कांगारुनामा ! 
अक्षररंग

कांगारुनामा !

निसर्गसौंदर्याने नटलेल्या ऑस्ट्रेलियातील ‘कुरुम्बीयन वाईल्डलाइफ सँक्चुरी’ या प्रसिद्ध अभयारण्याच्या सफरीचे हे एक सुंदर शब्दचित्र आहे. यात तिथल्या सप्तरंगी पक्ष्यांचे आणि निसर्गाचे वर्णन करत, कांगारू प्राण्याच्या अद्भुत विश्वाची रंजक सफर घडवली आहे.

नवशक्ती Web Desk

जगतवारी

मेधा आलकरी

निसर्गसौंदर्याने नटलेल्या ऑस्ट्रेलियातील ‘कुरुम्बीयन वाईल्डलाइफ सँक्चुरी’ या प्रसिद्ध अभयारण्याच्या सफरीचे हे एक सुंदर शब्दचित्र आहे. यात तिथल्या सप्तरंगी पक्ष्यांचे आणि निसर्गाचे वर्णन करत, कांगारू प्राण्याच्या अद्भुत विश्वाची रंजक सफर घडवली आहे.

‘ऑस्ट्रेलियाला येऊन कांगारू, कोआला, इमू, प्लॅटिपस, वॉलबी, वोम्बॅट आणि तस्मानियन डेव्हील अशा फक्त आमच्या भूमीवरच आढळणाऱ्या प्राण्यांना भेट न देता जर तुम्ही परतलात, तर मायदेशी गेल्यावर मुकाट्यानं आपला पासपोर्ट अधिकाऱ्यांना परत करावा.’ गोल्ड कोस्ट या ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेल्या सर्फिंगकरता प्रसिद्ध अशा शहरातील एका पत्रकावरच्या या वाक्याला मला मनापासून दाद द्यावीशी वाटली. आम्ही तिथल्या कुरुम्बीयन वाईल्डलाइफ सँक्चुरीला भेट देण्यासाठी आवर्जून आलो होतो. हे अभयारण्य तिथे येणाऱ्या ‘रेनबो लॉरीकीट्स’ करता प्रसिद्ध आहे. पन्नास-शंभर नाही तर चक्क हजारोंच्या संख्येने या पोपटांचे थवे इंद्रधनुष्याचे सातही रंग लेवून इथे येतात. त्यांना दिवसातून दोनदा दाणा टाकला जातो. या अभयारण्यातच मी कांगारूंच्या कळपात शिरून, त्यातल्या एकाला गोंजारून, माझ्या ओंजळीतून खाऊ घातलं होतं, कोआलाला लहान बाळासारखा उचलून कडेवर घेतलं होतं, घुबडाला हाताच्या फांदीवर बसू दिल होतं आणि हे सप्तरंगी लॉरीकीट्स तर माझ्या डोक्यावरच बसले होते. साप-अजगराच्या वाटेला गेले नाही म्हणून, नाहीतर त्यांच्याशीही हस्तांदोलन करून आले असते.

१९४७ साली डॉ. अलेक्स ग्रीफथी यानं हे अभयारण्य सुरू केलं. खरं तर त्यांना मधुपालनाचा छंद होता. इथे येणारे हे रंगीबेरंगी पोपट त्याला खूप सतावत असत. त्याच्या फुलांची, फळझाडांची नासधूस करत. त्यांना दुसरीकडे वळवण्यासाठी त्याने ठराविक वेळी ही दाणा टाकायची युक्ती शोधून काढली. उदरभरण आटोपल्यावर हे पक्षी वनात निघून जात असत. आजतागायत सकाळी आठ आणि दुपारी चार वाजता शेकडो जंगली पोपट स्वतःहून खाली येतात. त्यांना माणसांची भीती कशी ती नाहीच. ‘घास भरवायला’ उभ्या असलेल्या पर्यटकांच्या हातावर, खांद्यावर आणि डोक्यावरही बिनधास्त बसतात. या अभयारण्यातील हे सर्वात मोठं आकर्षण आहे.

मिठूमीयाला काऊचिऊचा घास भरवून आम्ही पोटाच्या पिशवीत बाळ घेऊन टणाटण उड्या मारणाऱ्या कांगारूला भेटायला गेलो. कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय गौरव! तो त्यांच्या नाण्यावर असतो, गळ्यातल्या पदकांवर मिरवतो. क्वांटास ही त्यांची राष्ट्रीय विमानसेवा आपल्या शेपटीवर कांगारूचं चित्र घेऊन मिरवते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमला आपण कांगारूच म्हणतो. कांगारू या नावाच्या उत्पत्तीबद्दल एक मजेशीर कथा सांगितली जाते. १७७० साली जेव्हा कॅप्टन कुक ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर उतरला तेव्हा त्याने या पोटाच्या पिशवीत पाडस असलेल्या प्राण्याला पाहिलं. त्याने तिथल्या स्थानिक इसमाला इंग्रजीत विचारलं, “हा कुठला प्राणी?” त्याने उत्तर दिलं “कांगारू!” गुगु यिमिथिर या स्थानिक भाषेत त्याचा अर्थ असा होतो की “तू काय बोलतो आहेस हे मला समजत नाही.” कुकला मात्र वाटलं या खेडूताने प्राण्याचं नाव सांगितलं. १९७०च्या सुमारास भाषाशास्त्रज्ञांनी संशोधन करून ‘गांगुरू’ असा त्या नावाचा मूळ उद्गम शोधून काढला. स्थानिक भाषेत ग्रे कांगारूसाठी हा शब्द वापरला जातो. रेड, इस्टर्न ग्रे, वेस्टर्न ग्रे आणि अँटिलोपाइन हे कांगारूंचे मुख्य चार प्रकार आहेत.

युरोपियनांनी प्रथम दर्शनापासूनच कांगारूला ‘विचित्र’ ही पदवी बहाल केली. हरणासारखं डोकं असलेला, माणसासारखा दोन पायावर सरळ उभा राहणारा आणि बेडकासारखा उड्या मारणारा हा प्राणी विचित्र न वाटला तर नवलच! त्यातून एखाद्याच्या नजरेस दुरून ही ‘दोन डोक्यांची’ ओली बाळंतीण पडली असेल तर त्याचं चक्रावून जाणं स्वाभाविक आहे. पोटाच्या पिशवीत पाडस ठेवणाऱ्या कांगारूसारख्या प्राण्यांना म्हणतात ‘मार्सुपिअल्स’ आणि बछड्यांना म्हणतात ‘जॉई’. कांगारू जॉईची जन्मकथा खूपच रोमांचक आहे. अंडकोषातून बाहेर पडून गर्भाशयात पोहोचलेल्या अंड्यात प्राण फुंकले गेले की अवघ्या तेहतीस दिवसांत त्याचा जन्म होतो. दृष्टिहीन, अंगावर किंचितही लव नसलेल्या, आपल्या अंगठ्याच्या नखाच्या लांबीच्या या गोळ्याचे मागचे पाय तर अजून फुटलेलेही नसतात. पूर्णपणे अंध आणि गुलाबी रंगाचे हे पिल्लू जन्मानंतर स्वतःहून आईच्या अंगावरील केसांच्या आधारे रांगत रांगत पोटाच्या पिशवीत येऊन पडते. ही प्रसूती व्हायला अवघी तीन मिनिटे लागतात. पिशवीत असलेल्या चारपैकी एका स्तनाग्राला तोंड लावून ते दूधही प्यायला लागते. पुन्हा आईच्या अंडकोषातून दुसरं अंड गर्भाशयात येऊन पडतं. त्यातही जर बीज पडलं तर या आईकडे त्या गर्भाची वाढ तात्पुरती थांबवण्याची विलक्षण अशी निसर्गदत्त शक्ती आहे. इकडे पिशवीतल्या नवजात जॉईची दिसामाशी आश्चर्यकारक अशी वाढ होत असते. १९० दिवसांनंतर ‘मोठ्या’ झालेल्या या बाळाला पिशवीतून बाहेर पडण्याची परवानगी आईकडून मिळते. मात्र या स्वच्छंद लेकराचं पिशवीच्या आत आणि बाहेर तळ्यात-मळ्यात असं बागडणं चालू असतं. शेवटी, २३५ दिवस झाले की आईची पोटाची पिशवी आपल्या भावंडांसाठी रिकामी करून हा जॉई बाहेरच्या जगात कायमचा प्रवेश करतो. मात्र अठरा महिन्यांपर्यंत आईच्या दुधावरचा आपला हक्क सोडत नाही. कांगारूंच्या मादीला एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचं दूध तयार करण्याची शक्ती निसर्गानं दिली आहे. नवजात शिशुस लागणारं वेगळं आणि या मोठ्या बाळांसाठी वेगळं. गर्भाची वाढ गोठवण्याच्या शक्तीचा सुज्ञ उपयोग ही मादी दुष्काळात चाऱ्याची कमतरता असते तेव्हाही करते.

कांगारू हे ताजा चारा खाऊन जीवन जगणारे शुद्ध शाकाहारी प्राणी! त्याचे मागील दोन पाय पुढील पायांपेक्षा खूपच लांब असल्यामुळे त्याला चालताना आपल्या शेपटीचा उपयोग काठीसारखा करावा लागतो. पुढचे आखूड पाय टेकवायचे, शेपटीचा आधार घ्यायचा आणि मागचे पाय सरपटत पुढे ओढायचे असं थोडं रांगल्यासारखं असतं त्याचं चालणं. मात्र त्याचे मागचे बळकट स्नायुयुक्त पाय, त्यातली स्प्रिंगसारखी उसळी मारण्याची शक्ती आणि मोठी पावलं पाहिली की वाटतं याचा जन्म धावण्याकरताच झालाय. हे वेगानं धावणं शत्रूपासून बचावासाठी नसून चाऱ्याच्या शोधात लांबवर जाण्यासाठी आहे. त्यांना प्राणायामाची कलाही अवगत असावी. पाऊल जमिनीवरून उचलताच, फुफ्फुसातली हवा बाहेर फेकायची आणि पावलं जमिनीवर टेकवण्याआधी पुन्हा श्वास घेऊन ती भरून घ्यायची. अशानं त्यांची उड्या मारण्याची शक्ती अधिक कार्यक्षम होते.

कांगारू तसा लाजरा आणि एकांतप्रिय प्राणी, परंतु एकमेकांत त्यांची कुस्ती चालू असते. कधी खेळीमेळीत तर कधी ‘जोरू के वास्ते’! त्याच्या पुढच्या पायांचं ‘हस्तकौशल्य’ तर वाखाणण्याजोगं असतं. ठोसा देण्यापासून ते घट्ट पकडून झुंजण्याच्या त्याच्या हातोटीस तोड नाही. त्याच्या मागच्या पायांची जबरदस्त लाथ बसली आणि अणकुचीदार नखं आतड्यात घुसली तर तो प्राणी राम म्हणू शकतो. कांगारूंच्या कळपाला ‘मॉब’ का म्हणतात त्याचं उत्तर मला मिळालं होतं.

कांगारू हा पट्टीचा पोहोणारा. जीव वाचवण्यासाठी धावत धावत पाण्यात शिरण्याचा पर्याय तो पटकन निवडतो. शत्रू पाण्यातही त्याच्या मागे आला तर आपल्या पुढील पायाच्या मजबूत पकडीत त्याचं शरीर धरून, दाबून त्याला पाण्यात बुडवून मारू शकतो. २००३ मध्ये लुलु नावाच्या एका कांगारूला राष्ट्रीय प्राणी शौर्य पुरस्कार मिळाला होता. अनाथ झाल्यावर आपलं पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्याचे प्राण तिने वाचवले होते. त्याच्या डोक्यावर झाडाची फांदी पडून तो बेशुद्ध झाला असता लुलुने १५ मिनिटे सातत्याने मदतीसाठी विचित्र आवाज काढून त्याच्या कुटुंबाला त्या जागी ओढून नेले होते. मानवाप्रति असलेल्या कृतज्ञतेची ही एक हृद्य कहाणी!

ऑस्ट्रेलियातील रस्त्यांवरच्या चित्रचिन्हांमध्ये शाळा, हॉस्पिटल या ओळखीच्या चित्रांखेरीज धावणाऱ्या कांगारूचं चित्रही हमखास पाहायला मिळतं. इंजिनाच्या आवाजाने घाबरून किंवा गाडीच्या प्रखर प्रकाशझोतामुळे दिपून हे भेदरलेले कांगारू नेमके वेगाने जाणाऱ्या गाडीसमोर उडी घेऊन जखमी होतात. कांगारूंचं वजन आणि वेग दोन्ही जास्त असल्यामुळे दोन वेगवान गाड्यांची टक्कर व्हावी इतका हा अपघात घातक असतो. अशा अपघातात जखमी झालेल्या कांगारूंच्या उपचारासाठी कुरुम्बीयन पार्कमध्ये प्राण्यांचं एक इस्पितळ व पुनर्वसन केंद्र आहे.

सत्तावीस हेक्टर जंगलात हे पार्क वसवलंय आणि त्यात सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्षी मिळून चौदा हजार नमुने आहेत. या पार्कच्या आत आपण आलो की प्राण्यांच्या दुनियेत इतके हरवून जातो की बाहेरच्या शहरी जीवनाचा कोलाहल आपल्या कानापर्यंत पोहोचतच नाही. काही जागी तर इतकं घनदाट जंगल आहे की जमिनीपर्यंत प्रकाशाची तिरीपही पोहोचू शकत नाही. येथील ‘फिडींग शो’ माहितीपूर्ण तर आहेतच; पण त्यातील प्रेक्षकांचा सहभाग त्यांना अधिक रोमांचकारी बनवतो. मेलेल्या उंदराला त्याच्या शेपटीनं उलटं पकडून, उडत येणाऱ्या बहिरी ससाण्याला त्यावर झडप घालू देणं किंवा विषारी सर्पांना, अजगरांना स्पर्श करणं अशा धाडसी प्रकारांना दुरूनच नमस्कार करून मी निलगिरीच्या झाडावर मस्त पहुडलेल्या कोआलाला बघायला गेले.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

Mumbai : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना भेट; पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

बनावट दाखल्यांचा घोटाळा उघडकीस; महसूल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल