ग्लास पडला, पण... 
अक्षररंग

ग्लास पडला, पण...

तुमच्या घरात, शाळेत किंवा कारमध्ये दिसणारी मजबूत काच कशी तयार झाली, याचा कधी विचार केला आहे का? तिच्यामागे आहे एका हुशार संशोधकाची भन्नाट कल्पना!

नवशक्ती Web Desk

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

तुमच्या घरात, शाळेत किंवा कारमध्ये दिसणारी मजबूत काच कशी तयार झाली, याचा कधी विचार केला आहे का? तिच्यामागे आहे एका हुशार संशोधकाची भन्नाट कल्पना!

काय बालमित्रांनो, कशी चाललीय शाळा? आता तर बघता बघता चाचणी परीक्षासुद्धा जवळ आली असेल, नाही? सकाळची ती शाळेची पळापळ... आईने ग्लास किंवा कपामध्ये भरून दिलेलं दूध गटागट पिणं, काचेच्या बशीतला नाश्ता पटकन फत्ते करणं आणि बॅग पाठीवर मारून शाळेच्या दिशेने धावत सुटणं! या सगळ्या गडबडीत घरातले मोठे शंभरदा तरी ओरडत असतील- “अरे हळू! काचेच्या वस्तू नीट हाताळ, फुटेल ते!” कुणालाही इजा होऊ नये हीच त्यांची इच्छा असते. थोडं जपून वागलं की, सगळं कसं सोपं होऊन जातं!

आता आपल्या बेनेडिक्टचेच बघा ना! पार एकोणिसाव्या शतकात त्याने अवघ्या मानवजातीसाठी अशी काही कमाल करून ठेवलीय की, आपण आज एकविसाव्या शतकात एकदम निर्धास्तपणे कार चालवू शकतो, स्टायलिश गॉगल्स वापरू शकतो आणि बरंच काही! म्हणजे नक्की काय केलं बरं त्याने? चला, ऐका त्याची छानशी गोष्ट!

एड्वर्ड बेनेडिक्ट हा एक फ्रेंच चित्रकार, लेखक आणि संशोधक होता. भारी हरहुन्नरी माणूस बरं का! त्याने सुरेख नाटकं लिहिली, सुरेख चित्रं काढली आणि विज्ञानातले काही महत्त्वाचे शोधसुद्धा लावले. फ्रांसच्या असेंबली हॉलमध्ये त्या काळात त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. आजही त्याची चित्रं विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

गोष्ट आहे १९०३ ची! बेनेडिक्ट आपल्या प्रयोगशाळेत काम करत होता. अचानक त्याच्या हातातून काचेचा एक ग्लास निसटला आणि खाली जमिनीवर पडला!

"गेला ग्लास! आता काचांचे तुकडे सगळीकडे विखुरणार आणि पसारा होणार..." असा विचार करत तो खाली बघतो तर काय, त्याचे डोळेच विस्फारले! ग्लास फुटला तर होता, पण त्याच्या काचांचे तुकडे होऊन ते सर्वत्र उडालेच नाहीत! ग्लासला फक्त तडे गेले होते आणि काचेचे लहान-लहान तुकडे तिथेच चिकटून राहिले होते. विशेष म्हणजे ते तुकडे अजिबात धारदार नव्हते!

बेनेडिक्टला खूप नवल वाटले. त्याने तो ग्लास उचलून नीट निरखून पाहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, अरेच्छा! कालच तर आपण यात 'सेल्युलोइड नायट्रेट' म्हणजेच लिक्विड प्लास्टिक ठेवले होते. त्या द्रवाचा एक सूक्ष्म थर आत राहिला होता.

"म्हणजे ही सगळी कमाल या प्लास्टिकची आहे की काय?" बेनेडिक्टच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. पण मग तो इतर कामांत गढून गेला.

एक-दोन दिवसांत त्याने वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. गाडीच्या अपघातात काच फुटून लोक कसे गंभीर जखमी होतात, याबद्दल त्यात लिहिले होते. तो काळ कार निर्मितीच्या सुरुवातीचा होता. फोर्ड कंपनीची गाडी बाजारात येत होती. अपघातात गाडीची समोरची काच फुटली, तर काचेचे मोठे अन् धारदार तुकडे अंगावर उडून मोठा अनर्थ घडायचा.

बातमी वाचताच बेनेडिक्ट पुन्हा विचारात पडला आणि कामाला लागला.

एक दिवस सकाळी नाश्ता करताना सँडविच पाहताच त्याला एक भन्नाट शक्कल सुचली! त्याने दोन काचांच्या मध्ये प्लास्टिकचा एक थर (शीट) ठेवून 'सँडविच ग्लास' तयार केला. ही काच फुटली, तरी तिचे बारीक-बारीक बोथट तुकडे जागेवरच राहायचे. इकडेतिकडे उडत नव्हते आणि कोणाला जखमही करत नव्हते.

आणि मग काय... अशा प्रकारे जगातील पहिला 'सेफ्टी ग्लास' तयार झाला!

हा सेफ्टी ग्लास कार चालकांसाठी अक्षरशः 'जीवनदाता' ठरला. बेनेडिक्टने लगेच याचे पेटंट घेतले. पुढे जाऊन यात आवश्यक ते अनेक बदल झाले आणि उत्तम दर्जाचे सेफ्टी ग्लास तयार होऊ लागले.

आज आपण अत्यंत निर्धास्तपणे गाड्या चालवतो, खिडक्यांना काचा लावतो, स्वयंपाकघरात काचेच्या प्लेट्स वापरतो, इतकेच काय... अगदी गाडीच्या बुलेटप्रूफ काचांपर्यंत याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो!

सेफ्टी ग्लास बनवण्याच्या जरी अनेक पद्धती असल्या, तरी बेनेडिक्टची ती 'सँडविच' तयार करण्याची पद्धतच आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

पाहा ना, बेनेडिक्टच्या हातातून एका भल्या पहाटे अचानक काचेचा ग्लास खाली पडला... आणि त्यातून न फुटणाऱ्या काचेचा शोध लागला! आहे ना गंमत?

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

OCI कार्डधारकांना ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai : अंधेरी-घाटकोपर प्रवाशांना मोठा दिलासा; मेट्रो वन आता दर ३ मिनिटांनी धावणार

Mumbai : पदपथांच्या पाहणीत हयगय झाल्यास अभियंते जबाबदार; 'पादचारी प्रथम' या अभियानांतर्गत प्रशासनाचा इशारा

Mumbai : डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी जीवावर बेतली; कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू

Mumbai : मुलुंड येथील बेस्ट बस अपघात प्रकरण; चालकाविरोधात गुन्हा, बस पोलिसांच्या ताब्यात