अक्षररंग

धार्मिकतेच्या वाटेवर तरुणाई....कशासाठी? कोणासाठी?

प्रबोधन काळात विवेकवाद, तार्किकता, वस्तुनिष्ठता यांचा प्रचार-प्रसार झाला. स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक भारताची उभारणी याच मूल्यांवर झाली. त्याकाळातील धार्मिकताही सहिष्णु होती. पण अलिकडच्या काळात धार्मिक कट्टरता अधिकाधिक वाढत असून तरुणाई आपला अधिकाधिक वेळ धार्मिकतेच्या वाटेवर व्यतीत करत आहे.

नवशक्ती Web Desk

समाजमनाच्या ललित नोंदी

लक्ष्मीकांत देशमुख

प्रबोधन काळात विवेकवाद, तार्किकता, वस्तुनिष्ठता यांचा प्रचार-प्रसार झाला. स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक भारताची उभारणी याच मूल्यांवर झाली. त्याकाळातील धार्मिकताही सहिष्णु होती. पण अलिकडच्या काळात धार्मिक कट्टरता अधिकाधिक वाढत असून तरुणाई आपला अधिकाधिक वेळ धार्मिकतेच्या वाटेवर व्यतीत करत आहे.

नुकत्याच संपलेल्या गणेशोत्सवात ज्या शेकडो ढोलताशा पथकांनी गणेश आगमनाच्या आणि २४ ते ३० तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत जल्लोषात वादन केले व त्यासाठी आधी दोन-दोन महिने रोज दोन ते तीन तास सराव केला, त्यामध्ये किती कामाचे मनुष्य तास - मॅन अवर्स वाया गेले असतील याचा नुसता अंदाज बांधला तरी आजची तरुणाई आपला धर्म व श्रद्धा इंग्रजी म्हणी प्रमाणे ‘Carries religion on the sleeve’ - आपला धर्म उघडपणे मिरवताना दिसत होती. दहा दिवसांच्या गणेशोत्सवातले देखावे, सांजसकाळी होणाऱ्या कंठाळी आरत्या, धार्मिक देखावे आणि रोज न चुकता दर्शन घेणे व रात्री-मध्यरात्री पर्यंत चौकाचौकात हिंडणे...अशा सामाजिक धर्म-श्रद्धा प्रदर्शनाचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे.

आता नवरात्र महोत्सव सुरु झाला आहे. आता पाळी आहे स्त्री वर्गाच्या धार्मिक क्रियाकर्माची. त्यात घराप्रमाणे सार्वजनिक दुर्गा उत्सव, गरबा खेळणे, त्यासाठी तरुण मुलींनी आधी बरेच दिवस टिपऱ्यांचा सराव करणे आणि खास महागडे ड्रेस शिवून घेणे हे मोठ्या प्रमाणात रोजच पाहायला मिळत आहे. पुन्हा नवरात्राच्या नऊ दिवसांचे नऊ रंग व त्या प्रमाणे रोज त्या रंगाची साडी वा ड्रेस परिधान करणे, त्याच्या सेल्फी समाज माध्यमावर व्हायरल करणे...हे वाढत्या धार्मिकतेचे लक्षण नाही तर काय म्हणायचे?

श्रावणापासून भारतात गणेश उत्सव, नवरात्र, दसरा-दिवाळी, संक्रान्त ते होळी असा किमान सहा-सात महिने एकामागोमाग एक सण येतात. या सणांचा मूळ उद्देश वेगळा असताना या सणांच्या निमित्ताने जणू जल्लोषाचा महापूर येतो. नव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षात त्याचे प्रमाण चढत्या क्रमाने वाढत आहे. त्यात किती उत्पादक शक्ती वाया जात असेल? याचा कोणतेही सरकार विचार करीत नाही. उलट सध्याचा काळ हा एक प्रकारे धार्मिक राष्ट्रवादाचा काळ आहे. मागील दहा वर्षांमध्ये उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाने व्यक्तिगत धर्म हा घरात पाळावा आणि सार्वजनिक ठिकाणी भारतीय नागरिक म्हणून नागरी राष्ट्रवाद पाळावा हे संविधानिक सेक्युलॅरीझमचे तत्वज्ञान पार खुंटीस टांगून ठेवत बहुसंख्यवादास - पक्षी हिंदुत्वास केंद्रस्थानी आणत सेक्युलॅरिझम विचार हास्यस्पद करुन टाकण्यात चांगलेच यश संपादन केले आहे.

