स्मरण
सुकल्प कारंजेकर
नुकतंच १ ऑक्टोबरला जेन गुडॉल यांचं निधन झालं. वयाच्या नव्वदीतही कार्यरत असणारी पर्यावरणवादी शास्त्रज्ञ आणि कार्यकर्ती अशी जेन यांची जगभर ओळख होती. जेन यांचं पहिलं प्रेम चिपांझी हे होतं आणि या प्रेमापोटी, आपल्या लाडक्या चिपांझींसाठी, ते राहत असलेल्या जंगलाच्या रक्षणासाठी जेन वेगवेगळ्या व्यवस्थांशी, सत्तांशी संघर्ष करत होत्या, संवाद साधत होत्या. पर्यावरण ओरबाडणाऱ्या व्यवस्थांशी आज असा संवाद साधणं शक्य आहे का? या प्रश्नासह जेन यांचं स्मरण करणं आवश्यक आहे.
मला जंगलात एकट्यानं चिपांझींचं निरीक्षण करत शांत आयुष्य घालवायला आवडलं असतं. पण माझ्या चिपांझींचं जग हळूहळू नष्ट होत होतं. हे थांबवण्यासाठी मला काहीतरी करणं भाग होतं. परिस्थितीमुळे मला शास्त्रज्ञाची भूमिका त्यागून कार्यकर्तीच्या भूमिकेत शिरणं भाग पडलं.” असं एका मुलाखतीत जेन गुडॉल यांनी म्हटलं होतं.
वयाच्या ९१ व्या वर्षातही त्या अखंड कार्यरत होत्या. जगभर हिंडत होत्या. एका वर्षात त्यांचे ३०० हून अधिक कार्यक्रम व्हायचे. लहानथोर सर्वांशी त्या संवाद साधायच्या. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जागृती घडवायच्या. पृथ्वी एकट्या माणसाची नाही. इथे इतर प्रजातींना देखील जगण्याचा हक्क आहे. भावभावना फक्त माणसालाच नसतात. चिपांझीसारख्या प्राण्यांनाही भावभावना, सामाजिक जीवन असतं, याची जाणीव त्यांनी जगाला करून दिली. जेन गुडॉल यांचा प्रवास आता थांबला आहे. पण निसर्गावर प्रेम करण्याच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा त्यांनी जगभरातील लोकांना दिली आहे.
चिपांझींचं पद्धतशीर निरीक्षण
जेन गुडॉल यांचा जन्म ३ एप्रिल १९३४ साली लंडनला झाला. प्राण्यांशी संवाद साधणाऱ्या डॉ. डूलिटिल यांच्या गोष्टीचं पुस्तक लहानपणी त्यांचं आवडतं होतं. मोठेपणी आफ्रिकेत जाऊन जंगलात राहावं, प्राण्यांशी संवाद साधावा, असं त्यांना वाटायचं. पण हे काम मुलींचं नाही, जंगलात भटकणारे संशोधक फक्त पुरुषच असतात, असं त्यांना सांगण्यात यायचं. मात्र जेन यांचं हे स्वप्न चिवट होतं. ते साकार झालं लुईस लीकी या आफ्रिकेत मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञामुळे. उत्क्रांतीच्या दृष्टीने चिपांझी माणसाच्या जवळची प्रजाती आहे. माणसाच्या उत्क्रांतीची पाळेमुळे समजून घेताना चिपांझींचं निरीक्षण उपयुक्त ठरू शकतं, असं लुईस यांना वाटायचं. पण चिपांझींचं पद्धतशीर निरीक्षण करण्यात कोणाला यश मिळालं नव्हतं. माणसाला इतर प्रजातींपेक्षा श्रेष्ठ समजणारे शास्त्रज्ञ अशा संशोधनाला महत्त्व देत नव्हते. चिपांझींचं निरीक्षण करण्याच्या प्रयोगासाठी असे कोणतेही पूर्वग्रह नसलेला एखादा संशोधक लुईस शोधत होते. याच दरम्यान त्यांचा परिचय जेनबरोबर झाला. सुरुवातीला जेन या लुईस यांच्या सेक्रेटरी म्हणून काम करू लागल्या. पण लवकरच त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि कार्यक्षमतेची कल्पना लुईस यांना आली आणि त्यांनी जेनची चिपांझींचे निरीक्षण करण्याच्या प्रयोगासाठी निवड केली. वयाच्या २६व्या वर्षी टांझानिया देशातील ‘गॉम्बे’ अभयारण्यात त्या पोहोचल्या. संशोधनाचा कुठलाही अनुभव नसलेल्या नवख्या तरुणीने सुरू केलेला हा प्रयोग जंगली प्राण्यांच्या निरीक्षणाचा सर्वात दीर्घकाळ चाललेला प्रयोग ठरला. जेन यांच्या संशोधनाने प्राणिजगताच्या संदर्भातल्या पूर्वग्रहांना धक्का बसला. प्राणिजगताकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन त्यांनी दिला.
चिपांझी ते पर्यावरण रक्षण
तंत्रज्ञानाचा वापर विचारपूर्वक करणं, भावभावना असणं हे फक्त मानवप्रजातीचं वैशिष्ट्य मानलं जायचं. जेन यांच्या काळजीपूर्वक निरीक्षणांनी हे चित्र बदललं. अन्न शोधताना चिपांझी पानांची, फाद्यांची अनघड ‘साधनं’ बनवून वापरतात, हे जेन यांच्या लक्षात आलं. म्हणजे चिपांझी प्राथमिक स्तराच्या ‘तंत्रज्ञानाचा’ वापर करायचे. जेन यांना चिपांझींचं सामाजिक वर्तनही जाणवलं. एकमेकांची काळजी घेणारे, मैत्री करणारे, तसेच काही प्रसंगी क्रूरपणे वागणारे, चिडून हिंसा करणारे चिपांझी त्यांना दिसले. मानवी टोळ्यांच्या वर्तनाशी समांतर दुवे दाखवणारं चिपांझींचं वर्तन होतं. जेन यांच्या संशोधनाने वैज्ञानिक जगतात खळबळ माजली. एका तरुण महिलेच्या संशोधनाच्या विश्वासार्हतेवर काही शास्त्रज्ञांनी शंका व्यक्त केली. मात्र जेनच्या तपशिलवार निरीक्षणांची दखल घेणं सर्वांना भाग पडलं. एकीकडे जेनच्या संशोधनामुळे चिपांझींच्या जगाबद्दल जागृती निर्माण होत होती. दुसरीकडे मात्र अनिर्बंध जंगलतोड, बेकायदेशीर शिकारींमुळे चिपांझींचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. माणूस आणि चिपांझींच्या डीएनएमध्ये ९८.६ टक्के समानता आहे, असं विज्ञान सांगत होतं. विध्वंसक मानवी वर्तन मात्र चिपांझींना नामशेष होण्याच्या वाटेवर ढकलत होतं.
१९८० च्या दशकात या धोक्याची तीव्रता जेन यांना प्रकर्षानं जाणवू लागली. त्यांनी पर्यावरणाच्या समस्येवर जनजागृती सुरू केली. त्याचबरोबर पर्यावरणासाठी कृतिकार्यक्रम राबवणाऱ्या संस्थांचीही त्यांनी स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या ‘जेन गुडॉल संस्थे’चं काम जगभरातील २५ हून अधिक देशांमध्ये चालतं.
लहान मुलांसोबत काम
लहान वयापासून निसर्गाबद्दल प्रेम जागृत करणाऱ्या त्यांच्या ‘रूट्स अँड शूट्स’ या संस्थेत जगभरातील १४० हून अधिक देशांमधील विद्यार्थी सहभागी आहेत. त्यांच्या लक्षणीय कामाची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाने २००२ साली त्यांची ‘शांतिदूत’ म्हणून निवड केली. याशिवाय इतरही अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
१९८० च्या दशकात कार्यकर्ती म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरू होता. १ ऑक्टोबर २०२५ ला निधन झालं, त्या दिवशी त्या अमेरिकेत लहान मुलांसोबत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार होत्या. त्यांना भेटण्यासाठी जमलेल्या मुलांना त्यांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा त्यांचे अश्रू अनावर झाले. मात्र जेन यांचं स्मरण करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. अखंड कार्यरत असलेल्या जेन यांना हीच समर्पक आदरांजली होती.
वैद्यकीय चाचण्यांसाठी प्राणीवापर नको
जेन गुडॉल यांचा समाजावर जो प्रभाव पडला त्याच्या अनेक बाजू शोधता येतात. चिपांझींच्या निरीक्षणातून सुरू झालेल्या त्यांच्या कामाने समग्र पर्यावरण रक्षणाच्या विषयाला कवेत घेतलं. त्यांच्या उदाहरणामुळे अनेक मुलींना पुरुषप्रधान मानल्या गेलेल्या क्षेत्रात संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. वैद्यकीय चाचण्यांसाठी चिपांझी किंवा इतर प्राण्यांना वापरू नये, यासाठी जेन यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कामामुळे अशा चाचण्या बंद करण्यात आल्या. प्राण्यांच्या हक्कांचाही विचार करायला त्यांनी भाग पाडलं.
विरोधी विचारांशी संवाद
जेन यांची भूमिका कायम वास्तवाला धरून असायची. लौकिक अर्थानं विरुद्ध गटातील माणसं जोडण्याचा, त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा त्या प्रयत्न करायच्या. चिपांझींसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करताना त्यांनी एका खासगी ऑइल कंपनीची मदत घेतली. शिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला आणि त्यातील काहींची साथ मिळवली.
स्थानिकांची सोबत
स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय पर्यावरण रक्षणाची मोहीम यशस्वी होणार नाही याचं त्यांना भान होतं. त्यामुळे त्यांनी स्थानिक लोकांचे प्रश्न समजून घेतले. त्यांच्याकडे लक्ष दिलं. यामुळेच त्यांच्या संस्थेला स्थानिक लोकांची मोलाची साथ मिळाली. जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, झपाट्याने नष्ट होणाऱ्या प्रजाती अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांना सामोरं जाताना जेन यांची सर्वसमावेशक संवादपद्धती मार्गदर्शक ठरते.
त्याचबरोबर शास्त्रज्ञांनी केवळ हस्तिदंती मनोऱ्यात न रमता आवश्यक प्रसंगी कार्यकर्त्याच्या भूमिकेत जाण्याचं महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केलं.
जेन गुडॉल यांचा प्रदीर्घ वैयक्तिक प्रवास आता थांबला आहे. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याची जबाबदारी आता नव्या पिढीच्या संशोधकांची, कार्यकर्त्यांची आणि त्याही पलीकडे संपूर्ण समाजाची आहे. n
writetosukalp@gmail.com