दोन खंडांना जोडणारा दुवा इस्तंबुल! 
अक्षररंग

दोन खंडांना जोडणारा दुवा इस्तंबुल!

एका बाजूला आशिया, दुसऱ्या बाजूला युरोप आणि मध्ये बोस्फोरसची खाडी... इस्तंबूलचं हे अनोखं रूप पहिल्याच भेटीत मन जिंकून घेतं. रोमन, बायझंटाईन आणि ऑटोमन साम्राज्यांच्या खुणांनी सजलेलं हे शहर इतिहास आणि वास्तुकलेच्या प्रेमींसाठी पर्वणीच!

नवशक्ती Web Desk

जगतवारी

मेधा आलकरी

एका बाजूला आशिया, दुसऱ्या बाजूला युरोप आणि मध्ये बोस्फोरसची खाडी... इस्तंबूलचं हे अनोखं रूप पहिल्याच भेटीत मन जिंकून घेतं. रोमन, बायझंटाईन आणि ऑटोमन साम्राज्यांच्या खुणांनी सजलेलं हे शहर इतिहास आणि वास्तुकलेच्या प्रेमींसाठी पर्वणीच!

काही काही शहरं मला न पाहताच, नुसत्या नावामुळे आवडून जातात. तुर्कस्तानातील इस्तंबूल शहर हे त्याच रांगेतलं. तिथला सुलतान, त्याचा तो टोप, लांब घेरदार भरजरी झगा, आकडेदार जोडे, त्याचे आलिशान महाल, गुसलखाने, असंख्य राण्या याबद्दल लहानपणीच्या गोष्टींच्या पुस्तकात बरंच वाचलं होतं. इतिहासाच्या या रंजक पार्श्वभूमीवर भूगोलात त्याचं स्थान नक्की कुठे आहे ते बघावं म्हणून जगाच्या नकाशावरील हा ठिपका शोधायला बसले आणि मग तर हे शहर आणखीनच आवडून गेलं. कारण हा आहे युरोप आणि आशिया या खंडांना जोडणारा दुवा ! इस्तंबूलमधील काही ठिकाणं युरोप खंडात तर काही आशिया खंडात मोडतात.

या शहराच्या प्रथम वसाहतीबद्दल एक मजेशीर लोककथा ऐकली. ग्रीसमधील बायझस नावाच्या राजानं नवीन शहर वसवण्यासाठी उत्तर-पूर्व दिशेला कूच केलं. मोहिमेवर निघण्यापूर्वी तिथल्या प्रथेनुसार त्याने भविष्यवेत्त्या व्यक्तीचा सल्ला घेतला. ‘आंधळ्यांच्या वसाहतीसमोर तू तुझं बस्तान बसव’ असा गूढ आदेश त्यांनी दिला. बायझस भूमध्य समुद्राकडून मारमारा समुद्रमार्गे काळ्या समुद्राकडे निघाला. त्याला आशिया खंडाच्या तीरावर वस्ती दिसू लागली. त्यानं वळून पश्चिमेकडे पाहिलं असता त्याला युरोप खंडातील ‘गोल्डन हॉर्न’ हे नैसर्गिक बंदर दिसलं. बोस्फोरस खाडी आणि त्याचा नयनरम्य किनारा पाहून तो हरखून गेला. इतकं सुंदर आणि मोक्याचं ठिकाण सोडून विरुद्ध दिशेला वस्ती करून राहिलेले हे लोक बहुदा आंधळे असावेत असा विचार मनात येताच त्याला ऋषींच्या त्या गूढ आदेशाची आठवण झाली आणि तो हसला. त्याने मग तत्परतेने गोल्डन हॉर्न बंदरामध्ये आपला नांगर टाकला. या बंदराचा उपयोग व्यापार आणि वाहतुकीसाठी करून घेतल्यामुळे बोस्फोरस खाडीच्या किनाऱ्यावर त्याने केलेली वस्ती हळूहळू फोफावत गेली. इ.स.पूर्व ६५७मध्ये वसलेल्या या शहराला बायझंटीयम हे नाव मिळालं. त्यानंतर पर्शियन, रोमन अशा बऱ्याच राजवटींच्या हातून कधी छळवादाला तोंड देत; तर कधी समृद्धीची चैन लुटत, कधी रणभूमी बनून; तर कधी राजधानीचं बिरुद मिरवत या बायझंटीयमचं कॉन्स्टॅन्टिनोपल आणि कालांतरानं इस्तंबूल असं नामकरण झालं. नवनवीन राजवटी आपापल्या आवडीप्रमाणे शहरात भव्य इमारतींची, किल्ल्यांची चर्च वा मशिदींची भर टाकत गेल्या. १४५३ ते १९२३ पर्यंत पाचशे वर्षं मात्र इथे उस्मान गाझीच्या वंशावळीची राजवट राहिली. सुलतानाने आजूबाजूचे प्रदेश आपल्या कब्जात घेतले. त्या काळात खूप चढउतार झाले. त्यात ही राजधानी कधी सोन्याची लंका तर कधी लंकेची पार्वती बनून राहिली. शेवटी १९२३ साली राष्ट्रपिता मुस्तफा कमाल अतारतुर्क यांच्या अविरत प्रयत्नांनी सुलतानाच्या राजवटीचा अंत झाला आणि टर्की हे प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित झालं.