खरेतर पेव (Pew) संस्थेने पाच वर्षांपूर्वी भारतीयांच्या धार्मिक श्रद्धा आणि आचरणाचे एक व्यापक सर्वेक्षण केले होते, त्यात हिंदुसह शीख, जैन, बौद्ध, मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्माचे ९८ टक्के लोक धर्म व देव मानणारे व दोन तृतीयांशहून अधिक दररोज प्रार्थना, पूजा करणारे वा पूजास्थळांना नियमित जाणारे आहेत.

या सर्वेक्षणातून दिसणारे चित्र अपेक्षितच आहे. कारण भारत हा कट्टर धार्मिक श्रद्धावान धर्मियांचा देश आहे. लेखक शशी थरूर म्हणतात त्याप्रमाणे भारत हे ‘मेल्टिंग पॉट’ नाही तर ‘मेल्टिंग थाळी’ आहे, ज्यात विविध धर्माच्या वाट्या मांडलेल्या आहेत. भारतात धर्म सहिष्णूता आहे. म्हणजे इतर धार्मियांचे अस्तित्व मान्य आहे व त्याविषयी आदर आहे. तरीही साधारणपणे दहा टक्के लोक सोडले तर इतरांचा आंतरधार्मिक विवाहास विरोध आहे. आता तर जिथे जिथे उजव्या विचारांचे सरकार सत्तेवर आहे, तिथे ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदे केले जात आहेत. यातून जे अल्पस्वल्प आंतरधर्मीय विवाह होतात - खास करुन हिंदू मुलींचे मुस्लिम वा ख्रिस्ती मुलांशी - त्यात अडथळा आणला जात आहे. हिंदू धर्मात आंतरजातीय विवाहाला पण अनेक जात-पंचायतींचा विरोध आहे. त्यातून ऑनर किलिंग/ मुला-मुलींचे खून आणि कुटुंबाला वाळीत टाकणे, याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी न होता वाढत आहे.

हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते, पण उजव्या विचारसरणीने गौ रक्षकांचा भस्मासूर निर्माण केला आहे. यातून गेल्या दहा वर्षांत नुसत्या संशयावरून अनेक मुस्लिमांच्या झुंडीने हत्या केल्या गेल्या, त्यात प्रामुख्याने तरुण वर्गाचा सहभाग होता. याच अतिरेकाचा एक भाग म्हणजे शाकाहारी खाद्य संस्कृती थोपणे व सोसायटीत मासमच्छी खाणाऱ्यास जागा न देणे इथपर्यंत विपरीत स्वरूपाचा धार्मिकतेचा प्रसार झाला आहे.

आजची तरुणाई अधिक धार्मिक झाली आहे म्हणजे ती अधिक पुराणातल्या वांग्यात व कधीकाळच्या सुवर्णयुगात रममाण होताना दिसत आहे. आजच्या आधुनिक काळाची आव्हाने वेगळी आहेत. ती ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आहेत. ज्ञानक्षेत्रात दररोज नवी भर पडत असताना ज्ञान साधना करत आर्थिक पुरुषार्थाची कास धरायची सोडून का अधिकाधिक भारतीय तरुण प्रतिगामी होतो आहे? का तो धार्मिक परंपरा आणि रूढी पालनात मग्न होत तारुण्याचा सुवर्ण काळ, ज्यावेळी काही यश आणि नवनिर्माण करुन देश मोठा करण्यात योगदान द्यायचे असते, महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करुन त्यांच्याप्रमाणे मोठे होण्याचा प्रयत्न करायचा असतो, ते सोडून केवळ जयंत्यांमध्ये आणि उत्सवांमध्ये आपली सारी शक्ती का खर्च करत आहेत? सगळ्यांनीच याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे.

