१ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच १९ जणांना अटक करण्यात आली आहे.

नियमभंग करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाचे पालघर विभागाचे सहाय्यक आयुक्त वेंकटेश चव्हाण यांनी सांगितले की, अन्नभेसळीविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून विविध भागांत विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. वसई-विरार परिसरात अन्नभेसळ किंवा प्रतिबंधित पदार्थांची विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in