कडू गोड़ आठवणींना दूर ठेवावं म्हणून आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं देशाच्या मध्यभागी असावं म्हणून इस्तंबूल ऐवजी अंकारा शहराला राजधानीचा मान मिळाला. कधीकाळी पूर्वेकडील पॅरिस म्हणून गौरवलं जाणारं इस्तंबूल हळूहळू आपली शान गमावून बसलं. मात्र इतिहासाच्या पानांची साक्ष असलेलं हे शहर पर्यटकांनी अक्षरशः उचलून धरलं. आशिया, युरोप आणि अमेरिकेतून पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे इस्तंबूलमध्ये येतात. नवं शहर अद्ययावत सुखसोयींनी सुसज्ज असलं, तरी जुनं शहर आपल्याला भूतकाळात घेऊन जातं. प्रथमतः मनात भरतात त्या तेथील वास्तू. सुलतानाच्या राजवटीत, इस्लाम धर्माला अनुसरून शिल्पकला व चित्रकला यांवर बंदी असल्यामुळे वास्तुशिल्पांवर मोठाच भर होता. इस्तंबूलमध्ये भव्य मशिदी, महाल, मदरसा, हमाम (न्हाणीघरं) अशा आकर्षक इमारती अजूनही दिमाखात उभ्या आहेत.

रोमन साम्राज्याची शान म्हणवून घेणारं ‘अया सोफाया’ चर्च, वरवर पाहता कुठल्याही आधाराशिवाय उभा असलेला त्याचा भव्य घुमट , घुमटाच्या आतील बाजूस लावलेल्या तीन करोड सोनेरी मोझॅइक फरशा हे सारं आपल्याला अचंबित करून जातं. इस्लामचा प्रवेश टर्कीमध्ये झाला त्यानंतर बहुतांश चर्चचं मशिदीत रूपांतर झालं. इस्लामच्या निराकारवादात येशू अन माता मेरीच्या पूजनीय प्रतिमांना स्थान नव्हतं. मात्र त्यांचा विध्वंस न करता सुलतानाने त्यावर प्लास्टरचा लेप लावला. मध्यावर असलेलं ‘मॅडोना अँड चाईल्ड’ हे सोनेरी मोझॅइक फरश्यांनी बनवलेलं अप्रतिम चित्र लेपाचे पोपडे पडून गेल्यामुळे आता अगदी स्पष्ट दिसतं. मोझॅइक ही अरब देशात आढळणारी पुरातन कला आहे. विविध रंगांच्या फरश्यांचे, संगमरवरी दगडांचे छोटे छोटे चौकोनी, आयताकृती तुकडे हव्या त्या आकारात करून आणि नंतर ते डकवून हे सुंदर नक्षीकाम केलं जातं. फुलं, पानं, फळं, पक्षी आणि भूमितीतले आकार यापेक्षा व्यक्तिरेखांना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांसह या मोझॅइकमध्ये जिवंत करणं हे एक आगळं कसब आहे. पहिल्या मजल्यावरील गॅलरीत जॉन द बाप्टिस्ट, वर्जिन मेरी, क्राईस्ट आणि थोर राजराण्यांची मूळ चित्रं किंचित खराब झाली असली तरी जपून ठेवली आहेत. ही पुरातन चित्रं इस्तंबूलमधील अनेक चित्रकारांची प्रेरणास्रोत आहेत. त्यांना त्यांच्या मूळ अवस्थेत जिवंत करणारी प्रदर्शनं इस्तंबूलमध्ये ठिकठिकाणी भरत असतात. आम्ही पाहिलेल्या अशाच एका प्रदर्शनातली ब्रशच्या साहाय्याने काढलेली चित्रं, मोझॅइक तर नाही ना ? अशी शंका यावी इतकी उत्कृष्ट होती. गॅलरीत उभं राहिलं की खालील प्रार्थनागृह पूर्णपणे नजरेच्या टप्प्यात येतं. प्रार्थनागृहात उभं राहून त्या भव्य घुमटाच्या आतील बाजूस असलेली चित्रं बघण्यासाठी मान बरीच वाकडी करावी लागते. घुमटाच्या तळाशी अतिशय रेखीव अरबी अक्षरं कोरलेले गोल बसवले आहेत. कॅलिग्राफी हीसुद्धा एक पुरातन मुसलमानी कला आहे. हस्ताक्षरातील रेषा आणि त्यांचे रफार मिळून एक आकर्षक डिझाईन बनवणं हा या हस्ताक्षरकलेचा आत्मा. ऑटोमन साम्राज्यातील प्रत्येक सुलतानाची खास वेगळी मोहोर म्हणजे कॅलिग्राफीचा एकेक उत्कृष्ट नमुना होय. या भव्य वास्तूचा प्रभाव आपल्यावर पडल्याशिवाय राहत नाही.

बाहेर पडत असताना एका खांबासमोर मोठी रांग लागलेली पाहिली. आमच्यामधील कुतूहल जागृत झालं. प्रत्येक माणूस आपली पाळी आली की त्या खांबावरील छिद्रात बोट घालून पाहत होता. या खांबाला ‘व्हिपिंग कॉलम’ असं म्हणतात. छिद्रात बोट घालून मनात इच्छा धरली आणि बोटाला ओलावा लागला तर इच्छापूर्ती होते अशी तिथल्या भक्तांची श्रद्धा आहे. आमच्या नशिबी दुष्काळच आला.

दुरूनही लक्ष वेधून घेणारी आकर्षक टुमदार ‘निळी मशीद’ ही इस्तंबुलची निशाणीच ! रोमन राजा जस्टनिनच्या अया सोफायाला टक्कर देणारं एक वास्तुशिल्प मी बांधीन असा विडा उचललेल्या सुलतान अहमदने सोळाव्या शतकात ही मशीद बांधली. अया सोफायाची जादू आतल्या घुमटावर तर या ब्ल्यू मॉस्कची घुमटाच्या बाहेरील बाजूस! छोट्या छोट्या घुमटांची मोहक रचना आणि चार नव्हे तर सहा उंच मिनार हा त्याचा वेगळेपणा ! मशिदीच्या आतल्या भिंतीवर लावलेल्या निळ्या इझनीक फरश्यांमुळे या मशिदीला ‘ब्ल्यू’ हे नाव पडलं. मशिदीचा भव्य घुमट चार मोठ्या खांबांवर विसावला आहे. या उलट अया सोफायाच्या घुमटाला चाळीस फासळ्यांचा आधार आहे आणि या फासळ्यांना खांबांचा. पण ते खांब आहेत भिंतीत चिणलेले. त्यामुळे सकृतदर्शनी हा घुमट आधाराविना उभा आहे असं वाटतं. हेच अया सोफायाचं वैशिष्ट्य ! त्यामुळे ब्ल्यू मॉस्क हे खरंच अया सोफायाला टक्कर देणारं वास्तुशिल्प आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे. मला मात्र या दोन्ही भव्य आणि सुंदर वास्तू खूप आवडल्या.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

पाकच्या 'फसवणुकी'चा बुरखा भारताने फाडला; मालिया 'गंभीर परिणामां'चा सज्जड दम