आभाळाएवढा आनंद 
अक्षररंग

आभाळाएवढा आनंद

एका धाडसी मुलीची प्रेरणादायी गोष्ट...

नवशक्ती Web Desk

कथा

एकनाथ आव्हाड

एका धाडसी मुलीची प्रेरणादायी गोष्ट...

रियाने आठवीच्या वर्गात जेव्हा पहिले पाऊल ठेवले, तेव्हा तिचे पाय थरथरत होते. मनात प्रचंड धडधड आणि डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. वर्गातील प्रत्येक मूल या नवीन विद्यार्थिनीकडे उत्सुकतेने अन् निरखून पाहत होते. कपाळावर उमटलेला उजळपणा, दोन लांबसडक वेण्या आणि बोलके डोळे असलेली रिया मूळची सिन्नर तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातली. घरातल्या अचानक उद्भवलेल्या कौटुंबिक वादांमुळे तिचे आई-वडील गाव सोडून मुंबईत आले होते. रिया आणि तिचा धाकटा भाऊ परशुराम यांच्यासाठी हे संपूर्ण शहर, इथली माणसे आणि ही महानगरपालिकेची नवी शाळा एकदम अनोळखी होती. नातेवाइकांच्या मदतीने एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहत, भाजी विक्रीचा व्यवसाय करून तिचे आई-बाबा कुटुंबाचा गाडा हाकत होते.

शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गाच्या शेवटच्या बाकावर रिकामी जागा पाहून रिया गप्पचाप जाऊन बसली. नवीन वातावरण, अनोळखी चेहरे आणि आपली गावची बोलीभाषा... या सर्व गोष्टींमुळे तिच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. तिच्यात कोणाशी जाऊन बोलण्याचे धैर्य नव्हते आणि वर्गातील मुलेही तिच्याकडे कुतूहलाने पाहत असली तरी तिच्याजवळ कोणी आले नाही.

तेवढ्यात हातात हजेरी पटाचा कॅटलॉग आणि नवीन पुस्तकांचा गठ्ठा घेऊन सरोदे सर वर्गात आले. सरोदे सर हे आठवीचे वर्गशिक्षक तर होतेच, पण त्यासोबतच ते उत्तम मराठी शिकवणारे आणि अत्यंत रंजक पद्धतीने गोष्टी सांगणारे शिक्षक म्हणून संपूर्ण शाळेत प्रसिद्ध होते. मुले त्यांचे धडे अगदी मनापासून ऐकायची. सरांनी हजेरी घेताना रियाला बोलावले, तिची आपुलकीने विचारपूस केली आणि तिच्या हातात नवीन पुस्तकांचा गठ्ठा सोपवत म्हणाले, “आता मन लावून छान अभ्यास करायचा.” सरांनी वर्गातील इतर मुलांनाही रियाची ओळख करून दिली आणि टाळ्या वाजवून तिचे स्वागत करायला सांगितले. सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या, पण तरीही स्वतःतील कमी आत्मविश्वासामुळे रिया नेहमी एकांतातच राहायची. ती एकटीच बसायची, एकटीच डबा खायची आणि मोकळ्या वेळात पुस्तके वाचण्यात रमून जायची.

दिवसांमागून दिवस जात होते. जानेवारी महिना उजाडला आणि शाळेत आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेचे परिपत्रक आले. सरोदे सरांनी या स्पर्धेसाठी ‘कमलची जिद्द’ नावाचे एक अतिशय सुंदर नाटक लिहिले होते. अडचणींवर मात करून शिक्षणाची वाट धरणार्या एका ग्रामीण भागातील मुलीची ही कथा होती. उत्साही मुलांनी नाटकात काम करण्यासाठी आपली नावे दिली आणि तालमी सुरू झाल्या. रिया मात्र या सर्व गदारोळापासून लांबच होती.

नाटकाची स्पर्धा अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेपली आणि अचानक एक मोठी अडचण उभी राहिली. मुख्य भूमिका साकारणारी सोनाली गंभीर आजारी पडली. आता कमलचे पात्र कोणाला द्यायचे, हा मोठा प्रश्न सरांसमोर उभा राहिला. कोणीही नवीन मुलगी ते पात्र करायला तयार होत नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी परिपाठाच्या वेळी सरोदे सरांनी मुलांना स्वामी विवेकानंदांचा एक प्रसंग ऐकवला. स्वामीजींनी एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या बळावर पाण्याच्या लाटांवर तरंगणाऱ्या अंड्यांच्या कवचांवर बंदूक मारून कसा अचूक नेम धरला होता, हे सांगताना सर म्हणाले, “मुलांनो, एकाग्रता, आत्मविश्वास आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न यांची बेरीज म्हणजेच यश! आयुष्यात हरण्याची भीती कधीही बाळगू नका.” सरांनी मुलांना आत्मविश्वासाचे महत्त्व सांगताना 'आइस्क्रीम'चे रूपक वापरले— आत्मविश्वासाचा ‘आ’, इच्छाशक्तीचा ‘इ’, सकारात्मक दृष्टिकोनाचा ‘स’, क्रियाशीलतेचा ‘क्री’ आणि महत्त्वाकांक्षेचा ‘म’. सरांच्या या विचारांचा रियाच्या मनावर खोल प्रभाव पडला. तिने ठरवले की, आता संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जायचे.

परिपाठ संपल्यावर वर्गात येऊन सरांनी पुन्हा विचारले, “सोनाली आजारी असल्यामुळे कमलची भूमिका करायला कोणी तयार आहे का? हे नाटक ग्रामीण बोलीभाषेतले आहे.” संपूर्ण वर्गात शांतता पसरली.

तेवढ्यात शेवटच्या बाकावरून रिया हळूच उभी राहिली. तिच्यात कुठून एवढे धैर्य आले कोणास ठाऊक! ती आत्मविश्वासाने म्हणाली, “सर, म्या करील नाटकात काम. गावाकडं साळत म्या केलंय नाटकात काम.” तिची ग्रामीण भाषा ऐकून वर्गातील काही मुले हसली, पण सरांनी मुलांना त्वरित शांत केले. सर रियाचे कौतुक करत म्हणाले, “शब्बास रिया! लोकांचे कौतुक आपल्याला प्रेरणा देते आणि टीका सुधारण्याची संधी. कोणाचाही विचार न करता तू घाबरू नकोस, तयारीला लाग.”

स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक होते. रियाने दिवस-रात्र एक करून नाटकातील सर्व संवाद पाठ केले. तासनतास तालमी केल्या. तिचा धाकटा भाऊ परशुराम नेहमी तिच्यासोबत असायचा.

अखेर बालनाट्य स्पर्धेचा दिवस उजाडला. शहरातील विविध शाळांमधून एकूण दहा नाटके या स्पर्धेत आली होती. रियाच्या मनात थोडी धाकधूक असली, तरी तिने आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही. रंगमंचावर पडदा उघडला अन् रियाने आपल्या सहज आणि जिवंत अभिनयाने कमलचे पात्र हुबेहूब साकारले.

संध्याकाळी निकालाची वेळ आली. सरोदे सरांच्या ‘कमलची जिद्द’ या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. आणि त्यानंतर जेव्हा निवेदकाने ‘सर्वोत्कृष्ट अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस’ म्हणून रिया दराडे या नाव पुकारले, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

आपले नाव ऐकून रियाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सरोदे सरांनी स्वतः तिला व्यासपीठावर नेले. परीक्षकांनी तिच्या हाती ढाल आणि प्रशस्तीपत्रक सोपवले. माईक हातात आल्यावर रिया गदगदलेल्या आवाजात म्हणाली, “मला हे बक्षीस मिळवून आज आभाळाएवढा आनंद झाला आहे. माझ्या सरोदे सरांनीच माझ्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण केला. यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो, हे आज सिद्ध झाले.”

रियाने ते बक्षीस आदराने सरोदे सरांच्या हातात दिले. एका भीतऱ्या मुलीचा हा यशस्वी अन् आत्मविश्वासी प्रवास पाहून सरोदे सरांचेही डोळे अभिमानाने आणि आनंदाने भरून आले होते.

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

OCI कार्डधारकांना ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai : अंधेरी-घाटकोपर प्रवाशांना मोठा दिलासा; मेट्रो वन आता दर ३ मिनिटांनी धावणार

Mumbai : पदपथांच्या पाहणीत हयगय झाल्यास अभियंते जबाबदार; 'पादचारी प्रथम' या अभियानांतर्गत प्रशासनाचा इशारा

Mumbai : डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी जीवावर बेतली; कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू

Mumbai : मुलुंड येथील बेस्ट बस अपघात प्रकरण; चालकाविरोधात गुन्हा, बस पोलिसांच्या ताब्यात