शतकापूर्वी विचारवंत बर्ट्रांड रसेल यांनी धर्माचा आधार हा निसर्गातील रहस्यमय बाबी, अमूर्ताची आणि मृत्यूची भीती हा आहे, असे म्हटले आहे. मात्र मागील शतकातील विज्ञानाच्या अफाट प्रगतीनंतरही धर्माचा आधार मोठ्या प्रमाणात कायम आहे. सर्वच धर्माच्या मुलतत्ववाद्यांनी या अमूर्ताच्या भीतीचा वापर करुन लोकांच्या असुरक्षितेला खतपाणी घालून धर्माचा पगडा अधिक घट्ट केला, हे आजचे कटू वास्तव आहे. भारतासह अनेक देशातल्या राज्यसत्ता त्यात सहभागी आहेत व ते देश-समाजाला अज्ञान व अंधश्रध्दांच्या तमोयुगात नेण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात सहिष्णू भारतीयांना कट्टर धार्मिक करण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत, हा खरे तर अभ्यासाचा विषय आहे.

मागील शतकाच्या उत्तरार्धात समाजशास्त्रामध्ये सेक्युलरायझेशन सिद्धांतांचा अधिक अभ्यास होत होता. त्यानुसार जसजशी देशाची आर्थिक प्रगती होते तसतशी लोकांची धार्मिकता कमी होत जाते. उदा. युरोपियन देश. पण नव्या शतकात अमेरिका आणि भारताने हा सेक्युलरायझेशनचा सिद्धांत फोल ठरवला आहे. हे असे का घडले याची कारणमीमांसा करताना भारतीय समाजशास्त्रज्ज्ञ राजीव भार्गव सांगतात, “वाढती आर्थिक विषमता आणि उदारीकरणाच्या काळात वाढणारे वाढते असमाधान व भीती यामागे आहे. दुसरे कारण म्हणजे जगाने सर्वत्र घेतलेले उजव्या विचारांचे वळण आणि रोजीरोटीच्या प्रश्नावरून तरुणाईच्या असंतोषचा उद्रेक होऊ नये म्हणून धार्मिक ओळख हा अस्मितेचा आणि गर्वाचा विषय करणे होय.” त्यामुळे तरुण आधुनिक मुल्यांपेक्षा धार्मिक श्रद्धा अधिक महत्त्वाची मानू लागले आहेत.

हिंदू धर्मावर विपुल लेखन करणारे देवदत्त पटनाईक वाढत्या धार्मिकतेचे समर्थन करताना एक वेगळा विचार मांडतात. ते म्हणतात की, “विज्ञानाने सदैव आपल्या समृद्ध प्राचीन सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगण्यापासून परावृत्त केले आहे. विवेकवादाच्या नावाने या जुन्या परंपरा त्याज्य व मागस मानण्यात आल्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून आज देशात भक्तीची लाट आली आहे.” या विचारात थोडे तथ्य जरूर आहे, पण आजच्या वाढत्या धार्मिकतेचे हे समर्थन जास्त व कारणांचा मुलगामी शोध घेणे कमी आहे.

स्पष्टपणे सांगायचे झाले तर गेली शंभर वर्षे हिंदुत्वाचा जो प्रचार केला गेला आहे व केंद्रात २०१४ साली सत्तांतर झाल्यापासून धार्मिकतेला अधिक उधाण आले आहे. हिंदू धर्म व परंपरांना प्रत्येक कार्यक्रमात उघडपणे पुढे आणत संविधानिक सेक्युलॅरिझमला एकप्रकारे बाद करण्यात आले आहे. रामजन्मभूमी आंदोलनापासून हिंदुत्वाची भरधाव घोडदौड चालू झाली आहे आणि त्याच्या प्रभावाखाली आजची तरुणाई मोठया प्रमाणात आली आहे. नेहरूंच्या काळातले तरुण विज्ञान निष्ठा, विवेकवाद आणि ‘हिंदू मुस्लिम शिख इसाई - हम सब है भाई भाई’ या सर्वधर्मसमभावाच्या विचारांचा होता. तर आज वर्तमानातला तरुण हा छद्मविज्ञानी, अंधश्रध्दाळू, परधर्माबद्दल वाढत्या प्रमाणात अनुदार-असहिष्णू असा झाला आहे.

याला ‘कालाय तस्मै नम:’ असे म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?

ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत