अक्षररंग

मनातल्या गुदगुल्या… शिकण्याचा उलगडा

वर्गातल्या एका छोट्या क्षणातून उमललेला शिकण्याचा आनंद-लेकरांच्या मनातल्या गुदगुल्यांमधून आत्मविश्वास कसा फुलतो, याची ही हळवी आणि प्रेरणादायी गोष्ट.

नवशक्ती Web Desk

शिक्षणगुज

युवराज माने

वर्गातल्या एका छोट्या क्षणातून उमललेला शिकण्याचा आनंद-लेकरांच्या मनातल्या गुदगुल्यांमधून आत्मविश्वास कसा फुलतो, याची ही हळवी आणि प्रेरणादायी गोष्ट.

शिकणं कधी गोंगाटात घडत नाही… ते अलगद एखाद्या लेकराच्या मनात उमलतं… आणि शिक्षकाच्या हृदयात नुसत्या गुदगुल्या करून जातं.

ही त्या गुदगुल्यांची एका साध्या पण जिवंत वर्गक्षणाची गोष्ट. सकाळचा वर्ग नुकताच सुरू झाला होता. कोणी वही उघडत होतं, कोणी पाटी पुसत होतं, गोंगाटातही एक निरागस लय होती. इतक्यात खुशी धावत माझ्या जवळ आली. चेहऱ्यावर तेज, डोळ्यांत चमक आणि आवाजात थोडीशी धडधड. ती म्हणाली, “गुरुजी… मला कसंतरीच होतंय...” क्षणभर काळजी वाटली.

“काय झालं गं? तब्येत बरी नाही का?”

ती खळखळून हसली आणि थोडी लाजत म्हणाली-

“नाही गुरुजी, माझ्या मनात नुसत्या गुदगुल्या होत आहेत!”

मी हातातलं काम बाजूला ठेवलं.

“अगं… सांग ना नीट.”

ती चमकत्या डोळ्यांनी म्हणाली, “गुरुजी, मला आता इंग्रजी वाचता येऊ लागलंय!

काल घरी आईसमोर मोठ्यानं वाचलं. आई म्हणाली, “अगं, तू तर भारी झालीस!” तेव्हापासून माझ्या मनात नुसत्या गुदगुल्या होतायत. तिचे शब्द ऐकताच माझ्याही मनात गुदगुल्या सुरू झाल्या. त्या लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू एखाद्या नव्या पहाटेसारखा उजळला होता. मी तिला जवळ घेतलं. ती हसतच राहिली आणि मला जाणवलं; आज एका लेकरानं स्वतःचं नवं आकाश गाठलं आहे. दुपारपर्यंत आम्ही एकमेकांकडे पाहून हसत होतो. मी शिकवत होतो आणि तिच्या चेहऱ्यावर उमटणारा आत्मविश्वास टिपत होतो. दुपारच्या वाचनाच्या आनंद सोहळ्यात मी तो प्रसंग वर्गासमोर सांगितला. लेकरांच्या डोळ्यांत उत्सुकतेची चमक उमटली.

मी विचारलं, “मुलांनो… तुम्हाला काही नवीन जमू लागलं की तुमच्या मनात काय होतं?”

क्षणात हात वर झाले. कल्याणी म्हणाली, “गुरुजी आधी टेन्स कळत नव्हते. आता समजू लागले. मला वाटतं मी पक्षी झालेय आणि आकाशात उडतेय!”

स्वाती म्हणाली, “आधी गणित बघितलं की भीती वाटायची. आता उदाहरण सुटलं की, मी वहीला मिठी मारते आणि मनात गुदगुल्या होतात!”

दिशा शांतपणे म्हणाली, “पाहुण्यांना Thank you म्हटलं की मला वाटतं मी मोठी झाले.”

मनीषा उड्या मारत म्हणाली, “नवं काही जमलं की, मी घरी सगळ्यांना सांगते आणि उड्या मारते!”

अंजूताई म्हणाली, “आता मला मराठी-इंग्रजी वाचता येतं. मी लहान भावाला गोष्ट वाचून दाखवते. तो हसतो तेव्हा मला खूप आनंद होतो.”

शीतल तालात म्हणाली, “काही जमलं की माझे पाय आपोआप नाचायला लागतात!”

साक्षी खट्याळपणे म्हणाली, “गणित सुटलं की

मी मनात म्हणते ‘येस! मी जिंकले!’”

प्रयास म्हणाला, “प्रश्नाचं उत्तर दिलं की मित्र म्हणतात ‘भारी!’ तेव्हा वाटतं आपण सुपरहिरो आहोत!”

बराच वेळ शांत बसलेली ममता हळू आवाजात म्हणाली, “गुरुजी तुम्ही शाबासकी देता, डोक्यावर हात ठेवता तेव्हा मला खूप आनंद होतो. आता मला छान लिहिता-वाचता येतंय. मी आईला पत्र लिहिलं, आईने मला मिठी मारली.”

क्षणभर वर्गात शांतता पसरली, मग टाळ्यांचा गजर झाला. त्या दिवशी वर्गात शब्द नव्हते. होते आनंदाचे तुषार; जे माझ्या शिक्षकमनावर अलगद बरसत होते आणि मला पुन्हा जाणवलं- शिक्षण हे फक्त अक्षर शिकवणं नाही ते आत्मविश्वासाची पहिली चाहूल आहे. लेकरांच्या छोट्या यशात एक मोठं जग दडलेलं असतं. त्या दिवशी वर्ग संपला लेकरं घरी गेली, पण त्यांच्या शब्दांच्या गुदगुल्या माझ्या मनात अजूनही उमलत राहिल्या. जणू बंद ओंजळीत जपलेला एक छोटासा पण अमूल्य आनंद.

शिक्षणगूज : लेकरांना काही नवीन जमू लागलं की त्यांच्या मनात उमलणारा आनंद ऐकणं हीच शिक्षकाची खरी साधना आहे. चुका, प्रयत्न आणि छोट्या यशातून आत्मविश्वास फुलतो. जेव्हा शिक्षक लेकरांच्या भावनांशी जोडला जातो तेव्हा शिक्षण पाठ्यपुस्तकात राहत नाही- ते त्यांच्या मनात रुजतं आणि आयुष्यभर सोबत राहतं.

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात.

yuvrajmane892@gmail.com

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड